योग
लग्न म्हणजे काय ? “लग्न तेव्हाच जमतं जेव्हा योग येतो. योग यावा लागतो.”
मुलींची लग्न जमवताना ‘योग’ या शब्दाचा अर्थ मी अगदी कसोशीने धुंडाळला होता. ‘योग’ म्हणजे ध्यान धारणा प्रणालीतील मनःशांती मिळवण्यासाठी करावयाची एक शारीरिक आणि मानसिक कृती इतकंच मला माहीत होतं. म्हणजे तसा अनेकांच्या मुखातून येता-जाता, इकडून तिकडून, योग या शब्दाचा उच्चार वेळोवेळी कानी पडतच होता पण “योग यावा लागतो” याचा शब्दशः अर्थ शोधावा असे मला कधी गांभीर्याने वाटले नव्हते आणि योग शब्दाचा संबंध हा जन्म कुंडलीतल्या बारा घरांशी आणि त्यात वस्ती करून बसलेल्या ग्रहांशी घनिष्ठ आहे हे कळल्यानंतर मी पत्रिका या विषयावर जरा लक्ष केंद्रित केले.
ग्रहमैत्री, गण, नाडी, चंद्रबळ, मंगळ दोष, ग्रहांची एकमेकांवरची कृपादृष्टी, वक्रदृष्टी, दोन ग्रह विरोधात असले तरी एखादा मित्र ग्रह परिस्थिती कशी सावरून धरतो वगैरे वगैरे वाचताना मी खरोखरच एखाद्या चमत्कारयुक्त विश्वाची सफर करत आहे असेच मला वाटले आणि एक सकारात्मक विचार माझ्या मनात रुजला की खगोलशास्त्र आणि इथे कागदावर आकाशातल्या ग्रहांना आणून त्यांच्याद्वारे मानवी जीवनाचा अभ्यास करणे या दोन्हीमध्ये साम्य नसले तरी शास्त्राचा अभाव नक्कीच नाही. ठोकताळे असले तरी अगदीच निष्प्रभ, कुचकामी नाहीत फक्त त्यांच्या ताब्यात अथवा त्यावर किती विसंबून राहायचं हे मात्र वैयक्तिक आहे. मनाच्या एका कोपऱ्यात या सर्व ग्रहांना कोंबून ठेवताना दुसऱ्या कोपऱ्यात मात्र व्यावहारिक आणि तार्किक बुद्धी शाबूत ठेवण्याची कसरत मी मुलींचे विवाह जमवताना अनुभवली. दोघींच्याही जन्मवेळा, जन्मस्थान आणि तारखा या पुरेशा डेटावरून पत्रिकाही बनवून घेतल्या. त्यावेळी प्रकर्षाने आठवण झाली ती पप्पांची. आम्हा सर्व बहिणींच्या, आमच्या मुलांच्याही पत्रिका पप्पानी त्यांच्या जन्माच्या वेळी स्वतः बनवलेल्या होत्या कारण त्यांचा याही विषयाचा अत्यंत गाढा आणि सखोल अभ्यास होता. त्यांनी त्या पत्रिका अभ्यासल्याही असतील पण चुकूनही कधीही या सगळ्यांच्या “पत्रिका काय सांगताहेत” हे कुणालाच सांगितले नाही.
“बिल्ड युवर ओन स्टार्स” असंच ते म्हणायचे. एक दिवस मी पप्पांना विचारले होते, ”मग कशाला पत्रिका बनवण्यात इतका वेळ घालवता ?” त्यावेळी मला त्यांनी काही उत्तर दिले नाही. असो !
थोडं विषयांतर झालं असेल पण मूळ मुद्दा असा होता की माझ्या गुणी, गोजिरवाण्या, देखण्या, उच्चशिक्षित, सक्षम, स्वावलंबी, चि.सौ.कां. कन्यांच्या वर संशोधनाच्या क्षेत्रात मी जय्यत तयारीनिशी उतरले होते हे नक्कीच.
पुन्हा “मॅरेजेस आर मेड इन हेवन” किंवा “लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात” हा ही एक कल्पना विश्वात रमवणारा विषय डोक्यात घर करून होताच. आणि अशातच एक दिवस अमेरिकेहून ज्योतिकाचा फोन आला. “मम्मी मी एक लिंक तुला पाठवली आहे. ती बघ. एका “एलिजिबल बॅचलर” विषयी ती आहे. गेले काही दिवस आम्ही ऑनलाईन चॅटिंग करत आहोत. जरा बरा वाटतोय मला. जेनुइन वाटतोय पण तू बघ आणि काय ते सांग.”
“जरा बरा वाटतोय मला, ”हे ज्योतिकाचं वाक्यं माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. तिचं “जरा बरा” म्हणजे माझ्या मते “उत्तम” हेच स्केल. पुन्हा एकदा ‘जेन ऑस्टीनची’ एलिझाबेथ बेनेट माझ्या अंगात संचारली.
मी कम्प्युटर सुरू केला. माझं ईमेल अकाउंट उघडलं आणि इनबॉक्स मध्ये येऊन पडलेला ज्योतिकाचा मेल अपार उत्सुकतेने आणि मनाच्या अत्युच्च भावनाविवशतेने उघडला. असा की “जणू काही प्रत्यक्ष पांडुरंगच माझ्या उंबरठ्यावर “करकटी ठेवूनिया उभा” राहिला असावा.”
मी विलासलाही मेल दाखवला. दोघांनी त्या “बरा वाटला” हा ज्योतिकाचा शेरा मिळालेल्या मुलाचा फोटो आणि संपूर्ण प्रोफाइल अनेक वेळा वाचला आणि विलास जेव्हा म्हणाला,” हरकत नाही पुढे जायला. बघू तर या !” आणि शिवाय हा मुलगा ज्योतिकानेच शॉर्टलिस्ट केला होता त्यामुळे नंतर पलटून माझ्यावर वार होण्याचा (महत्त्वाचं नसलं तरी दुखावणारं असं काहीतरी) संभव कमी असल्यामुळे मी ज्योतिकाला “गो अहेड” असा उत्तरादाखल मेलही पाठवला. त्यावरही तिचे उत्तर होतेच, ”मम्मी ! इतकी काय एक्साईट वगैरे होऊ नकोस. आम्ही प्रत्यक्ष भेटायचं ठरवलंय. भेटल्यावर काय ठरतंय ते बघूया. आतापुरतं इतकंच !”
कितीही ताण घ्यायचा नाही असे ठरवले तरी स्ट्रेस हा येतोच. सर्वात वाईट असते ती ही ‘तळ्यात मळ्यातली अवस्था’. एक प्रकारची “नो मॅन लँड” असते. आमच्यासारखंच ४५० किलोमीटर दूरीवरचं आणखी एक दाम्पत्यही याच अवस्थेत असावं.
रात्रीचे साडेअकरा वाजले असतील. त्यावेळी फोन खणखणला. इतक्या रात्री कुणाचा फोन असेल ? पुन्हा भय, चिंता उत्सुकता सगळं काही.
फोन विलासनेच उचलला. लँडलाईन असल्यामुळे “स्पीकरवर टाक ही भानगड नव्हती. विलासने उत्तरादाखल बोललेली दोन-तीन वाक्यं ऐकलेली अशी..
“नमस्कार”
“हो बोलतोय.”
“हं हं बोला ना ?”
चौथं वाक्य फार महत्त्वाचं.
“तुम्ही माझ्या मिसेसशीच बोला.” तेव्हाच मी समजून गेले, हा टेक्निकल फोन आहे करंट विषयावरचा. काहीतरी निर्णय घ्यावा लागणारा असणार आणि माझा अनेक वर्षांचा विलासच्या बाबतीतला अनुभव.
घेतला मी फोन. पलीकडून अगदी छान आवाजात मृदू शब्दांची उलगड झाली.
“मी शिरीष वाघमोडे बोलतोय. पार्ल्याहून. त्याचं असं आहे आमचा मुलगा साकेत काही दिवसांसाठी मिलवाॅकीला म्हणजे शिकागो जवळच्या गावात जात आहे. तुमची मुलगी ज्योतिकाही तिथेच असते. काय योगायोग आहे बघा ! साकेत ज्योतिकाला तिथे भेटणार आहे तर तुम्हाला हे चालेल का ?”
तशी पार्श्वभूमी मला माहीतच होती. प्रथमत:च “शिरीष वाघमोडे” या व्यक्तीबद्दल माझं मत एकदम चांगलं झालं. एक तर त्यांचा आवाज. सभ्य बोलणं आणि अशा रीतीने परवानगी पर काही विचारणं हे मला खूपच अर्थपूर्ण, योग्य वाटलं. पारंपरिक पद्धतीने थोरा मोठ्यांच्या सहवासात या दोघांचा बघण्याचा…भेटण्याचा म्हणूया .. कार्यक्रम होणे हे साकेत ज्योतिकाबाबत शक्यच नव्हते. त्यामुळे हा पर्याय,” काय हरकत आहे ? या सदरात अगदी सहजपणे गेला. त्यानंतर मी, विलास शिरीष आणि सुवर्णा वाघमोडे आलटून पालटून एकमेकांशी खूप वेळ गप्पा करत बसलो. त्या अर्ध्या एक तासातच आम्ही इतके मनमोकळे झालो की जणू काही आमची वर्षानुवर्षांची मैत्री आहे. “योग यावा लागतो” याचं प्रात्यक्षिकच जणू काही आम्ही अनुभवत होतो.
२५ एप्रिल २००५ ही तारीख होती. फोनवरच आम्ही त्या दिवशी साकेत ज्योतिकाशी बोललो. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. २५ एप्रिलला सुवर्णाताईंचा (साकेतच्या आईचा) वाढदिवस आणि २६ एप्रिलला विलास चा वाढदिवस त्यामुळे दोघांनाही मुलांकडून मिळालेली ही अतिशय गोड, अनमोल भेटच होती. सुवर्णाताई तर लगेचच पार्ला देवीच्या देवळात जाऊन नवसही फेडून आल्या.
डेट्राॅइटला तुषार-पिंकाने (माझ्या बहिणीच्या मुलाने आणि सुनेने) त्यांच्याच घरी साकेत ज्योतिकाच्या एंगेजमेंटचा अगदी गोड,प्रेमळ सोहळा पार पाडला. अमेरिकेतली सर्व भावंडे तिथे जमली. मयुरा तर होतीच. तिचा आनंद काय वर्णावा ? त्याचवेळी या कार्यक्रमासाठी काही मित्रमंडळीही उपस्थित होती आणि त्यात मोनिका पिंगे जी ब्रुकबाँड कॉलनीतली जळगाव मधली ज्योतिकाची बालमैत्रिण होती. हा शानदार सोहळा आम्ही चौघांनी (आम्ही दोघे आणि आमचे भावी व्याही) आमच्या जळगावच्या सुंदर बंगल्यात स्काईपर ऑनलाईन अनुभवला. अगदी सुटा बुटात पैठण्या परिधान करून! बंगल्यालाही सजवले होते. आयुष्यातले खरोखरच अविस्मरणीय क्षण ते !

२० डिसेंबर २००५ रोजी ज्योतिका साकेतशी विवाहबद्ध झाली. लग्नाच्या काहीच दिवस आधी ती भारतात आली होती, धडाम धुडूम खरेदी आणि लग्न सोहळ्याची धामधूम.. सारेच मनोरंजक आणि न विसरता येण्यासारखे.
साकेतला आम्ही पाहिले ते लग्नाच्या अदल्या दिवशीच. उंच, गोरा, देखणा, हुशार, उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत जावयावरून मीठ मोहर्या ओवाळताना आम्ही दोघे भरून पावलो.
जळगावीच लग्नाचा सोहळा अत्यंत बहारदारपणे पार पडला. देव देवक, मेहंदी, हळद, बांगड्या भरणे, संगीत, शुभमंगल सावधान आणि स्वागत सोहळा सर्व सर्व अगदी लक्षात राहण्यासारखेच पार पडले. भांडारकर कुटुंबियांसमवेत आणि माझ्या माहेराने आमचा संपूर्ण ऐसपैस बंगला गजबजला. प्रवेशद्वारीच्या केळीच्या घडयुक्त खांबांनी अतिशय मंगलमय वातावरण निर्मिती केली. आमचं घर फुलापानांनी सजलं, दिव्यांनी प्रकाशलं. वर्हाडी मंडळींनी “ओम” कार्यालयातल्या सुसज्ज वास्तव्याचा प्रसन्न अनुभव घेतला.
या कार्याच्या निमित्ताने आमचे कुटुंबीय, आमचा जळगावचा घट्ट मित्रपरिवार, गावातले सारेच वेंडर्स यांनी जी कमालीची साथ आम्हाला दिली.. तेव्हा जाणवले ते एकच “आपण किती भाग्यवान आहोत !” आमच्या कुंडलीतल्या बारा घरात स्थित असलेल्या सर्वच ग्रहांनी आमच्यावर जणू काही सुगंधित फुलांची बरसात केली. वधू-वरांना आशीर्वाद दिले
।। शुभास्ते पंथान: सन्तु।।
“नांदा सौख्यभरे !”
या विवाह बंधनातल्या काही ठळक बाबी मात्र सांगायलाच हव्यात. यात “तुमची जात कोणती ?” हा प्रश्न नव्हता. देण्या घेण्याच्या याद्या नव्हत्या. मानपान, तुमचे आमचे, तुमच्यात आमच्यात, असे काहीही प्रकार नव्हते. सगळा अत्यंत मुक्त, मोकळा, मैत्रीपूर्ण सोहळा होता. “तुम्ही जावयाला न पाहताच कसे काय लग्न ठरवले ?” या प्रश्नांची उत्तरेही विचारणाऱ्यांना लग्न समारंभातल्या खेळीमेळीच्या आणि आमच्या व्याही मंडळींशी झालेल्या संवादातूनच मिळाले असावे.
मान्य आहे रिस्क फॅक्टर्स दुर्लक्षून चालत नाहीत पण “वही होता है जो खुदा चाहता है !”
“अच्छी सोच अच्छे फल” ही टॅगलाईन स्वीकारली.
मयुराच्या लग्नाचीही गोष्ट अशीच सुरस आहे. ती आपण पुढच्या भागात वाचूच पण गंमत सांगते आजकाल मी सुद्धा लग्नाळू मुलांच्या चिंतित आई-वडिलांना दिलासा देण्यासाठी म्हणते.
“अहो योग यावा लागतो ! लग्नाच्या गाठी स्वर्गातच जुळलेल्या असतात. नका काळजी करू.”
क्रमश:

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 986948400.
