पंढरीची गोष्ट
एक दिवस आई (सासुबाई) मला म्हणाल्या,” सुभद्रावहिनींनी तुला बोलावले आहे. येशील का ?”
“हो चालेल ना. जाऊया की.” मी म्हणाले.
अर्थात नेहमीप्रमाणेच कुटुंबातलं सुभद्रावहिनींशी आपलं नातं काय याचा गोंधळ माझ्या डोक्यात होताच. आईंना ते न सांगताच समजले.
“सुभद्रा वहिनी म्हणजे पंढरीनाथची पत्नी. पंढरीनाथ म्हणजे गोपाळचा मोठा भाऊ. नानांचा ज्येष्ठ मुलगा.”
ही सगळी लिंक सुद्धा ओपन करायला मला बराच वेळ लागला पण आलं लक्षात.
नाना म्हणजेच भिकाजीशेठ भांडारकर. आबांच्या (माझे सासरे) चार भावांपैकी दुसऱ्या नंबरचे मोठे भाऊ. पंढरी त्यांचा ज्येष्ठ मुलगा.
आई कधीकधी मला सांगत सुभद्रावहिनींबद्दल.
“ खूप रुबाब होता तिचा कुटुंबात. सर्वात मोठी सून म्हणून. तिला जर कधी बरं नसलं, प्रकृती अस्वस्थ असली तर तिचं जेवणाचं ताट माडीवर त्यांच्या खोलीत नेलं जायचं पण आता बघा काय अवस्था झाली आहे! पंढरीने असं नको होतं करायला. पदरात चार मुली, एक मुलगा. असा भरला संसार टाकून जाताना थोडा तरी विचार करायचा होता. निदान आपल्या मागे त्यांचं नक्की काय होऊ शकतं याची कल्पना तरी त्याने करायला हवी होती.”
“लक्ष्मी गल्ली” मधली सगळीच घरं तीन मजली. ऐसपैस, वाडा सदृश आणि या सर्वच घरांमधून भांडारकर कुटुंबाचं वैभवशाली एकत्र वास्तव्य. वास्तविक अमळनेर मध्ये या गल्लीला भांडारकर गल्ली असेच म्हटले जाते.
माझं लग्न झालं तेव्हा कुटुंब तसं बरंच विखुरलं होतं. मात्र आमच्या घराच्या समोरच्या इमारतीत वरच्या मजल्यावर सुभद्रावहिनी त्यांची मुले म्हणजेच शरद, माणिक, हेमा, चारू यांच्या समवेत राहत असत. सुभद्रावहिनींना मी ओझरतंच पाहिलं होतं. माझा त्यांच्याशी कधी फारसा संवादही झाला नव्हता. मात्र चारू, हेमा कधी खाली ओट्यावर येऊन माझ्याशी बोलायच्या. मलाही त्यांच्याशी गप्पा करायला आवडायचे. शाळेत शिकणाऱ्या या कुमारवयीन मुली अतिशय बुद्धिमान असल्या पाहिजेत इतके मात्र मला त्यांच्याशी बोलताना जाणवायचे पण त्याचवेळी त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर बापाविना वाढणारी मुलं म्हणून एक पोरकेपण त्यांच्या जीवनाला वेढलेलं आहे असं वाटायचं आणि त्याचं मला फार वैषम्य वाटायचं.एका वैभवशाली कुटुंबाचा तेही भाग होते मग असं का? हा प्रश्न मला नेहमी पडायचा. कधीकधी मी आईंना आडून,जरा बिचकतच विचारायची तेव्हा त्या म्हणायच्या,” असंच असतं ग बाई एकत्रात. हात अनेक पण सारी सूत्रं मात्र एकाच्या हातात. कुटुंबाची चाकं त्यांच्याच मर्जीने फिरणार. तसं म्हटलं तर पंढरीच काय सगळेच भरडले जात होते.आबांनी कमी समजावलं का आप्पांना? पंढरीची खूप बाजू त्यांनी मांडली पण शेवटी आबा धाकटेचना भावंडांमध्ये? त्यांचं कोण ऐकणार? मात्र आबांजवळ बुद्धी आणि संयम दोन्ही होतं. जेव्हा जेव्हा त्यांनी मांडलेले अनेक उपयुक्त प्रस्ताव डावलले गेले तेव्हा अक्रस्ताळेपणा अथवा माथेफिरुपणा न करता शांतपणे त्यांनी त्यांचे मार्ग मात्र आखले पण डोळ्यादेखत कुटुंबाची होणारी पडझड मात्र ते फारशी नाही रोखू शकले.”
माझ्यात आणि आईंच्यात होणाऱ्या संवादाची हीच गंमत असायची. सुरुवात एखादा वेगळाच विषय घेऊन व्हायची आणि तो विषय मागे राहून बोलणं दुसरीकडेच जायचं. खूप वेळा आईंचही बोलणं गूढ, अस्पष्ट असायचं. त्यात त्यांचा राग जाणवायचा, नाराजी डोकावयाची. त्यामुळेच सुभद्रावहिनी आणि पंढरीनाथ यांच्या सहजीवना विषयी, नात्याविषयी माझ्या मनात अनेक अनुत्तरीत प्रश्न उरायचे. विलास कडून मला पंढरी या व्यक्तीविषयी तसं बरंच कळलं होतं. त्याच्या बोलण्यात मात्र भाऊ म्हणून पंढरीविषयी प्रेम आणि अभिमान जाणवायचा.
“पंढरी खूप हुशार होता. रसिक होता.तो इतकं सुंदर गायचा! स्वप्नाळू तर होताच तो पण आयुष्याबद्दल त्याच्या काही स्वतंत्र कल्पना होत्या.त्याचं मन या कुटुंबात रमायचं नाही. त्याला काहीतरी वेगळं करायचं होतं. परदेशी जायचं होतं आणि त्यासाठी तो नानांजवळ म्हणजेच वडिलांजवळ पैसे मागत असे. म्हणून तो गृहद्रोही, भेदी, विभाजक ठरला. कोणीच त्याला समजून घेतलं नाही. संपूर्ण कुटुंब त्याच्या विरोधात. हळव्या मनाच्या पंढरीची ताकद कमीच पडली. तो आधी एककल्ली होताच पण त्यानंतर तो एका खोल कोषातच गेला असावा, कधी कधी खिडकीत बसून एकटाच गायचा, रडायचा, हिंसकही व्हायचा. घरातून पळून जाण्याच्या धमक्या द्यायचा तेव्हा घरातली ज्येष्ठ मंडळी त्याला घरात कोंडूनही ठेवायचे. नानांनी चाबकाने फोडलेही होते एकेकदा त्याला.खूप तंग वातावरण असायचं घरात. मात्र त्याच्या अंतरातला आवाज ऐकावा असं कुणालाही वाटलं नाही. त्याला सुधारण्याचे, त्याच्या विचारापासून परावृत्त करण्याची त्यांची हीच साधनं होती. एक वेळ अशी आली की दोन दिवस पंढरी घरीच आला नाही. संपूर्ण गावात शोधाशोध झाली. चव्हाट्यावर नाना चर्चाही घडल्या असतील. शेतावर राहणाऱ्या पावरीला (राखणदार) विहिरीजवळ काढलेल्या चपला आणि कपडे दिसले म्हणून त्यांनी विहिरीत डोकावले. पंढरीचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता.”
हीच ती पंढरीची गोष्ट माझ्या मनात आजही टोचत राहते. त्या काळाची मनावर साकारलेली अनेक चित्रं मग दृश्यमान होतात. गौरवर्णी, ठुसका आकर्षक बांधा सदैव जरीचं काठ पदरी चापून-चोपून नेसलेलं नऊवारी लुगडं, गळ्यात, हातात भरगच्च सुवर्णांचे अलंकार, बुद्धिमान रसिक स्वप्नाळू व्यक्तीची पत्नी, पाच मुलांची आई, मोठी सून. जेव्हा जेव्हा माझ्या मनात अशा सुभद्रावहिनींचा विचार येतो तेव्हा सहज वाटते की त्या आपल्या पतीला आत्मघातापासून का नाही परावर्तित करू शकल्या? त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी लागणारं धन त्या फक्त देहावरच का बाळगत होत्या? ते वापरण्याचा त्यांना अधिकार नव्हता का? त्या एका विशिष्ट काळाने त्यांना रोखलं असेल का असा निर्णय घेण्यापासून? याची समाधानकारक उत्तरे मला मिळालीच नाहीत. त्या काळाचं ते अवघड आव्हान त्या तेव्हा पेलवू शकल्या असत्या तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचं चित्र निराळं नसतं का?
मला नेहमीच वाटतं की उणीवा, त्रुटी, कमतरता भरून काढण्याचं सामर्थ्य स्वतःतच असायला हवं. परिस्थितीपुढे हार मानून सहानुभूती मिळवत जगणं हे जीवन उजळवणारं कसं ठरेल?
त्यादिवशी ठरल्याप्रमाणे मी आणि आई सुभद्रा वहिनींना भेटायला गेलो. थोरल्या जाऊबाई म्हणून त्यांना मी वाकून नमस्कार केला. त्यांनी माझ्या पाठीवर हात फिरवला. आम्हाला बसायला चटई अंथरली. चुलीजवळ असलेल्या शिशवी पाटावर त्या खुरमांडी घालून बसल्या. हेमाने आणि चारुने चहा पोहे बनवले. आम्ही आल्यामुळे त्यांचे चेहरे खूप आनंदले होते. आई आणि सुभद्रावाहिनी बोलत होत्या. मी फक्त ऐकत होते. कारण त्या दोघी ज्या अनेक विषयांवर बोलत होत्या ते सारे विषय माझ्यासाठी अनोळखी, परके होते. मात्र मध्येच सुभद्रावहिनी माझी दखल घेत, “घेगं! चहा घे, साखर घालू का अजून? पोहे ही घे बरं का? आवडतात नं तुला? का गं ! तू मुंबईची, तुला अमळनेरला आवडतं का?” असं काहीबाही अगदीच जुजबी पण बोलत होत्या.
तास दीड तासाने आम्ही घरी परत आलो पण सुभद्रावहिनींच्या त्या भेटीत मला सतत जाणवला तो त्यांच्या चेहऱ्यावरचा कधीही न मिटणारा उपहास. त्यांच्या स्मितहास्यामागे दडला होता फक्त उपहास.मला उगीचच वाटले, त्यांच्या संपूर्ण देहावर काळाने मारलेल्या चाबकाचे अदृष्य वळ आजही आहेत.
गेल्या ५० वर्षात कुटुंबात मी पाहिलेले अनेक चेहरे विझले असले तरी माझ्या अंतर्मनाने टिपलेल्या त्या कृष्णधवल छटा मात्र अमीट आहेत. अजूनही प्रश्नांकित आहेत.
क्रमश:

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800