“बुम ला पास”
३ बहिणींच्या भेटीतील सर्वात चित्तथरारक भेट ठरली ती, “बुम ला पास”ची. डोळ्याचे पारणे फेडणारे नैसर्गिक सौंदर्य, डोंगर, दऱ्या, दूरवर दिसत राहणारे क्षितिज, वळणावळणाचे रस्ते, मध्ये दिसणारे तलाव यामुळे तवांग शहरापासून ३७ किलोमीटरवर, १५,२०० फूट उंचीवर असलेल्या या ठिकाणी जाण्यासाठी छोट्या जीपमधून करावा लागणारा प्रवास खूप रोमांचक आणि आनंददायी होतो.

तवांग येथून जसजसे आपण पुढे जाऊ लागतो, तसतसे आपल्या लष्कराचे अस्तिस्त्व आपल्याला दिसू लागते. हा इतका दुर्गम आणि संवेदनशील भाग आहे की, मध्ये थोड्या थोड्या वेळाने चहा, कॉफी तेथील वातावरणानुसार, आवश्यक असलेल्या वस्तूंची विक्री आदी सर्व बाबी लष्कराकडूनच पाहिल्या जातात. एका ठिकाणी तर सदिच्छा म्हणून लष्करातर्फे मोफत चहा देण्यात येतो. हा भाग संवेदनशील असल्याने छायाचित्रण करू नये, अशा सूचना ठीकठीकाणी देण्यात आलेल्या आहेत.
बुम ला पास म्हणजे जिथे भारत आणि चीन मध्ये १९६२ साली प्रत्यक्ष युद्ध झाले होते, ती युद्धभूमी होय. तिबेट मधून दलाई लामा याच मार्गाने भारतात आले होते. त्यामुळे १९६२ च्या भारत- चीन युद्धादरम्यान चिनी सैन्याने याच खिंडीतून भारतावर हल्ला केला होता. त्यामुळे याच ठिकाणी युद्ध पेटले होते. भारतीय लष्करी अधिकारी आणि जवान शहीद झाले होते.
दोन्ही देशांमध्ये जेव्हा केव्हा काही वादाचे मुद्दे उपस्थित होतात, तेव्हा याच ठिकाणी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये बैठका होतात. त्यामुळे हे ठिकाण बऱ्याचदा आपल्याला बातम्यांमध्ये ऐकायला, पहायला मिळत असते.

आमच्या पासची सर्व व्यवस्था टूर ऑपरेटर ने केलेली असल्यामुळे, त्यासाठी आम्हाला काही कष्ट घ्यावे लागले नाहीत. बुम ला पास इथे गेल्यागेल्या लक्ष वेधून घेतो तो, आपला उंच उंच अभिमानाने, डौलाने फडकणारा राष्ट्रध्वज आणि त्याच्या अलीकडे मोठ्या अक्षरात उंचावर लिहिलेले “बुमला पास” हे शब्द.

इथे एक प्रकारचे वाट पहात बसण्याचे ठिकाण म्हणजे लष्करी कॅन्टीन आणि स्टोअर. आलेल्या सर्वांना एकदम सीमेवर न सोडता गटागटाने सोडतात. तिथे गेल्या गेल्या, सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी तैनात करण्यात आलेला जवान आपल्याला आपले मोबाईल बंद करण्याची किंवा फ्लाईट मोडवर ठेवण्याची सूचना देतो त्याचे कारण असे आहे की, तिथे भारतीय मोबाईलचे नेटवर्क नाहीय चिनी नेटवर्क आहे. त्यामुळे आपला मोबाईल हॅक होऊन आपण अडचणीत येऊ शकतो.
हा जवान आपल्याला बुम ला पास चे ऐतिहासिक महत्व, १९६२ चे युद्ध या विषयी खड्या आवाजात, उमदेपणाने माहिती देतो. त्यानंतर विचारलेल्या प्रश्नांना देखील योग्य ती उत्तरे देऊन आपले शंका निरसन करतो.
इथून आपल्याला पलीकडे उभे असलेले चिनी सैनिक, त्यांच्या हालचाली सहज दिसत असतात. इतक्या कमी अंतरावर ते असतात.
या जवानाचे ऐकून झाल्यावर आणखी पुढे, जवळपास प्रत्यक्ष सीमेजवळ आपल्याला आपल्या गटासोबत जाऊ देतात. तिथे लष्करातर्फेच आपला एकट्याने किंवा जोडीने फोटो काढण्यात येतो. अर्ध्या तासात आपल्याला त्या फोटोची प्रत मिळते.

हे ठिकाण खूप उंचावर असल्याने, आमच्यातील काही पर्यटकांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना इच्छा असुनही फार पुढे, वर न येता कॅन्टीन मध्ये बसून राहावे लागले. बहुतेक पर्यटकांकडे, दिलेल्या सूचनेनुसार कापूर होताच म्हणा.
बुमला पास वर किती आणि कसा वेळ गेला, याचे आपल्याला भान रहात नाही. पण पुढचा गट वाट पहात असल्याची आपल्याला जवानांकडून आठवण करून दिली जाते आणि इच्छा नसताना आपल्याला तिथून पाय काढता घ्यावा लागतो.

बुमला पास (तवांग) ला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे मे ते ऑक्टोबर या महिन्यातील कालावधी होय. पुढे नोव्हेंबर ते एप्रिल या काळात मुसळधार बर्फवृष्टी, शून्यापेक्षा कमी तापमान, कठीण हवामान यामुळे बर्फ व रस्ते बंद राहतात आणि हा प्रदेश दुर्गम होतो.
इतक्या दुर्गम, खडतर वातावरणात, जीवावर उदार होऊन आपले जवान २४ तास डोळ्यात तेल घालून देशाचे आणि पर्यायाने आपले रक्षण करीत असतात हे पाहून त्यांच्याविषयीच्या कृतज्ञतेने आपले मन भरून जाते. तर दुसरीकडे त्यांच्याच जीवावर आपण किती सुरक्षित, सुखासीन आयुष्य जगत असतो हे लक्षात येऊन आपले मन कानकोंडे देखील होते. जयहिंद.
क्रमश :

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— काही संदर्भ : गुगल
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 986948480
