इंच इंच जमिनीसाठी भाऊ एकमेकांचे वैरी होतात. प्रसंगी जीव घ्यायला देखील कमी करीत नाहीत, अशा आजच्या काळात आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीमार्फत हजारो लोकांना शेकडो एकर जमीन दान करण्यासाठी प्रेरित केले, हे आज कदाचित काल्पनिक वाटेल. पण ते सत्य आहे. हे सत्य जाणून घेऊ या, विनोबांचे आणि त्यांच्या साहित्याचे अभ्यासक हेमंत मोने यांच्या या विशेष लेखातून. आचार्य विनोबा भावे यांना विनम्र अभिवादन.
— संपादक.
देश, काल, परिस्थितीनुसार जमिनीच्या प्रश्नाचे स्वरूप आणि गांभीर्य बदलत चालले आहे.जमीन उत्पादक साधन आहे. त्यातून अन्नधान्याचे उत्पादन व्हावे हा मूळ विचारच स्वार्थापोटी डावलला जात आहे की काय ? अशी शंका येवू लागली आहे. शेतमालाला मिळणारा भाव, रासायनिक खतांचा अविवेकी वापर, बदलते आयात निर्यात धोरण, शेत मजूरीपेक्षा अन्य कामात कमी कष्ट आणि जास्त मजूरी या दुहेरी लोभामुळे शेती कामाला भासणारा मजूरांचा तुटवडा, अनुत्पादक कर्जे या सर्व प्रश्नांचे ग्रहण शेतजमिनीला लागत चालले आहे. अन्नधान्य उत्पादनाचा मुख्य स्त्रोत याकडे दुर्लक्ष होत आहे.
सुमारे 60—65 वर्षापूर्वी याच जमिनीच्या प्रश्नाचा आधार घेऊन हृदये जोडण्याचा महान यज्ञ आचार्य विनोबा भावे यांनी केला. आर्थिक आणि सामाजिक भ्रष्टाचाराच्या गर्तेत सापडलेल्या राजकीय पक्षांना आता हृदये जोडण्याचे काम हाती घ्या असे सांगण्याची वेळ आली आहे. सत्तेच्या आणि संपत्तीच्या लोभापायी पुन्हा श्रीमंत आणि गरीब, सत्ताधारी आणि सत्ताकांक्षी, सत्ताधारी आणि सत्तेवर परिणामकारक अंकुश ठेवता न येणारी प्रजा अशा नवीन वर्ग संघर्षाला आपण पुन्हा प्रस्थापित करीत आहोत. त्यामुळे विनोबांच्या भूदान यज्ञामागील तत्वाचा पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. भूदान यज्ञाच्या स्मृती आणि स्वरूप जाणून घेणारी पिढी आता कालप्रवाहात विलीन होत चालली आहे. म्हणूनच तरूण पिढीला प्रेरणादायी अशा भूदान यज्ञाचा परिचय वारंवार करून देणे ही काळाची गरज आहे.
जमिनीच्या संघर्षाची पार्श्वभूमी, जमीनदारी, खोती, वारसा हक्क इत्यादी व्यवस्थेमुळे एखाद्या व्यक्तीकडे प्रचंड जमिनीचा मालकी हक्क असे. यामुळे समाज व्यवस्थेत बरीच विषमता निर्माण झाली. 1951 च्या शासकीय अहवालानुसार हैद्राबाद राज्यातील नलगोंडा, मेहबूबनगर आणि वरंगळ या तीन जिल्ह्यात 500 एकर पेक्षा जास्त जमीन बाळगणारे 550 जमीनदार होते आणि त्यांच्याकडे लागवडी योग्य जमिनीपैकी 70 टक्के जमीन होती. जमिनीची प्रत्यक्ष मशागत करणारा माणूस हा असहाय्य मजूर ठरला. लोभ आणि अहंकार या शत्रूंचे यामुळे चांगलेच फावले. उत्पादनातील फक्त विसाव्वा भाग मजुराच्या वाट्याला आला. एखादी घोंगडी आणि वहाणा यावरच त्याला समाधान मानावे लागे. शोषक आणि शोषित अशी वर्गवारी झाली. ज्याने कधीच मेहनत केली नाही तो शोषक बनला. असे चित्र जवळ जवळ सर्व जगात निर्माण झाले. त्याची प्रतिक्रिया म्हणून मार्क्सवाद जन्माला आला. त्याच्या प्रभावाखाली लूट आणि लाठी या साधनांनी जमीनदारांच्या जमिनी आणि धान्य वितरीत करण्याचा हिंसक मार्ग हाच एकमेव मार्ग आहे अशी सर्वदूर भावना निर्माण झाली. अपहरणकर्त्याचे अपहरण न करणे हा अधर्म आहे अशी भावना रुढ झाली आणि व्यक्तीला महत्व न देणारी साम्यवादी चळवळ सर्वत्र फैलावली.
साम्यवादी चळवळीने निर्माण होत असलेल्या समस्येचे पूर्णपणे निर्दालन करील असा एक नवीनच विचार, नवीन मार्ग भारतात उदयाला येत होता. जगाचे लक्ष वेधणारा आणि या समस्येकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहणारा हा विचार कोणता होता ? हा भूदानाचा विचार होता.
भूदानामागील भूमिका :
शिवरामपल्ली या हैद्राबाद जवळील सर्वोदय सम्मेलनासाठी विनोबा 1951 सालच्या मार्च महिन्यात वर्ध्याहून सुमारे 400 किलोमीटरचे अंतर पायी गेले. जमिनीच्या समस्येचा तोडगा म्हणून उफाळलेला हिंसाचार पाहून विनोबा कोणतेही सरक्षण न घेता पोचमपल्ली या गावात पोहोचले. गावची लोकसंख्या सुमारे 3000 त्यात 80 टक्क्यापेक्षा जास्त लोक भूमिहीन. जमीनदारांच्या जमिनीवर राबणे या खेरीज उदरनिर्वाहाचे साधन नाही. ते ही अपुरे आणि मानहानीकारक. अशा स्थितीत 80 भूमिहीनांनी विनोबांजवळ शेती उत्पादनासाठी जमिनीची मागणी केली आणि गतकाळात कधीही घडून न आलेला आश्चर्यकारक प्रसंग घडला. रामचंद्र रेड्डी या जमीनदाराने आपली 100 एकर जमीन या भूमीहीनाना विनाअट देऊ केली. जमीन गरिबांना दान करावी असा पुसटसा विचार रामचंद्र रेड्डी यांच्या मनात होताच. विनोबांच्या उपस्थितीने आणि विचाराने तो कार्यान्वीत झाला. ही अभूतपूर्व घटना घडली तो दिवस होता 18 एप्रिल 1951. संत दर्शनाने माणूस बदलतो याचा प्रत्यय आला. या प्रकाराने विनोबांना रात्री झोप आली नाही. मनात हिंसा की अहिंसा अस द्वंद्व चालू होते. विनोबांना साम्ययोग दिसत होता. साम्यवाद्यांची भूमिका सर्वस्वी भिन्न होती. साम्यवादी समाजाचे आस्तित्व मानतात पण व्यक्ती शून्य मानतात. त्यांचा जनतेवर विश्वास आहे पण हृद्ययावर नाही. म्हणूनच विनोबांनी जमिनीचा प्रश्न आईच्या कळकळीने आणि गुरूच्या कुशलतेने हाती घेतला. ईश्वर शरण विनोबांनी ईश्वरी संकेत समजून जमिनीचे दान मागण्याचा निर्णय घेतला. तेलंगणाच्या दोन महिन्याच्या पदयात्रेत विनोबांना 12 हजार एकर जमीन मिळाली. कोणत्याही त-हेची धाक दपटशा, लालूच न दाखविता केवळ अहिंसेने मिळालेली ही जमीन भूमीहीनाना वाटली गेली. साध्याबरोबर साधनातही क्रांती होते हे विनोबांनी दाखवून दिले.
जमिनीचे दान मागणे हा विनोबांचा विचार प्रतिक्रियावादी नव्हता. ही कृति कोणाच्याही विरोधासाठी नव्हती. यामागे मूळ तत्व होते अपरिग्रहाचे. अपरिग्रह म्हणजे साठा न करणे. माझ्या उदरनिर्वाहासाठी लागणारी वस्तू मी कमीत कमी घेण्याचा प्रयत्न करीन. माझी सम्पत्ती, शक्ती इत्यादी समाजासाठी आहे त्यामुळे संग्रहाचा हव्यास सोडणे हे अपरिग्रहाचे तत्व आहे प्रत्येकाला सांगावयाचे आहे की तुमच्याही खाली कोणी आहे.छोट्याशा लंगोटीतही आसक्ती राहू शकते म्हणून प्रत्येकाने हे समजावून घेतले पाहिजे की आपल्याजवळ जे काही घरात असले तरी ते समाजासाठी आहे. प्राचीन धर्मग्रंथांचे किंवा श्रद्धेय ग्रंथांचे तत्व समाजाला ग्राह्य होईल अशा पद्धतीने सांगणे ही विनोबांच्या विद्वत्तेची खरी कमाल आहे. दानं समविभाग, दान म्हणजे समविभाजन हा शंकराचा-यांचा अर्थ जेंव्हा विनोबा समाजाला समजावून देतात तेंव्हाच लोक नैतिक पातळीवर विचार करू लागतात.
वाघाला आपले भक्ष्य निसटल्यावर राग येतो कारण ते भक्ष्य हा त्याचा शत्रू असतो. भूमिहीन हे जमीनदारांचे शत्रू नाहीत. त्यांचा लोभ हा अज्ञानातून निर्माण झाला आहे. मानवरूपातील नारायणाला ते विसरले आहेत. याची आठवण सर्वांनाच करून देण ही विनोबांची भूमिका होती. भूसम्पादन आणि हस्तान्तरण एवढा संकुचित विचार त्या मागे नव्हता. हृदये जोडणे आणि माणसातल्या चांगुलपणाला, सदभावनेला जागृत करण ही त्या मागची प्रेरणा होती. विनोबा म्हणत बंदुकीने वाघाची शिकार करता येते पण विचारांचा सामना विचारानेच करावा लागतो. त्याचा अनुभवही आला. विनोबांना दानात मिळालेल्या जमिनी या सुरुवाती सुरुवातीला गरीब शेतक-यांकडूनच मिळाल्या. मला सहावा भाऊ माना आणि तुमच्या जमिनीचा फक्त सहावा हिस्सा मला द्या असे विनोबा सांगत. भारतातील कुटुंबात साधारण पाच भाऊ असतात त्यामुळे मला सहावा भाऊ मानून भूमिहीनाला तुमच्या जमिनीचा सहावा हिस्सा द्या या वास्तवाला विनोबा महाभारताच्या कथेची जोड देत. विनोबा विचारीत पांडव किती ? या प्रश्नाचे उत्तर अर्थातच पाच असे मिळे. विनोबा सांगत “कर्ण“ हा त्यांचा सहावा भाऊ होता. त्याच्यावर अन्याय झाला आणि त्यातून महाभारत युद्धाचा भडका उडाला. सुईच्या अग्रावर राहील इतकी जमीनही न देण्याची परिणती अखेर संघर्षमय युद्धात झाली.
भूमीदान हा प्रजासूय यज्ञ दरिद्रनारायणाचे दारिद्र्य नाहीसे करेल आणि त्याला उचित असा आत्मसन्मान मिळवून देईल, ही जमीन मागण्यामागील भावना असल्यामुळे विनोबांचे हे कार्य ही चळवळ होती.मोर्चा नव्हता, आंदोलन नव्हते, दिंडी नव्हती तर तो सर्वेपि सुखिन: सन्तु हा मंत्र सर्वांसाठी अमलात आणणारा एक क्रांतिकारी विचार होता. त्यात लोकसहभाग होता.
कोणत्याही शासनाच्या पलीकडचा हा प्रश्न होता म्हणून विनोबा याला प्रजासूय यज्ञ म्हणत. तेलंगणाच्या या पदयात्रेत विनोबांना बारा हजार एकर जमीन दानात मिळाली.
जून 1951 च्या शेवटी विनोबा परंधाम आश्रमात परत आले. पण त्यानंतर योजना आयोगाच्या सल्ला मसलतीसाठी दिल्लीचे आमंत्रण आले. जिथे साम्यवादाचा बिलकूल मागमूसही नव्हता अशा मध्यप्रदेश इत्यादी राज्यातून विनोबा तीन महिन्याची पदयात्रा करीत दिल्लीला पोहोचले. या प्रवासात विनोबांना अठरा हजार एकर जमीन भूदानात मिळाली. निर्भयता, प्रेम आणि रचनात्मक कार्यावर विश्वास या तत्वांचा म्हणजे अहिंसेचा जय झाला होता.जे काम कायद्याने झाले नसते ते महान कार्य एका शुचिर्भूत व्यक्तीने करून दाखविले. नोव्हेंबर 1951 नंतर विनोबांची पदयात्रा चालूच राहिली आणि पोचमपल्लीच्या पहिल्या भूदानाला वर्ष होईपर्यंत विनोबांना एक लाख एकर जमीन भूमिहिनांसाठी मिळाली. एखादा 500 एकरवाला जमीनदार जेंव्हा विनोबांना 5—10 एकर जमीन देई तेंव्हा विनोबा ती घेत नसत. विनोबा म्हणत मला देणा-याची आणि घेणा-याची दोघांचीही प्रतिष्ठा राखावयाची आहे.

पदयात्रेची वैशिष्ठ्ये :
विनोबा 1951 पासून पुढे 13 वर्षे पायी हिंडले.लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या सारख्या क्रांतिकारकानेही आपले सर्वस्व भूदानासाठी अर्पण केले. विनोबांच्या अध्यात्मिक दृष्टीला सर्वत्र संतांच्याच विचाराचा प्रभाव दिसतो. उत्तर प्रदेशातून बिहारमध्ये, बिहार मधून बंगालमध्ये, अशा राजकीय सीमा विनोबांनी केंव्हाच पार केल्या होत्या. तुलसीदास आणि कबीर यांच्या भूमीतून मी बुद्धाच्या आणि महावीरांच्या भूमीत प्रवेश केला. तेथून रामकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आमची पदयात्रा चालली आहे, असे जेंव्हा विनोबा म्हणतात तेंव्हा त्यांनी येथील जनतेची मानसिकता ओळखली होती याचा प्रत्यय येतो. विनोबांची अध्यात्मिकता केवळ भाबडी नाही. विनोबांचे व्यवस्थापकीय कौशल्यही येथे दिसून येते. पटना येथील 1953 च्या सभेत विनोबांनी लोकांना संपत्ती दानाचे आवाहन केले. दारिद्रयात खितपत पडलेल्या भूमिहीनाला नुसती जमीन देऊन भागणार नाही. त्याच्यामागे शेतीला पूरक अशा साधनांचे बळही उभे करावे लागेल हे विनोबा जाणून होते. म्हणून विनोबा म्हणत की तुमच्या आर्थिक संपत्तीचाही सहावा हिस्सा भूमिहीनांच्या सुखरूप पुनर्वसनासाठी खर्च करा. मला फक्त हिशोब द्या. लोकांच्या सद्सदविवेकबुद्धीला हे आवाहन होते. विनोबांच्या या निस्वार्थ घोषणेलाही योग्य तो प्रतिसाद मिळाला. 45 लाख एकरांच्या आसपास जमीन मिळूनही विनोबांनी मातीच्या एका कणावरही आपला हक्क सांगितला नाही.
पदयात्रेतील सारा वेळ विनोबा अध्ययन, अध्यापनासाठी, लोकांच्या प्रबोधनासाठी वापरीत. ज्या ज्या प्रांतात जात तेथील अध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करीत. लोकांना सोप्या भाषेत त्यातील आशय समजावून सांगत. भूमी वितरणाचा हा प्रयोग जसाच्या तसा आज करता येणार नाही हे जरी खरे असले तरी मूल्यांची जपणूक कधीच कालबाह्य होत नाही. मूल्ये आपल्यासाठी नसून आपण मूल्यांसाठी आहोत हे विनोबांनी आपल्या स्वत:च्या आचरणातून सिध्द केले. सोशल मिडीयावर वांझोटया चर्चा करीत बसण्यापेक्षा आपल्या वर्तनाचा आदर्श घालून देणा-या व्यक्ती आणि त्यांचे कार्य कधीच कालबाह्य होत नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. सामुदायिक समाधीची आता समाजाला गरज आहे हा विचार मांडत असतानाच विनोबा अहिंसा, अपरिग्रह, ब्रह्मचर्य या सारख्या व्रतानमधील तथ्याला चालू काळाशी सुसंगतता प्राप्त करून देत. अहिंसा म्हणजे प्रेम व सहकार, रचनात्मक कार्यावर निष्ठा हा विधायक भाग समजावून देत. ब्रह्मचर्य म्हणजे उच्च ध्येयासाठी सर्व इंद्रियांवर संयम याचे महत्व पटवीत. काम भावनेवर नियंत्रण म्हणजे केवळ ब्रह्मचर्य नव्हे. किडेमकोडे निरंतर उत्पत्ती करीतच असतात. कारण त्यांना उच्च ध्येयच नसते. मानवता हाच खरा धर्म आहे बाकीचे झगडे हे सांप्रदायिक आहेत म्हणूनच कर्नाटकच्या पदयात्रेत विनोबांनी “जय जगत” हा मंत्र दिला. इतकेच नव्हे तर त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानातही (आजचा बांगला देश) 16 दिवसांची पदयात्रा करून 150 एकर जमिनीचे भूदान प्राप्त केले.

निधीमुक्ती :
विनोबांनी उचलेले आणखी एक पाऊल म्हणजे निधीमुक्ती हे होते. भूदानासाठी गांधी स्मारक निधीतून मिळणारी मदत घेणे विनोबांनी बंद केले. भूदानाचे काम पगारी कार्यकर्त्यांवर चालते असा काही लोकांचा गैरसमज होता म्हणून अगदी कमी लोकांना जे काही थोडे फार वेतन मिळत होते तेही बंद केले. सगळ्या भूदान समित्या बरखास्त केल्या. या पाठीमागे क्रांतीचाच विचार होता. संस्थेद्वारे सामान्य सेवेचे काम होऊ शकते, सत्ता प्रथापित होऊ शकते पण जनमानसात क्रांति घडवून आणता येत नाही. क्रांती तंत्राने होत नाही, मंत्राने, हृदय परिवर्तनाने होते ही विनोबांची भूमिका होती. भूमीदानानंतर त्यागाची भूमिका जनमानसात यावी म्हणून ग्रामदानाचा विचार आला. ग्रामदानात मालकी हक्क विसर्जित करावा लागतो. वहिवाटीने जमीन कसता येते पण मालकी गावाची असते. आसामचे उदाहरण या दृष्टीने आदर्श उदाहरण आहे. बंगाल आणि पाकिस्तानातल्या लोकांनी आसामातल्या जमिनी विकत घेवून तेथे आपले साम्राज्य निर्माण केले आणि आसामची स्थानिक जनता निर्वासित झाली. कारण व्यक्तिश: जमीन कोणीही विकू शकत असे. ग्रामदानात असे करता येत नाही. गावाच्या संमतीनेच विक्रीचे व्यवहार करता येतात. विनोबा याला “डिफेन्स मेजर” म्हणत. आजही शहरांच्या अवतीभोवती विकास या नावाखाली जमिनीचे हस्तांतरण चालू आहे ते परिणामी अनेक सामाजिक समस्यांना जन्म देत आहे. हे म्हणजे धान्याचा उपयोग धान्य म्हणून न करता त्यातून दारू उत्पादन करण्यासारखे आहे. अहिंसक क्रांतिला आपली संमती दर्शवावी आणि पुढील पिढीवरही दानाचे, त्यागाचे संस्कार व्हावेत म्हणून “सर्वोदय पात्र“ ही कल्पनाही कार्यान्वित झाली. प्रत्येक घरात ठेवलेल्या या पात्रात लहान मुलाच्या मुठी एवढे धान्य टाकायचे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या किंवा अन्य लोकांच्या किमान चरितार्थाताचा प्रश्न सोडविण्याचा हा विधायक मार्ग होता.

भूदान, ग्रामदान या निमित्ताने लोकशक्ती जागृत करण्याचे महान कार्य विनोबांनी केले. प्रत्येक प्रश्नाचे राजकारण करणा-या आणि त्यातून सत्ता आणि संपत्तीचा हव्यास बाळगणा-या तथाकथित राजकीय पक्षांनी आणि त्यांना भरभरून साथ देणा-या स्वार्थी लोकांनी यातून थोडा जरी बोध घेतला तरी समाजाचे स्वास्थ्य आणि सुख फार दूर नाही.
— लेखन : हेमंत मोने. कल्याण
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
