पांडुरंग सदाशिव साने.
जन्म : २४ डिसेंबर १८९९, पालगड, रत्नागिरी
मृत्यु : ११ जून १९५०, मुंबई.
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे।
करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे।
बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो।
मराठीतले एक श्रेष्ठ गांधीवादी नेते, समाजसुधारक प्रतिभावंत लेखक, शिक्षक सानेगुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. जवळपास ७३ पुस्तके. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार व्हावेत यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांचे बहुतांश लेखन ते स्वातंत्र्य आंदोलनात तुरुंगात असताना झाले.
महाविद्यालयात शिकत असतानाच गुरुजींचा महात्मा गांधींच्या विचारांचा परिचय झाला. १९२१ पासून गुरुजींनी खादी वापरण्यास सुरवात केली. १९२४ मध्ये मुंबई विद्यापीठातून तत्वज्ञान व मराठी या विषयातून त्यांनी एम.ए.पदवी मिळवली. त्याच वर्षी गुरुजी अमळनेर येथील खानदेश एज्यूकेशन सोसायटीच्या प्रताप हायस्कुलमध्ये शिक्षक म्हणून ते रुजू झाले.
डिसेंबर १९२९, काँग्रेसच्या लाहोर येथील अधिवेशनात अध्यक्ष जवाहरलाल नेहरु यांनी ऐतिहासिक ‘पूर्ण स्वराज्याचा’ ठराव मांडला. पूर्ण स्वराज्याचा किंवा संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी घोषित करण्यात आली. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील सविनय कायदेभंगाच्या आंदोलनासाठी हा ठराव भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक निश्र्चित क्षण ठरला. साने गुरुजींनी लगेचच नोकरीचा त्याग करून २९ एप्रिल १९३० रोजी स्वातंत्र्य आंदोलनात प्रवेश केला. त्यात त्यांना कारावास भोगावा लागला.
९ ऑगष्ट १९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनात गुरुजी सहभागी झाले. काही काळ भूमिगत राहून खानदेश व त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर तालुक्यात आंदोलन करत त्यांनी जनजागृती केली.
स्वातंत्र्याच्या महान संग्रामाचे आणि १९४२सालच्या क्रांतिकारक आंदोलनाचे ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ गुरुजींनी आपल्या स्फूर्तिदायक वाणीने महाराष्ट्राला सांगितले.
स्वातंत्र्याच्या युध्दात ज्यांनी बलिदान केले त्यांच्या हौतात्म्याचे पोवाडे गुरूजी जेव्हा गाऊ लागत तेव्हा वीस वीस – पंचवीस हजार लोकांच्या डोळ्यांतून अश्रूचे पाझर वाहू लागत.
गांधीजी व विनोबा ही गुरुजींची दैवते होती. गुरुजी पराकोटीचे विनम्र व विनयशील होते. त्यांची एका पुस्तकाची प्रस्तावना. (मी वाचलेली सर्वात लहान प्रस्तावना.)
भगवद्गीगीते सारखा विषय, त्यावर तुकडोजींचे भाष्य, मी पामर काय प्रस्तावना लिहिणार. मी असमर्थ आहे.
— पांडुरंग सदाशिव साने
१९४६ मधे पंढरपूर विठ्ठल मंदिर अस्पृशांसाठी खुले व्हावे म्हणून त्यांनी प्राणांतिक उपोषण केले व मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा केला.
“मी जीवनाचा एक नम्र उपासक आहे. सभोवताचा सारा संसार सुखी नि समृध्द व्हावा, ज्ञानविज्ञान संपन्न नि कलामय व्हावा, सामर्थ्य संपन्न नि प्रेममय व्हावा हीच एक मला तळमळ आहे. माझे लिहिणे वा बोलणे, माझे विचार वा माझी प्रार्थना या एकाच ध्येयासाठी असतात.” — साने गुरुजी
पुज्य सानेगुरुजींना त्यांच्या १२६ व्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.
— लेखन : श्या.गो.पाटील डोंबिवली.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
