“जोहार मायबाप जोहार”
ज्यावेळी एखादी लेखिका किंवा लेखक अत्यंत मनापासुन , गांभीर्याने आणि महत्वाचे म्हणजे अखंडपणे, स्वतःच्या जीवनाशी संबधित अशी लेखमाला लिहितात आणि ती यशस्वीपणे पूर्ण करतात तेव्हा, एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात अश्रू अशी आमची अवस्था होते.
लेखमाला यशस्वीपणे पूर्ण झाली, याचा आनंद वाटत असतो पण त्या त्या लेखक/ लेखिकेच्या लिखाणाचे संपादन, मांडणी, एकूण निर्मिती ही केवळ एक तांत्रिक किंवा कामाची बाब रहात नाही तर कळत नकळत त्यांच्या जीवनात आम्ही गुंतत जातो. आणि मग समारोपाची वेळ येते तेव्हा, सासरी जाणार्या मुलीच्या आईवडिलांसारखी अवस्था होते.
राधिकाताईंनी अतिशय मनस्वीपणे, साध्या, सरळ सोप्या भाषेत, चित्रमय शैलीत ही लेखमाला लिहिली आणि माध्यमांच्या दृष्टीने आणखी एक अतिशय महत्वाची बाब म्हणजे शिस्त, नियमितपणा, सततचा सुसंवाद अशा अनेक गोष्टींची अवधाने त्यांनी कटाक्षाने पाळली या बद्दलही त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. वाचकांनी त्यांच्या लेखनाला भरभरुन प्रतिसाद दिल्यामुळे लेखन करण्यासाठी जसा त्यांचा हुरूप वाढत राहिला, तसाच आमचा देखील वाढत राहिला. त्यामुळे सर्व वाचकांचे देखील मनःपूर्वक आभार. या लेखमालेचे पुस्तकात रूपांतर होवो यासाठी आणि
पुढील लेखनासाठी राधिकाताईंना मनःपूर्वक शुभेच्छा.
— टीम एन एस टी.
माननीय श्री देवेंद्र भुजबळ आणि माननीय सौ. अलकाताई भुजबळ यांनी प्रोत्साहित केल्यामुळे “न्यूज स्टोरी टुडे” च्या या इंटरनॅशनल पोर्टलवर मी, “माझी जडणघडण” ही मालिका जवळजवळ गेली दीड वर्षे लिहीत आहे. सुरुवातीला हे आव्हान स्वीकारताना मी खूप साशंक होते. मूळातच मी, ”हे का लिहावं ?” हा प्रश्न माझ्या मनात होता. कारण स्वतःविषयी काही लिहावं आणि ते वाचकांकडून वाचलं जावं इतकी मी कुणी प्रसिद्ध अथवा वलयांकित व्यक्ती नाही. चार चौघींसारखंच माझं जीवन पण तरीही देवेंद्रजी म्हणाले,”लिहा तुम्ही. आयुष्यातील तुमच्या अनुभवांविषयी, जीवन जगताना जे जे तुम्हाला जाणवले ते लिहा.”
म्हटलं, ”बरं! प्रयत्न करते.”
अक्षरशः मी माझा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळही जवळ घेऊन बसले. अदृश्यपणे माझ्याच आयुष्याचं गाठोड सोडवलं आणि मग त्या प्रवाहात लिहिता लिहिता स्वतःला खरोखरच झोकून दिलं.
वास्तविक “माझी जडणघडण” ही ७८ भागांची मालिका म्हणजे माझे आत्मवृत्त आहे असे मी मुळीच म्हणणार नाही. आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर आलेल्या कडू, गोड, आंबट, तुरट अनुभवांचं भेटलेल्या अनेक व्यक्तींचं माझ्या जडणघडणीत काय योगदान ठरलं याचं मी बारकाईने निरीक्षण केलं, काहीसं चिंतनही केलं आणि माझ्या दृष्टीने मला जे वाटलं ते तुम्हा वाचकांसमोर अगदी प्रांजळपणे ठेवलं.
ही मालिका लिहिताना आणि विशेषतः भूतकाळात शिरताना मला सुद्धा नक्कीच खूप आनंद मिळाला. तेव्हा न जाणवलेलं लिहिताना जाणवलं. हरवलेलं कितीतरी, दडून बसलेलं काहीतरी गवसत गेलं आणि जीवन पुन्हा नव्याने कळत गेलं. प्रत्येक लेख लिहिताना मला हे वाटायचं की,” यात तसं विशेष काय आहे?” पण ज्या ज्या वेळेला वाचकांचे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचे त्यावेळी मी मनोमन हरखून जायचे. वाचकांचा या मालिकेला खरोखरच उदंड प्रतिसाद मिळाला. कुठेतरी वाचकही माझ्या या लेखनाशी रिलेट व्हायचे. त्यांच्या जीवनातलेही संदर्भ ते या लेखनात पडताळून बघायचे.
अभिप्रायासोबत तेही त्यांच्या आयुष्यात आलेले अशाच प्रकारचे अनुभव मला सांगायचे. कित्येकांचे फोनही यायचे. काहीजण वैयक्तिक मेसेजेसमधून त्यांच्या भावना व्यक्त करायचे आणि हे सगळंच माझ्यासारख्या सामान्य लेखिकेसाठी खूपच भारी होतं. माझ्या अनुभवात त्यांचेही अनुभव मिसळत माझ्या जडणघडणीचा आणखी एक नवाच प्रवास त्यामुळे सुरू व्हायचा.
“पुढील भागाची प्रतिक्षा करत आहोत.” हे वाचकांचं वाक्य माझ्यासाठी खूप प्रेरणादायी असायचं.
या लेखनानिमित्ताने अनोळखी ओळखींमधून त्यांच्या हृदयीचे खरेखुरे बोल वाचून, ऐकून मीही प्रत्येक वेळी खरं म्हणजे अधिक समृद्ध होत गेले. अनेक नवी दालनेत जणू काही माझ्यासाठी उघडली गेली. त्यामुळे माझ्या या वाचक वर्गाची मी खूप ऋणी आहे. माझ्या लेखनातून मी त्यांना काय दिलं यापेक्षा त्यांच्या प्रांजळ मनापासून लिहिलेल्या प्रतिक्रियेतून मला मात्र खूप आनंद मिळाला. सुरुवातीला जे वाटत होतं की “मी हे का लिहावं ?” ही भावनाच गळून गेली. या लेखनाच्या माध्यमातून मला खूप मोठा मित्रपरिवार लाभला आणि मी अक्षरशः त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा केल्या. माझ्या मनातल्या अनेक प्रश्नचिन्हांनाही मी वाट मोकळी करून दिली. हा साराच आनंद खरोखरच अवर्णनीय होता.
खरं सांगू का ? तसा हा जडणघडणीचा प्रवास न संपणाराच आहे. याचं शेवटचं स्थानक म्हणजे आपला शेवटचा श्वास. आज मागे वळून पाहताना ज्यांनी माझं बोट धरून जीवनरूपी आकाशातले तारे मला पाहायला शिकवलं ते हात लुप्त झालेले जाणवत असले तरी आयुष्याची उरलेली वाट नव्या पिढीच्या हाताला धरून चालतानाही पुन्हा एकदा जडणघडणीचाच प्रवास सुरू असल्याची भावना मनात प्रबळ होते. जगत असताना संस्कार म्हणून सहजपणे ज्यांना मी माझ्यातलं दिलं त्यांच्याच सोबतीने पुन्हा माझ्यावरच संस्कार होत असल्याचं अनुभवते तेव्हाही हेच वाटतं की हे संस्काराचं पात्र केवढं मोठं आहे! अनंत आहे, न संपणारं आहे म्हणूनच म्हणते ही जडणघडणीची मालिका न संपणारी आहे. सांगायचं असं काहीतरी खूप बाकी आहे आणि पुढेही ते बाकीच राहणार आहे.काल घडलं,आजही काही घडणार आहेच आणि पुढेही घडेल.. म्हणून आता इथेच थांबायचं मी ठरवलंय. तुमचा प्रेमळ निरोप घेत आहे. या संपूर्ण मालिकेच्या प्रवासात वाचकहो! तुम्ही दिलेली साथ माझ्यासाठी केवळ अनमोल आहे. धन्यवाद तरी कसे देऊ ? तुमच्या कायम ऋणातच मी राहीन.हेच नम्रपणे म्हणावसं वाटतं..
।। जोहार मायबाप जोहार
तुमच्या महाराचा मी महार
बहु भुकेला झालो
तुमच्या उष्ट्यासाठी आलो ।।
मी स्वतःची कुठल्याही रत्नाशी तुलना करत नाही पण माननीय देवेंद्रजी आणि माननीय अलकाताई मात्र खरोखरच रत्नपारखी आहेत. त्यांच्या “न्यूज स्टोरी टुडे” मधून ते सातत्याने सुप्तावस्थेतल्या अनेक मौल्यवान सूक्ष्मातल्या सूक्ष्म कणाला सुद्धा सहस्त्र पैलू पाडून चमकवत आहेत.. हे अतुलनीय आहे. त्या सूक्ष्मतला एक कण होण्याचं भाग्य मला मिळालं. देवेंद्रजी, अलकाताई मी तुम्हाला प्रेमादरपूर्वक वंदन करते आणि तुमच्या या अभिजात मराठी भाषिक चळवळीसाठी मनापासून शुभेच्छा देते.
तेव्हा मित्रहो! आता निरोप घेते. चूक भूल द्यावी घ्यावी. सदैव एकमेकांच्या स्मरणात मात्र नक्कीच राहू.
बाsssय!
समाप्त.

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
