“प्रेमचंद” भाग २
‘ठाकुर का कुंआ’ ही प्रेमचंद यांची स्पर्श अस्पृश्य, उच्च-नीच भेदभाव व सामाजिक विषमता या वास्तवावर आधारित मर्मस्पर्शी कथा आहे. या कथेत भारतीय स्वातंत्र्यापूर्वीचे चित्रण प्रेमचंद यांनी केलेले दृष्टीपथास येते. भारतीय समाजरचना वर्णावर आधारित आहे. या मध्ये माणसाची श्रेष्ठता आणि कनिष्ठता ही त्याच्या कर्मावर नसून जन्मावर आधारलेली आहे. म्हणून व्यक्तीच्या कर्माला महत्त्व नसून त्याच्या जन्माला महत्त्व दिले जाते. तो कोणत्या जातीत जन्मला, उच्च की नीच, दलित, अस्पृश्य, आदिवासी की सवर्ण याला महत्त्व दिले जाते. खरं म्हणजे माणसाच्या सदगुण व सत्कर्माला महत्त्व पाहिजे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की भारतीय समाजात असे घडताना दिसत नाही. प्रस्तुत कथेच्या माध्यमातून लेखकाने अस्पृश्य समाजाची पिण्याच्या पाण्याची समस्या किती तीव्र व भयावह आहे याचे चित्र रेखाटले आहे. कथा पात्र- ‘जोखु’ आणि पत्नी ‘गंगी’ चरित्रा द्वारे या समस्येवर प्रकाश टाकला आहे. गावात सवर्णांसाठी वेगवेगळ्या समाजाच्या विहिरी आहेत परंतु अस्पृश्य समाजासाठी गावाबाहेर दूर विहिर आहे. जिथे गरजेच्या व रात्रीच्या वेळी जाणे कठीण आहे. सवर्णांच्या विहिरीवर पाणी भरण्यास अस्पृश्यांना मनाई आहे.आजही अनेक गावांमध्ये दलितांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्यास सख्त मनाई आहे. यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. हे आपण जाणतोच आहे.
या कथेच्या माध्यमातून प्रेमचंद यांनी आणखी एका गोष्टीचा उलगडा केला आहे की तत्कालीन समाजात सेठ, सावकार, पंडित एकापेक्षा एक चांगले लोक आहेत. जे चोरी-चकारी, जालसाजी, फरेब, धोखाधडी, भेसळ करणारे, खोटे धंदे करणारे आहेत. म्हणून त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही. हेच मोठेपणाचा आव आणणारे लोक गरीबांची मजूरी देताना मात्र आनाकानी करतात. प्रेमचंद यांनी अत्यंत सहज, सरळ, सोप्या व प्रभावी भाषेत सजीव चित्रण केले आहे. जे वाचकांच्या काळजाला हात घालणारे आहे. या वास्तववादी कथेच्या माध्यमातून लेखकाने सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच समाज परिवर्तनाचा संदेश दिला आहे.
ही कथा आजही तितकीच सुसंगत व प्रासंगिक आहे. कारण जातीभेद, विषमता आणि अन्याय, अत्याचाराचे प्रश्न पूर्णपणे नाहीसे झालेले नाहीत. त्यामुळे “ठाकुर का कुंआ” ही कथा भारतीय समाजाचा आरसा आहे. तसेच मानवी समतेचा संदेश देणारी साहित्यिक कलाकृती आहे.
प्रेमचंद यांची ‘बुढी काकी’ ही कथा मध्यमवर्गीय परिवारातील सदस्यांचे आपल्या वृद्धांच्या प्रति होत असणारे दुर्लक्ष व अवहेलना याचे दर्शन घडवते. ही कथा आदर्शोनमुखी आहे. तसेच ती वृद्धांच्याप्रती परिवारातील सदस्यांचे आपल्या वृद्धांच्या प्रती असलेले कर्तव्य दर्शविते. बुढीकाकीचा पुतण्या ‘बुद्धीराम’ व पत्नी ‘रूपा’ हे दोघे आपल्या काकीच्या संपत्तीवर मौज मजा करतात. एके दिवशी त्यांच्या घरी मुलाच्या साखरपुड्याचे भोजणाचे आयोजन होते. घरात आलेली सगळी पाहुणे मंडळी जेवून आपापल्या घरी निघून जातात. रूपा आणि बुद्धीराम दोघेही रात्री झोपते वेळी कार्यक्रमाविषयी चर्चा करत असताना त्यांना असे जाणवते की बाहेर उकिरड्यावर काहीतरी खटपट होत आहे. तेव्हा ते उठून बघतात तर तेथे ‘बुढीकाकी’ भुकेने व्याकुळ होऊन पात्रावर असलेली उष्ठावळी शोधून खात असते. हे दृश्य पाहून ‘बुधिराम’ आणि ‘रूपा’ यांना पश्चाताप होतो आणि त्यांनी आपल्या काकीकडे केलेले दुर्लक्ष याची जाणीव होते. तेव्हापासून दोघेही पुढे काकीची चांगल्या प्रकारे काळजी घेतात.
‘नशा’ व ‘ईदगाह’ या बाल मनोविज्ञानावर आधारित कथा आहेत. विशेषतः प्रेमचंद यांची ‘ईदगाह’ ही कथा बाल मनोविज्ञानावर आधारित सर्वश्रेष्ठ कथा आहे. घरातील गरिबी व आर्थिक दारिद्र्य कशाप्रकारे परिणाम करते याची प्रचिती प्रस्तुत कथेत पाहावयास मिळते.
मातृ-पितृहिन ‘हमीद’ची आजी ‘अमिना’ दळण कांडण करून सांभाळ करत असते. रमजानच्या ईदच्या दिवशी यात्रेत खर्चण्यासाठी आजी हमीदला तीन पैसे देते. हमीद आपल्या मित्रांसमवेत दिवसभर यात्रेत फिरतो. त्याचे मित्र मिठाई खातात, झोके खेळतात, खेळणी विकत घेतात आणि मोज मजा करतात परंतु हमीद त्यांच्याकडे मोठ्या लालसेने बघतो व काहीच खरेदी करत नाही. त्याचे मित्र त्याला खूप चिडवतात परंतु तो ते सर्व सहन करतो आणि नेहमी आपल्या खिशातील तीन पैसे खिशातच आहेत का कुठे हरवले याची चाचपणी करत राहतो. घरी परतत असताना हमीदला एक भांड्याचे दुकान दिसते. तेथे त्याला चिमटा दिसतो. त्याला लगेच आठवण येते की आपली आजी भाकरी शेकत असताना तिचे हात भाजतात म्हणून तिच्यासाठी आपण चिमटा खरेदी केला पाहिजे. हमीद मोलभाव करून चिमटा खरेदी करतो. घरी आल्यावर हमीदने आजीसाठी आणलेला चिमटा बघून हमीदला बालवयातच आलेले प्रौढत्व बघून ती अत्यंत हळवी होते. त्याला आपल्या छातीशी कवटाळून घेते. तिचे हृदय हेलावून जाते व हमीदला खूप खूप आशीर्वाद देते.
या कथेतील कुतूहल, रोचकता आणि संवेदनशीलता पाठकांच्या मनाचा ठाव घेते. कथेतील पात्र त्यांचे संवाद अत्यंत सजीव, सूक्ष्म, व्यंग्यात्मक असल्याने कथा प्रभावी ठरते. कथेची वर्णन शैली अत्यंत स्वाभाविक असून ती पाठकांना कथेच्या उद्देशाप्रत नेते.
वरील काही कथेच्या आढाव्यानंतर कादंबरीचा विचार करणे ही क्रमप्राप्त ठरते. प्रेमचंद यांच्या सेवासदन, प्रेमाश्रय, निर्मला, गोदान, गबन आणि रंगभूमी ह्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत.

‘सेवा सदन’ ही कादंबरी मुख्यतः वेश्यांच्या जीवनावर आधारित आहे. तसेच ती भारतीय स्त्रीची परावलंबिता,असहाय्यता, तिचे आत्मबलिदान, पती व परिवाराची सेवा हेच तिचे कर्तव्य आहे.अशी धारणा भारतीय संस्कृतीने स्त्री मनावर बिंबवली आहे. ही कादंबरी समाजातील भयावह हुंडा पध्दतीवर आधारित मर्मस्पर्शी कथा आहे. हुंडा पद्धती समाजाला लागलेला कलंक आहे.
‘सुमन’ कादंबरीची मुख्य नायिका आहे. जीचा विवाह एका विवाहित पुरुष-गजाधर सोबत केला जातो. आपल्या विलासी वृत्तिमुळे ती वेश्यावृत्ति पत्करते. शेवटी समाजात चहुबाजूने अपमानित, प्रताडीत होऊन समाजातील विधवा, बालविधा, परित्यक्ता, असहाय व विशेषतः वेश्यांसाठी एक ‘सेवासदन’ स्थापित करुन अशा महिलांना चांगले संस्कार देऊन समाजात मानसमन्मान मिळवुन देण्याचे महत्वपूर्ण समाज सेवेचे कार्य करत असते. तसेच ही कादंबरी अत्यंत प्रामाणिक व इमानदार असलेल्या पोलीस खात्यातील व्यक्तीला भ्रष्टाचार करण्यासाठी ही व्यवस्था कशी बळी पडते याचेही मार्मिक चित्र उपस्थित करते. ही कादंबरी वेश्यांच्या जीवनातील विवंचना, विडंबना व त्या विरुद्ध केलेल्या प्रतिक्रियेचे जीवंत चित्रांकन आहे. तद्वतच ही कादंबरी भारतीय समाजातील स्त्रियांसंबंधी अंधविश्वास, रूढी परंपरा शिक्षित समाज कशाप्रकारे बाळगतो याचेही वास्तविक चित्रण प्रेमचंद ने केले आहे. समाजातील अनेक शिक्षित श्रीमंत लोक आचरणाने अत्यंत पुराणमतवादी आहेत याचेही दर्शन ही कादंबरी घडवते. या कादंबरीची भाषा अत्यंत रोचक, स्वाभाविक, सरळ, प्रवाहमय व वाचकांना प्रभावित करणारी आहे.

प्रेमचंद यांची ‘गोदान’ ही कादंबरी महाकाव्यात्मक आहे. तशीच ही शेतकऱ्यांच्या ऋणग्रस्त जीवनावर आधारित विश्व प्रसिद्ध कादंबरी आहे. प्रस्तुत कादंबरी ‘पुस की रात’ या कथेचा विस्तार आहे.
भारतीय शेतकऱ्याच्या जीवनातील विविध समस्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. गोदान मध्ये एकीकडे रावसाहेब, मिल मालिक खन्ना, मालती आणि मेहता यांची वेगळी उच्च जीवनशैली आहे. हा पांढरपेशा वर्ग शोषकवर्गाचे प्रतीक आहे. तर दुसरीकडे होरी, धनिया, गोबर, सोमा आणि हिरा यांचे दारिद्र्य पूर्ण व आर्थिक अभावग्रस्त, हलाखीचे जीवन जगणाऱ्या शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गाचे प्रतिनिधी चरित्र आहेत. जमीनदार व सेठ सावकारांद्वारे शेतकऱ्यांचे कशा पद्धतीने शोषण केले जाते. याचा जिवंत दस्तावेज म्हणजेच ‘गोदान’ ही कादंबरी आहे. सामाजिक अंधविश्वास, अनिष्ट रूढी परंपरा यांचाही संकेत ही कादंबरी देते. गावातील लोकांचे एकमेकांशी असलेले वैरभाव अत्यंत सजगतेने लेखकाने टिपले आहे. तसेच स्त्री-पुरुष अनैतिक संबंधांचे सुद्धा चित्रण कादंबरीत पहावयास मिळते. हिंदू परंपरेनुसार गोदान करणे शेतकऱ्याचे श्रेष्ठ कार्य समजले जाते परंतु होरीला जीवनभर शक्य होत नाही. परंतु मृत्यू समयी त्याची इच्छा पूर्ण केली जाते.

‘सेवासदन’ या कादंबरीनंतर ‘निर्मला’ व ‘गबन’ प्रेमचंद यांच्या ‘स्त्री समस्या प्रधान’ कादंबऱ्या आहेत. निर्मला ही कादंबरी वेगवेगळ्या पती-पत्नीची वेगवेगळी कथा दर्शविते. जसे की उदयभानुलाल व कल्याणी, भालचंद्र व रंगीली बाई, डॉक्टर व सुधा, तोताराम व निर्मला या स्त्री-पुरुष पती-पत्नी व अनैतिक संबंध याचे दर्शन घडवते. तसेच अनमेल विवाहामुळे (वृद्धपती व तरुण पत्नी) उद्भवणाऱ्या लैंगिक समस्यांचे चित्रणही प्रेमचंद यांनी मोठ्या कुशलतेने केले आहे. ‘गबन’ ही कादंबरी प्रामाणिक व इमानदार कार्यालयीन कर्मचारी आपल्या पत्नीच्या अवास्तविक, भौतिक गरजा पूर्ण करण्याच्या लालसेपोटी व तिच्या अट्टाहासापायी कार्यालयातील रकमेची कशा पद्धतीने चोरी करतो आणि त्याला जेलमधून सोडवण्यासाठी पत्नी कशा पद्धतीने अनैतिकतेचा वापर करते याचाही संकेत प्रस्तुत कादंबरीत सांकेतिक होतो.

सारांश रुपाने असे सांगता येईल की प्रेमचंद यांनी आपल्या संपूर्ण कथा, साहित्याच्या माध्यमातून भारतीय समाज व्यवस्थेचे बखुबी चित्रण केले आहे. महाजन, सावकार, जमीनदार व कारखानदार यांच्याकडून समाजातील शेतकरी, श्रमिक, कामगार व कर्मचारी यांचे शोषण केले जाते. तसेच कौटुंबिक कलह, पारिवारिक संबंध, नैतिक-अनैतिक संबंध, आपसी तणाव, समाजातील अंधविश्वास, रूढी परंपरा, कर्मकांड, बुवाबाजी, शिक्षित-अशिक्षित वर्गातील लोकांचे आचार-विचार, भ्रष्टाचार, अशिक्षित लोक, बेरोजगारी, राहणीमान, वेशभूषा, भाषा-संस्कृती, धर्म, रीती-नीती, शहरी व ग्रामीण संस्कृतीचे जीवंत दर्शन म्हणजेच प्रेमचंद यांचे कथा साहित्य होय. म्हणून प्रेमचंद यांच्या विषयी असे म्हणता येईल की प्रेमचंद हे एक हिंदी साहित्यातील अद्वितीय कथा साहित्यकार आहेत. त्यांनी हिंदी साहित्य विश्वातच नव्हे तर जागतिक स्तरावर आपले स्थान निर्माण केले आहे.म्हणून त्यांचे हिंदी साहित्याच्या क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांच्या साहित्यावर अनेक जणांनी पीएचडी पर संशोधन केले असून काही चित्रपटही तयार करण्यात आले आहेत.
असा हा थोर साहित्यिक ८ ऑक्टोबर १९३६ रोजी इहलोकीची यात्रा संपवून गेला. या साहित्य सम्राटला कोटी कोटी प्रणाम.

— लेखन : प्रा.डॉ.एम.डी.इंगोले. गंगाखेड जि. परभणी
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
