अकोल्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात शाळांची असणारी अपुरी संख्या लक्षात 1942 साली श्री य रा डोंगरे (अध्यक्ष), डॉ शं शि सावजी (उपाध्यक्ष), द श कोल्हटकर (उपाध्यक्ष), वा रा केळकर (चिटणीस), सभासद सर्वश्री म रा ठोसर, गो रा ठोसर, ना रा केळकर, भा ग देव, चं पू सरोदे, रा शं फडके या मंडळीनी एकत्र येऊन “प्रागतिक शिक्षण प्रसारक मंडळ “ही संस्था स्थापन केली. पुढे संस्थेच्या वतीने 1942 साली न्यू ईरा हायस्कूल सुरू केले. अनेक चढउतार पहात या शाळेने 84 वर्षे पूर्ण केली.

संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री विश्वनाथ गद्रे, सर्व संचालक मंडळ, विद्यमान मुख्याध्यापक श्री महेश ठोके, त्यांचे सर्व सहकारी यांनी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्याचे तीनचार महिन्यांपूर्वी मनावर घेतले. योगायोगाने त्याच दरम्यान महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शाळेने माजी विद्यार्थी संघ स्थापन करून, त्या मार्फत शाळेचा विकास करण्यात यावा, अशा आशयाचे आदेश निर्गमित केले. विशेष म्हणजे, या शासन आदेशाप्रमाणे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा 27 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करणारी न्यू ईरा हायस्कूल राज्यातील पहिलीच शाळा ठरली.

या मेळाव्यात 1953 पासूनचे साधारण एक हजार माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते. एकच हजार अशा साठी ची, आसन क्षमताच तेव्हढी होती !

मेळाव्याच्या प्रारंभी आजी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून छान वातावरण निर्मिती केली.

त्यानंतर मान्यवरांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि 27 डिसेंबर रोजी जयंती असलेले, भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मुख्याध्यापक श्री महेश ठोके यांनी प्रास्ताविक करून मेळाव्याचे आयोजन करण्यामागची भूमिका स्पष्ट केली.

प्रास्ताविकानंतर गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थी, विद्यार्थीनीचा आणि विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना, गुणवत्ता यादीत आलेल्या, शाळेच्या माजी विद्यार्थिनी तथा नागपूर येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ चारुताई माहूरकर म्हणाल्या, प्रत्येक विद्यार्थ्याच्या जडणघडणीत या शाळेचे योगदान अमूल्य आहे. आपली शाळा, आपली ओळख असते. म्हणुन या शाळेसाठी आपण काय करू शकतो, याचा आपण विचार केला पाहिजे.

शाळेचे माजी विद्यार्थी तथा ब्रिगेडियर श्री सुहास कुलकर्णी यांनी अतिशय परखडपणे भाषण करून केले. भारत हा कधी कधी माझा देश आहे, अशी आपली भावना असून चालणार नाही, तर प्रत्येकाने हर क्षणी आपण देशासाठी काय करू शकतो, याचा विचार केला पाहिजे असे आग्रही प्रतिपादन केले.
या नंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते सुंदर, संग्राह्य अशा स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी अल्पावधीत स्मरणिका तयार केल्याबद्दल स्मरणिकेचे संपादक 1995 E च्या तुकडीचे श्री सागर लोडम यांचा सत्कार करण्यात आला.
मेळावा संयोजन समितीचे अध्यक्ष तथा संस्थेचे उपाध्यक्ष श्री जयंत मराठे यावेळी बोलताना सांगितले की, ही शाळा आपल्या जीवनाचा पाया असून शाळेच्या नव्या इमारतीसाठी आपण सर्व मिळून भरघोस मदत करू या.

संस्थेचे अध्यक्ष श्री विश्वनाथ गद्रे यांनी आपल्या भाषणात शाळेच्या प्रगतीचा, आलेल्या, येत असलेल्या अडचणींचा आढावा घेऊन 2013 मध्ये ते अध्यक्ष झाल्यापासून केलेली कामगिरी विशद केली. पुढील शैक्षणिक वर्षापासुन अकरावी सुरू होत आहे, अशी माहिती देऊन त्यांनी प्रत्येक माजी विद्यार्थ्याने शाळेला एक तरी नवा विद्यार्थी मिळवून द्यावा, असे आवाहन केले.
उद्घाटनपर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन 1993 च्या तुकडीचे श्री सचिन जोशी यांनी केले.
या नंतर झालेल्या मनोरंजन पर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जे दिव्या आणि आर जे अमृता या दोघींनी बहारदारपणे केले. दरम्यान, वर्ष निहाय तुकड्या व्यासपीठावर येऊन जल्लोषात छायाचित्रे काढून घेत होत्या.

अनेक वर्षांनी आपापले वर्ग मित्र मैत्रिणी भेटत असल्यामुळे सर्व वातावरण दिवसभर आनंदी आणि उत्साही होते. खुद्द माझा केवळ वर्ग मित्रच नाही तर एकाच बेंच वर बसणारा माझा मित्र अनिल देवधर याच्याशी तब्बल 49 वर्षानी भेट झाली.
मेळाव्याच्या आयोजनात आधुनिक व्यवस्थापन तंत्रे, उत्कृष्ट आयोजन आणि सेवाभाव यांचा सुंदर मिलाफ झाल्याने हा मेळावा अविस्मरणीय ठरला.

— लेखन : देवेंद्र भुजबळ. निवृत्त माहिती संचालक
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
