मला नेहमी असे वाटत आले आहे की, “आर्थिक श्रीमंती बरोबर, सांस्कृतिक श्रीमंती” असली तरच आपण आणि आपला समाज, हे जग खऱ्या अर्थाने प्रगत होत राहील, अन्यथा नुसते पैसे कमविण्याच्या नादात, जगायचेच राहून गेले, असे शेवटी वाटण्याची वेळ येऊ शकते !
अशाच एका सांस्कृतिक श्रीमंतीचा मला छान अनुभव आला, तो म्हणजे सिंगापूर स्थित मोहना आणि संजय कारखानीस या दाम्पत्याने मुंबईत आयोजित केलेल्या “स्नेह भेट” या कार्यक्रमाच्या निमित्ताने.
सकाळी साडेनऊ वाजता, भेटीच्या वेळी हे दाम्पत्य प्रवेशदारापाशीच प्रत्येकाचे हसतमुखाने स्वागत करीत होते. त्यानंतर अल्पोपाहार आणि अनौपचारिक गप्पा गोष्टी रंगत गेल्या.
भेटणे, बोलणे, अल्पोपाहार,भोजन इतकेच या स्नेह भेटीचे मर्यादित स्वरुप नव्हते. तर स्वतः लेखिका असलेल्या मोहना यांच्या पुस्तकांवर चर्चा, गोवा आणि साहित्य यावर अनुभव कथन, काव्य संमेलन, पुस्तक प्रकाशन अशा सांस्कृतिक, साहित्यिक मेजवानी ची जोड या स्नेह भेटीला होती, हे विशेष ! वाचू या, या स्नेह भेटी चा वृत्तांत……

सुरुवातीला मोहना यांच्या टेक ऑफ’ (कथासंग्रह), चेहरे, कहाण्या आणि सिंगापूर’ (लेखसंग्रह) आणि चंद्रकळा’ (कवितासंग्रह) या पुस्तकांवर आधारित झालेला परिसंवाद उत्तरोत्तर रंगत गेला. त्यांचे साहित्य हे सहज हळूवार भावविश्वांचे प्रतिनिधीत्व करते आणि त्यातून समाजमनाला त्या आपल्या जाणीवांचा प्रत्यय देत असते, असा मान्यवरांचा सूर यावेळी व्यक्त झाला.
परिसंवादाची सुरुवात मोहना यांच्या कथासंग्रह ‘टेक ऑफ’ वरील चर्चेने झाली. या कृतीतून प्रवासी जीवनातील संघर्ष, आशा आणि सांस्कृतिक संमिश्रण यांचे सूक्ष्म चित्रण केले गेले आहे, असे अधोरेखित करून मी (देवेंद्र भुजबळ) असे स्पष्ट केले की, “मोहनांच्या कथा या जागतिक मराठी माणसाच्या भावनांना स्पर्श करणाऱ्या आहेत. सिंगापूरसारख्या बहुसांस्कृतिक शहरातील अनुभवांचे हे प्रतिबिंब समाजाला नव्या दृष्टिकोनातून पाहण्यास भाग पाडते.”

याच सत्रात गौरी कुलकर्णी यांनी ‘टेक ऑफ’ मधील एका कथेचे भावपूर्ण अभिवाचन केले, ज्याने उपस्थित रसिकांना त्या कथेच्या गाभ्यापर्यंत नेले.
या अभिवाचनानंतर कोमसाप अध्यक्षा नमिता कीर यांनी लेखसंग्रह ‘चेहरे, कहाण्या आणि सिंगापूर’वर भाष्य केले. “हे पुस्तक सिंगापूरच्या विविध चेहऱ्यांद्वारे मराठी अस्मितेचे नवे रूप उलगडते. यातून प्रवासातील एकटेपणा आणि सामाजिक जागृती यांचा संगम दिसतो,” असे त्या म्हणाल्या.
‘चंद्रकळा’ या कवितासंग्रहावर प्रकाश टाकतांना डिंपल प्रकाशन चे अशोक मुळे यांनी या कवितांमध्ये हळूवार भावनांचे प्रतिबिंब दिसते, असे सांगितले. “मोहनांच्या कविता चंद्रकळेसारख्या – हळूहळू उजळणाऱ्या आणि मनाला स्पर्शणाऱ्या. त्या समाजमनातील सूक्ष्म जाणीवा उलगडतात, ज्या आजच्या वेगवान जीवनात विसरलेल्या आहेत,” असे त्यांनी नमूद केले. भरारी प्रकाशनच्या लता गुठे यांनी या कृतींच्या माध्यमातून स्त्री-प्रवासी अनुभवांचे साहित्यिक चित्रण होत असल्याचे अधोरेखित केले. परिसंवादात सहभागी झालेल्या इतर साहित्यिकांनीही मोहना कारखानीस यांच्या लेखनशैलीचे कौतुक केले.
स्नेह भेट च्या दुसऱ्या भागात ‘गोवा आणि मराठी साहित्य’ या विषयावर प्रिया कालिका बापट यांनी आपले विचार मांडले. गोव्याच्या सांस्कृतिक वारशाला मराठी साहित्यात स्थान कसे मिळवावे, यावर त्यांनी चर्चा केली आणि मोहना कारखानीस यांच्या कृतींशी याचा तुलनात्मक संबंध जोडला. “गोव्याच्या किनारपट्टीप्रमाणेच मोहनांच्या लेखनात समुद्री प्रवास आणि सांस्कृतिक मेळ यांचे वर्णन आहे,” असे त्या म्हणाल्या.

“कला साहित्य भूषण” चे प्रकाशन –
या स्नेह भेट कार्यक्रमात गझलनवाझ भिमराव पांचाळे यांनी भाषणबाजी न करता, संगीताची साथ संगत नसताना त्यांच्या गझला पेश करून असा काही माहौल तयार केला की, त्यांच्या अर्थपूर्ण, आर्त सुरांमध्ये उपस्थित रसिक कधी, कसे हरवले, ते त्यांचे त्यांनाच कळाले नाही ! त्यांच्या या गायनाने, माझ्या “कला साहित्य भूषण ” या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ रसिकांच्या सदैव स्मरणात राहील. यावेळी बोलताना मी, या पुस्तकात रेखाटलेल्या व्यक्ती, त्यांची वैशिष्ट्ये, समाजासाठी ते देत असलेले योगदान याविषयी माहिती दिली.

स्नेह भेटीतील एक विशेष आकर्षण म्हणजे निमंत्रित कवयित्रींचे काव्यवाचन हे होते. गौरी कुलकर्णी, हेमांगी नेरकर, प्रतिभा सराफ, संगीता अरबुने, लता गुठे, ज्योती कपिले, फरझाना इकबाल, कविता मोरवणकर यांनी स्वरचित कविता सादर केल्या.
सर्वच कवयित्रीच्या कविता इतक्या आशयप्रधान, प्रसंगी आक्रमक वाटणार्या होत्या की, प्रत्येक कवितेचे स्वतंत्रपणे रसग्रहण करायला हवे असे वाटत होते.

जवळपास चार तास चाललेल्या या संपूर्ण स्नेह भेटीचे निवेदन अश्विनी भोईर यांनी एकटीने बहारदारपणे केले. शेवटी स्वादिष्ट सामिष स्नेह भोजनानंतर या स्नेह भेटीची सांगता झाली.
सदैव लक्षात राहील, अशीच ही अनोखी स्नेह भेट ठरली. विशेष म्हणजे, या स्नेह भेटीत केवळ मुंबईतीलच नाही, तर मुंबई बाहेरून देखील काही जण, जणी आवर्जून आले होते. अशा या सुंदर स्नेह भेटीबद्दल कारखानीस दाम्पत्याचे मनःपूर्वक आभार.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
