‘धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघा’ तर्फे ‘माध्यमकर्मींचे हक्क आणि अधिकार’ या विषयावर नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादाला पत्रकारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर हे होते.

यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई) तथा दैनिक द ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राच्या कार्यकारी संपादक शीतल करदेकर म्हणाल्या की, पत्रकार, पत्रकारेतर कर्मचाऱ्यांंना वेतन आयोग लागू नाही. तसेच पत्रकारांची सरकारकडे नोंदणी देखील नाही. खऱ्या पत्रकारांना हक्क आणि अधिकार मिळायचे असतील तर पत्रकार नोंदणी, अर्थात गणना व्हायला हवीच, यात जो नोंद क्रमांक मिळेल तोच माध्यमकर्मीच्या कामाचे रेकॉर्ड अपडेट करणारा असेल. आर्थिक, सामाजिक मानसिक सुरक्षेसाठी हे होणे अत्यावश्यक आहे.”
आपण आपले हक्क मालकांकडे मागत असतो. सरकारकडे पत्रकारांची नोंदणी देखील नाही. आपली सरकारने नोंदणी केली पाहिजे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या हितासाठी पत्रकार महामंडळ स्थापन झाले पाहिजे यासाठी आम्ही लढा देत आहोत. मी यासाठी आमरण उपोषण देखील केले आहे. महामंडळ स्थापन झाल्यास पत्रकारांच्या अनेक समस्या सुटणार आहे. खऱ्या पत्रकारांना त्यांचे अधिकार मिळणार आहेत. मंजुर झालेल्या महामंडळाची सुरुवात महाराष्ट्रातून झाली पाहिजे. तर महाराष्ट्र देशाचा दिशादर्शक ठरेल.”

प्रमुख अतिथी म्हणून माई संघटनेचे उपाध्यक्ष तथा संभाजीनगर येथील जेष्ठ पत्रकार अब्दुल कदीर यांनी सांगितले की, “मी गेल्या ४० वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. पत्रकारांच्या समस्या व हक्क यासाठी महामंडळ झाले पाहिजे, यासाठी आम्ही लढा देत आहोत. शीतलताई नेहमी पत्रकारांच्या समस्यांबाबत आवाज उठवत असतात. तसेच अधिस्वीकृती पत्रिका धारकांसह सर्व पत्रकारांना सुविधा मिळायला पाहिजेत अशी देखील माईची मागणी आहे. पत्रकारांनी प्रत्येक क्षेत्राचे रिपोर्टींग केल्यास त्यांच्या अनुभवात भर पडेल अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी अनेक स्वानुभव विषद केले.
माईचे मुंबई जिल्हाध्यक्ष चेतन काशीकर म्हणाले की, “आज कोणीही स्वतःला पत्रकार म्हणवून घेत आहे, याला पायबंद बसला पाहिजे. आधीच्या पत्रकारांचे नेटवर्क चांगले होते. त्यामुळे अचूक बातमी मिळत असे. आपली भाषा सर्वसामान्य नागरिकांशी जुळणारी असावी. प्रत्येक पत्रकाराने मिशन मॉडेल तयार केले पाहिजे.” असेही त्यांनी सांगितले.
जेष्ठ पत्रकार बापुसाहेब ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणातून सांगितले की, “आपली बाजू सत्य असली पाहिजे. म्हणजे आपल्याला यश देखील मिळत असते. पत्रकाराने स्वतःला अपडेट करत राहिले पाहिजे, या पत्रकार संघात अनेक उपक्रम सुरु असतात. ते पाहून आनंद होत असतो.”
पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचालन राकेश गाळणकर यांनी केले. सचिव सचिन बागुल यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
