“रंग आयुष्याचे”
एरव्ही आकड्यांशी खेळणारे मुंबईस्थित कर सल्लागार श्री. विनय पारखी हे चक्क शब्दांशी खेळू लागले आणि त्यातून तयार झाला, त्यांचा पहिला-वहिला कथासंग्रह ‘रंग आयुष्याचे’ !
आपल्या कॅनडा स्थित लेखिका प्रियांका शिंदे जगताप यांनी करून दिलेला या पुस्तकाचा परिचय पुढे देत आहे. श्री. विनय पारखी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
“रंगांमधून घडलेलं भावदर्शन”
महाकवी भर्तृहरिरचित “क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम्”, या नीतिवाक्यातून वाणीचं सौंदर्य प्रस्फुटित करण्यात आलं आहे. बाह्यालंकार, भौतिक संपत्ती यांची किंमत कालांतरानं कमी होऊ लागते; मनुष्याला प्राप्त असलेलं वाणीरूपी आभूषण मात्र कालौघातंही चिरस्थायी राहतं. वाणीरूपी आभूषणानं व्यक्तिचं व्यक्तिमत्व अधिक खुलून दिसतं. मुंबईस्थित लेखक श्री. विनयजी पारखी सर यांना लाभलेली सुमधुर, सुसंस्कृत वाणी हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वपूर्ण पैलू. पारखी सर हे मुळातंच गाढे अभ्यासक, सजग वाचक व उत्तम वक्ते आहेत. त्यांचा लोकसंग्रह देखील अफाट आहे. वास्तविक त्यांची व्यावसायिक पार्श्वरूपी अत्यंत वेगळी आहे. ‘आर्थिक नियोजन’, ‘कर आकारणी’, या विषयांसंबंधित सेवा प्रदान करण्यासाठी लागणारे निकष, कायदे, नियमांचा त्यांनी सर्वंकष अभ्यास केलेला असून, कर देयकांसाठी गेली तीन दशकं ते ‘कर सल्लागार’ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीच्या क्षेत्रात ते जरी मुरब्बी असले, तरी कागदावरती सतत काहीतरी ओतत राहण्याची कला मात्र त्यांनी सवडीनं जपली, हे विशेष. इतर क्षेत्रांपेक्षा अधिक रसडोळस असलेल्या साहित्य क्षेत्रातंही त्यांनी एप्रिल, २०२५ मध्ये दमदार पदार्पण केलं.
“उत्कट भव्य तेचि घ्यावे । मळमळीत अवघेचि टाकावे । निस्पृहपणे विख्यात व्हावे । भूमंडळी ।।”
समर्थ रामदास स्वामी यांच्या दासबोधातील उपरोक्त वचनानुसार पारखी सरांनी आजतोवर नवोदित-दिग्गज लेखनकर्त्यांच्या निवडक लेखनकृतींमधून पाझरणारं तात्विक, वैचारिक सौंदर्य अंतर्बाह्य टिपून ते सहजसुंदर लेखनशैलीत रसग्रहणबद्ध केलं आहे. रसग्रहणातून वाचकवर्गाला भावलेली त्यांची परिपक्व लेखनशैली ‘रसग्रहणनिपुण’ म्हणून त्यांना जितकी समृद्ध करते, त्याहूनंही एक ‘लेखक’ म्हणून त्यांना अधिक सुबत्त बनवते. हिरव्याकंच वनराईत सोन्याचा हंडा अनपेक्षितपणे सापडावा, अगदी तसाच सोन्यासम लेखक श्री. विनय पारखी सरांच्या रूपात वाचकांनी हुडकला आहे. त्यांच्या वाङ्मयीन कार्यकर्तृत्वाची ही जरी नांदी असली, तरी भविष्यात एकाहून एक सरस साहित्यकृतींची घडणावळ त्यांच्याकडून घडेल, अशी आशा आपण येथे करू.

पारखी सरांना साहित्यात विशेष भावणारा लेखनप्रकार म्हणजे कथा. कथेच्या चौकटीतून एखादा अनुभव किंवा विचार वाचकांसमोर सशक्तपणे मांडता येतो. कल्पनाविश्व व वास्तव यांंचा अनोखा मिलाफ कथेच्या माध्यमातून साधता येतो. याच भूमिकेतून पारखी सरांनी त्यांची पहिली-वहिली साहित्यकृती ‘रंग आयुष्याचे’ ही कथासंग्रहाच्या स्वरूपात प्रकाशित केली आहे. सदर कथासंग्रहात ‘स्पर्श’, ‘सूड’, ‘कुंडली’, ‘एक मौत’, ‘सप्तपदी’, ‘ओढ’, ‘गजरा’, ‘तो आणि ती’, ‘उकल’, ‘कपाट’, ‘मुक्काम पोस्ट कर्जत’ अशा एकूण ११ कथांचा समावेश असून कथेच्या विषयानुसार अगदी छोटेखानी शीर्षकं कथांना देण्याची योजना सरांनी आखलेली दिसून येते. ‘स्पर्श’ सारख्या कथेमधून ‘समलैंगिक संबंध’ हा संवेदनशील विषय सरांनी शृंगारिक कथेच्या रूपात वाचकांसमोर हातोटीनं उलगडून दाखवला आहे. विवाहोत्सुक वर-वधुंची कुंडली जुळवण्याचा कार्यक्रम हा भारतीय विवाह पद्धतीचा एक अविभाज्य भाग होय. आजच्या काळात कुंडली पाहणे वा न पाहणे ही जरी ऐच्छिक बाब असली, तरी नावाप्रमाणेच ‘कुंडली’ ही कथा नियतीची अनोखी खेळी खेळताना दिसते. पारखी सरांनी ही कथा अतिशय सुरेखरीत्या रंगवली आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी खंबीरपणे सामना करताना घरच्यांनी दिलेला मानसिक आधार हा कर्करोगग्रस्त रुग्णाला उभारी घेण्यासाठी पुरेसा असतो. वैद्यकीय उपचार, किमोथेरपीप्रमाणेच जगण्याला बळ देण्यासाठी मानसिक आधार हा अधिक महत्वाचा असतो. अशा कठीण प्रसंगी कुटुंब व कर्करोगग्रस्त व्यक्ति यांच्यातील नाजूक भावबंध जपणारा कथारूपी ‘गजरा’ वाचकांना नयनाश्रुंचं आंदण देऊन जातो. अगम्य धाग्यांनी विणलेली कपोलकल्पित कथा ‘एक मौत’, सप्तपदीत समावलेल्या सात वचनांचं महत्व विशद करणारी हलकी-फुलकी कथा ‘सप्तपदी’, प्रेमभंगापायी उत्पन्न झालेली सूडभावना व त्याचा रहस्यमय वेध घेणारी ‘सूड’ ही कथा, अशा बहुरंगी-बहुढंगी कथांची गुंफण या कथासंग्रहात झालेली दिसून येते. कथा वाचताना समग्र वाचकवर्ग त्या कथांच्या व्यक्तिरेखांमध्ये इतका गुंग होऊन जातो की त्या कथा अक्षरशः तो जगतो. सदर कथासंग्रहात समाविष्ट असलेल्या कथांची मांडणी लक्षवेधी असून वाचकांना त्या कथानकात गुंतवून ठेवण्याची अजब किमया पारखी सरांनी करून दाखवली आहे. याशिवाय, ‘माझं पहिलं नाटक’ – ‘गुरुदक्षिणा’ असं शीर्षक असलेला त्यांच्या बालपणीचा सुखद किस्सा देखील साहित्यकृतीच्या सरतेशेवटी त्यांनी विशद केला आहे.
साहित्यकृतीचं दर्शनी मूल्य वृद्धिंगत करणारं ‘मुखपृष्ठ’ म्हणजे त्या साहित्यकृतीची ओझरती झलकंच जणू. सदर साहित्यकृतीचे मुखपृष्ठकार श्री. चंद्रशेखर सातपुते यांनी ‘रंग आयुष्याचे’ ह्या साहित्यकृतीच्या शीर्षकाला साजेसं मुखपृष्ठ बहाल केलं आहे. कुंचल्यातून अवतीर्ण झालेले नानाविध रंगांचे फटकारे मुखपृष्ठावरती चितारत रंगांची ही अवघी दुनिया त्यांनी नेत्रपटलावरती उभी केली आहे. समाजाच्या प्रबोधनासाठी एखादा ‘द्रष्टा’ जन्म घ्यावा लागतो. मुखपृष्ठामार्फत ते अवघं दृश्य न्याहाळणारा असाच एक द्रष्टा वाचकांच्या नजरेस पडतो. अर्थातंच साहित्यातून समाजप्रबोधन घडवणारा द्रष्टा म्हणजे या साहित्यकृतीचे जनक श्री. विनय पारखी सर होत. ‘पद्मजा प्रिंटर्स अँड पब्लिशर्स, पुणे’ या नामवंत प्रकाशन संस्थेनं मुखपृष्ठनिर्मिती, सुटसुटीत छपाई, ठळक अक्षरांतील सुलेखन यांकडे विशेष लक्ष पुरवलं आहे. सदर साहित्यकृतीच्या मलपृष्ठावरती पारखी सरांचा सचित्र परिचय व कार्योल्लेख करून दिलेला वाचकांच्या निदर्शनास पडतो. मलपृष्ठाच्या अधोभागावरती संस्थेचा लोगो व प्रकाशित पुस्तकाचा क्रमांक यांचा संदर्भ आढळतो. श्री. विनय पारखी सरांनी हे लेखनकार्य सिद्धीस नेण्यासाठी ज्यांनी ज्यांनी त्यांना बळ प्रदान केलं, अशा सर्वांना ही साहित्यकृती अर्पण पत्रिकेद्वारा सविनय समर्पित केली आहे.

समग्र पुस्तकाचं सार म्हणजे त्या पुस्तकाची प्रस्तावना. ‘महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे’ या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, कलोपासक, व्याख्याते, मुद्रक, प्रकाशक, संपादक, संत तैलचित्रकार, भावकवी श्री. विलास ग. सातपुते उर्फ आप्पा यांच्या सात्विक लेखनशैलीतून प्रसवलेली आशीर्वादरूपी प्रस्तावना पारखी सरांच्या ‘रंग आयुष्याचे’ या साहित्यकृतीला प्राप्त होणं, म्हणजे ‘सोन्याहून पिवळा’ योग म्हणावा लागेल. आप्पांनी त्यांच्या प्रासादिक वाणीतून, नेमक्या शब्दांत पारखी सरांचा करून दिलेला परिचय केवळ परिचय नसून एक अमृतानुभव आहे. सदर साहित्यकृती ही वाचकांसाठी वाचनपर्वणी कशी आहे, याचा संक्षिप्त गोषवारा आदरणीय आप्पांनी त्यांच्या लेखणीत जेरबंद केला आहे. ‘रंग आयुष्याचे’ ही साहित्यकृती घडवणारा लेखक व ती वाचकांंना उपलब्ध करून देणारा प्रकाशक, यांच्यातील समन्वय उत्तम साधला गेल्याची पोचपावती जणू ह्यातून मिळते.
मानवी आयुष्यात रंग हे महत्वाची भूमिका बजावतात. जीवन परिपूर्ण करण्यासाठी भावनांच्या वैविधांगी रंगछटांना कवेत घेत श्री. विनय पारखी सरांनी त्या कागदावरती शिंपडल्या आहेत. मानवी भावनांचे रंग कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक मानसिकता दर्शवतात. हिरवा रंग चैतन्य, समृद्धीचं प्रतिक समजला जातो. गुलाबी रंग प्रेमाच्या तरल भावनांना जागृत करतो. लाल रंग उत्कटता, क्रोध, साहस दर्शवतो. शोक, नैराश्य अशा भावनांना प्रतीत करणारा रंग म्हणजे काळा. अशाच वैविधांगी रंगांची मुक्त उधळण करणारा कथासंग्रह म्हणजे ‘रंग आयुष्याचे’. सुटसुटीत भाषाशैली, नेमकेपणा, कल्पनारम्यता, नादमधुरता, मनोवेधक मांडणी, बोधदर्शकता व मनोरंजन या सर्व गोष्टींची सरमिसळ या कथासंग्रहात झालेली दिसून येते. मानवी जीवनातील गुंतागुंत उलगडून दाखवणाऱ्या कथांचा वळणघाटांचा हा प्रवास करायला उत्सुक असलेल्या वाचकप्रवासी मंडळींनी या वाचनप्रवासासाठी सहर्ष सज्ज व्हावं व हा अनुभव आपले आप्तेष्ट-मित्रपरिवार यांच्यासोबत अवश्य सामाईक करावा. पारखी सरांना त्याच्या भावी साहित्यकृतींच्या घवघवीत यशासाठी आम्हा वाचकांकडून लक्ष लक्ष शुभेच्छा.
‘कोरोनाकाळ’ हा अनेक लेखनकर्ते मंडळींसाठी अंतःप्रेरणा देणारा काळ ठरला. पारखी सरांच्या आत दडलेल्या लेखकाचा जन्म देखील या कोरोनाकाळातंच झाला, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ति नसावी. लाॅकडाऊनमध्ये फावल्या वेळेचा सदुपयोग करून लेखणीतून उत्स्फूर्तपणे व्यक्त होणं त्यांना अधिक जिव्हाळ्याचं वाटलं अन् नकळत त्यांच्या हातून नानाविध शब्दशिल्पांची निर्मिती झाली. ‘रंग आयुष्याचे’ या शब्दशिल्पाची मुहूर्तमेढंही कोरोनाकाळातंच रोवली गेली. आज ते शब्दशिल्प प्रकाशित होऊन वाचकांच्या हाती सोपवताना पारखी सरांंना आनंदातिशय होत आहे.
“शुद्ध बिजा पोटी । फळे रसाळ गोमटी ।।”

— परीक्षण : प्रियांका शिंदे जगताप. कॅनडा
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

सखोल अभ्यास करून सुंदर शब्दांमध्ये लेख लिहिला आहे. सुरेख मांडणी प्रियांका. पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा. श्री. विनय पारखी सरांचेही अभिनंदन. मी पुस्तक वाचलं आहे. विविधरंगी कथांचा सुंदर संग्रह.