Saturday, October 18, 2025
Homeलेखप्रसंगी वाचत जावे…

प्रसंगी वाचत जावे…

नुकताच, १५ ऑक्टोबर रोजी वाचनदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने वाचू या, वाचनाचे किती फायदे आहेत ते !
— संपादक

आजकाल विविध प्रकाराने वाचन होते. छापील पुस्तकांचे वाचन, अभिवाचन, ऑनलाईन वाचन, चाळणे, रेंगाळणे आदी.या सर्वात विचारमंथन हा प्रकार कुठे तरी हरवत चालला आहे,असे वाटते. कारण वाचलेले, मनन करून, चिंतन केल्याने ज्ञान वाढते. त्यानंतर बैठकीत चर्चा करणे, विषयाचे आकलन करणे महत्वाचे ठरते.

आताशा लोक आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे लगेच इन्टरनेटवर शोधतात. बराचशी माहिती गोळा करतात. त्यातून निवड करताना कुठेतरी निर्णय क्षमतेची उणीव भासते. वाचायचा कंटाळा करणारे विडिओच्या माध्यमाने एका कानाने ऐकतात, दुसर्‍या कानाने सोडून देतात. इन्टरनेट, सोशल मिडिया इतका पसरलाय की समाजाचे काय व्हायचे ते होऊ देत. आज मोबाईल हातात आल्यावर मनोवृत्तीत बिघाड करणारे जणू अनेक विकल्प आहेत. शिवाय वेळेच्या कसोटीत नेमके काय आणि कसा निग्रह करावा ही कदाचित आजच्या पिढीसाठी सुद्धा अतिशय चिंताग्रस्त बाब आहे.

पूर्वी पुस्तक प्रकाशित करणे इतके सोपे नसायचे. आता त्याचा सुद्धा व्यापार झालाय. वर सेल्फ पब्लिशिंगची कल्पना आली आहे. जो तो लेखक होतो. त्यामुळे कुणीही, कुठलेही विचार, कशाही पद्धतीने पुस्तकात छापत आहेत. त्यावर ते अधिक संख्येने वाढावे याकरिता सोशल मार्केटिंगचे ऑनलाईन कोर्सेस चालत आहेत. पुस्तकविक्री केन्द्र, ऑनलाईन अ‍ॅप च्या माध्यमाने पुस्तकांची धूम विक्री होत आहे. वाचणारे नेमके काय वाचत आहेत आणि तेच ते पुन्हा पुन्हा इतर माध्यमातून ऐकवत आहेत, दाखवत आहेत. कुठेही शिस्त राहिलेली नाही कारण कुठल्याही बाबतीत, कुणालाही, कुठलीच पाबंदी नाही.

आपल्याकडे मोठ्या थोऱ्यांनी आपल्यावर लहानपणापासून एक विशिष्ट प्रकाराने वाचनाचे संस्कार केले आहेत. त्यामुळेच तर आपल्या पिढीला अजूनही वाचनाकडे ओढ आहे. एखादे पुस्तक वाचायला घेत असताना जणू त्या वाचकाचे विश्वच वेगळे होवून जाते. पुस्तकाची नस हाती लागली की बस. त्याचा कस निघेपर्यंत ते पुस्तक पूर्णत्वाला येत नाही तोपर्यंत चैन पडत नाही. लेखक – वाचकाच्या गाठीभेटीत असे वाटते जणू ते दोघे एकाच नावेचे प्रवासी. आपल्या आवडलेल्या पुस्तकांबद्दल एखाद्याशी चर्चा करून त्या विचारांची देवाणघेवाण करताना वाचकाला नकळत पण एक विशिष्ट समाधान मिळते. एकमेकांशी व्यक्त होताना नकळत भाषेची शुद्धता, विचारांची सुस्पष्टता, शब्दाशब्दातून जाणवते. नियमित वाचनाने ज्या त्या विषयाचे गांभीर्य लक्षात येते. विचारांना दिशा मिळते, मन-मस्तिष्कावर साचलेल्या प्रश्नांची उत्तरे सापडतात आणि तेव्हाच अनेक पैलू असलेल्या या गूढ जीवनाचे कोडे हळूवार सुटतात.

विविध विषयांवर, विविध प्रकाराची पुस्तके उपलब्ध असली तरी वाचकांच्या आवडी निवडी असतातच. शालेय शिक्षण घेताना विद्यार्थ्यांचा सर्वांगी विकास व्हावा याहेतूने बुद्धीला कसणारे गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, भाषा, नागरिक शास्त्र या विषयांवर स्पर्धात्मक दृष्टीने सखोल अभ्यास व्हावा हा त्यामागचा उद्देश्य. पण तरी या काटेकोर नियमात सगळेच बसतील असेही नाही. त्यांनाही वाचनाची गोडी लागावी म्हणून शालेय वाचनालयात किंवा इतर सामाजिक संस्थेच्या वाचनालयामुळे दुर्लभ असलेले विषय सामोरी आले. ज्ञानात वाढ होण्यास अशीच सुरुवात झाली. पुस्तक एकमेकांस भेट दिली जायची. लहानश्या घरात सुद्धा पुस्तकाची जागा असायची. बस स्टॉप, रेल्वे स्थानकावर विविध प्रकाराची सुशोभित मुखपृष्ठ असलेली मासिके मिळायची, जिथे तिथे पुस्तकांचे स्टॉल असायचे. सतत बडबड करण्या ऐवजी वाचनकरणे ही एक शिस्तबद्धता. प्रवासात वेळ घालवायला पुस्तकांसारखे दुसरे काहीच नाही. आपण भाग्यवान आहोत की कम्प्यूटर व इन्टरनेट यायच्या पूर्वीचा काळ आपण पाहिलाय. आपली आवडनिवड असून योग्यायोग्यचा निर्णय घेण्याची क्षमता विकसित होण्यामागे पुस्तकांचा पूरेसा कार्यभाग आहे.

आपली पिढी आहे तोपर्यंत तरी आपला देश पुस्तकांवर अवलंबून असेल याला दुमत नाही. परदेशात शिक्षक शाळेत कम्प्यूटरवर अभ्यास घेतात याचे त्या पालकांना कौतुक वाटते पण इन्टरनेटवर सर्च केल्याने मुलांचे ज्ञान समृद्ध होत नसून बोटांचे कार्य बटन दाबण्यापुरते मर्यादीत रहाते. मुलांना फारसे लिहीता येत नाही. चित्र काढता येत नाही. त्या काळजीपोटी ते एक्स्ट्रा एक्टिव्हीटी मध्ये मोटर स्किल डेव्हलप करण्याचे वेगळे कोर्सेस घेत आहेत. न्यू जनरेशन डेव्हलपमेंटच्या नावाखाली आपल्या देशातही अशा प्रकारे आधुनिकीकरण यायला फारसा वेळ लागणार नाही.

लहान मुलांना समज यायच्या आधी रट्टा मारून लक्षात ठेवणे हा शिस्तीचा भाग असून खरा मेंदूचा व्यायाम आहे. जो ऋषींच्या काळांपासून चाललेला आहे. पण जेव्हा पासून लिहिण्याची सुरुवात झाली, ग्रंथांची उत्पत्ती झाली. वाचनशैली विस्तृत झाली. तो संपन्न समाजाचा, नैतिक बांधिलकी जपणारा उत्कृष्ट काळ होता. आज कितीही फास्ट लाईफ असली तरी ओवन मधल्या पिझ्झा पेक्षा तव्यावरची पोळीच बरी वाटते. व्यायामात जीमपेक्षा योगाच योग्य वाटतो. कारण मशीन पेक्षा स्वतः स्वतःचे उचललेल्या पावलात हवा तो बदल घडविण्याचे सामर्थ्य असते.

आजुबाजुचे जग कितीही बदलले तरी पुस्तकांच्या गुणवत्ता बाबत आजही लेखकावर समाजाची जबाबदारी आहे. दर्जेदार पुस्तकांची निर्मीती झाली तर अधिकाधिक ज्ञानात वाढ होईल. नवीन पिढी सुद्धा वाचन-लेखनाकडे वळेल. भाषेचा आढावा घेऊन ज्ञानकौशल्य वाढवणारी पुस्तके अधिकाधिक यायला हवीत.

शेवट ऐवढेच
“गुगल-बिगल वर नको हरवू भान
तना-मनात, बुद्धीत रुजू दे ज्ञान..”

— लेखन : सौ. दिपाली वझे. बेंगळूरू
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

ॲड.श्रध्दा बापूसाईनाथ राऊळ. आरवली.. on माणसांच्या गर्दीतूनी या…!!
संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप