रक्ताच्या नात्यापेक्षाही नाव नसलेल्या नात्यांनी माझे आयुष्य समृद्ध केले आहे. त्या नात्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांचे स्मरण करणे ही कर्तव्य भावना या लेखनामागे आहे. अशा व्यक्तींचे माझ्या आयुष्यातील स्थान खरे तर शब्दांत व्यक्त न होणारे असे आहे. जवळच्या नातेवाईकांची माया, मदत, त्यांचे प्रोत्साहन हे कुणालाच नाकारता येत नाही. पण आपल्या आयुष्यात अशाही व्यक्ती अचानक, अनपेक्षितरीत्या प्रवेश करून जातात. अन् रंगमंचावरील सह–कलाकाराप्रमाणे तुमच्या आयुष्याच्या नाटकाला रंगत आणतात. नाटकात कुणी एक पात्र रंग भरत नाही. तो एक सामूहिक प्रयोग असतो. अगदी पडद्या मागील कलाकारांचा देखील नाटकाला मिळणाऱ्या हशा, टाळ्यांवर तितकाच अधिकार असतो.
मी शाळेत असताना ज्या वाड्यात राहत असू त्यांचे मालक डांगे पती पत्नी हे वृद्ध होते. देव भक्त होते. त्यांच्याकडे पूजा अर्चा, सोवळे, ओवळे अतिशय कडक होते. परीक्षेच्या आधी नियमित त्यांच्या घरी जायचे, त्यांच्या घरच्या देवाला, त्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे हा माझा अलिखित नियम होता. ते हातावर तीर्थ द्यायचे. काकू परीक्षेच्या वेळी हातावर दही साखर ठेवायच्या. त्या दोघांच्याही आशिर्वादाचे पाठबळ माझ्यासाठी त्यावेळी मोलाचे होते. मी मॅट्रिक मध्ये मेरिट मध्ये आल्यावर त्यांनी माझ्या हातावर ठेवलेले चांदीचे पाच रुपयांचे नाणे लाख मोलाचे होते माझ्यासाठी. मी शेवटचे त्यांना भेटलो ते आय आय टी ला शिक्षणासाठी गेलो तेव्हा. तिथे खरगपूरला असताना कळले की काका काकू एका यात्रा कंपनी बरोबर चार धाम करायला गेले अन् तिकडेच त्यांचे निधन झाले. वाईट वाटले. त्यांच्या आशीर्वादावर माझी श्रद्धा होती. श्रद्धेवर विश्वास होता. या बळावरच मी पुढचे आयुष्य जगलो. या श्रद्धेने, विश्वास भावनेने मला पुढे पावलोपावली बळ दिले.
माझी पहिली नोकरी मुंबई टी आय एफ आर ची. तिथे जायचे तर राहायचे कुठे हा प्रश्न होता. माझ्या एका आत्या ने पत्र दिले. कल्याण येथे राहणारे डॉ वैद्य पती पत्नी तिच्या चांगल्या परिचयाचे होते. मी तिचे पत्र घेऊन त्यांच्याकडे गेलो. त्यांनी जुजबी चौकशी केली. अन् ताबडतोब राहायला यायला सांगितले. तेव्हा वैद्य काका अंथरुणावर आजारीच होते. त्यांची एक मुलगी जवळच राहायची. दुसरी डॉक्टर होती. ती माटुंग्याला असायची. मी सामान घेऊन त्यांच्या घरी गेलो एन त्या घरचाच झालो. सकाळी आठ ते रात्री आठ मी बाहेरच असे. जेवून यायला उशीर व्हायचा. पण रविवारी सुटीच्या दिवशी मी त्यांच्याकडेच जेवावे हा त्यांचा आग्रह असे. त्यांनी माझ्याकडून भाडे वगैरे कधीच घेतले नाही. डॉ काकांना मृत्युपत्र करायचे होते. ते सगळे काम, म्हणजे टायपिंग करणे, वकीलाकडे जाणे, नोटरी करणे हे त्यांनी विश्वासाने माझ्याकडूनच करवून घेतले. मी गेल्यावर दोनच महिन्यांनी डॉ काकांचे निधन झाले. आयुष्यात मी जवळून पाहिलेला अनुभवलेला तो पहिलाच मृत्यू.
काका गेल्यानंतर तर काकूंना माझी फार गरज भासू लागली. मी असल्याने त्यांच्या लेकीही निश्चिंत झाल्या. पुढे थोडे स्थिरावल्या नंतर माझ्या बरोबर त्या नाटक सिनेमाला देखील यायला लागल्या. काकूंना वाचनाची आवड होती. जाण होती. आम्ही नव्या जुन्या कुठल्याही विषयावर मोकळे पणाने चर्चा करायचो. माझ्या पहिल्या कादंबरीच्या प्रती कल्याणला च आल्या पोस्टाने. या पुस्तकावर कल्याणच्या घरचाच पत्ता आहे. माझ्या दुसऱ्या गाजलेल्या पत्रांजली या कादंबरीचे फायनल लेखन डॉ वैद्याच्या घरातच झाले. काकूंना याचा अभिमान वाटायचा.पुढे पी एच डी करायची म्हणून, मी लेक्चररशीप मिळाल्याने पुन्हा आय आय टी खरगपूरला परत गेलो. तेव्हा काकूंना, त्यांच्या मुलींना खूप वाईट वाटले. पण संयोग वियोग हा आयुष्याचा नियम आहे. पुढे काकू वारल्या. तरी या कुटुंबाशी संबंध टिकून राहिलेत. आजही त्यांच्या वयाने पार थकलेल्या डॉक्टर मुलीशी अधून मधुन बोलणे होते. व्हॉट्स ॲप कॉल आहेतच. कल्याणच्या नात–सूनेशी देखील संबंध टिकून आहेत. कुठले ऋणानुबंध असतात हे कुणास ठाऊक ?
खरगपूरला माझे दोन गुरू हे माझ्यासाठी पितृतुल्य होते. किंबहुना त्याहीपेक्षा जास्त म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. डॉ बी एन दास हे माझ्या एम टेक तसेच पी एच डी प्रबंधाचे मार्गदर्शक. त्यांना दोन मुले होती. मी तिसरा असे म्हणायला हरकत नाही. कारण स्वतःच्या मुलाइतकेच कडक धोरण त्यांनी माझ्याशी वागताना ठेवले. जितके कठोर तितकेच प्रेमळ देखील. डॉ सन्याल हे त्यांचे गुरू. माझेही. शिवाय आम्हा दोघांचेही बॉस. विभाग प्रमुख या नात्याने. मी दोघांबद्दल ही यापूर्वी बरेच लिहिले आहे. मी आज जो काही आहे,जे काही कमावले आहे ती या दोघांची देणगी. त्यांनी खूप काही शिकवले. शिकवायचे कसे (खरे तर कसे शिकवायचे नाही हे!), संशोधन कसे शिस्तबद्ध असायला हवे, पेपर, प्रबंध नेमके कसे लिहायचे, प्रोजेक्ट प्रपोजल कसे तयार करायचे. मुद्देसूद रिपोर्ट कसे लिहायचे हे सारे महत्वाचे या दोघांकडून शिकायला मिळाले. त्या दोघांनी जे दिले ते शब्दातीत. त्याची परतफेड केवळ अशक्य. त्या ऋणा चे ओझे वाहण्यात च आनंद !
खरगपूरच्या दहा वर्षे वास्तव्यानंतर आम्ही हैदराबाद येथे उस्मानिया विद्यापीठात स्थलांतर केले. इथे शहर नवे, माणसे नवी, भाषा वेगळी.. शिवाय परिचयाचे असे कुणीच नाही. त्यावेळी प्रा मक्तल यांची खूप मदत झाली. ते एम टेक करायला खरगपूर ला आले होते. त्यावेळचा जुजबी परिचय. पण इथे स्थिर स्थावर व्हायला त्यांची, त्यांच्या पत्नीची खूप मदत झाली. ते शांत सौम्य स्वभावाचे होते. वहिनी नी माझी पुस्तके वाचली होती. त्या माझ्या फॅन होत्या म्हणायला हरकत नाही. शिवाय आमची त्यांची मुलं आसपासच्या वयाची. स्नेह वाढायला, जगवायला हे सारे पुरेसे होते. आमच्या इथल्या घरची प्रत्येक महागडी नवी वस्तू त्यांच्याच सल्ल्याने घेतलेली आहे. आज तीस वर्षानंतरही हा स्नेह टिकून आहे. सुख दुःखात आम्ही एकत्र होतो. अगदी घेण्यासारखे. किंबहुना जरा जास्त जवळचे. डॉ मक्तल, वहिनी दोघेही आमच्या पेक्षा वयाने मोठे. कॉलेज मध्ये मी वरच्या पदावर. पण हे लहान मोठेपण मैत्री आड आले नाही कधी. आज डॉ मक्तल नाहीत. वहिनी पुण्याला स्थायिक झाल्या. मुली परदेशी स्थिरावल्या. पण येणेजाणे आहे. फोन ने विचारपूस आहे. लांबलचक वार्तालाप आहे ! या कुटुंबाने आम्हाला भरभरून प्रेम दिले.

चीमोटे काका काकू यांचे छत्र आशिर्वादासारखे होते. काकू आमच्या नागपूरच्या. जिव्हाळ्याचे तेही एक कारण. काका दत्त भक्त. दरवर्षी त्यांच्याकडे दत्त जयंतीला जाणे व्हायचेच. शिवाय अडीअडचणी ला त्यांचा सल्ला ही आमची भावनिक गरज होती. ते पत्रिका बघायचे. सल्ला द्यायचे. विशेष म्हणजे मुलेही त्यांचा सल्ला मानायची. खरे तर त्यांना देखील स्वतःचे असे दुःख होतेच. या अशा समस्या कुणालाच चुकल्या नाहीत. पण त्यांनीही सगळे आहे ते आहे तसे स्वीकारले. सकारात्मक दृष्टीकोनापेक्षा स्वीकारात्मक दृष्टिकोन त्यांना महत्वाचा वाटे. रडगाणे गात बसू नका. पदरी पडले ते पवित्र मानून पुढे चला. एकाच ठिकाणी रेंगाळत रडत बसू नका ही त्याच्याकडून मिळालेली मोलाची शिकवण. आधी काकू गेल्या कॅन्सर ने. मग पाठोपाठ काका ही गेले. आम्हाला डोक्यावरचे छत उडाल्या सारखे वाटले !
आमच्याच कॉलनीत राहणारे भुसारी काका म्हणजे एक जिंदादिल माणूस. आम्ही हैदराबाद ला आल्यावर दहा वर्षांनी त्यांची ओळख झाली. तेही त्यांच्या कॉलनीत गेल्यावर. पण म्हणता म्हणता या नात्याने सर्व भिंती पार केल्या. वयाने काका काकू आमच्या पेक्षा किती तरी मोठे. पण मैत्रीत वय आड आले नाही. काका चे वाचन प्रचंड. गाठीशी भरपूर माहितीचा खजिना. त्यामुळे गप्पा छान रंगायच्या. त्यांची दोन्ही मुले अमेरिकेत. आधी जोश होता तेव्हा ते देश परदेश खूप भटकले. आयुष्य सर्वार्थाने एन्जॉय केले. बँकेतून रिटायर झाल्यावर ते कार चालवायला शिकले. अन् कार विकत घेतल्यावर बायकोला गाडीत गोव्याला घेऊन गेले. सगळ्या गोष्टीची दोघांनाही हौस. वहिनी जरा मृदू स्वभावाच्या. युवर्स फेथफुली या सदरात मोडणाऱ्या. पण स्वभावाने गोड. शांत. त्यांनी मुलांचे तिकडे स्थिरावणे, आपले इकडे एकटे राहणे आनंदाने स्वीकारले. आमच्या प्रत्येक आनंद सोहळ्यात ते जातीने हजर राहिले. आम्हाला आधार देत राहिले. मुलांच्या लग्न खरेदीत उत्साहाने सहभागी झालेत. जणू त्यांना कसली तरी उणीव भरून काढायची होती आमच्या स्वरूपात ! काकांचे दोनदा ऑपरेशन झाले हृदयाचे. पेस मेकर लागला हृदयात.. त्याची बॅटरी बदलून झाली इतक्यात ! तरीही हे जिंदादिल मस्त. काहीही झाले नाही या थाटात जगताहेत. लाईफ मस्त एन्जॉय करताहेत. त्यांच्या कडून खूप शिकण्यासारखे.त्यांनी एकेक करून आपल्या गावातील मुलं शहरात आणली. त्यांना काही ना काही शिकवले. आता तेच त्याच्या मदतीला आहेत शेवटच्या दिवसात. या मुलांची लग्नं झालीत. त्यांच्या मुलाची शिक्षण देखील यांनीच केले. कुणी इंजिनिअर झाले, कुणी एम बी ए. त्यांना नोकरीला लावण्याचे कामही यांनीच केले अती उत्साहाने. यांच्या ओळखी पालखी भरपूर. अन् काका ना नाही म्हणायची कुणाचीच हिंमत नाही. एवढे उपकारांचे ओझे त्यांनी इतरांच्या डोक्यावर लादून ठेवलेले !
काही महिन्यापूर्वी वहिनी गेल्या तेव्हा परदेशातली मुले येई पर्यंत सगळे या गावच्या मुलांनी, त्यांच्या बायका मुलांनीच केले. सांभाळले. काकानी या मुलांच्या संसारात काही कमी पडू दिले नाही. संबंध कसे जपावेत, माणसे कशी जोडावीत हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो. पंचवीस वर्षाच्या वास्तव्यानंतर आम्ही ती जुनी कॉलनी सोडली तेव्हा सर्वात जास्त दुःख भुसारी काका काकूंना झाले. निरोप देताना ते गहिवरले. मग काकूही गेल्या तसे ते अगदीच एकटे पडले. आताही दर दिवसाआड फोनवर बोलणे होतेच. आता ते एकटे पडले. खूप थकले. ते दोघे म्हणजे आमचे हैदराबाद चे आईवडील ! आम्हाला जन्म न देता आमचे पितृत्व घेतलेले !!
ते चक्क माझ्या एका कादंबरीचे पात्र झालेत. काही कथांतून डोकावले. त्याची त्यांना गंमत वाटत असे. मी तुमच्या पुस्तकातून अमर राहीन असे म्हणायचे विनोदाने.
हैदराबाद ला विद्यापीठात ही अनेक तेलगू प्रोफेसरानी खूप सहकार्य केले. अगदी आल्या आल्या मुलांच्या प्रवेशापासून तर स्थिरावण्या पर्यंत. आम्हाला कधीही आपण आऊटसाईडर आहोत असे वाटले नाही. मला तर नको तितका मान सन्मान दिला या विद्यापीठाने. इथल्या विद्यार्थ्यांनी मला शिक्षक म्हणून घडवले. डझनभर कुलगुरूंच्या बरोबर मी काम केले.. निवृत्ती नंतरही गेल्या वर्षी पर्यंत माझे ऑफिस, नावाची पाटी कायम होती आमच्या विभागात. मुलानी लाखो रुपये देणगी देऊन एक प्रयोग शाळा बांधली. त्याला माझे नाव दिले. कोण करते एवढे सारे कुणासाठी ? तेही पर प्रांतातील माणसासाठी ?
औरंगाबाद (आता छत्रपती संभाजीनगर) येथील कुलगुरू पदाच्या वास्तव्यात देखील अनेक प्रेम करणारी, जीव लावणारी माणसे भेटली. नवी नाव नसलेली नाती निर्माण झाली. मराठवाड्यातील हे प्रेम, हा जिव्हाळा न विसरणे सारखा. त्यातही न्या. चपळगावकर पती पत्नी आमचे तिथले लोकल पालक झाले. दर आठवड्याला घरी येणार अन् जेवूनच जाणार. त्यांच्या बरोबर साहित्यिक गप्पा मारणे, विविध विषयावर चर्चा करणे ही बौद्धिक मेजवानी होती. त्यांचे निधन झाले तेव्हा पोरके झाल्यासारखे वाटले ! एकूणच या विद्यापीठाच्या कॅम्पस मधील सहकाऱ्यांनी जे प्रेम दिले, जीव लावला त्याचे शब्दात वर्णन करणे कठीण. आता दहा वर्षे झालीत तिथून निवृत्त होऊन. पण तिथल्या नात्याची नाळ काही तुटली नाही. अनेकांचे फोन येतात. लग्नाची आग्रहाची निमंत्रणे येतात. मी आयुष्यात फारसा पैसा कमावला नसेल. पण या नाव नसलेल्या नात्यांनी दिलेली श्रीमंती कधीच कमी न होणारी. उलट चक्रवाढीने वाढत जाणारी !
माझे नाते गोते नसलेले अनेक विद्यार्थी, माझे प्राध्यापक, माझे सहकारी, प्रत्येक नव्या शहरात मिळालेले स्नेही. अशा सर्वांनी आमच्या जीवनाचे सार्थक केले. आम्हाला घडवले. समृद्ध, श्रीमंत केले. म्हणूनच रक्ताच्या नात्यापेक्षा ही या नाव नसलेल्या नात्यांची किंमत माझ्या आयुष्यात सर्वाधिक आहे. न मोजता येण्या इतकी प्रचंड आहे. माझ्या हृदयाचे कपाट या नाव नसलेल्या नात्याच्या अमूल्य दागिन्यांनी अक्षरशः भरले आहे..
उतू जाईपर्यंत !!

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. हैद्राबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
