सुप्रसिद्ध जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प.मंजुश्रीताई खाडिलकर या वयाच्या 86 व्या वर्षी काल अनंतात विलीन झाल्या. त्यांच्या सूनबाईच नाही तर त्यांच्या शिष्या असलेल्या कीर्तनकार डॉ. वीणा त्यागराज खाडिलकर यांनी त्यांना वाहिलेली ही भावपूर्ण श्रद्धांजली …
ह.भ.प. मंजुश्रीताई खाडिलकर यांना विनम्र अभिवादन.
— संपादक
मंजुश्रीताई म्हणजे गेली ६८ वर्षे अविरत अखंड कीर्तन सेवेत रममाण असणाऱ्या माझ्या कीर्तन गुरू व सासूबाई सुद्धा ! वयाच्या १५ व्या वर्षी नारदीय कीर्तन सेवेचे व्रत त्यांनी हाती घेतले. कीर्तन सेवेसाठी म्हणून संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, दिल्ली, पंजाब, मध्यप्रदेश, अश्या अनेक प्रांतात, त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य केले. पंजाबातील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात थेट खलिस्तानवादी अतिरेकी भिंद्रांवाले याच्या समोर हिंदी, पंजाबी भाषेत कीर्तन केले ! इतकेच नव्हे तर इंग्लंड, अमेरिका, कॅनडा या देशांत तब्बल ३ महिने कीर्तनसेवेच्या माध्यमातून भारतीय संस्कृती व कलेचा प्रचार प्रसार केला. युरोप, अमेरिकेचा दौरा करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय कीर्तनकार होत्या ..!
मंजुश्रीताईंच्या कार्याचा एक महत्वाचा पैलू म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवन चरित्रावर संपूर्ण भारतात त्यांनी १०० कीर्तने केली. या कीर्तनातून मिळालेले पूर्ण मानधन, दादर येथील स्वा. सावरकर स्मारक उभारणीच्या निर्मिती कार्यास अर्पण केले.
मंजुश्रीताईंनी महिलांना भजन, कीर्तने शिकवुन ज्ञानदानाचे कार्य तब्बल ६५ वर्षे अविरत चालू ठेवले होते. सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या उषाताई विश्वनाथ कराड यांना त्या गुरुस्थानी होत्या.

मंजुश्रीताईंची संत सखू, लाखा कोलाटी नरसिमेहता ही अत्यंत आवडती आख्याने, त्यांनी आजच्या अनेक नवोदित कीर्तनकाराना ठेव म्हणून दिली होती. अत्यंत मधुर आवाज,अत्युच्च प्रत्युत्पन्नमती, गायकी पूर्ण कीर्तन शैली, व रंजक कथन हा त्यांच्या यशस्वी कीर्तनाचा हातखंडा होता.
वारकरी संप्रदायाचे गुरुवर्य साक्षात धुंडा महाराज देगलीकरांनी मंजुश्री ताईना सन्मानार्थ वीणा प्रदान केली होती. तसेच करवीरपीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते त्यांना कीर्तनमंदाकिनी ही उपाधी प्रदान करण्यात आली होती. असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. पण शासकीय पुरस्कारापासून त्या शेवट पर्यंत वंचित राहिल्या आहेत, ही खंत आहे.
शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीताचा कीर्तनात उत्तमरित्या समावेश करणाऱ्या, तसेच महिलांचे अनेक प्रश्न कीर्तनातून ठामपणे मांडणाऱ्या सामाजिकतेचे भान असणाऱ्या, मंजुश्री ताई या पहिल्या महिला कीर्तनकार होत्या असे म्हटले तर वावगे होणार नाही. आपल्या भजन, कीर्तन गायनाचा वारसा अनेक विद्यार्थ्यांसोबत तिन्ही मुले, सुप्रसिद्ध गायक त्यागराज खाडिलकर, नटराज खाडिलकर, आणि अमृता खाडिलकर, आपल्या राज्ञी, मोक्षा, तेजसा, ग्रीष्मा, सोहमादित्य यशराज या नातवंडांनाही सुपूर्त केला. आज ही सर्व मंडळी संगीत क्षेत्रात अविरत संगीत सेवा देत आहेत.
शेवटच्या श्वासापर्यंत भजनात रममाण असलेल्या, ह.भ.प. मंजुश्रीताई खाडिलकर यांच्या कीर्तन सेवेला शेवटचा रामकृष्ण हरी !!

— लेखन : कीर्तनकार, डॉ. वीणा त्यागराज खाडिलकर. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
