Tuesday, November 18, 2025
Homeलेखमाझी जडणघडण : ७३

माझी जडणघडण : ७३

“आमचं घरटं”

ज्योतिकाच्या लग्नाच्या वेळी माझी आई बोरिवलीला करुणा हॉस्पिटल मध्ये अॅडमिट होती. तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती. छुंदाचे (माझी धाकटी बहीण) पती श्री. रमेश चाफेकर आईजवळ होते आणि त्यांनी छुंदाला, “तू काळजी करू नकोस मी मम्मा जवळ आहे. ज्योतिकाच्या लग्नाला तू निश्चिंत मनाने जा. आईला काही होणार नाही. she is a strong lady.” असे खात्रीपूर्वक म्हटल्यामुळे छुंदा लग्नाला येऊ शकली होती.
लग्नाचा आनंदमय बहारदार सोहळा पार पडत असताना मनोमन कुठल्यातरी कोपऱ्यात आईची आठवण आणि काळजी सतत होतीच.

ज्योतिका सासरी गेली. तिचे सासर मुंबईतले पार्ले येथील. त्याच दिवशी ती आणि साकेत आईला भेटायला करुणा हॉस्पिटलमध्ये गेले. आई तशी ग्लानीतच होती. हळूहळू ती जीवनाच्या पलीकडे सरकत होती. कुणाला ओळखेनाशी झाली होती पण ज्योतिकाने जवळ जाऊन “मम्मा आजी” अशी हाक मारताच आईने अर्धवट डोळे उघडले.तिच्याकडे पाहिलं. तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राला हातात धरले आणि ती हलकेच हसली. तिच्या त्या क्षीण हास्यातही तिचा स्वर्गीय आनंद दडलेला जाणवला. ज्योतिकाच्या लग्नाचा आईने मनोमन खूप ध्यास घेतला होता. ज्योतिका – साकेत गादीवर असलेल्या आईला नमस्कार करण्यासाठी वाकले तेव्हा आईने दोघांच्याही डोक्यावर हात ठेवले. गालावरून हात फिरवले, मुके घेतले. ती काहीतरी बोललीही. शब्द कळत नव्हते पण भाव समजत होते. “सुखी रहा. सुखाने संसार करा, एकमेकांना कधीही अंतर देऊ नका.”

दोघांचे डोळे अश्रूंनी डबडबले. २० डिसेंबरला ज्योतिकाचे लग्न झाले आणि ३१ डिसेंबरला आईने जगाचा निरोप घेतला. ती देवाघरी गेली. ज्योतिका चे लग्न होईपर्यंत जणू काही आईने प्राण धरून ठेवले असावेत. अशी असते आई ! अशी होती आई ! पुन्हा पुन्हा जाणवत राहिले.

या प्रसंगाने आणखी एका गोष्टीची मनात नोंद केली. साकेत, त्याचे आई-वडील आणि त्यांच्या परिवारातले सर्वच किती समंजस आणि भावनांची कदर करणारे आहेत ! नुकताच गृहप्रवेश केलेल्या नवदांपत्याला हॉस्पिटलमध्ये मरणासन्न आजीला ताबडतोब जाऊन भेटण्यासाठी पाठवताना तिच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या होत्या. जीवनातले फार मोठे आशय असेच वेचले जातात.

ज्योतिकाचे लग्न जमल्यापासून ते संपन्न होण्यापर्यंतच्या काळात एक सुखद घटनाही आमच्या जीवनात घडत होती. त्याच दरम्यान ‘संकेत काळे’ नावाच्या एलिजिबल बॅचलरशी मयुराचं मैत्रीचं नातं जुळत होतं. त्यावेळी मयुरा अमेरिकेत मेरीलँडला राहत होती आणि संकेत टेक्सासला होता. बरेच दिवस ते फोनवर एकमेकांशी बोलत होते. अजूनही एकमेकांबद्दल दोघांनाही नक्की काय वाटत होतं ते सांगता येत नव्हतं. एक दिवस मयुरा मला असे म्हणाली होती, “आई तो इतकं बोलतो की कधी कधी माझं डोकं दुखतं पण तो खूप हुशार वाटतो. चौफेर ज्ञानी आहे काहीसा व्यवहारी वाटतो. ठामही आहे शिवाय मनमोकळा आणि प्रामाणिक आहे हे मात्र नक्की.“
“तो उंच आणि देखणा ही आहे अत्यंत हेल्थकॉन्शस आणि क्रीडाप्रेमी आहे.” हे पण तिने मला सांगितले वास्तविक मयुरा म्हणजे अत्यंत आनंदी वृत्तीची, हसरी, खेळती बागडती, काहीशी बिन्धास्त, खर्चिक वृत्तीची पण अतिशय संवेदनशील मुलगी.

एक दिवस मयुरा आणि संकेत मेरी लँडलाच भेटले. खरं म्हणजे दोघंही एकमेकांकडे आकर्षित झाले होते पण निर्णय काही दोघांनाही घेता येत नव्हता. मयुराने तर हळूहळू त्याच्यातून मन काढून घेण्याचेच ठरवले होते पण त्याचवेळी दुसरी काही प्रपोजल्स बघण्याची तिची मानसिक तयारी होत नव्हती.

दरम्यान सुरेशजी आणि सुमेधाताईंशी (संकेतचे आई वडील) आमचे मधून मधून फोनवर बोलणे होत असे. ते चेंबूरला शेल कॉलनीत राहत. त्यांच्या घरी आम्ही एक दिवस गेलो. घर खूपच लहान आणि नीटनेटकं असलं तरी जरा असुविधांचंच होतं पण का कोण जाणे आमची त्या दोघांशी मात्र खूप चांगली मैत्री जुळली. सुमेधाताई या अतिशय मनमोकळ्या प्रामाणिक, प्राणी पक्षीप्रेमी, अत्यंत धार्मिक आणि भावुक वृत्तीच्या आणि सुरेशजी क्रीडा प्रेमी, दुसऱ्याला सतत मदत करण्याची वृत्ती असणारे, उंच व्यक्तिमत्त्वाचे, स्वतःच्या कपड्यांविषयी अधिक जागरूक असणारे, मनमोकळे, आनंदी असे वाटले. या दोघांचा तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाच प्रेम विवाह झालेला होता. सुरेशजी शहाण्ण्यव कुळी मराठा आणि बडोदा स्थित आणि सुमेधाताई सारस्वत, दादर माहीम येथे राहणाऱ्या, पूर्वाश्रमीच्या दळवी. त्यांनी जेव्हा आम्हाला हे सांगितलं तेव्हा माझ्या मनात पटकन आले, साकेतचे पप्पाही मराठा आणि बडोद्याचे आणि सुवर्णाताई सुध्दा सारस्वत, मुंबईतच राहणाऱ्या हॉस्कुटे फॅमिलीतल्या. शिवाय तो साकेत आणि हा संकेत. अरे वा ! अर्थात म्हणून संकेत मयुराचे लग्न जुळेलच असा काही बालीश विचार करण्याचे मी तेव्हा नक्कीच टाळले पण ज्योतिकाच्या लग्नाचे आमंत्रण मात्र आम्ही त्या दोघांना दिले. मयुराला फारसं रुचलं नव्हतं पण आमच्या अनेक फ्रेंड्स पैकी हे दोघे असे आम्ही तिला पटवूनही दिले.

सुरेशजी आणि सुमेधाताई ज्योतिकाच्या लग्न समारंभात अगदी आमची खूप जुनी मैत्री असल्यासारखेच मिसळले होते. आमच्या जळगावच्या मित्र-मैत्रिणींशीही त्यांनी ओळख करून घेतली. एकंदरीत ते फार कम्फर्टेबल होते. त्यांना मयुराही अतिशय आवडली. संकेत आणि मयूराची जोडी जमावीच असे त्यांनाही मनापासून वाटत असावे कारण त्यानंतरही त्यांच्याशी फोनवर बोलताना आम्हाला हे जाणवलं होतं.

एक किस्सा त्यांनी सहज बोलता बोलता सांगितला होता, तो असा… ते दोघेही संगीत प्रेमी आणि दादरला वाघमोडे यांचं (म्हणजे साकेतचे वडील) ‘महाराष्ट्र ग्रामोफोन अँड वॉच कंपनी, नावाचं जवळजवळ सत्तर वर्षांची परंपरा असलेलं अत्यंत प्रसिद्ध असं म्युझिक हाऊस होतं आणि तिथे हे दोघं संकेतसह नेहमी जात. संकेत तेव्हा लहान शाळकरी अथवा महाविद्यालयीन मुलगा असेल. एक दिवस साकेत वडीलांबरोबर दुकानात आला होता. तोही साधारण संकेतच्याच वयाचा होता. त्याला पाहून तेव्हा सुमेधाताई पटकन म्हणाल्या होत्या, ”अरे ! हे दोघं किती सारखे दिसतात! यांचं काहीतरी नातंच असलं पाहिजे असंच वाटतं. नावं पण बघा ना कशी ! साकेत आणि संकेत !” जीवनात येणारे असे हे गमतीदार योगायोगच म्हणायचे का ?

ज्योतिकाचे लग्न होण्यापूर्वी आणखी एक योगायोगाची गोष्ट म्हणजे ज्योतिका टेक्सासलाच ऑस्टिन या गावी काही प्रोजेक्टच्या निमित्ताने होती. त्यादरम्यान ती स्वतःच संकेतला डॅलसला जाऊन भेटून आली आणि तिचे संकेत विषयी फारच चांगले मत झाले आणि तिने तसे आम्हाला कळवले. बरेच दिवस आम्ही या विषयाबाबत तसे न्यूट्रल होतो.किंचित तणाव, दाब होता कारण एखादा.. मग पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह कोणताच निर्णय लागत नसल्यामुळे दुसरे पाऊल उचलता येत नव्हतं. एका रेषेवर सर्व काही ठप्प झालं होतं आणि माझ्यातल्या एलिझाबेथ बेनेटला ते असह्य होत होतं. विलास मात्र शांत होता नेहमीप्रमाणे.

माझे आणि सुमेधाताईंचे मात्र फोनवर छान बोलणे व्हायचे. मयुराची आणि संकेतची पत्रिका कशी जुळते वगैरे अगदी आशावाद बाळगून सांगायच्या. आम्ही तशा इतरही गप्पा मारायचो कारण सुमेधाताई अतिशय स्वच्छ मनाच्या, प्रांजळ वृत्तीच्या असलेल्या जाणवायच्या आणि संकेत त्यांचा एकुलता एक मुलगा त्यामुळे होणाऱ्या सुनेचं मनापासून कोड कौतुक करणारी एक सुंदर स्त्री मी त्यांच्यात त्यावेळी पाहिली. (या माझ्या त्या वेळच्या विचारांना आणि भावनांना आजपर्यंत कधीही धक्का पोहोचलेला नाही हे विशेष.)

बरोबर एक वर्ष उलटलं असेल. फायनली मयुराने आणि संकेतने एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतरच्या विवाहविषयक ठरवलेल्या योजना भराभर उत्साहाने आणि आनंदात पारही पडल्या. लग्नाच्या आधी लग्न करण्यासाठीच एखादा आठवडाच आधी मयुरा आणि संकेत दोघेही एकत्रच भारतात आले. आम्ही मुंबई विमानतळावरच संकेतला प्रथम भेटलो. हा आमचा होणारा दुसरा जावई ! मन हरखून गेले. संकेत-मयुराचं हातात हात घालूनच विमानतळावर आगमन झालं होतं. दोघंही इतके छान दिसत होते ! कौतुकाने मन भरून गेलं. मनातल्या मनात या सर्व योगायोगांची मांडणी करत असतानाच परमेश्वराचे आभारही मानले.

मयुरा -संकेत

ज्योतिका- साकेतच्या लग्नानंतर बरोबर एक वर्षाने म्हणजे १८ डिसेंबर २००६ रोजी जळगावलाच, त्याच ओम लॉन्स वर संपूर्णपणे ज्योतिकाच्या लग्नाचा रिप्ले मयुराच्या लग्नाबाबत संपन्न झाला. अत्यंत खेळीमेळीत, पुरोगामी पद्धतीने, तुमचं -आमचं अजिबात नसलेला एक मित्रत्त्वाचा, नव्या नात्याचा सुंदर सोहळा पार पडला. आनंदी आनंद जाहला.

ज्योतिका आणि मयुराच्या लग्नातली कवीवर्य ना.धो. महानोरांची उपस्थिती आणि त्यांनी केलेलं त्यांच्याच कवितांचं गायन हे कायम स्मरणात राहणारं ठरलं.

काही बोलू नये तिशी
नुसते डोळ्यांशी बुडावे
आणि बेसावधपणी
नुसते आभाळ झेलावे…

महानोरांचं काव्य आणि त्यांचं गावरान कंठातलं गायन.. संगीत समारंभातला एक अत्यंत सुखद क्षण.

मयुराच्या लग्नातली “पुढारी”चे संस्थापक बाळासाहेब जाधव यांची झेड सिक्युरीटीतली उपस्थितीही लक्षवेधी होती. बाळासाहेब वधुवरांना आशीर्वाद देण्यासाठी मंचावर आले तेव्हा म्हणाले,”दोघंही भाग्यवान. एकदम अनुरूप !”

असे ते लाडक्या लेकींचे विवाह सोहळे. आनंदाचे.. सुखाचे.

आमच्या दोन चिमण्या आमच्या उबदार गोजिरवाण्या प्रेमळ घरट्यातून आता मात्र खऱ्या अर्थाने नव्या विश्वात झेप घेण्यासाठी उडाल्या. जरी त्या शिक्षणाच्या निमित्ताने दूरच होत्या तरी आमचं घरटं तेव्हा एकच होतं. दोघींचे विवाह झाले आणि घरट्यातली पोकळी, रिकामपण मात्र जाणवायला लागलं. एकाच वेळी कर्तव्यपूर्तीचे समाधान आणि वियोग, दुराव्याच्या लहरीवर हेलकावे घेत आम्ही दोघं आमच्याच जीवनाकडे साक्षी भावाने मागे वळून पाहत राहिलो.आमच्या सहजीवनातल्या घट्ट वीणेत गुंफलेला तो मोत्याचा क्षण होता..
क्रमशः

राधिका भांडारकर

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील सर on बालदिन : काही कविता…
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on “वाढत्या आत्महत्या : या “शिक्षणा”चा काय उपयोग ?”