जगात वेगवेगळ्या स्तरावर विविध देशांची वर्गवारी केली जाते.कोणते देश अधिक आनंदी आहेत हेही तपासले जाते. सरत्या वर्षांत हॅपिनेस इंडेक्स मध्ये आपण ११८ नंबर वर आहे.फिनलंड सारखा देश पहिल्या क्रमांकावर आहे. युरोपातील अनेक देश पहिल्या दहात आहेत. आश्चर्य म्हणजे आपले शेजारी देश नेपाळ, अन् पाकिस्तान आपल्या थोडे पुढे आहेत.
हॅपिनेस इंडेक्स ठरविण्यासाठी देशातील सामाजिक जडण घडण, कुटुंबाची आर्थिक स्थिती ,आरोग्य व्यवस्था, राजनैतिक परिस्थिती, स्थैर्य, भ्रष्टाचार, नैतिक पातळी, मानसिक आरोग्य, समाजातील, कुटुंबातील ताण तणाव,समाजाचे वैचारिक भान, शिक्षणाची गुणवत्ता अशा गेल्या तीन वर्षातल्या अनेक बाबी तपासल्या जातात. अभ्यासाचे जास्तीत जास्त अचूक विश्लेषण करण्याच्या गणिती, तांत्रिक पद्धती आता उपलब्ध आहेत. त्यामुळे हे निरीक्षण म्हणा, अंदाज म्हणा बाजूला सारणे, त्यावर आक्षेप घेणे योग्य होणार नाही.
प्रश्न हा आहे, की एकीकडे आपण प्रगत राष्ट्र म्हणून स्वतःला घोषित करतो.देश पातळीवर, राज्य पातळीवर प्रत्येक नवे जुने सरकार फक्त प्रगतीचे ढोल वाजवत असते. आपले सरकारी अहवाल, त्यातील वाढत्या श्रेणीच्या संख्या या प्रत्येक क्षेत्रात वरचढ असेच असतात. आर्थिक उलाढाल, व्यापार, उद्योग, शिक्षण, आरोग्य, दळण वळण, गरिबी निर्मूलन, पर्यावरण, सामाजिक सुधारणा अशा सर्वच बाबतीत आपले सरकारी अहवाल, आकडे हे वरचढ प्रगती दर्शविणारेच असतात. मग इतके सगळे ऑल वेल असताना जागतिक परीक्षेत, स्पर्धेत आनंदी असण्याच्या मूल्यांकनात आपण इतके मागे का आहोत ? याचे विद्यापीठ पातळीवर,सरकारी स्तरावर विश्लेषण व्हायला हवे, अभ्यास, चिंतन व्हायला हवे. पण तसे होताना दिसत नाही.कदाचित आपले पितळ उघडे पडेल म्हणून कुणी ते करीत नाही किंवा ते करू दिले जात नाही !
आपली मानसिकता लक्षात घेता आपल्याला आनंदी व्हायचेच नाही असे दिसते. अनेकाना प्रगत झालो असे म्हणण्याऐवजी मागासलेले म्हणवून घेण्यात धन्यता वाटते असावी. असे वाटण्याचे काही फायदे आहेत, लाभ आहेत. रडगाणे गाण्यात कुटुंबातील अनेकाना आनंद वाटतो. जगातील सगळी दुःखे आपल्याच पदरी आहेत, सगळा ताप आपल्यालाच होतो आहे,सगळी अवहेलना, अपमान आपल्याच नशिबी आहे ..एकूण इतरांच्या तुलनेत आपलेच नशीब खोटे, हे सांगून, रडगाणे गाऊन, सहानुभूतीची भीक मागण्यात, अनेकाना आतून सात्विक आनंद होत असतो.
आपल्याकडे अध्यात्म, परमार्थ,ध्यान, योग असे अनेक सात्विक मार्ग आहेत मन शांतीसाठी.पण आपल्याला कसलेही कष्ट घ्यायचे नसतात.हातपाय हलवायचे नसतात.आपल्याला घर बसल्या सगळे फुकटात, हातात हवे असते. इन्स्टंट.. ते मिळाले नाही तर आम्ही नाखूश. तक्रारी करायला मोकळे. सरकारच्या नावाने बोटे मोडायला मोकळे. व्यवस्थेला नावे ठेवायला मोकळे. कारण दुसऱ्याला दोष देऊन हात झटकणे,आपली जबाबदारी टाळणे फार सोपे असते.कुटुंबातील अस्वास्थ्य, ताणतणाव यातूनच निर्माण होतात. प्रत्येक लहान मोठ्याला आरडा ओरडा करून, आसवे गाळून स्वतः कडे इतरांचे लक्ष वेधून घ्यायचे असते. आकांडतांडव करून, खोटे अश्रू ढाळून चक्क इमोशनल ब्लॅक मेलिंग करायचे असते. हेच तत्व घरीदारी, कामाच्या ठिकाणी, सामाजिक गर्दीत.. सगळीकडे वापरले जाते.आपल्या लायकीपेक्षा जास्त आपल्या पदरी पडावे हीच प्रत्येकाची इच्छा असते. आश्चर्य म्हणजे योग्यतेपेक्षा जास्त मिळाले तरी समाधान नसते.त्या यशाची किंमत नसते. तक्रारी संपतच नाहीत.जे मिळाले त्यात समाधान मानण्याऐवजी, जे मिळाले नाही त्याचाच हिशेब मांडण्यात आपले आयुष्य वाया जाते.कुठेतरी तडजोड करायची असते, माघार घ्यायची असते,थोडे थांबायचे असते,आपलेच आपण परीक्षण करायचे असते, आत्मचिंतन करायचे असते..हे आपल्या ध्यानी मनी नसते.खरे तर या गोष्टी शिकणे,आत्मसात करणे म्हणजे खरे शिक्षण. हे खरे संस्कार..पण आपली शिक्षण व्यवस्था जे शिकवते ते सारे शिकणाऱ्याला आनंद देण्याऐवजी, कंटाळवाणे वाटणारे असते. खरे तर या गोष्टी शाळा, कॉलेजात शिकायच्या नाहीत. त्या समाजातील अनुभवातून, एकमेकाच्या संपर्कातून, सहजीवनातून शिकायच्या आहेत.याला सामाजिक एटीकेटस म्हणतात.
आपण सिंगापूर किंवा युरोपियन देशात जातो तेव्हा तिथली शिस्त,तिथली स्वच्छता, तिथल्या हवेची गुणवत्ता, तिथले बोलणे वागणे आपल्या नजरेत भरते.तिथले हे वेगळेपण आपल्याला पटकन जाणवते.तिथे गेल्यावर तेव्हढ्या काळापुरते का होईना आपणही (नाईलाजानेच का होईना !) बदलतो. पण इथे आल्यावर पुन्हा या रे माझ्या मागल्या! ही आपली वृत्ती. विघ्न संतोषी, अल्प संतुष्ट प्रवृत्ती..मग आपण आनंदी होणार कसे ?
आयुष्यात यश, सुख, समाधान, आनंद या चार वेगवेगळ्या उंचीच्या पायऱ्या आहेत.यश मिळाले तरी सुख मिळेलच असे नाही. सुख मिळाले तरी आपण समाधानी असू याची खात्री नाही. यश, सुख, समाधान असले तरी माणूस आनंदी दिसेल असेही नाही. हा मुळात वृत्ती प्रवृत्तीचा प्रश्न आहे.जी माणसे सुखी आनंदी असतात ती स्वतःची इतरांशी तुलना करीत नाहीत. आपल्या यशाचे, सुखाचे, आनंदाचे मोजमाप आपणच असतो.दुख हे इतराशी तुलना करण्याने होते.त्याला का मिळाले? तो, (ती) माझ्यापुढे का, कसा गेला (गेली) सगळे भोग माझ्याच नशिबी का ? त्याची योग्यता काय ? या अशा निरर्थक तुलना करण्यात आपले आयुष्य जाते. ते करताना आपल्याला आपल्या मूळ कर्तव्याचाच विसर पडतो. आपण निष्क्रिय होत जातो. आपली आनंदी होण्याची क्षमताच हळूहळू कमी होत जाते. हा आपल्याकडे एकट्या दुकट्याचा रोग नाही. ही सार्वजनिक समस्या आहे. हा चक्क संसर्गजन्य रोग आहे. आपण आनंदी नसण्याचे हे मूळ कारण आहे.आपण इतरांशी तुलना करणे सोडले, इतरां ऐवजी स्वतःशीच स्पर्धा केली, दुसऱ्या पेक्षा स्वतःवरच लक्ष केंद्रित केले,स्वतःशीच स्पर्धा केली तर बऱ्याच समस्या आपोआप सुटतील. आपण तुलना करण्याचे मापदंड देखील बदलले पाहिजेत. आपली योग्यता तपासून, त्या मानाने अधिक मेहनत घेऊन, जोमाने पुढे जाण्याचे धोरण अंगी बाळगले पाहिजे. सहानुभूतीची भीक मागणे सोडले पाहिजे. हाव नसेल तर प्रत्येकाची मूलभूत गरज पूर्ण करण्याची संसाधने अवतीभवती निश्चित आहेत असे गांधीजी म्हणत. त्यामुळे खरे तर चिंतेचे कुणालाच काहीच कारण नाही. त्यामुळे नव्या वर्षात नव्या दमाने खऱ्या अर्थाने आनंदी होण्याचा निश्चय करू या !

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
