भारताच्या “वंदे मातरम्…!” या राष्ट्रीय गीताला आज, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण होत आहेत.
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ७ नोव्हेंबर १८७५ रोजी “वंदे मातरम्” हे गीत रचले.

ते प्रथम बंगदर्शन या साहित्यिक मासिकात प्रकाशित झाले होते. पुढे ते त्यांच्या १८८२ साली प्रकाशित झालेल्या एन ‘आनंदमठ’ या कादंबरीमध्ये समाविष्ट केले गेले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १८९६ साली झालेल्या अधिवेशनात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत प्रथम गायले होते. त्यानंतर हे गीत १९०५ पासून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात शीर्षस्थानी गाण्यात येऊ लागले. या गीतावर आणि हे गीत समाविष्ट करण्यात आलेल्या, ‘आनंदमठ’ कादंबरीवर इंग्रज सरकारने बंदी घातली. परंतु जनतेने ही बंदी झुगारून दिली होती. हे गीत सार्वजनिक ठिकाणी गायल्याबद्दल अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला होता. पुढे देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या गीतावर असलेली बंदी उठविण्यात आली.

भारतीय संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी “वंदे मातरम” हे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले. याप्रसंगी भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद म्हणाले की, “जन गण मन” या भारताच्या राष्ट्रगीताच्या बरोबरीने या गाण्याचा देखील सन्मान केला पाहिजे.” तथापि, भारतीय राज्यघटनेत “राष्ट्रीय गीता”चा उल्लेख नाही.

या ऐतिहासिक गीताने भारतीय स्वातंत्र्य संग्रामास असामान्य प्रेरणा दिली आहे. ते राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे. वंदे मातरम या शीर्षकाचा अर्थ “मातृभूमी मातेची मी स्तुती करतो” असा आहे. गीताच्या नंतरच्या कडव्यात “माता देवी” चे वर्णन; लोकांची मातृभूमी असे केले आहे. बंगमाता आणि भारत माता; परंतु मजकुरात याचा स्पष्ट उल्लेख नाही. या गीताची पहिली दोन कडवी ही आई आणि मातृभूमीचा अमूर्त संदर्भ आहेत. या गीताच्या सादरीकरणासाठी ६५ सेकंद इतका कालावधी अपेक्षित आहे.

शांतिनिकेतनमधील चित्रकार राममनोहर यांनी भारतीय संविधानाच्या हस्तलिखितावर (पृष्ठ १६७) हे गीत चित्रित केले आहे.
भारतभर या गीताचा १५० वर्षांचा उत्सव आजपासून राष्ट्रीय आणि स्तरावरील भव्य कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी सामूहिक गीत गायन, विशेष कार्यक्रम, स्मारक डाक तिकीट आणि नाणे प्रकाशन यांचाही समावेश आहे.संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम, शाळा- महाविद्यालये आणि सांस्कृतिक संस्थातही विविध कार्यक्रम आयोजित केले जातील.

भारतभर जसा या गीताचा उत्सव साजरा करण्यात येत आहे तसा तो जगातील सर्व भारतीयांनाही साजरा करणे संयुक्तिक ठरेल.
— संदर्भ आणि छायाचित्रे : गुगल

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
