मी दूरदर्शनची नोकरी सोडून जवळपास चौतीस पस्तीस वर्षे झाली, तरी तेथील काही सहकार्यांशी जुळलेलं मैत्र कायम राहिले आहे. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे मीना गोखले-पानसरे होय.
दूरदर्शन मध्ये काही जोड्या, काही ना काही कारणांनी प्रसिद्ध होत्या. त्यातील एका जोडीला सगळे जण ‘मा मी प्रॉडक्शन’ म्हणायचे. आता, तुम्ही म्हणाल, हे ‘मा मी प्रॉडक्शन’ म्हणजे काय भानगड आहे ? तर भानगड बिनगड काही नाही, ते संक्षिप्त रूप आहे. “मा” म्हणजे माधवी कुलकर्णी आणि “मी” म्हणजे मीना गोखले. दूरदर्शनमध्ये ही जोडगोळी सतत साथसाथ असायची. एकमेकींच्या कामात, म्हणजेच कार्यक्रम निर्मितीच्या सर्व टप्प्यांमध्ये सोबत असायची. खरे म्हणजे आपण गमतीने म्हणतो की, हजार पुरुषांचे एकमेकांशी छान जमेल, पण दोन स्त्रिया काही आनंदाने एकत्र राहू शकत नाही! पण या दोघी मात्र या म्हणण्याला अपवाद होत्या.त्यात परत दोघी स्त्री- मुक्तीच्या कट्टर पुरस्कर्त्या ! असे असले तरी, निर्मात्या म्हणुन त्यांची स्वतंत्र ओळख होती.
आज आपण लोककला, लोकसाहित्य याविषयी खूप बोलतो, चर्चा करतो, विविध उपक्रम राबवितो. मुंबई विद्यापीठाने तर स्वतंत्र लोककला विभाग स्थापन करून लोककलेला मोठीच प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. हे सर्व आवश्यकच आहे, चांगलेच आहे. पण पस्तीस चाळीस वर्षांपूर्वी लोक कला, लोक साहित्य या विषयी इतके जागरूक वातावरण नसताना मीनाने, खेड्यापाड्यात जाऊन चित्रीकरण करून ‘रानजाई’ मालिकेची निर्मिती केली, त्या तिच्या कल्पकतेला आणि कष्टांना तोड नाही. तिच्या या एका निर्मितीने माझ्या मनात तिच्याविषयी आदराचे स्थान निर्माण केले. त्यात भर पडण्याचे दुसरे कारण म्हणजे, तिने आणि श्रीकलाने मिळून, दूरदर्शन मधील त्यांचे गुरू, विनायक चासकर यांचे, दोन-तीन वर्षांपूर्वी, अतिशय देखणे आणि संदर्भमूल्य असलेले चरित्र प्रसिद्ध केले, हे आहे.आताच्या काळात, जिथे काही जण आपल्या जिवंत आई वडिलांची, गुरूजनांची कदर करीत नाहीत, तिथे सरकारी नोकरीत भेटलेल्या एका वरिष्ठ व्यक्तीला गुरूचा दर्जा द्यायचा आणि केवळ नोकरीत असेपर्यंतच नाही, तर निवृत्तीनंतरही ती भावना कायम ठेऊन आपल्या गुरूचे त्याच्या मृत्युपश्चात्,
अफाट मेहनत घेऊन चरित्र प्रसिद्ध करायचे, हे मोठे दिव्यच आहे. आजच्या व्यवहारी जगात, कुणीही आधी हा विचार करेल, की गेलेल्या व्यक्तीचे चरित्र लिहून, प्रकाशित करून मला काय मिळेल? पण असला काही एक विचार न करता, अनेक वर्षांच्या अथक परिश्रमातून तयार झालेले हे चरित्र मराठी साहित्यातील एक आगळेवेगळे लेणे आहे, असे मला वाटते.
अशा या चरित्र ग्रंथाच्या दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या प्रकाशनासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या सुहृदांमध्ये मी देखील होतो.
मुंबईत मुंबईबाहेरुन आलेल्या, त्यात परत त्यावेळी प्रचंड ग्लॅमर असलेल्या दूरदर्शन मध्ये नोकरी करताना, मुंबईत जन्मलेल्या, वाढलेल्या व्यक्तींविषयी माझ्या मनात आकसाचीच भावना असायची आणि खरं म्हणजे काही जण, जणी तसेच वागायचे, बोलायचे देखील. पण मुंबईत, त्यातही विलेपार्ले ह्या साहित्यिक, सांस्कृतिक राजधानीत जन्मलेली, तिथेच बालपण गेलेली मीना मात्र अपवाद होती. शाळेत असताना तिने पाठांतर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा ह्यासारख्या स्पर्धांतून भाग घेतला.तिच्यात नाटकाची,अभिनयाची आवड रूजत गेली.आईकडून संस्कृत भाषेचे संस्कार होत गेले. आईवडिलांमुळे वाचनाची आवड निर्माण झाली. शिवानंद सहनिवास मधील वास्तव्यात तिने अनेक नाटकांतून कामं केली.या बरोबरच तिने अनेक व्यावसायिक, प्रायोगिक नाटकं पाहिली, अनुभवली. सुधा जोशी, माधव वाटवे, बाळ कर्वे अशा प्रतिभावान कलाकारांच्या सोबतीने नाट्यकलेचे तिच्यावर संस्कार झाले. रंगमंचावर उभे राहण्याची भीती गेली.
मीनाने बी.एससी. नंतर सोफिया कॉलेज मधून ‘मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझम’ चा कोर्स केला. तिथूनच ती दूरदर्शनवर ट्रेनिंगसाठी रूजू झाली. तिने ‘नाटक आणि गजरा’ ह्या विभागात निर्मिती सहाय्यक म्हणून काम सुरू केलं. विनायक चासकर हे त्यावेळी दूरदर्शनच्या नाटक विभागाचे प्रमुख होते. दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून त्यांनी प्रशिक्षण घेतलं होतं. मुंबई दूरदर्शनच्या सुरूवातीच्या काळापासून ते तिथे कार्यरत होते. मोठं नाटक, छोटं नाटक, गजरा हे विविधरंगी कार्यक्रम, नाट्यावलोकन, चित्रावलोकन अशा अनेक कसदार कार्यक्रमांची निर्मिती- दिग्दर्शन ते करत असत. चासकरांनी आपल्या प्रतिभावान दिग्दर्शनाने, अत्यंत कष्टाळू स्वभावाने हे कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर नेले होते. ट्रेनिंगच्या काळात ह्या विभागात काम करण्याची संधी मीनाला मिळाली. अशा प्रतिभाशाली निर्माता- दिग्दर्शकाच्या हाताखाली ती दूरदर्शन कार्यक्रम निर्मितीची कला शिकली. ह्या विभागात काम करत असताना अनेक यशस्वी, नावाजलेल्या, गुणी कलाकारांची कामं मीनाला जवळून पाहायला मिळाली. त्याचवेळी तिच्या अभिनयाच्या आवडीमुळे दूरदर्शनच्या अनेक छोट्या नाटिकांमधून,चासकरांनी तिला अभिनयाची संधी दिली. चतुरस्र अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर त्यावेळी ‘गजरा’ कार्यक्रमांची संहिता लिहित असत. त्यांनी लिहिलेल्या अनेक नाटिकांमधून मीनाला अभिनय करता आला. त्यावेळी ह्या अष्टपैलू, प्रतिभावान कलाकाराशी जुळलेले तिचे स्नेहबंध आजही कायम आहेत, हे विशेष !
एकदा चासकर ट्रेनिंगसाठी जर्मनीला गेलेले असताना, हंगामी तत्त्वावर निर्मिती सहाय्यक म्हणून काम करत असलेल्या मीनावर वरिष्ठ अधिकार्यांनी मोठ्या विश्वासाने संपूर्ण विभाग सांभाळण्याची जबाबदारी सोपविली. त्यादरम्यान तिने ज्येष्ठ अभिनेत्री सुमती गुप्ते आणि दिग्दर्शक विजय बोंद्रे ह्यांनी गुंफलेला ‘गजरा’ कार्यक्रम सादर केला. शं. ना. नवरे, रत्नाकर मतकरी ह्यांच्या लघुनाटिका सादर केल्या. ‘आपुले मरण पाहिले म्यां डोळा’ह्या नाटकात ज्येष्ठ नटवर्य दत्ता भट तसंच ‘घरकुल’ ह्या दूरदर्शनवर सादर झालेल्या नाटकात ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रा.मधुकर तोरडमल ह्यांच्याबरोबर प्रमुख भूमिकेत अभिनय करण्याची संधीही तिला प्राप्त झाली.

चासकरांसोबत काम करत असताना कार्यक्रमासाठी अपार कष्ट करण्याची सवय मीनाला लागली. कार्यक्रमाचे प्रक्षेपण होईपर्यंत तो अधिकाधिक चांगला कसा होईल ह्याचा ध्यास घेण्याचे तिच्यावर संस्कार झाले. प्रत्येक कार्यक्रम सुंदर कसा करता येईल ह्याचं लाखमोलाचं ज्ञान मिळालं. ‘आरोही’, ‘शब्दांच्या पलिकडले’ यांसारख्या संगीतमय कार्यक्रमांच्या विभागात
डॉ. किरण चित्रे ह्यांच्यासोबत तिने काम केले. काही काळ ज्योती व्यास ह्या ज्येष्ठ, कल्पक आणि कर्तव्यकठोर निर्मातीबरोबर तिने गुजराथी विभागांत काम करून स्वतःला सिद्ध केले.
तो सर्व काळ मुंबई दूरदर्शनचा सुवर्णकाळ होता. अनेकविध कार्यक्रमांची निर्मिती तेव्हा होत असे आणि प्रेक्षकही भरभरून दाद देत असत. ह्याच काळात मीनाने व्यावसायिक रंगभूमीवर, प्रतिभावान लेखक सुरेख खरे लिखित, ‘मंतरलेली चैत्रवेल’ ह्या ‘दि गोवा हिंदू असोसिएशन’ च्या नाटकात प्रमुख भूमिका केली. तसंच मोहन वाघ ह्यांच्या ‘चंद्रलेखा’ ह्या नाट्यसंस्थेच्या गगनभेदी’ नाटकाच्या काही प्रयोगांत प्रमुख भूमिका केली.
सई परांजपे लिखित-दिग्दर्शित; रंगभूमीवर अत्यंत लोकप्रिय झालेल्या ‘सख्खे शेजारी’ ह्या नाटकात तिला ‘निर्मल’ची भूमिका मिळालेली होती. सईताईंचं सहजसुंदर लिखाण आणि त्यांच्या सकस आणि प्रभावी दिग्दर्शनात काम करण्याचा अनुभव तिच्यासाठी अपूर्वच होता ! सुहास जोशी, अरूण जोगळेकर, मंगेश कुळकर्णी, सतीश पुळेकर, अरूण होर्णेकर, संजीवनी बिडकर असे कसलेले सहकलाकार होते. सईताईंसारख्या चतुरस्र, अष्टपैलू दिग्दर्शिकेबरोबर काम करण्याची ही अनुपम संधी होती. हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर खूपच गाजले आणि त्यातल्या मीनाच्या अभिनयाची वाखाणणीही झाली.
निर्मितीच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक समजला जाणारा दूरदर्शन मधील विभाग म्हणजे नाटक विभाग! अशा या नाटक विभागाची जबाबदारी मीनाने माधवीच्या साथीने नुसतीच यशस्वीपणे पेलली नाही तर त्या विभागात नवनवे प्रयोग करण्याचे धाडस केले. कथांचे नाट्यरूपांतर करून दूरदर्शन निर्मिती केली. महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या प्रायोगिक तसंच राज्य नाट्यस्पर्धेतील पारितोषिकप्राप्त संस्थांना, कलाकारांना पाचारण करून त्यांना दूरदर्शनचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
‘मा मी प्रॉडक्शन’ ने निर्मिती केलेली, उल्लेखनीय ठरलेली मोठी नाटकं होती, ‘संभुसांच्या चाळीत’, ‘खडाष्टक’, ‘दुरितांचे तिमिर जावो’… मंगला गोडबोले ह्या सिद्धहस्त लेखिकेच्या कथेवरून ‘मध्यस्थ’ ही लघुनाटिका दूरदर्शनसाठी मीनाने सादर केली. कमलाकर सारंगांनी ह्या कथेचं रूपांतर केलं होतं. दोन पिढ्यांमधलं अंतर हा सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषय होता. अरूण जोगळेकर, लालन सारंग, राजन भिसे हे कलाकार नाटकात होते. अरविंद औंधे ह्यांच्या ‘नीरक्षीर’ नाटकाचा विषयही वेगळा होता. विक्रम गोखले, इला भाटे असे गुणी कलाकार नाटिकेत होते. अरविंद औंधे ह्यांचं प्रभावी लिखाण, नेमके संवाद आणि कलाकारांचा अभिनय ह्यामुळे हे नाटक प्रेक्षकांना खूप आवडलं होतं. ‘अव्या अव्या दार उघड’हे विनोदी नाटक निखळ मनोरंजन करणारे होते. दिलिप प्रभावळकर लिखित ‘चूक-भूल द्यावी घ्यावी’ (दिलिप प्रभावळकर, नीना कुळकर्णी), शेखर ताम्हाणे लिखित ‘बिंबा’ (मीना नाईक, विनी परांजपे), रत्नाकर मतकरी लिखित ‘पोर्ट्रेट’ (दिलिप प्रभावळकर) त्याशिवाय ‘परिसस्पर्श’, ‘चौकट’, ‘आरसा’ (वंदना गुप्ते, कमलाकर सोनटक्के), ‘आरण्यक’ यांसारखी मीनाची काही नाटकं विशेष नोंद घेण्यासारखी होती.

सुरुवातीलाच उल्लेख केलेली ‘रानजाई’ मालिका ही मीनाच्या दूरदर्शन कार्यक्रम निर्मितीमधील एक महत्त्वाचा टप्पा ठरली. या मालिकेत लोककलेच्या, लोकसंस्कृतीच्या संशोधक, लेखिका डॉ. सरोजिनी बाबर आणि ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके ह्यांच्या मनमोकळ्या गप्पा असत! सरोजिनीअक्कांच्या लोकगीतं, ओव्या, लोकसंगीत ह्यावर लिहिलेल्या विपुल ग्रंथसंपदेतून काय वेचावे आणि काय वगळावे हा प्रश्न मीनाला पडे, कारण त्यांच्याकडे लोकसाहित्याचं भांडार होतं, खजिना होता. त्यामुळे कार्यक्रमाची अशी ‘संकल्पना’ ठरवली गेली, ती म्हणजे एका लहान मुलीच्या आयुष्यात, ती मोठी होत जाते तसतसे विविध प्रसंग येतात, त्यानुसार येणारी गाणी, ओव्या, लोकगीतं घ्यायची आणि त्यांचं चित्रण करायचे. ती लहान असतांना आट्यापाट्या खेळते, झाडांवर झोपाळे बांधून झोके घेते, भातुकली खेळते, मोठी होते. सासरी जाते, आई होते, गृहलक्ष्मीची भूमिका निभावते, सासर-माहेर बांधून ठेवते! एका भागातून दुसर्या भागात अशी स्क्रिप्टची जुळवणूक केली. ‘उगवती’, ‘ऐलमा- पैलमा’, ‘कोणे एके काळी’, ‘श्रावण हंकारी’, ‘आली गौराय पाव्हणी’… अशी या मालिकेतील भागांची शीर्षकं होती.
मीना आणि दूरदर्शन टीमने सरोजिनी अक्कांबरोबर महाराष्ट्रात दूरदूर हिंडून चित्रण केलं. चित्रिकरणाच्या वेळेस सरोजिनीअक्का आणि शांताबाई, दोघींचाही उदंड उत्साह असायचा. या मालिकेचे शीर्षकगीत शांताबाईंनी लिहिले होते, तर ज्येष्ठ संगीतकार रामभाऊ कदम ह्यांचे संगीत होते. ‘दर्याखोर्यांत फुलसी तू ग रानजाई’ हे शीर्षकगीत अतिशय लोकप्रिय झाले. उत्तरा केळकर ह्यांच्या स्वराने त्याला चार चाँद लागले. श्रीकृष्ण सावंत ह्यांनी चित्रीकरणाची तर यशवंत काळभोर ह्यांनी ध्वनिमुद्रणाची जबाबदारी मनापासून पार पाडली. या सर्वांनीच अतिशय प्रतिकूल परिस्थितीत चांगल्यात चांगलं काम केले. कॅमेरामन नरसिंह पोतकंठी, ध्वनिमुद्रक मुकुंद येवलेकर यांनीही काही भागांचे चित्रिकरण केले होते. या मालिकेच्या संकलनासाठी समर्थपणे उभे राहिले ज्येष्ठ संकलक मनोहर कुलकर्णी ऊर्फ आम्हा सर्वांचे लाडके ‘बापू’ !

‘रानजाई’नं मीनाला भरभरून दिलं. ती खूप हिंडली. गावागावांतल्या स्त्रियांशी संपर्क साधला. खूप मेहनत घेतली. त्या काळात ती जरी सहाय्यक पदावर होती तरी पूर्णवेळच्या निर्मातीसारखी निर्मिती करत होती. झपाटल्यासारखं तिने एकहाती काम केलं. त्याच बरोबर सहाय्यकाची इतरही कामं निभावली. त्यावेळचे दूरदर्शनचे संचालक श्री. आर. एस. सावदेकर ह्यांनी मीनाला खूप प्रोत्साहन दिलं. उत्कृष्ट प्रॉडक्शनचा, प्रतिष्ठेचा ‘RAPA’ – (Radio And TV Professionals Association) पुरस्कार (१९९१) ‘रानजाई’ मालिकेसाठी तिला मिळाला.
‘स्वर कवितेचे’ ह्या मालिकेनं देखील मीनाला निखळ आनंद दिला. ह्या मालिकेत सुप्रसिद्ध गायिका संजीवनी भेलांडे ह्यांचा स्वर आणि प्रा.प्रवीण दवणे ह्यांचं रसग्रहणात्मक निवेदन होतं.
‘भक्तिरंग’ सारखे आध्यात्मिक कार्यक्रम ज्यामध्ये परमपूज्य डॉ. श्रीमंगलनाथ यांची रसाळ प्रवचने आणि संतांच्या रचनांवर आधारित भक्तिगीते यांचा समावेश होता.
स्मिता पाटील ही मीनाची अत्यंत आवडती अभिनेत्री ! तिच्या कार्यकर्तृत्वाचा, तसेच व्यक्ती म्हणून ती कशी होती ह्याचा वेध घेणारा कार्यक्रम मीनाने ‘कवडसे’ ह्या शीर्षकाअंतर्गत निर्माण केला. या कार्यक्रमात स्मिताचे आईवडील, बहीण ह्या तिच्या जिवलगांनी व्यक्ती म्हणून ‘स्मिता’ किती प्रेमळ, किती साधी होती ह्या सर्व आठवणी जागवल्या. कोवळ्या उन्हाचे कवडसे हातात पकडता नाही येत पण ह्या कवडशांचा तरल, भावस्पर्शी अनुभव ह्या कार्यक्रमाचं दिग्दर्शन, निर्मिती करतांना मीनाला मिळाला. सर्व दूरदर्शन केंद्रांच्या अखिल भारतीय स्पर्धेत उत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कार, तिला ह्या कार्यक्रमाने मिळवून दिला.
साधनाताई आमटे ह्यांच्या समर्पित जीवनाचा वेध घेणारी ‘समिधा’ नावाची डॉक्युमेंट्री मीनाने तयार केली. यामुळे बाबा आमटे आणि साधनाताई आमटे ह्यांच्या निरलस, निगर्वी सहवासाचा लाभ तिला मिळाला. एका लोकोत्तर दांपत्याचा जीवनप्रवास जवळून निरखता आला.
‘फेअर अँड लव्हली भरारी’ ही एक कस्टमाईज्ड कार्यक्रम मालिका! विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्या स्त्रियांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख तर ह्यात होताच पण त्याचबरोबर त्या करिअरच्या संदर्भात करिअर निवडीसाठी लागणारं शिक्षण, पुढील संधी ह्याबाबतचा, विद्यार्थ्यांसाठी आढावा देखील होता. तरूणांसाठी ‘करिअर’हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने मीनाचा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. एकूण ८० पेक्षा जास्त भाग आणि त्यात सर्व स्त्रियांच्या मुलाखती ह्यामुळे ही मालिका खर्या अर्थाने ‘भरारी’ घेणारी होती.
‘क कायद्याचा’ ही मालिका करताना मुलाखत आणि विषयाला अनुसरून लिहिलेले एक नाटुकले ह्यामुळे क्लिष्ट विषय रंगतदार होऊ शकला.अॅड.निर्मला सामंत- प्रभावळकर ह्यांनी ह्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी स्वीकारत विविध विषयांवरच्या कायदेतज्ज्ञांना बोलते केले.
‘हॅलो सखी’ ह्या कार्यक्रमाने अगदी तळागाळातील स्त्रियांपासून मान्यवरांपर्यंत सर्वांच्या विचारांच्या सानिध्याचा लाभ मीनाला घडवला.
कुठलाही चांगला कार्यक्रम हे एक ‘टीमवर्क’ असतं. मीना आणि तिच्या सर्व सहकारी मित्र मैत्रिणी एकत्रितपणे, अमाप उत्साहाने, कार्यक्रमाच्या निर्मितीचा प्रत्येक टप्प्यावर आनंद घेत, काम करत असत. मुख्यतः ‘हिरकणी’ आणि ‘नवरत्न’ पुरस्कारांच्या वेळी हा अनुभव विशेष येत असे.
विनायक चासकर हे मीनाचे दूरदर्शनमधील गुरू होते, हे वर आलेच आहे. चासकर सरांना आदरांजली म्हणून, मीना आणि श्रीकला हट्टंगडी, अशा दोघींनी मिळून, निवृत्ती नंतर ‘विनायक नावाचे भाऊ चासकर’ ह्या पुस्तकाची निर्मिती केली. रंगमंच आणि दूरदर्शनवरील एका झपाटलेल्या व्यक्तिमत्त्वास केलेला हा सलाम आहे. त्यांच्या समवेत काम केलेल्या कलाकार सुहृदांनी लिहिलेल्या लेखांच्या ह्या पुस्तकाचं संपादन मीनाने केलं आहे. ह्या पुस्तकाला वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.

निवृत्तीनंतर दूरदर्शन-सह्याद्री वाहिनीसाठी मीनाने दिग्दर्शित केलेली कार्यक्रम -मालिका म्हणजे ‘कथा सईची’! सई परांजपे ह्या चतुरस्र, प्रतिभावान चित्रपट- नाट्य- लेखिका-दिग्दर्शिका! त्यांचे चित्रपट, नाट्य, साहित्य ह्या क्षेत्रातील योगदान केवळ स्तिमित करणारे आहे. सुदैवाने मीनाला तिच्या करिअरच्या अगदी सुरूवातीच्या काळापासून त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी लाभली. विनायक चासकर ह्यांच्या विभागात काम करत असताना सईताईंनी अनेक ‘गजरा’ कार्यक्रमांचं लेखन, सादरीकरण केलं होतं. त्यांचे ‘डोळा’, ‘टेलीफोन’ ह्या विषयावरचे ‘गजरा’ कार्यक्रम आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्या वेळेपासून सईताईंनी आपल्या स्वभावाने दोघीतलं अंतर नाहीसं केलं.

सईताईंचा स्वभाव अत्यंत उत्साही, निर्मळ, कळायला खूप सहज असा नितळ पारदर्शी आहे, असा मीनाचा अनुभव आहे. त्यांचा स्नेह ही मीनाच्या मर्मबंधातील ‘ठेव’ आहे. ‘‘कथा सईची या मालिकेचं दिग्दर्शन तू करावंस’’, असं त्यांनी मीनाला हक्काने सांगितलं. या तीस भागांच्या मालिकेचं दिग्दर्शन हा मीनासाठी अपूर्व अनुभव होता. प्रेक्षकांनी ह्या मालिकेचं भरभरून स्वागत केलं. या मालिकेत सईताईंनी, त्यांची आई ज्येष्ठ समाजसेविका शकुंतला परांजपे,आजोबा रँग्लर परांजपे यांच्या कार्यकर्तृत्त्वाच्या आठवणींना उजाळा दिला. सईताईंचं अत्यंत प्रांजळ, खुमासदार निवेदन ह्यामुळे प्रत्येक भागाची रंगत वाढली. निवेदन कसं असावं ह्याचा हा एक वस्तुपाठच होता. महाराष्ट्रातील कानाकोपर्यातूनच नाही, तर इतर देशांतूनही, सर्व स्तरातील, सर्व वयाच्या प्रेक्षकांची ह्या मालिकेला प्रशंसेची पावती मिळाली. राजहंस प्रकाशनाचे दिलिप माजगांवकर, हरहुन्नरी अभिनेते, लेखक दिलिप प्रभावळकर, नाटककार सुरेश खरे, चित्रपट पटकथा लेखिका, दिग्दर्शिका चित्रा पालेकर अशा मान्यवरांची देखील या मालिकेला दाद मिळाली.
एकुणच मीना जेव्हा विचार करते की निर्मिती करताना ही जी ‘मी’ आहे तिचा काय फायदा झाला ? तर तिला असे वाटते की, तिचा ‘मी पणा’ कमी झाला. एका प्रचंड अदृश्य शक्तीला आठवत राहिल्यानं एखादी गोष्ट मी केली असं म्हणण्यापेक्षा ती कुणीतरी माझ्याकडून करवून घेतली हे म्हणण्याचं बळ मिळालं. एका प्रचंड मोठ्या खेळातले आपण एक प्यादे आहोत ह्याचं भान आलं. कार्यक्रमाचा आलेख ठरवताना मन विशाल झालं. दुसर्याच्या दुःखाशी समरस होता आलं. नाण्याला फक्त दोनच नाही तर अनेक बाजू असू शकतात हे कळलं. कुठल्याही कठीण प्रसंगाला तोंड द्यायची शक्ती मिळाली. सामान्य व्यक्ति किती असामान्य असू शकते हे समजलं. पर्फेक्शनचं वेड लागलं. ती अंतर्मुख झाली तशी बोलकीही झाली. तिचं मन तरूण राहिलं.
निवृत्तीनंतरही मी आणि माझी पत्नी सौ. अलका जे काही काम करतोय, करण्याचा प्रयत्न करतोय त्याचे मीनाला खूप कौतुक वाटते. या कौतुकापायी मीनाने स्वतः पुढाकार घेऊन ‘अलका’ची एप्रिल महिन्यात दूरदर्शनच्या हॅलो सखी कार्यक्रमात मुलाखत घडवुन आणली. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एकशे एक प्रचारकांच्या जीवन कथा असलेल्या ‘समिधा’ ग्रंथाच्या प्रकाशनासाठी नुसते अगत्याने बोलाविलेच नाही, तर अलकाने सुरू केलेल्या न्यूज स्टोरी टुडे यू ट्यूब चॅनल साठी ‘समिधा’ ग्रंथाची संकल्पना असलेले, अमेरिकास्थित ज्येष्ठ संगणक व्यावसायिक श्री. विनोद बापट आणि ‘समिधा’चे संपादक, विवेक प्रकाशनाचे श्री. रवींद्र गोळे यांच्या मुलाखतीच्या संयोजनासाठी तिने सर्वतोपरी सहकार्य केले. या मुलाखतीनंतर माझ्या ‘माध्यमभूषण’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. या प्रकाशनात मीनाचा लाभलेला हातभार ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आम्हाला मदत केली, तशी ती इतरांना देखील करीतच असते कारण तो तिचा स्वभावच आहे.
अशी ही मीना मुलाखतीच्या शेवटी म्हणाली,
‘‘आकाश खूप मोठं आहे.
तुम्ही भरारी घ्याल
तितकी त्याची निळाई
खोल आहे.’’

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
