Wednesday, December 31, 2025
Homeलेखमाझी जडण घडण : ६९

माझी जडण घडण : ६९

“टॅली”

आयुष्यात दोन वेळा मला प्रेमाचं, सावलीचं, आनंदाचं घर सोडावं लागलं. पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर. एक वात्सल्याचा मायेचा उंबरठा ओलांडून नवऱ्याबरोबर जीवनाची वेगळी जबाबदारीची वाट चालण्यासाठी आणि दुसऱ्यांदा निवृत्तीनंतर. ज्या बँकेत मी नोकरी करत होते जवळजवळ ३५ वर्षे त्या उबदार परिवाराला अलविदा करताना. ऑफिसची चौकट ओलांडताना झालेला भावनांचा ओहळ निराळा असला तरी मनावर आलेलं जडत्व तेच होतं.

माझ्या नोकरीच्या काळात माझी ऑफिस मधली प्रतिमा हसरी, आनंदी, कुठल्याही कामाचा कधीही ताण न घेणारी, सर्वांशी अगदी चतुर्थश्रेणीतल्या कर्मचाऱ्यांशीही मित्रत्त्व जोडणारी, खेळकर, खोडकर आणि कधी अंतर्गत मॅनेजमेंटशी मतं जुळली नाहीत तर जोरदारपणे भांडण करणारी, मुद्देसूद बाजू मांडणारी निडर आणि अजिबात पडतं धोरण न स्वीकारणारी अशी होती.

मी काही वर्ष मुंबईतल्या राष्ट्रीयकृत बँकेतही काम केलं होतं आणि लग्नानंतर निवृत्त होईपर्यंत “देना बँक” नवी पेठ जळगाव, या शाखेत काम केलं. इथे मात्र माझे सहकर्मचार्‍यांशी आणि बँकेत येणार्‍या ग्राहकांशीही खरे स्नेहसंबंध जुळले. अर्बन भागात काम करण्याचा अनुभव खूप वेगळा आणि माझ्या जडणघडणीत योगदान देणारा ठरला असे म्हटले तर ते योग्यच ठरेल.

मुंबईत जाणवणारे सॅफिस्टिकेशन, पोशाखीपणा, दूरस्थपणा “देना बँक” नवी पेठ जळगाव ब्रांच, मध्ये कधीच जाणवला नाही. मला तिथे काम करत असताना नेहमीच एका परिवारात असलेला आपलेपणा जाणवला. याचा अर्थ असाही नव्हे की तिथे वाद नव्हते, हेवेदावे नव्हते, भांडण नव्हती, स्पर्धा नव्हत्या, २०/२५  माणसं जेव्हा एकत्र काम करतात आणि तेही उदरनिर्वाहासाठी, संसाराचा रथ ओढण्यासाठी तेव्हा समर्पितपणापेक्षा स्वार्थीपणा, चढाओढ असणं स्वाभाविकच आहे, पण ते जर मर्यादित  रेषांमध्ये असेल तर ते तसं हिंसक किंवा कोणाचे जीवन पालथं करणार ठरत नाही.

इथे मी बँकिंग क्षेत्रातले कामासंबंधीचे संबंध आणि काम संपल्यानंतरचे निर्माण झालेले वैयक्तिक संबंध दोन्हीही अनुभवले. सुरुवातीला तर मला आश्चर्य वाटायचे की सकाळी हे दोघेजण मॅनेजरच्या केबिनमध्ये जाऊन एकमेकांविषयी जोरजोरात तक्रारी करत होते आणि संध्याकाळी कामाची वेळ संपल्यानंतर ऑफिस बाहेर रस्त्यावर लागलेल्या गाडीवर जाऊन गळ्यात गळे घालून “चना जोर गरम” खायचे.

आमच्या वेळेचं बँकिंग हे मॅन्युअल होतं. तेव्हा संगणक नव्हते. ते अगदी माझ्या नोकरीच्या उत्तरार्धात आले पण तोपर्यंत मोठमोठ्या जड आणि जाड लेजर्स मधून आम्हाला ग्राहकांच्या खात्यात होणारी रोजची उलाढाल हाताने लिहून दिवसा अखेर संपूर्ण, प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये झालेल्या डेबिट क्रेडिटचा ताळा (Tally) करावा लागायचा. वेगवेगळ्या लेव्हलवर वेगवेगळी माणसं काम करायची. एक प्रकारचे सामूहिक काम असतं ते. पुन्हा एकाची छोटीशी चूक सुद्धा दिवसाअखेर क्लोजींगवेळी ज्याला आम्ही “डे  बुक” म्हणायचे ते टॅली करताना त्रास व्हायचा पण यातूनच एक सहकार्याची वृत्ती स्टाफमध्ये जोपासली गेली असल्यामुळे आमच्या बँकेत त्या दृष्टीने अत्यंत खेळीमेळीचं वातावरण असायचं. अर्थात ज्याने कोणी चूक केली असेल ज्याच्यामुळे कामात समस्या आणि व्यत्यय निर्माण झाला असेल त्याच्याकडून पेनल्टी वसूल केली जायची. पेनल्टी म्हणजे काय “एक कटिंग चहा”.  घरी तुम्ही पीत असाल चांदीच्या कपात चहा पण इथे या वातावरणात अगदी कडेला कपची उडालेल्या छोट्याशा कपातून ओसंडून बशीत सांडलेला चहा सुद्धा अमृततुल्य वाटायचा.

आमच्या ब्रांच मध्ये एक “नवीन शहा” नावाचा कर्मचारी होता. तसा तो अतिशय हुशार होता पण अत्यंत कंजूष होता. वास्तविक आम्हा सर्वांचे *पे स्केल* कमी अधिक प्रमाणात सारखेच होते पण नवीनची राहणी अतिशय गबाळी, गलिच्छ असायची. आठवडाभर तो एकच शर्ट पॅन्ट घालायचा. त्याच्या पायातली चप्पल दहा वर्षांपूर्वीची असायची. किंबहुना मी त्याच्या पायात कधीही नवीन चप्पल पाहिलीच नाही. तो बँकेपासून तसा दूरच काही अंतरावर राहायचा पण पायी यायचा आणि पायी जायचा. मी त्याला एकही दिवस रिक्षात पाहिले नाही. त्याच्याकडे साधी सायकलही नव्हती आणि असून उपयोग काय त्याला सायकलही चालवता येत नव्हती. ऑफिसमध्ये त्याने कधीही कोणाला एक कप चहा सुद्धा पाजला नाही. त्याचं अक्षर अतिशय गिचमीड, दहा शब्दातल्या लेखनातही चार-पाचदा खोडलेले, ओव्हरलॅपींग वगैरे. चुका नसायच्या पण त्याचं रजिस्टर चेक करणे म्हणजे करणाऱ्याची डोळेफोड, कसोटी असायची. अर्थात या त्याच्या ढिसाळ व्यक्तिमत्त्वामुळे ऑफिसात त्याची खूपच टिंगल व्हायची. सारे जण त्याची मजा घ्यायचे. त्याला वाटेल तसे बोलायचे पण नवीनमध्ये कधीच फरक पडला नाही. तो तसाच राहिला. त्याने कधीच कोणाकडे लक्ष दिले नाही. पण एक मात्र होतं, त्याला तीन मुलगे होते आणि तिघेही अतिशय हुशार होते. ते तिघे बारावीला मेरीटमध्ये आले होते. नंतर मेडीकलला गेले. ओपन कॅटेगीरी मध्ये गुणवत्तेच्या आधारे त्यांना प्रवेश मिळाला होता. त्यावेळी मात्र त्याने स्टाफला पेढे  वाटले.

काही वर्षांपूर्वी त्याचा मोठा मुलगा मला पुण्यात भेटला होता. आता तो एक प्रख्यात युरोलॉजिस्ट आहे. त्याने केलेल्या एका अवघड किडनी स्टोन शस्त्रक्रियेची गिनीज बुक मध्ये नोंद झालेली आहे. मी त्याला लहानपणापासून ते विद्यार्थीदशेत पाहिला होता. पण आज तो माझ्यासमोर एका निराळ्याच शायनिंग व्यक्तिमत्त्वात उभा होता. खूप गप्पा झाल्या आमच्यात. खरं म्हणजे त्यानेच मला ओळखले. नाहीतर मी त्याला ओळखूही शकले नसते.
तो सांगत होता, ते तिघेही भाऊ अत्यंत सुस्थितीत आणि आलिशान घरात सध्या राहत आहेत. अर्थातच मी नवीन ची चौकशी केली तेव्हा तो म्हणाला, “जिंदगीमे पापाने कभीभी खुद के लिए कुछ नही किया, कुछ नही खरीदा। हमारे एज्युकेशन और वेल्फेअर के लिए जिंदगीभर कडी मेहनत की। मनको मारते रहे लेकिन हमे काबिल बनाया
“लेकीन अभी तो खुश होंगे ना ?” मी विचारले.
“खुश तो है लेकीन हमारे साथ नही रहते। मम्मी पप्पा अभी भी जलगाव मे ही छोटे घर मे रहते है। ना उनकी लाइफस्टाइल चेंज हुई ना उनकी स्वभाव चेंज हुवा।”
ते नेहमी म्हणतात, “मी माझं ध्येय पूर्ण केलं. मला पुरेसं पेन्शन मिळतं. मला तुमच्या जीवावर वेगळं, मजेत, ऐषाआरामाचं आयुष्य नाही जगायचं. ये मेरी जिंदगी है । अलग होगी पर अपनी है। मै खुश हूँ।”

गबाळा, गलिच्छ, कंजूष नवीन. तो चूक की बरोबर हे माहीत नाही पण आज मला वाटतं आपण एखाद्याबद्दल आधीच का जजमेंटल होतो ?

बँकेत काम करत असताना अशाच काही वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तींच्या आयुष्याच्या खिडकीतून जीवन बघण्याचा अनुभव नक्कीच विलक्षण आणि कधीही न विसरण्या सारखाच होता.

“रमेश पांडे” नावाची एक व्यक्ती अशीच लक्षात राहिली आहे. बँकेच्या पायरीला नमस्कार केल्याशिवाय कधीही आत न येणारे, भिंतीवर त्यांनीच लावलेल्या गणपतीच्या फोटोला रोज हार घालणारे, आणि पूजा केल्यानंतरच कामाला सुरुवात करणारे एक अत्यंत धार्मिक व्यक्तिमत्त्व. कामात अतिशय हुशार आणि परफेक्ट. अडीअडचणीतल्या, नाडलेल्या कुणालाही यथाशक्ती आर्थिक मदत करायचे. खिशात असलेल्या चिटोर्‍यांवर कुणाला किती पैसे दिले याचा हिशोब ठेवायचे. पण कधी त्याप्रमाणे वसुलीसाठी धडपडलेले आठवत नाहीत. या त्यांच्या सवयीमुळे कित्येक वेळा महिनाअखेरीस त्यांच्या शीलकेत फक्त शून्य असायचं. गंमत म्हणजे त्यांच्या पत्नीनेही कधी त्यांना टोकल नाही, राग धरला नाही. पतीच्या या परोपकारी वृत्तीत तीही विना कुरकुर कशी काय सहभागी असायची याचे मला नेहमी आश्चर्य वाटायचे. एकदा मी त्यांना म्हणालेही होते, ”काय हो ! तुम्ही काय स्वत:ला टाटा बिर्ला समजता का ?” तेव्हा ते फक्त हसले होते. म्हणाले होते, ”श्रींची इच्छा!”

बँकेतले बहुतेक धार्मिक सोहळे विशेषतः “गणेश स्थापना” वगैरे त्यांच्याच पुढाकाराने पार पडत. आम्ही सारे वर्गणी देत असू परंतु त्या व्यतिरिक्तही झालेला खर्च पांडे स्वतःच करायचे. शिवाय रोजचा प्रसाद त्यांच्याच घरून यायचा.

आमच्या बँकेसमोर एक व्याधीग्रस्त भिकारी अत्यंत घायाळ अवस्थेत असताना त्याला उचलून रिक्षात घालून पांडेंनी स्वत: त्याला सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. बँकेच्या वेळात किंवा वेळेनंतर ते रोज त्याला भेटायलाही जात. एक दिवस तो भिकारी मेला आणि त्याचे अंत्यसंस्कारही पांडेनी केले. अशी पांडेंसारखी निस्वार्थी, सेवाभावी माणसे पडद्यामागेच असतात पण स्वतः मात्र आतून समाधानी असतात. याच पांड्यांच्या धाकट्या मुलाला रेल्वे अपघातात पाय गमवावा लागला. तेव्हाही ते शांतपणे एकच वाक्य म्हणाले, ”श्रींची इच्छा !” सामान्य माणसातली ही स्थितप्रज्ञता कुणालाही थक्क करणारी होती. मला आठवतं त्यावेळी माझ्या मनात आलं होतं की अशा धर्मात्म्याच्या बाबतीतही देव कुठेतरी न्याय द्यायला चुकला का ?, पण पांडेंचं एकच वाक्य “श्रींची इच्छा!” यात स्वीकृतीचं एक महान अध्यात्मिक तत्त्वच नव्हतं का दडलेल ?

मात्र कुठेतरी थेंबाथेंबाने गोळा केलेलं हे पुण्य त्यांच्या मुलांच्या बाबतीत – अजित, अतुल आणि अभयच्या आयुष्यात समृद्धीसाठी नक्की कामी आलं.
निवृत्तीनंतर पांडे मुलांच्या भरभराटीच्या संसारात स्वाभिमानाने आणि सुखात राहिले. त्यांच्या शेवटच्या दिवसात मी त्यांना भेटायला गेले होते. घरीच होते ते. तेव्हा उमादेवी (त्यांची बायको) प्रेमाने त्यांची दाढी करत होती. खरं सांगते त्या दिवशी त्या दोघांना तसं पाहताना मला साक्षात “शिवपार्वतीचे दर्शन” झाल्यासारखे वाटले.

असं खूप काही लिहिण्यासारखं आहे. मला निवृत्त होऊन सतरा वर्ष  झालीत. अनेक सहकर्मचारी आज या जगात नाहीत. पण जे आहेत ते बर्‍यापैकी संपर्कात आहेत. मग खूपवेळा आठवणींना उजाळा मिळतो. आमच्या वेळचे इअर्लि क्लोजींग, त्यावेळचे खानपान, कामाच्या तणावातली हास्यमस्करी, चांगले वाईट विक्षिप्त मॅनेजर्स, काही नाजूक गुपितं आणि खूप काही. पण एकच सांगते, या नोकरीच्या निमित्ताने मला अशी अनेक माणसे भेटली. मनाच्या कोपऱ्यात त्यांना मी टिपत गेले आणि सामान्यातलं असामान्यत्व पाहताना मीही नकळत वेगळ्या प्रकारे पुन्हा पुन्हा घडत गेले. माझ्यातले लेखन गुण खरं म्हणजे तिथेच विकसित झाले. ऑफिसमध्येच वाया गेलेल्या, फाडलेल्या, निरुपयोगी अनेक कागदांवर मी कितीतरी कथा लिहिल्या. सोनार नावाचा एक शिपाई हे असे विखुरलेले कागद गोळा करून माझ्या टेबलवर ठेवायचा. म्हणायचा, ”मॅडम लिहा आता. भरपूर कागद आहेत”.

निवृत्तीनंतर बेरजा वजाबाक्या, क्रेडिट डेबिट च्या व्यावहारिक कागदी जीवनातून बाहेर पडताना म्हणूनच मला खूप उदास वाटलं होतं.
क्रमशः

राधिका भांडारकर

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”