अकोल्यात 1942 साली स्थापन झालेल्या न्यू इरा शाळेच्या 1953 पासूनच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, आज, शनिवार, 27 डिसेंबर 2025 रोजी होत आहे. साधारण एक हजार माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या पैकीच एक, निवृत्त माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ यांनी, शाळेविषयी जागवलेल्या या काही आठवणी….
— संपादक
न्यूईरा,म्हणजे न्यूईरा हायस्कूल मध्ये मी पाचवी ते दहावी पर्यंत होतो. नॉर्मल स्कूल मधून मी 1970 साली ४थी पास झालो आणि त्यावेळी एक नंबरची समजल्या जाणार्या न्यूईरा मध्ये पाचवीत मला दाखल करण्यात आले.
पाचवी पासून मला “अ” तुकडी मिळाल्याने, मी हुशार नसताना देखील स्वतः ला हुशार समजायला लागलो होतो !
न्यूईरा म्हटले की, मला तिथे काय शिकविले हे आठवण्यापेक्षा, आठवतात ते, शाळेतील काही सर, काही मॅडम आणि माझे काही मित्र. खरं म्हणजे, शिकविलेले आठवले असते तर बरे झाले असते, कारण मी दहावीत नापास झाल्यापासून तरी वाचलो असतो.पण आजच्या भाषेत सांगायचं झालं तर, माझा “इमोशनल कोशंट” (IQ) कमी पडला. अर्थात मी नापास होणार याची मला इतकी खात्री होती की, परीक्षा झाल्या झाल्या मी आधी माझ्या आजोळी, संगमनेर इथे आणि तिथून पुढे पुणे येथे गेलो आणि पुढील काही महिने तरी मी अकोल्यात फिरकलोच नाही, इतकी तिथे तोंड दाखवायची लाज वाटत होती.
तर पुन्हा न्यूईरा कडे येऊ या…
मला आठवतात ते अतिशय तळमळीने पाचवी ते सातवी इंग्रजी शिकविणारे अ म जोशी सर. पांढरा शुभ्र पायजमा आणि पांढरा शुभ्र सदरा घातलेल्या जोशी सरांच्या हातात नेहमी एक वेताची छडी असायची. ते वर्गात आले की, सर्वांना पाय बाहेर काढून बसावे लागायचे. शिकविता शिकविता ते वर्गात, दोन्ही रांगांमधुन दोन्ही कडच्या मुलांच्या वह्या तपासत जायचे. कुणाच्या वहीत काही चूक दिसली की, त्याचा पायावर छडी बसलीच म्हणुन समजा. माझ्या पायावर मात्र त्यांची छडी कधी बसली नाही.
दुसरे एक सर होते, ते म्हणजे गणित शिकविणारे धर्माधिकारी सर. धर्माधिकारी सर गणिता सारखेच अतिशय कडक होते. त्यांचा वर्ग नेमका जेवणाची सुट्टी व्हायच्या आधी असायचा. भूक लागलेली असायची. पोट खपाटीला गेलेले असायचे. अशा वेळी गणित चुकलेले पाहून ते आमच्या पोटाला चिमटा घेऊन तो असा काही पिरगाळायचे की, डोळ्यातून पाणीच यायला लागायचे. ही शिक्षा माझ्या वाट्याला वरच्यावर यायची. अजूनही कधी त्या चिमट्याची आठवण झाली की, डोळ्यात पाणी येते. पुढे या गणिताने आणि त्याच्या जोडीला विद्यान विषयानेच माझा दहावीत घात केला.
आठवी पासून मी सेमी इंग्लिश मीडियम घेतले. तेव्हा देशपांडे मॅडम इंग्लिश शिकवायच्या. गोर्यापान, तेजस्वी, शांत आणि नेहमी पांढरी साडीच त्या घालायच्या. त्यांचे अक्षर सुद्धा खूप सुंदर होते. त्या त्यांचे पती, देशपांडे सरांच्या मोटार सायकलवर शाळेत येत जात असायच्या. देशपांडे मॅडमच्या उलट त्यांचे व्यक्तिमत्त्व. उंच पुरे, धिप्पाड, काळे सावळे, त्यात दाढी राखलेले! ईश्वर आपल्या गाठी स्वर्गात बांधतो, हे त्यांच्या कडे बघून लक्षात यायचे !
आठवी नंतर बायॉलॉजी शिकवायला शैला गोगटे मॅडम, या नवीनच मॅडम आल्या होत्या. फिजिक्स, केमिस्ट्री कोण शिकवायचे ते मात्र काही आठवत नाहीये.
मराठी चे शिंत्रे सर मात्र खूपच गमतीशीर होते आणि ते शिकवायचे सुद्धा गमतीशीरपणे. त्यांनी सांगितलेला एक किस्सा अजून माझ्या लक्षात आहे, तो आहे रस्त्याविषयी….
रस्त्याविषयी बोलताना ते म्हणाले होते, रस्ता कसा हवा, की आधी उतार असावा. म्हणजे सायकलला पायडल न मारताच ती वेगाने खाली उतरेल. आणि ती इतक्या वेगाने खाली उतरली पाहिजे की, त्या वेगानेच पुढचा चढ चढली पाहिजे! (अर्थातच सायकलला पायडल न मारता) आतापर्यंत मी बावीस तेवीस देशात तरी फिरलो आहे, पण शिंत्रे सरांच्या कल्पनेतील रस्ता अजूनही कुठे पाहायला मिळाला नाही, यावरून लक्षात येते की, ते काळाच्या किती पुढे होते !
एक उंचेपुरे, धिप्पाड, गोरेपान, थोडेसे लांब ,कुरळे केस असलेले ध्येयवादी गोळे सर होते. विद्यार्थी शाळेत असतानाच त्यांच्यावर चांगले संस्कार होऊ शकतात म्हणुन ते चक्क कॉलेज मधील प्रोफेसरची नोकरी सोडून न्यूईरात सर म्हणुन आले होते.
मित्रांमध्ये म्हणाल, तर अमल दामले, राजेश देवगावकर, अरविंद देशमुख आणि मी असा आमचा चौघांचा छान ग्रुप जमला होता. माझ्या बेंच वर बसणारा अनिल देवधर याच्याशीही माझी चांगली मैत्री होती. तो लहान असताना, चालू फॅन मध्ये त्याने उजव्या हाताचे बोट टाकले होते. त्यामुळे त्याचे एक बोट (त्या बोटाला तर्जनी म्हणतात, हे खूप पुढे कळले!) वाकडे झालेले होते.तर एकदा आम्ही चौघे अरविंद देशमुख च्या उगवा या गावी गेलो होतो. तिथे दोन दिवस त्याच्या वाड्यात, शेतात छान हुंदडत होतो . जेवायला बसलो की, अरविंदची बहीण चौघांनाही गरम गरम पोळ्या वाढत असे, ते ही इतक्या झटपट की, कुणाला पोळीची वाट बघत बसायची वेळच येत नसे.
जाता जाता, सांगू की नको, या संभ्रमात होतो, पण आता सांगूनच टाकतो, ते म्हणजे मी नववीच्या वार्षिक परीक्षेत कॉपी करताना पकडला गेलो होतो. आता काही आपली धडगत नाही, सर्व वर्गासमोर मान खाली घालण्याची वेळ आली म्हणुन प्रचंड अस्वस्थ होऊन गेलो होतो.सर पेपर काढून घेतात, वर्गाबाहेर काढतात,की वाटेल तसे बोलतात अशा काही अपेक्षेत असताना, सरांनी शांतपणे कॉपी काढून घेतली आणि तितक्याच शांतपणे सांगितले, “अरे,तुझे भाऊ फर्स्ट क्लास मध्ये आलेले असल्याने, त्यांची नावे शाळेच्या बोर्डावर लागली आहेत आणि तू हे काय करतोस ? “इतकेच बोलून बाकी काही न करता निघून गेले.
सरांचे ते शब्द मला इतके विदिर्ण करून गेले की, पुढे आयुष्यात कुठल्याच परीक्षेत काय, इतर कोणत्याही बाबतीत मी, कधी कोणाची कॉपी केली नाही !

— लेखन : देवेंद्र भुजबळ. माजी पत्रकार,
माजी दूरदर्शन निर्माता, निवृत्त माहिती संचालक,
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
