Wednesday, November 12, 2025
Homeलेख"अशा" प्रकारे पुरस्कार : सन्मान की अपमान ?

“अशा” प्रकारे पुरस्कार : सन्मान की अपमान ?

पुढील वृत्तांत वाचून, आपल्यालाही पुरस्कारांबद्दल बरे वाईट अनुभव आले असतील तर ते अवश्य कळवा. या मागे कुठल्याही संस्थेला किंवा व्यक्तीला नावे ठेवण्याचा उद्देश नसून पुरस्कार वितरण समारंभ सन्मानजनक, आटोपशीर, व्यवस्थित होत जावेत अशी अपेक्षा आहे.
— संपादक

नव्वदी पार केलेल्या मधु मंगेश कर्णिक यांच्या पुढाकारानं नव्वदच्या दशकात ‘कोकण मराठी  साहित्य परिषद‘ (‘को. म. सा. प.’) या वाङमयीन संस्थेची स्थापन झाली. त्यांच्या उत्साहानं लवकरच ती रुजली. या घटकेला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या कोकणातील पाचही जिल्ह्यांत  तिच्या 71 शाखा उत्साहानं कार्यरत आहेत.

वर्षभरात प्रकाशित झालेल्या विविध साहित्य प्रकारांतील पुस्तकांना ‘को. म. सा. प.‘ दरवर्षी विविध व्यक्तींच्या नावानं  पुरस्कार देत असते. 2023 – 24 या वर्षातील पुस्तकांना जाहीर झालेल्या पुरस्कारांचं वितरण केशवसुतांच्या मालगुंड या जन्मगावी शुक्रवार 7 नोव्हेंबर रोजी झालं.

यंदा मला  माझ्या ‘तराने – अफसाने‘ या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला होता. म्हणून मी या समारंभाला माझी मुलगी अदिती अभ्यंकर हिच्याबरोबर गेलो होतो.

मला हा पुरस्कार प्रदान केल्याबद्दल मी ‘ को. म. सा. प. ‘ चा आभारी आहे.

चित्रपट सृष्टीत / सृष्टीवर लेखन करणाऱ्या लेखकांना साहित्यिक आणि अन्य वाचक फारसा मान देत नाहीत, याची खंत कित्येकांना वाटत असे. त्यांत दिवंगत लेखक, चित्रपट निर्माते – दिग्दर्शक भाई भगत, नामवंत लेखक ग. दि. माडगुळकर हे ही होते.

मात्र, ‘ को. म. सा. प. ‘ नं यासाठी भाई भगत यांच्या पत्नी कुंदा भगत यांच्या सूचनेवरून हा पुरस्कार ठेवला. कुंदा भगत यांनी त्यासाठी काही रक्कमही ‘ को. म. सा. प. ‘ ला देणगी म्हणून दिली होती.

मात्र, हा समारंभ अतिशय ढिसाळ आणि त्रासदायक झाला, हे खेदानं नमूद करावं लागत आहे.

मालगुंडला येण्यासाठी रत्नागिरीला यावं लागतं. त्यासाठी जवळ जवळ दोन / दोन महिने अगोदर आरक्षण करावं लागतं. आम्हाला जेमतेम 20 – 21 दिवस अगोदर तारीख कळवली गेली. त्यामुळे माझं तर आरक्षण शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा यादीवर होतं !

आम्हाला आलेल्या पत्रात फक्त सकाळी 11.30 वाजता कार्यक्रम आहे, इतकंच नमूद केलं होतं. कार्यक्रम पत्रिका, प्रमुख पाहुणे, वा अन्य कसल्या म्हणजे कसल्याही गोष्टीचा उल्लेख नव्हता.

कार्यक्रमाची वेळ सकाळी 11.30 अशी गैरसोयीची ठेवली. कार्यक्रमाला पोचलो तेथे स्वागत करायला कोणीही नव्हतं. चहा, न्याहरी  सोडा; साधं प्यायचं पाणीही देऊ केलं नाही. अनेकांना (साधारण 20 पेक्षा जास्त)  पुरस्कार जाहीर झालेले होते. तर कार्यक्रम ठिकाणी त्यांच्यासाठी पहिल्या 2 – 3 रांगा आरक्षित करायला हव्या होत्या. त्या तशा नसल्यामुळे मिळेल त्या ठिकाणी पुरस्कारार्थी बसले !

11.30 चा कार्यक्रम 12.15 ला सुरु झाला. स्वागत, दीपप्रज्वलन अशांत वेळ घालवत कार्यक्रमाला सुरवात झाली. व्यासपीठावर अनेकजण होते. प्रत्येकानं भाषण केलं. तसं कोणाचंही भाषण  लांबलं  नाही. पण प्रत्यकेजण व्यासपीठावरच्या सर्वांचा उल्लेख केल्याशिवाय भाषणाला सुरवात करत नव्हता. ‘ को. म. सा. प. ‘ च्या 71 शाखांपैकी काही शाखाध्यक्ष उपस्थित होते. त्यांचं शाल देऊन स्वागत केलं गेलं. मालगुंड गावाचे सरपंच, उपसरपंच आणि अन्य अनेक व्यक्तींचं स्वागतही फूल देऊन केलं  गेलं. कार्यक्रम सुरु असताना  कुणी महनीय व्यक्ती आली की, कार्यक्रम थांबवून तिचं स्वागत केलं जायचं. भाषण  संपल्यावरही इतक्या व्यक्तींचं स्वागत केलं गेलं की, मला तर  आज वेळेअभावी पुरस्कार प्रदान सोहळा रद्द होतो की काय अशी भीती वाटू लागली !

अनेकांची भाषणं झाल्यामुळे बराच वेळ गेला. मग पुरस्कार अशा वेगाने दिले गेले की, विचारू नका ! पुरस्कारात सन्मानचिन्ह, मानचिन्ह, एक असोला नारळ, छोटी शाल आणि रोख रक्कम असं वाटप झालं. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्याच गोष्टी मिळाल्या असाव्यात असं मी धरून चालतो !

वास्तविक प्रत्येक पुरस्कारार्थीचा दोन तीन ओळींत परिचय करून देणं आवश्यक होतं. पण ते केलं गेलं नाही; वा त्याची कोणालाही खंतही वाटली नाही ! यात वेळ घालवायचा नव्हता तर एक छोटी पुस्तिका छापून पुरस्कारार्थींचा परिचय, छायाचित्र आणि पुस्तकांची नावं यांची नोंद केली असती तर ते बरं पडलं असतं. आता संगणकाच्या युगात ही गोष्ट सुकर आणि अत्यंत कमी खर्चात झाली असती.

इतक्या व्यक्तींनी भाषणं  केली; पण पुरस्कारार्थी व्यक्तींपैकी कोणालाही भाषण करण्याची संधी दिली नाही.

लांबलेल्या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शन करणाऱ्या व्यक्तीनं सुमारे 8 – 10 मिनिटं पीळ पीळ पिळलं ! त्यानं काही व्यक्तींचं केलेलं कौतुक ऐकवत नव्हतं !

कार्यक्रम सुरु झाल्यावर सुरवातीला उपस्थितांना भोजन देण्यात येईल असं जाहीर केलं गेलं. दोन वाजून गेल्यावर कार्यक्रम संपला. मग भोजनाला झुंबड उडाली !

कार्यक्रमाला सुमारे 250 व्यक्ती उपस्थित होत्या.

माधव अंकलगे यांनी लांबलेल्या कार्यक्रमाचं सूत्र संचालन नेटकं केलं. कुठेही पाल्हाळ त्यांनी लावला नाही. या संपूर्ण कार्यक्रमात मला तरी ही एकमेव अभिनंदनीय गोष्ट वाटली.त्यांचं मनापासून अभिनंदन !

असे कार्यक्रम ‘ को. म. सा. प. ‘ किमान 25 वर्षे करत आहे. दरवर्षी अशाच प्रकारे कार्यक्रम ‘ उरकला ‘ जातो का ? कार्यक्रमात काही गोष्टी अपरिहार्य असतात. काही गोष्टी आयत्या वेळी कराव्या लागतात, हे मला मान्य आहे. मग या गोष्टी लक्षात घेऊन कार्यक्रम सकाळी 09.30 अथवा अशाच सोयीच्या वेळेला सुरु करता आला असता.

पुरस्काराचं स्वरूप काय आहे, हे पत्रात तर कळवलं नाहीच; पण दूरध्वनीवर त्याची विचारणा केली असताना त्याचं उत्तर टाळलं गेलं. निमंत्रण पत्रात कार्यक्रमाची पत्रिका देता आली असती.
ती ही दिली नाही.

पुरास्कारार्थींना सन्मानचिन्ह, मानपत्र दिलं गेलं. पण ज्या प्रकारे ते दिलं गेलं त्यात त्यांचा मान राखला गेला आहे, असं निदान मला तरी वाटलं नाही.

पुढच्या वर्षीपासून या त्रुटी दूर केल्या जातील, अशी उमेद  बाळगावी काय ?

केवळ टीका करायची म्हणून हा मजकूर लिहिला नाही. तर ‘ को. म. सा. प. ‘ अशा नामवंत संस्थेच्या कार्यक्रमात आमूलाग्र सुधारणा व्हावी म्हणून असं कटुसत्य लिहावं लागलं.

मला पुरस्कार दिल्याबद्दल मी ‘को. म. सा. प’ चे पुनश्च आभार मानतो.

आयोजक या गोष्टींची दखल घेऊन योग्य त्या सुधारणा घडवून आणतील अशी अपेक्षा करतो.

‘ को. म. सा. प.‘ ला शुभेच्छा !

जाता जाता  :
1) मानपत्र आणि सन्मानचिन्ह या दोन्ही ठिकाणी माझ्या पुस्तकाचं शीर्षक ‘ तराने  *अफसाने* ‘ ऐवजी ‘ तराने *अपसाने* असं लिहिलं गेलं आहे ! या दोन्ही ठिकाणी पुरस्कारार्थी आणि पुस्तकाचं शीर्षक बारीक अक्षरात आणि प्रदान करणाऱ्यांची नावं मोठ्या अक्षरात छापली आहेत !

2) 1994 साली दिवंगत भाई भगत यांना उल्हासनगर येथे झालेल्या ‘को. म. सा. प.‘ संमेलनात पुरस्कार मिळाला होता. त्या वेळेस चित्रपटावर लेखन करणाऱ्याला असा पुरस्कार दिला जावा, अशी  सूचना नामवंत अभिनेत्री आणि भाई भगत यांच्या, आज 91 वर्षांच्या असलेल्या, पत्नी कुंदा भगत यांनी मधु मंगेश कर्णिक यांना केली; आणि काही रक्कमही देऊ केली.

3) माझ्या – पहिल्या पुस्तकाच्या–*‘ चंदेरी सृष्टी सोनेरी गोष्टी ‘*  प्रकाशनाला चित्रपटसृष्टीवर सातत्यानं लेखन करणारे प्रख्यात लेखक दिवंगत मधु पोतदार आले होते. त्या वेळेस ते ही म्हणाले होते की, चान्देजी, शासन आपली दखल घेत नाही. वाचकांचं प्रेम हाच आपला पुरस्कार !

4) फूल देऊन स्वागत तर इतक्या व्यक्तींचं झालं की, मला तर खेडेगावातील लग्न पत्रिकेची आठवण झाली ! त्या पत्रिकेत लग्नाच्या निमंत्रणाचा मजकूर 4- 5 ओळींत आणि उरलेलं पृष्ठ (वा बाजूचं पृष्ट) गावातील सर्वांच्या नावानं भरून जातं. तसंच या कार्यक्रमात अन्य भरताड लांबली आणि प्रत्यक्ष पुरस्कार वितरण हे काही मिनिटांत उरकलं गेलं !

5) माझा गाववाला आणि गेली 50 पेक्षा जास्त वर्षे रत्नागिरीत एक अग्रगण्य कर सल्लागार म्हणून कार्यरत असलेल्या रसिकलाल शंकरलाल शहा या 85 वर्षीय सन्मित्रानं माझ्यासाठी या कार्यक्रमाला 1 तासाचा प्रवास  करून उपस्थिती लावली. इतकंच नव्हे; तर त्याच्या आलिशान चारचाकीतून त्यानं अदितीला आणि मला रत्नागिरी ते मालगुंड आणि परत अशी नेण्याआणण्याची व्यवस्थाही केली !

प्रकाश चांदे.

— लेखन : प्रकाश चांदे. डोंबिवली
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ.मृदुला राजे on कॅन्सर म्हणजे “कॉमा” !