“शैलपुत्री“
आज २२ सप्टेंबर; पासून नवरात्रीस आरंभ होत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया देवीच्या सर्व रूपांची माहिती.
आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
उपासना, प्रार्थना, पूजा,नैवेद्य हा त्या त्या देवीच्या आवडता बनवला जातो, शिवाय माळ सुद्धा तिला आवडणाऱ्या खास फुलांची लावली जाते.
भारतीय परंपरेत नवरात्राच्या उत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. हे दिवस अगदी मंतरल्यासारखे असतात. याची तयारी आधी काही दिवसांपासून केली जाते. घरादाराची, मंदिरांची धुवून पुसून, रंगरंगोटी करून स्वच्छता केली जाते, सजावट केली जाते. झेंडुची फुले, हार, विविध साहित्यांनी ,वस्तूनी बाजारपेठ फुलली जाते .
महाराष्ट्र, गुजरात, बंगाल, उत्तरप्रदेश वगैरे ठिकाणी तर या दिवसात लोकांच्या उत्साहाला जणू उधाणच येते. गरबा, दांडिया,असे विविध कार्यक्रम ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात, जोशात साजरे केले जातात. हस्त नक्षत्राचे स्वागत भोंडला किंवा भुलाबाईची गाणी गाऊन अगदी लहान मुलींपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण करतात. महिलावर्गाची तर धावपळ, धमाल विचारायलाच नको. बऱ्याच महिला, पुरुष नऊ दिवस व्रत, उपवास करतात. अशा या उत्सवाची माहिती करून घेऊ.
नवरात्रातील देवींच्या नऊ रूपाना दुर्गेची नऊ रुपे असेही ओळखले जाते . त्यातील प्रथम दिवशीच्या पहिल्या रूपाला ‘शैलपुत्री’ असे संबोधले जाते .ती दक्ष राजाची कन्या होती . तिचे नाव सती होते .पार्वतीचेच रुप ! तिचे शंकरावर खूप प्रेम होते ,पण ते दक्ष राजाला मान्य नव्हते . पण त्यांचा विरोध नं जुमानता तिने शंकराशी विवाह केला होता. त्याचा दक्षाला खूप राग आला.त्यांनी त्यांचे सर्व संबंध तोडले .
एकदा दक्षराजानी खूप मोठा यज्ञ करण्याचे ठरवले . सर्व देव देवताना आमंत्रण दिले पण शंकर आणि सतीला आमंत्रण दिले नाही . जेंव्हा ही गोष्ट सतीला समजली तेंव्हा तिने शंकराकडे हट्ट धरला की आमंत्रण नसले तरीही आपण जाऊच.लेक,जावईच आहोत , त्यानिमित्ताने बहीण ,आई आणि सर्वांची भेट होईल. कदाचित सर्व विसरून माफ करतील आणि आपले संबंध छान होतील .पण शंकराने नकार दिला त्यामुळे ती थोडीशी नाराज झाली ,पण तिने स्वतः जाण्याचे ठरवले . मग शंकरानेही तिला अडवले नाही .यज्ञाच्या वेळी ती एकटीच माहेरी गेली .तिचे कोणीही स्वागत ,आदरातिथ्य केले नाही ,उलट तिची , शंकराची चेष्टा केली.अपमान केला .त्याचे सतीला खूप वाईट वाटले .यज्ञ सुरु असतानांच सर्वांसमक्ष तिने यज्ञ कुंडात उडी घेतली आणि भस्म झाली .

ही गोष्ट शंकराला समजतांच त्याला खूप दुःख झाले आणि सतीच्या विरहात खूपच व्याकूळ होऊन हिमालयात तपश्चर्येसाठी निघून गेला . अशी ही शैलपुत्रीची कथा आहे . हरितालिकेच्या कहाणी मध्ये याचा उल्लेख आहे.
शैल म्हणजे पाषाण , कातळ ,दगड ! आणि पुत्री म्हणजे मुलगी ,कन्या ! तिची आराधना ,पूजा केल्यामुळे आपले मन खडकाप्रमाणे खंबीर ,दगडाप्रमाणे निश्चल होते . सर्वत्र भरकटणारे मन स्थिर होते असा समज आहे . तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फुल आहे . त्रिशूळाने पापी , दुष्ट लोकांचा नाश करते तर कमळ हे शांती , समृद्धी यांचे प्रतिक आहे .खंबीरपणा तिच्या या रूपात दिसून येतो . तिचे वाहन वृषभ आहे . म्हणूनच तिला ‘ वृषोरूढा ‘असेही म्हटले जाते . तिला शुभ्र रंग आवडतो म्हणून तिला पांढऱ्या शुभ्र वस्त्रानी, फुलांनी सजवले जाते .ही सती , भवानी माता , हेमवती , पार्वती अशा नावांनीही ओळखली जाते. ती हिमालय कन्या असल्यामुळे तिला शुभ्र रंग आवडतो. शिवाय तिच्या सात्विक रूपाला,स्वभावाला हा रंगच शोभून दिसतो. हिचे वाहन सुद्धा पांढरा नंदी आहे. हिला पहिली माळ पिवळ्या रंगाच्या शेवंती किंवा सोनचाफा, तिळाच्या फुलांचीही लावली जाते. तसेंच साजूक तुपात बनवलेल्या शिरा,हलवा अशा पदार्थांचाही नैवेद्य आवडतो.
तिला गायीच्या दुधापासून बनवलेला कलाकंद खूप आवडतो .म्हणून शैलपुत्री देवीला पहिल्या दिवशी कलाकंदाचाही नैवेद्य दाखवला जातो .
तिला प्रसन्न करण्यासाठी पुढील मंत्र म्हणून तिची मनापासून प्रार्थना केली जाते .
वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम् ।
वृषारुढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम् ॥
-या देवी सर्वभूतेषु माँ शैलपुत्री रूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:
आजच्या दिवशी घराघरात , मंदिरात माती मध्ये सप्तधान्य पेरून घट बसवले जातात . नऊ दिवस त्या घटात दररोज एक फुलांची माला सोडली जाते. नऊ दिवस अखंड तेलाचा दिवा तेवत ठेवला जातो .म्हणून आजच्या नवरात्रीच्या पहिल्या दिवसाला घटस्थापना असे म्हणले जाते .आजच्या दिवसापासून गरबा ,दांडिया ,भोंडला असे खास कार्यक्रम मोठया उत्साहात ,जोशात साजरे करतात. तसे हे नऊ रंग, साड्या,अलंकार हे या दिवाशीच्या ग्रहांच्या रंगानुसार घातले जातात. हे परिधान करण्यामुळे त्या ग्रहाचा आपल्यावर छान परिणाम होतो,असे मानल्यामुळे सर्वजण आजच्या दिवशी पांढरी वस्त्रे, विशेषतः महिला या रंगाच्या साड्या नेसतात. चला ,मग आपणही नवरात्री जोशात साजरी करूया .

— लेखन : सौ.स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800