आयुष्याच्या वेलीवर
येई दिवसाचे फुल
काही ओले काही सुके
अशी नशीबाची झुल..
असे आयुष्याचे पाणी
जरा वाहते अडते.
काही झुलत्या क्षणांचे
रेशमी काटेरी पाते…
काही झेलायचे वार
काही जपायची धार
काही क्षण अलवार
त्याचा सांभाळावां भार…
काही तुझे काही माझे
आहे नशीबाची रेख…
सुख दुःखाच्या पल्याड
देण्या घेण्याचा आलेख…
मणी गेले ओघळून
सर आयुष्याची तुटे
काही राहिले हातात
सुख संचीताचे ठसे…

— रचना : अनुपमा मुंजे. नागपुर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
