“जसवंतगढ़ युद्ध स्मारक”
हा सर्व प्रदेश चीनच्या सीमेला लागून असल्याने १९६२ च्या भारत – चीन युद्धाशी संबंधित अनेक आठवणी या भागात आहेत आणि ते स्वाभाविकही आहे.
अशीच एक जतन करून ठेवलेली आठवण आहे ती, १९६२ च्या युद्धात नूरानांग परिसरात अतुलनीय शौर्य दाखवत स्वतःच्या जीवाची बाजी लावणाऱ्या गढवाल रायफल्सच्या चौथ्या बटालियनचे रायफलमॅन “जसवंत सिंह रावत” यांची.
त्यांच्या बलिदानाविषयी कृतज्ञता म्हणून, जे स्मारक उभारण्यात आले आहे, ते खरं म्हणजे एक प्रकारचे मंदिरच आहे. जसवंत सिंह रावत यांच्या काही वस्तूंचे येथे जतन करण्यात आले आहे.

रायफलमॅन जसवंत सिंह यांनी आपल्या सहकारी जवानांना वाचविण्यासाठी शून्यापेक्षाही कमी तापमानात १० हजार फूट उंचीवर अथकपणे एकट्याने ७२ तास चिन्यांशी लढत देऊन त्यांची मोठ्या प्रमाणात हानी केली. पण शेवटी चिन्यांनी त्यांना पकडले आणि ते १७ नोव्हेंबर १९६२ रोजी शहीद झाले. त्यांच्या या शौर्याबद्दल भारत सरकारने त्यांना, लष्करातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च सन्मान असलेल्या महावीर चक्राने मरणोपरांत सम्मानित केले.

जसवंतगढ़ युद्ध स्मारक हे तवांग पासून २५ किलोमीटर अंतरावर नूरानांग जिल्ह्यात येते. नुरानाँग गावापासून जरा पुढे आलो की लांबूनच ‘जसवंतगड वॉर मेमोरियल’ दिसायला लागते. लष्कराच्या कडक शिस्तीतले हे एक स्वच्छ, सुंदर आणि अत्यंत प्रेरणादायी आणि आपला ऊर अभिमानाने भरून येतो असे हे युद्धस्मारक आहे.

स्मारकाच्या प्रवेशद्वारातून काही पायऱ्या चढून वर जावे लागते. तिथे गेल्यावर, आत येताच आपले लक्ष चबुतऱ्यावर कडक शिस्तीत उभ्या असलेल्या रायफलमॅन जसवंतसिंग रावत यांच्या पुतळ्याकडे जाते..

आणि त्यांच्या सन्मानार्थ आपली मान आपसुकच लवते. काही जण लष्करी शिस्तीप्रमाणे सॅल्युट देखील करतात. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्या हस्ते या स्मारकाचे २२ सप्टेंबर २०२१ रोजी उद्घाटन करण्यात आले.

या स्मारकाला भेट देण्यासाठीचा योग्य कालावधी म्हणजे ऑक्टोबर ते जून महिन्यादरम्यानचा आहे. हे स्मारक सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुले असते.
स्मारकाजवळ लष्कराने चालविलेले माफक दरातील कॅन्टीन आहे. पण विशेष म्हणजे या कॅन्टीनजवळ सदिच्छा म्हणून चहा मात्र आपल्याला मोफत देण्यात येतो.
क्रमशः
— संदर्भ : गुगल

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
