चेरापुंजी आणि इतर :
चेरापुंजी हे ठिकाण शिलॉगच्या दक्षिणेस १५ किलोमीटर अंतरावर आहे.जगातील सर्वाधिक पावसाच्या ठिकाणांपैकी हे एक आहे, असे शाळेत असताना भूगोलाच्या पुस्तकात वाचले होते. ते प्रत्यक्ष बघायला मिळाले. पण पाऊस अजिबात पडत नव्हता, म्हणुन पाऊस अनुभवता काही आला नाही.
पण आता चेरापुंजी पेक्षा जास्त पाऊस मांसिनराम येथे पडतो, अशी माहिती आमच्या टूर ऑपरेटरने दिली.
चेरापुंजीचे मूळ नाव ‘सोहरा’ आहे. ‘सोहरा’ हे नाव बदलून ते चेरापुंजी असे का केल्या गेले, हे काही कळू शकले नाही. तसेच या दोन्ही नावांच्या अर्थाबाबतही काही बोध झाला नाही. ‘सोहरा’ हे ठिकाण खासी जमातीच्या राज्याची राजधानी होते.
मावलिनॉन्ग :
मेघालय राज्यातील पूर्व खासी हिल्स जिल्हयातील मावलिनॉन्ग हे गाव त्याच्या स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे. डिस्कव्हर इंडिया मासिकाने आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ते निवडले होते. मावलिनॉन्गमध्ये २०१९ पर्यंत ९०० रहिवासी होते. २०१४ पर्यंत सुमारे ९५ घरे आहेत लोकसंख्या बहुतेक खिश्चन धर्माचे प्रालन करते. गावात लीन चर्च आहे. साक्षरता दर १०% आहे. शेती हा स्थानिक लोकांचा मुख्य व्यवसाय आहे, सुपारी हे प्रमुख पीक आहे. उन्हाळ्यात, अननस आणि लीची आढळतात. ते जवळच्या प्रदेशात विकण्यासाठी पाठविले जातात.

लिव्हिंग रूट ब्रिज हा मुळात नदी ओलांडण्यासाठी बांधण्यात आला आहे. हा ब्रिज भारतीय रबराच्या झाडांच्या वाढणाऱ्या मुळांपासून बनवलेला निसर्गरम्य पूल आहे. याला स्थानिक लोक जिंग कीग क्री’ म्हणतात. शिर्लंग पठाराच्या दक्षिणेकडील डोंगराळ प्रदेशातील खासी आणि जैन्तिया लोकांनी रबर, अंजीर वृक्षांच्या हवाई मुळांपासून हाताने या रचना बनवल्या आहेत.
आपण पुलावरून जात असताना, तो झुल्या सारखा झुलायला लागतो. त्यामुळे आपल्याला गंमत वाटत असली तरी, खाली खोल असलेल्या, खळाळून वहात असलेल्या नदीच्या प्रवाहाकडे आपण क्षणभरही पाहू शकत नाही, इतकी छातीत धडकी भरते .
डावकी नदी :
डावकी नदी उम्मगॉट म्हणूनही ओळखली जाते. ही एक सुंदर आणि स्वच्छ नदी आहे. तिचे पाणी इतके नितळ आहे की नदीचा तळ स्पष्ट दिसतो. या नदीवरील पूल ब्रिटिशकालीन सस्पेंशन पूल (तांबडी पूल) आहे. तो १९३२ मध्ये बांधला गेला होता. ही नदी हिरव्यागार लैंडस्केपमधून वाहते. तिला चुननेरी टेकड्याच्या दोन्ही बाजुनी वेढले आहे.

डावकी शहर भारत- बांगला देश सीमेवर आहे. त्यामुळे इथून आपल्याला पलीकडचा बांगला देश दिसतो.
डावकी विषयीची माहिती आम्हाला दिलेल्या माहिती पत्रकातील आहे. पण प्रत्यक्षात ही नदी, तिथे होणारे नौकानयन आम्ही अनुभवू शकलो नाही, कारण तिकडे जाणार्या रस्त्यावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झालेली होती. म्हणुन मागे गाड्यांची रांग लागून अडकून पडण्याच्या आधीच आम्ही यशस्वी माघार घेतली.
क्रमशः

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ.अलका भुजबळ. ☎️ 9869484800
