पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज 136 वी जयंती आहे. ते मुलांना आणि मुले त्यांना फार प्रिय होती. म्हणुन मुले त्यांना “चाचा नेहरू” असे म्हणत. चाचा नेहरू यांच्या बालकां विषयीच्या प्रेमामुळे त्यांचा जन्म दिवस “बालदिन” म्हणुन साजरा करण्यात येतो. या निमित्ताने वाचू या, काही कविता.
आजची पहिलीच कविता ही डॉ शुभांगी गावडे पाटील, नवी मुंबई यांची आहे. त्यांची कविता आपल्या पोर्टल वर पहिल्यांदाच प्रसिद्ध होत आहे. न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे हार्दिक स्वागत आहे.
चाचा नेहरू यांना विनम्र अभिवादन.
— संपादक
१. माझे गमतीदार स्वप्न
एके दिवशी शाळेमध्ये
गुरुजींनी केली खूपच कमाल
म्हणाले, नको पुस्तके नको अभ्यास
करू आपण सारे मज्जा मस्ती धमाल
ठाऊक आहे का तुम्हास मुलांनो
घडली गोष्ट अभिमानाची
बालचांद्र मोहीमेसाठी
झाली निवड आपल्या शाळेची
ऐकून सारे नाही उरला
आनंदा पारावर
नाचू लागलो गावू लागलो
घुमू लागले चित्कार
नकोत आता कसले संभ्रम
नकोत कसले सवाल
करू आपण सारे
मज्जा मस्ती धमाल
इस्त्रोमध्ये झालो दाखल
ठरल्या दिवशी
आम्ही सारे मोठ्याच
तयारीनिशी
मोठमोठाली याने तेथे दिमाखात उभी
झेपावण्या सज्ज त्या निळ्या नभी
इटुकले पिटुकले अंतराळवीरांचे पोशाख
इस्रो ने केले आम्हास बहाल
अन् म्हणाले चंद्रावरती करू आपण
मज्जा मस्ती धमाल
यानाचे झाले प्रक्षेपण यशस्वी
करुनी प्रदक्षिणा पूर्ण पृथ्वीची
आम्ही निघालो चंद्राच्या देशी
मनी हुरहूर आम्ही आतुर
लागता चंद्राची चाहूल
अन् अलगद पडले चंद्रावरती
आमचे इवलेसे पाऊल
निघाली आमची स्वारी
घेण्या रहस्यांचा माग
गजर झाला मोठ्याने
अन् खडबडून आली जाग
गमतीदार या स्वप्नाची मज
अजूनही वाटे कमाल
आहे की नाही मित्रांनो
खूप मज्जा मस्ती धमाल
— रचना : शुभांगी गावडे पाटील. नवी मुंबई
2. केव्हांतरी बालपणी….
केव्हातरी बालपणी,
स्वप्न एक साकारले,
चिमुकल्या हातांनी
मातीचे घर बांधले.
केव्हातरी बालपणी,
भिऊन अंधाराला,
शिरले आईच्या कुशीत
अन् धरले सुरक्षित पदराला
केव्हातरी बालपणी,
पळताना दूर पडले
वेदना विसरून लगेच
उठून उभी रहात हसले
केव्हातरी बालपणी,
होडी केली कागदाची
कोसळणाऱ्या पावसात
कशी ती डोलायची.
केव्हातरी बालपणी,
झाले छोटेसे भांडण,
क्षणार्धात विसरून
पुन्हा झालो एकत्र.
केव्हातरी बालपणी,
होते सारे किती छान
निरागस आठवणीत
विसरले मी भान.
— रचना : पूर्णिमा आनंद शेंडे. मुंबई
3. स्व. नेहरूजी …
भुरळ घातली सर्वां
राजबिंडे व्यक्तीमत्व
राजबिंडे जवाहरजी
इतिहासा कळे महत्व
समाजवाद अग्रस्थान काही
सोडली नसे मूलतत्व
मानवतावादी दृष्टिस
आज जाणवते सत्व
स्वातंत्र्य लढ्या लाभे
अभिनव सार्थ नेतृत्व
स्वातंत्र्य मिळे सुखद
मूर्त रूपा येई जेतृत्व
पहिलेपंतप्रधान असे
स्वप्नांस बनवले सत्य
लाडके आबालवृद्धां
जन सेवेत मग्न नित्य
जगती उठवला ठसा
गाजविले अधिपत्य
आमराई फळे चाखी
आम्ही तव कृतकृत्य
उच्च शिक्षीत पांडित्य
ओघवी साजरे वकृत्व
स्वार्थ ना स्पर्शे मनास
वृत्तीत ना येई लोलूत्व
कनवाळू स्वभावभारी
मनात पाझरे कवित्व
द्रष्टा भिन्न पंतप्रधान
सुखी भारतीय जिवीत्व
— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
४. जत्रा
चला चला मुलांनो जत्रेला चला
उंच उंच झोका घेण्या वाट बघतोय झुला
खाऊ, खेळणी कितीतरी करा आता मजा
काय हवे काय नको सांगा पटापटा
आम्ही मित्रमैत्रिणी जमल्या आमच्या जोड्या
एकमेकांच्या मग काढूकी हो खोड्या
इतक्यात दिसल्या तरंगत्या होड्या
मजा करण्यासाठी आता मारु त्यांत उड्या
चक्राकार झुल्यामध्ये उंच उंच जाऊ
भीती वाटतांच हळूच डोळे मिटून घेऊ
आता दिसले रंगीत फुगे फुगवूया खूप
एकमेकांत मारामारीत फोडूया की खूप
बाजारात मांडली होती खेळण्यांची रास
मनीमाऊ, कांगारु, कासव, पांडा नि टेडी खास
भूक लागली खाऊ खाण्या आहे कां कांहीतरी
ती बघ तिकडे आहे आईस्क्रिम,भेळपुरी
आता जरा घेऊ या खेळण्यांची मजा
टेडी, पांडा, कांगारू बोलावताहेत या, या
चला आता घरी जाऊ खूप केली ना मजा
वेळेवर नाही गेलो तर मिळेल बरं का सजा
— रचना : स्वाती दामले. बदलापूर
५. 🥳 बालदिन 🥳
होऊन पुन्हा एकदा लहान
करावी खुप दंगा धम्माल मस्ती
लोक काय म्हणतील,
याची नकोच धास्ती !!१!!
काय करू नाश्ता,
आज जेवणाचा मेनू काय
याचं नकोच ते टेंशन
खाऊ आज फक्त वडापाव
मांडावा वाटतोय आज पुन्हा
सागरगोटे व बिट्याचा छानसा डाव !!२!!
चॉकलेट, गोळ्या,
बुडीकेबाल खावेसे वाटतेय
भाजलेले चिंचोके, आवळे, चिंचा,
मस्त गारेगार बर्फाचा गोळा करावा फस्त !!३!!
गांवा मध्ये माराव्या
मैत्रिणी संगे फेरफटका,
घालून लंगडी खेळावे ठिक्कर
माराव्या दोरी वरच्या उड्या
नेम धरुन फोडावी लगोरी छान !!४ !!
जरी झालो आम्ही पालक महान
तरीही कायम मनात ठेऊ जिवंत
निरागस बालक लहान !!५ !!
माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींना ह्या बालदिनाच्या खोडकर खट्याळ सुंदर सुखद गोड आठवणींच्या खेळकर हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🥳🥳💃🏽💐 तुमची मनानी सदैव बालपण जपणारी मैत्रिण 🥳😍
— रचना : सौ.मंदा विजय शेटे.चेंबुर..मुंबई… 🙏🥳💃🏽
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
