“बनाना मालपोवा विथ रबडी”
आज आपण वेगळ्या स्टाईलचा “बनाना मालपोवा विथ रबडी” बनवू या.
पिकलेल्या केळीचे गुणधर्म, महत्व खूपच असल्यामुळे ती आता फेकून न देता त्याच्यापासून आपण एक सुरेख डिश अशी बनवू की खाणारे नक्की दाद दिल्याशिवाय राहूच शकणार नाहीत. चला मग लगेंच करूया.
साहित्य :
3 पिकलेली केळी,1 वाटी कणिक, 2 चमचे बारीक रवा, किंचित मीठ, 2 चमचे तूप, 1 कप दूध, अर्धा चमचा वेलची पावडर, 1 वाटी साखर, सजावटी साठी ड्रायफ्रुट्स चे काप, 1 वाटी रबडी.
कृती :
प्रथम केली सोलून ती मिक्सर मधून दूध घालून फिरवून मिल्क शेक सारखे बनवून घ्यावे. नंतर तो मोठ्या बाऊल मध्ये काढून त्यात कणिक, रवा, वेलची पूड, किंचित मीठ, जास्त गोड आवडत असेल तर 1..2 चमचे साखर घालावी व मस्त एकजीव करून भज्याच्या पिठाप्रमाणे बॅटर बनवून 15 मिनिटे झाकून ठेवावे.
नंतर साखरेत अर्धा ग्लास पाणी घालून एकतारी पाक बनवावा. त्यात केशरी रंग घातला तर छान दिसेल. हा पाक थंड करण्यास ठेवावा.
मग कढईत तेल गरम करायला ठेवून ते चांगले गरम झाले की त्यात 1 डाव बॅटर घालून गॅस मंद करावा व तेलात दोन्ही बाजूंनी लालसर रंगावर छान तळलेली पुरी चाळणीत काढून सर्व तेल पूर्ण निथळु द्यावे. मग ही पुरी थंड झालेल्या साखरेच्या पाकात टाकून लगेंच काढून घेऊन पुन्हा दुसऱ्या चाळणीत पाक गळण्यासाठी ठेवावी. पाक गळला की मग सर्व्हिंग डिश मध्ये काढून त्यावर रबडी व ड्रायफ्रुट्स यांनी सजावट करावी व सर्व्ह करावे.
वैशिष्ट्य :
ही डिश अगदी सॉफ्ट म्हणजे ओठांनी खाण्यासारखी लुसलुशीत बनते त्यामुळे लहान मुले, वयस्कर लोक सुद्धा सहज खाऊ शकतात. ही स्वीट डिश डिझार्ट म्हणून सुद्धा देऊ शकतो. केळींचा फ्लेवर इतका सुरेख लागतो की खाणारे नक्कीच वाहवा करतील यात शंकाच नाही. रबडी घातलीच पाहिजे असे नाही, न घालता सुद्धा छानच लागते. यातून केळी म्हणजे फळ, दूध, साखर आणि सुगंधी वेलदोडे असल्यामुळे देवीसुद्धा नक्कीच आनंदाने खाणार ! आणि तृप्त होऊन आशीर्वाद देईल.

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
