थोर कवी कुसुमाग्रज यांच्या “कुणी, घर देता का रे घर ?” या काव्याचे विडंबन पुढे सादर करीत आहे. अर्थातच कवी कुसुमाग्रज यांची क्षमा मागून.
एक उमेदवार भिंती वाचून,
छपरावाचून, माणसाच्या मायेवाचून,
देवाच्या दयेपासून,
गल्लोगल्ली फिरत आहे,
जिथून कुणी उठवणार नाही
अशी जागा धुंडत आहे,
कुणी, तिकीट देता का रे तिकीट ?
खरच सांगतो बाबांनो
उमेदवार आता थकून गेलाय
इकडे तिकडे जमेल तसे
नोकरी, धंदे करून
अर्ध अधिक तुटून गेलाय
मिनतवार्या करून, हातापाया पडून,
घरच्यांची बोलणी खाऊन,
मित्रांची मस्करी सहन करून,
झुंज देऊन देऊन,
उमेदवार आता थकून गेलाय
उमेदवाराला आता
झटपट श्रीमंत व्हायचं आहे म्हणुन,
कुणी, तिकीट देता का रे तिकीट ?
खुरडत खुरडत चालत आहे
खरं सांगतो बाबांनो
उमेदवाराला न मिळणारी
उमेदवारीच नडतेय
हे बाबा, कुणी तिकीट देता का रे तिकीट ?
उमेदवाराला महाल हवा
राजवाड्याचा सेट हवा
पदवी हवी, हार हवा
थैली मधली भेट हवी
हवा एक मोठा व्हिला
पंख मिटून पडण्यासाठी,
हवी एक सोन्याची आरामखुर्ची
उमेदवाराला बसण्यासाठी,
एक मर्सिडीज हवी पुढच्या दारात
सरकारांना फिरण्यासाठी
कुणी तिकीट देता का रे तिकीट ?

— रचना : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
