“केळीची मिठाई”
केळ हे अत्यंत टेस्टी, खायला सोपे आणि पोटभरीचे मस्त फळ आहे. लहानापासून ते वृद्धापर्यंत सारेच ही आवडीने खातात. पिकलेली केळी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असतात.
खूप लोक केळी पिकली की फेकून देतात. पण त्यात भरपुर प्रमाणात पोटॅशियम, मैग्नीशियम, फायबर्स असतात, त्यामुळे रक्तदाब नियंत्रीत होतो. बद्धकोष्ठता, पित्त यासारखे विकार होत नाहीत. शौचास सुलभ होते त्यामुळे पाईल्स, फिशर्स व पोटाचे विकार होत नाहीत. त्वचा उजळते.
पिकलेल्या केळीचे फायदे पाहिले आणि त्यात या मिठाई सारखी चवदार डिश खाल्ली तर कोणीच यापुढे पिकलेली केळी कधीच फेकणार नाहीत.उत्सुकता वाटतेय ना..? तर मग करूनच बघू या!
साहीत्य :
4 पिकलेली केळी ,अर्धी वाटी बारीक रवा ,अर्धी वाटी कणिक , अर्धी वाटी नारळ खोवलेले ,1 वाटी साजूक तूप पाऊण वाटी गूळ,1 चमचा वेलची पावडर, 7..8 थेंब खाण्याचा केशरी रंग,1 वाटी दूध, अर्धी वाटी ड्रायफ्रुट्सचे काप.
कृती :
प्रथम एका भांड्यात दुधात गूळ मिक्स करून विरघळण्यासाठी ठेवावा . केळी साले काढुन कुस्करुन घ्यावीत .मग गॅसवर कढई ठेवून त्यात 1 चमचा तूप घालून सर्वांत आधी सर्व काजू ..बदाम काप खुसखुशीत तळून घ्यावेत .मग कढईमध्ये रवा घालून तो अर्धवट परतून घ्यावा. मग त्यात नारळ घालून छान गुलाबी रंग येई पर्यंत मस्त परतून खाली काढावा. नंतर 2 चमचे तूप घालून कणिक खमङ भाजावी. कणिक भाजून होत आली की त्यात 1 चमचा तूप घालून कुस्करलेली केळी घालून छान सर्व परतावे . आता गॅस एकदम मन्द करून त्यात भाजलेला रवा, नारळ घालून एकत्र मिक्स होईल असे छान परतून त्यात वेलची पावडर घालून गूळ विरघळून तयार केलेले दूध घालून सजावटीसाठी ड्रायफ्रुट्स थोडेसे बाजूला ठेवून बाकीचे त्यात घालावेत.
आता सर्व मिश्रण कडेने सुटून घट्ट गोळा बनायला सुरु होईल. त्यावेळी त्यात रंग व बाकी राहिलेले 1 चमचा तूप घालून घट्ट गोळा होई पर्यंत छान परतत राहावे. म्हणजे मोकळे..रवाळ होऊन छान चमक येईल.
आता ट्रे ला तूप लावून त्यावर हा मिश्रणाचा गोळा काढून व्यवस्थित पसरून घ्यावा. वरून सजावटीसाठी ड्रायफ्रुट्सचे काप लावून सुरीने वड्या कट कराव्यात. थंड झाल्या की काढून छान डिश मध्ये काढून सर्व्ह कराव्यात.
वैशिष्ट्य :
केळी बरोबरच गुळात सुद्धा लोह व इतर पोषकतत्वे आहेत त्यामुळे साखरेपेक्षा गूळ वापरलेला कधीही उत्तम, म्हणून आपण यात गूळ वापरला. आकर्षक दिसण्यासाठी थोडासा फूड कलर आणि ड्रायफ्रुट्स वापरले. त्यामुळे पौष्टिकताही वाढते. तुपामुळे व नारळामुळे स्वाद तर छान येतोच पण स्निग्धता मिळते व मऊ वड्या होतात. असेल तर वर्ख लावला तरी आकर्षकता वाढते. कणकेमुळे एक वेगळीच खमंग गोड चवं येते. एकदा खाल्ली तर वारंवार बनवणारच !

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
