Friday, December 19, 2025
Homeलेखमाझी जडणघडण : ७१

माझी जडणघडण : ७१

“अनोखा टाका”

जगणं सोपं नसलं तरी सुंदर नक्कीच असतं. फक्त ती सुंदरता जाणून घेणं आणि अनुभवणं हे व्यक्तीच्या मनोवृत्तीवर अवलंबून असतं. आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर कायमच वेगवेगळ्या घटनांना, प्रसंगांना, सुखांना, दुःखांना, नवनवीन अपेक्षित आणि अनपेक्षित जबाबदाऱ्यांना सामोरे जाण्यात नक्कीच एक आव्हान असतं. ते स्वीकारणं गरजेचं आणि अपरिहार्य असतं. अशावेळी मनातल्या भय, चिंता, आपल्याला हे जमेल का ? यात यश मिळेल का ? नाही जमलं तर ? अयशस्वी झालो तर ? वगैरे वगैरे अनेक प्रश्न मनात सळसळत असतात पण त्याच वेळी संयमाने, समंजसपणे त्या प्रश्नांच्या राशीतून स्वतःला सोडवून घेऊन सिद्ध होणं हेच गरजेचं असतं. त्यासाठी लागणारं मनोबळ आणि योजना यांचा ताळमेळ जमवून पुढचं पाऊल उचलायचं असतं.

आयुष्याच्या या वळणावर मुलींचे विवाह जमवणे हे एक मोठे, काहीसे अवघड आव्हान आता आमच्यासमोर होते हो.
“अहो ! पहिलंच स्थळ पाहिलं आणि आमच्या शुभांगीचं लग्न जमलं. काहीच पायपीट करावी लागलीच नाही. किती छान !”
“अहो ! मुलींचीच काय आजकाल मुलांची लग्न जमवणंही खूप कठीण झालंय. पूर्वी पंचक्रोशीतच, थोरामोठ्यांच्या मदतीने आणि मतांनी लग्न जमायचे पण आता काय विविध मॅट्रिमोनीयल साइटवर ही मुलं अपेक्षांचं भलं मोठं सामान घेऊन वर वधू संशोधनाचा प्रवास करत असतात. मुलींना शहरातच राहणारा, बँक बॅलन्स भक्कम असणारा, स्वतःचा फ्लॅट, गाडी, शाश्वत नोकरी असणारा, पुरोगामी विचारांचा वगैरे वगैरे अगदी टेलर मेड जोडीदार हवा असतो.”
“त्यापेक्षा मुलांनी आणि मुलींनी स्वतःचे जोडीदार स्वतःच शोधावेत. कशाला हवे ते “कढईतले कांदे पोहे !”
हे सगळे भोवताली ऐकू येणारे सामाजिक संवाद.

तर माझा सांगायचा मुद्दा असा की मुलींचे विवाह जमवण्याच्या निमित्ताने आम्ही जेव्हा या वर संशोधनाच्या क्षेत्रात पाऊल टाकले तेव्हा प्रथम आमच्या भोवती असलेल्या पार्श्वभूमीचा विचार आम्हाला करणे गरजेचे होते. दोघीही परदेशस्थित, उच्चशिक्षित, करिअर माइंडेड, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी वगैरे वगैरे. शिवाय अजून पर्यंत तरी योग्य, त्यांच्या परिघात सामावणारा जोडीदार न भेटल्यामुळे “ठरवून विवाह” हा एकच पर्याय आमच्यासमोर होता आणि आता “याहून उशीर कशाला ? योग्यवेळी योग्य गोष्टी झालेल्या बर्‍या. या परंपरावादी रेषेवर आल्यानंतर वर संशोधनाची सुरुवात आम्ही आमच्या परीने केली मात्र.

आम्ही भारतात मुलं शोधत होतो आणि आम्हाला योग्य वाटणारे प्रोफाइल्स मुलींना पाठवत होतो. या दरम्यान आमची दोघांची प्रचंड भांडणेही होत. मतभेद, वादविवाद, आरोप प्रत्यारोप कधीकधी तर सारंच अगदी दोघांच्याही सहनशक्तीच्या पलीकडे जायचं. मूळातच “मुली” म्हणजे विलासचा अत्यंत हळवा कोपरा, प्रचंड वीक पॉईंट ! लग्नानंतरपेक्षा, लग्न जमवण्याच्या प्रक्रियेतच तो एका प्रचंड वियोग पोकळीत हरवलेला होता. त्यामानाने मी अधिक व्यावहारिक पातळीवर विचार करत होते. माझ्यासाठीही “अंधारातलीच उडी असली” तरीसुद्धा सुवर्णमध्य साधूया, काही अगदीच किरकोळ, साधारण तडजोडी करायला काय हरकत आहे ? सर्वच काही आपल्या मनासारखं घडतंच असं नाही वगैरे वगैरे मुद्द्यांचा विचार म्हणजे मला अविचार वाटत नव्हता.

विलास विरोधातही खूप वेळा माझ्यासोबत असल्यासारखा दाखवायचा. म्हणजे मला योग्य वाटलेल्या स्थळाविषयी तोही विचार करायचा. त्या बाबतीतल्या प्राथमिक बाबी, (जरी आमचा विश्वास नसला तरीही समोरच्यांसाठी पत्रिका वगैरे), भारतात त्याच्या आईवडिलांना तरी भेटूया वगैरे करण्यासाठी परवानगी- कम तयारी दाखवायचा पण ज्योतिकाकडूनच त्या स्थळाचे पूर्ण पोस्टमार्टम झाल्यावर मात्र मी, माझे विचार, माझी धडपड हे सगळं विलासकडून पार गाळात जायचं. निकालात निघायचं.
“तुला इतकी घाई काय आहे ? माझ्या मुली अत्यंत गुणी आहेत. मला त्या मुळीच जड झालेल्या नाहीत. तू त्यांना प्रेशराईज्ड बिलकुल करू नकोस आणि त्या स्वतःचा निर्णय घेण्यास समर्थ आहेत आणि त्यांचं सगळं चांगलंच होणार आहे.”
माझ्या बाजूने कुणीच नव्हतं, मी एकटीच पडले होते. मैत्रिणी, बहिणी इतर हितचिंतक एकीकडे मला म्हणत, ”बरोबर आहे आता लग्न जमायलाच हवं” तर दुसरीकडे “विलासचेच म्हणणे किती बरोबर आहे” असंही म्हणत. माझ्या भावनांचा, माझ्या कृतींचा चुकीचा अर्थ लावला जातोय आणि नक्की कशाचं समर्थन करू हे माझं मलाच कळत नसल्यामुळे माझ्या भोवती फक्त एका अनामिक एकाकीपणाचं वर्तुळ आखलं जात होतं.

एक दिवस ज्योतिका मला म्हणाली, “हे बघ मम्मी ! तू दुकानात जातेस, माझ्यासाठी तुझ्या आवडीचा, अगदी रंगसंगतीचा विचार करून तू एखादा ड्रेस अगदी प्रेमाने आणतेस गं ! मला आवडलेला नसला तरीही मी केवळ तुझ्यासाठी एक दिवस तो घालते पण नंतर मात्र कपाटातून तो कधीच बाहेर येत नाही पण जोडीदाराच्या बाबतीत असं नाही ना होऊ शकत ? संपूर्ण आयुष्याचा प्रश्न असतो ना ?”

काही उपयोग नव्हता अशा वेळी मी तिला समजावत सांगण्याचा, “की आम्ही नाही का तडजोडी केल्या ? काही बिघडलं का आमचं ?”
कारण “बाबा” म्हणजे जगातला एकमेव आदर्श, सर्वगुणसंपन्न पुरुष” ही मुलींच्या मनातली दगडावरची रेघ !

परिस्थिती अशी होती की ते तिघंही अगदी मजेत, आनंदात, निश्चिंत होते आणि मी मात्र जेन ऑस्टिनच्या “प्राईड अँड प्रेजुडाईस” या कादंबरी मधली मुलींच्या लग्नाचाच सतत विचार करणारी आणि चिंताग्रस्त राहणारी, एलिझाबेथ बेनेट सारखी एक “मूर्ख” आई होते.

माझ्या जडणघडणीतला हा एक अत्यंत अनोखा आणि नवीनच टाका होता.
क्रमश:

राधिका भांडारकर

— लेखन : राधिका भांडारकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ.मृदुला राजे on माहितीतील आठवणी : 37
सौ.मृदुला राजे on चित्र सफर : 58
गोविंद पाटील सर on बहिणाबाईं…