भारतीय चित्रसृष्टीतील दिलीपकुमार नावाचं अभिनयाचं जादुई वादळ आज कायमचं काळाच्या पडद्याआड विसावलं. लातूर येथील जेष्ठ पत्रकार श्री जयप्रकाश दगडे यांच्या पत्रकारितेच्या प्रदीर्घ प्रवासातील एक अविस्मरणीय क्षण म्हणजे त्यांनी दिलीपकुमार यांची समक्ष घेतलेली मुलाखत. ही मुलाखत त्यांनी फेब्रुवारी 1987 मध्ये लातूरच्या विश्रामगृहावर घेतली होती. आजही ताज्या वाटणाऱ्या, या मुलाखतीतून उलगडत गेलेला हा दिग्गज कलाकार …….
“मेरा रोम- रोम हिन्दुस्थान की मुहब्बत का कर्जदार है……’
एखाद्या दमदार मैफलीत धीरगंभीर दरबारी कानडा उलगडत जाताना अंगावर जसे रोमांच उभे राहतात, तीच अनुभूती ! आणि हा भरदार आवाजही कुणा ऐरागैऱ्याचा नव्हे…गेल्या पाच पिढ्या सातत्यानं हिंदी सिनेमाचा पडदा सळसळत्या चैतन्याने भारुन टाकणाऱ्या या आवाजाचा धनी होता अभिनयाचा अनभिषिक्त शहेनशाह दिलीपकुमार !!
बॉलिवूडमधील ठोकळेबाज स्टारपुत्रांचा गल्लाभरू ढिशाॅव ढिशाॅव सार्वत्रिक बाजार मांडला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘दिलीपकुमार‘ नावाचं एक वादळ कैक वर्षांपासून इथं घोंघावतं आहे. हा मनस्वी अभिजात कलावंत लातूरला हजरत सुरत शहावली दर्गा कमिटीच्या एका कार्यक्रमानिमित्त येणार असल्याचं कळताच मी फार आग्रहानं संयोजक प्रदीपभाऊ राठी यांना, त्यांच्या भेटीसाठी गळ घातली. राठींनी आनंदानं दिलीपजींशी बोलून ती व्यवस्था केली. मी दुसर्या दिवशी सकाळीच धावत पळत डाकबंगला गाठला.
त्या डाकबंगल्याला एका आभाळाएवढ्या उंचीच्या अभिनय सम्राटाचे पाय लागले होते. त्यांच्या समवेत होत्या त्यांना जीवनभर साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी व सुप्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानो.
आवडत्या कलावंताला मनाजोगतं भेटायला मिळावं, याचाही आनंद काही औरच. दिलीपकुमारना भेटायला जाताना (आणि आदल्या रात्री इथल्याच ‘अश्वमेध’ हाॅटेलवर झालेल्या शाही खान्याच्या वेळीही) मला माझा बार्शीचा जीवलग दोस्त (तत्कालीन आमदार व माजी मंत्री) दिलीप सोपल आठवत होता. सोपलही दिलीपकुमारचा फॅन ! सोपलांच्या बरोबर मी बार्शीत लता चित्रमंदिरमध्ये दिलीपकुमार च्या ‘गंगा जमना’ ची कितीतरी पारायणं केली. थिएटर मालक मदनसिंह चौहान मित्रच असल्यानं कधी तिकीट काढल्याचं स्मरत नाही. त्या स्वप्नाळू वयात आम्हां दोघांनाही ‘गंगा जमना’ जवळपास पाठच झाला होता म्हणा ना ! दोस्तांच्या मैफलीत गप्पा मारताना कधी सोपल ‘गंगा’ होत, आम्ही ‘धन्नो ‘ ! जुगलकिशोर तिवारी साथीला असले, तर ते कन्हैयालाल होत.
डागबंगल्यावर सकाळी दिलीपकुमारना भेटलो. डोक्यावर जाम टेन्शन होतं. मुळात प्रश्न हिंदीतून होते, उत्तरं मिळाली 90 टक्के फाड्फाड् इंग्रजीत.
पहिलाच प्रश्न मी त्यावेळचे खासदार शहाबुद्दीन यांच्या एका वादग्रस्त विधानाच्या अनुषंगानं केला. परंतु तो उल्लेख दिलीपजींना अप्रस्तुत वाटला असावा….छोडो भाई…कुछ कला के बारेमें पूछो…मैं कलाकार हूं…पॉलिटिशियन नहीं…अशी त्यांची रिॲक्शन होती. मी मग ‘स्टारसन्स’ कडं वळलो.
‘काही स्टारपुत्र सिग्निफिकंट आहेत. पण माझ्याही पेक्षा तुमचं मत महत्वाचं. सिनेरसिकांनीच त्यांच्याबद्दलचं मत ठरवलेलं बरं….’ असं जुजबी उत्तर दिलीपकुमारांनी दिलं. व्हिडिओ पायरसीमुळं सिनेक्षेत्राचं अतोनात नुकसान होतंय्, हे मान्य करुन दिलीपजी पुढं म्हणाले, ‘सिनेमा, टीव्ही, वृत्तपत्रं ही सगळी अत्यंत सशक्त माध्यमं आहेत. राष्ट्राच्या प्रगतीसाठी ही माध्यमं फार फार उपयुक्त आहेत. आपला मानसिक, बौद्धिक, शारीरिक, शैक्षणिक आणि आर्थिक व सामाजिक- सांस्कृतिक विकास साधण्यासाठी ही माध्यमं तशाच जबरदस्त ताकदीनं हाताळली गेली पाहिजेत. जगातल्या कुठल्याही देशापेक्षा आपल्या देशासाठी व्हिडिओ चा वापर आपण कितीतरी पटीनं अधिक प्रभावीरीत्या करु शकू. पण लोकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी या माध्यमाची ताकद आधी ओळखली पाहिजे. पण आज काय दिसतं आहे ? केवळ चित्रपट दाखविण्यापुरतं हे माध्यम सवंगपणे हाताळलं जावं, हे दुर्दैव नव्हे काय ? एक अर्थानं व्हिडिओ वरदानही ठरु शकेल. पण तो शाप ठरण्याची भीतीच आज वाटू लागलीय्.’
इतकं लांबलचक भाष्य सुरु असताना दिलीपकुमार च्या सहजसुंदर लकबी हालचालीतून डोकावत होत्याच. कसलं तरी वाॅल हँगिंग त्या सूटमध्ये होतं. त्याकडं एकटक बघत हाताच्या बोटांचा हनुवटीशी चाळा चाललेला… मधूनच कपाळावर बोटानं खाजविण्याची ती प्रसिद्ध दिलीपकुमार स्टाईल. वा : !
आपण आपलं आत्मचरित्र लिहिण्यास अनुत्सुक आहात, असं मध्यंतरी वाचनात आलं होतं. आपला हा निर्णयच असेल, तर तो दुर्दैवी ठरेल आमच्यासाठी. कारण शांतारामबापूंचं ‘शांतारामा’ परवाच प्रसिद्ध झालंय्. बापू काय, आपण काय, आपल्या सारख्यांची आत्मचरित्रं म्हणजे भारतीय चंदेरी पडद्याचा चालता बोलता इतिहासच ! पण आत्मचरित्र लिहायचं नाही, असं तुम्हाला का वाटतंय् ?..माझा हा प्रश्न लांबलचक होता खरा, पण दिलीपकुमार यांनी एवढंच सांगितलं…’कभी दिल कहता है लिखो..कभी कहता है मत लिखो.. वैसे काफी इंटरेस्टिंग चीजें हैं लिखने जैसी… ‘

आपण राष्ट्रीय एकात्मतेवर काल इथं टाऊन हाॅलवर बोललात. पण हाजी मस्तानच्या दलित मुस्लिम सुरक्षा महासंघाशी आपलं नाव जोडलं गेल्याचं वर्तमानपत्रात वाचलं होतं. तेव्हा आपलं कालचं बोलणं विसंगत वाटत नाही काय ? मी विचारलं.
तेव्हा ‘या महासंघाशी माझा कसलाही संबंध नाही. मुंबईत त्यांनी सहज एका कार्यक्रमाला पाहुणा म्हणून बोलावलं होतं. बस्स. तेवढंच. काल उमगायला नाही का एका काॅलेजच्या कार्यक्रमाला बोलावलं, तसंच ते. ..’
मग देशातील वातावरण आरोग्यदायी करण्यासाठी
राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारा एखादा देशव्यापी दौरा का काढत नाही, असं विचारलं असता, मी स्वतःहून काढणार नाही… पण सत्ताधीश वा या क्षेत्रात योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते यांनी विविध सेलिब्रिटीजना आवाहन केल्यास मी वेळ काढून ते करीनच..असं दिलीपकुमार म्हणाले. लातूर शहरातील समंजस व सलोख्याच्या वातावरणाबद्दल त्यांनी समाधानाची प्रतिक्रियाही यावेळी दिली.
‘यह एक आलमी चीज है…’, अशी सुरुवात आपल्या धीरगंभीर आवाजात करुन दिलीपकुमारांनी अंतर्मनातील एकेक धागे हळुवारपणे उलगडायला सुरुवात केली… जातीयवादाचं थैमान, प्रादेशिक वाद असल्या संकुचित जळमटात आपण गुरफटत चाललो आहोत. सगळं जग एकविसाव्या शतकाकडं वेगानं झेपावत असताना आपली पावलं मात्र असल्या निरर्थक आणि विकृत गोष्टींमुळं मागं खेचली जात आहेत. नीतीमूल्यांचं हे ढासळणं… किस सदीकी ओर है…? एकात्मतेचा अभाव ही बौद्धिकतेच्या अभावातून निर्माण झालेली विकृतीच. उभा देश आज विज्ञान आणि तंत्रज्ञानात विकासाची नवनवी क्षितिजे विस्तारित करु पाहत असताना काही मूठभर शक्ती जाती- धर्माच्या नावावर सबंध देशालाच उध्वस्तपण आणू मागत असतील, तर तो निःसंशयपणे देशद्रोहच आहे…’
ग्रीक, इजिप्त सारख्या संस्कृती उदयाला आल्या नि कालौघात त्या नष्टही झाल्या. पण हिन्दु संस्कृती टिकून आहे. नीतीमूल्यांवर भक्कमपणे उभी राहिलेली ही संस्कृती सभ्य, सुंदर आणि सर्वसमावेशक आहे. तिच्या जपणुकीसाठी आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे, असंही ह्या सुसंस्कृत आणि अभिजात कलावंताने यावेळी सांगितलं. बायबल असो वा कुराण किंवा गीता, यातील कोणताही धर्मग्रंथ एकमेकांचा द्वेष करा असं सांगत नाही….दिलीपकुमार बोलत होते….
अहो, सगळ्या जगालाच अस्तित्वाचं तत्वज्ञान हिन्दुस्थाननं दिलंय्…अवर इंडिया इज द मोस्ट सिव्हिलाईज्ड कंट्री इन द वर्ल्ड…देशाचं हे सुंदरपण जीवापाड जपलं पाहिजे, असं मला वाटतं…मेरा रोम- रोम हिन्दुस्थान की मुहब्बत का कर्जदार है…दिलीपकुमार हे सांगताना विलक्षण भावपूर्ण झाल्याचं मला जाणवलं…
विज्ञान- तंत्रज्ञानातील प्रगतीच्या गोष्टी करीत असताना साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील आपल्या समृद्ध वारशाकडं दुर्लक्ष होता कामा नये, असं सांगून या ट्रॅजेडी किंगनं अत्रे -खांडेकरांच्या अजरामर साहित्यकृतींचाही आदरपूर्वक उल्लेख केला. आपण तंत्रज्ञान आयात करू हो, पण संस्कृती कशी आयात करणार ? असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला.
दहा-पंधरा मिनिटं म्हणता म्हणता चांगल्या पाऊण तास गप्पा रंगल्या. फोटो सेशनही झालं. लातूरचे दिवंगत ज्येष्ठ पत्रकार सी. एल्. पाटीलही यावेळी उपस्थित होते. स्वतः दिलीपकुमार यांनी तेथे बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांपासून डाक बंगल्याच्या खानसाम्यापर्यंत सर्वांबरोबर फोटो सेशन केलं. एवढ्यात राठीजी आले नि या दिग्गज अभिनेत्यानं माझ्याशी हस्तांदोलन करुन त्यांच्या कारमध्ये प्रवेश केला.
एक समृद्ध आणि श्रीमंत अनुभूती आता मनांत दीर्घकाळ रुंजी घालणार….!!
(लोकमत वरुन साभार)

– लेखन : जयप्रकाश दगडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.
एका महान नायकाची झालेली एक्झिट मनाला खूप वेदना देणारी आहे.. जेष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांनी या कलावंताचे विविध पैलू या मुलाखतीतून व्यक्त केले आहेत. आणि म्हणूनच हा कलावंत चिरकाल आपल्या स्मरणात राहील. या महान कलावंतांस भावपूर्ण श्रद्धांजली..! आपले मनपूर्वक अभिनंदन..!
🙏
नमस्कार.मा.श्री जयप्रकाश दगडे यांनी अभिनयाचा शहेनशहा असलेल्या मा श्री.दिलीपकुमार यांची घेतलेली मुलाखत पाहिली अन् वाचली.माझ्या सिने स्मृतींना उजाळा मिळाला आहे याबद्दल आपले मनापासून हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.आपण ती मुलाखत पुन्हा पुनर्मुद्रित केली.खूप आनंद झाला आहे.धन्यवाद.शुभेच्छा.शुभरात्री.