माझा सगळा जन्म शिकण्यात अन् शिकविण्यात गेला. आता खोल विचार केल्यावर लक्षात येते की आपल्याला नेहमी अर्धसत्य शिकवले गेले. आपणही तोच कित्ता गिरवत अर्धसत्य शिकवले. कारण सगळे शिकवणे हे परीक्षेसाठी होते, शिकण्यासाठी ज्ञान संपादन करण्यासाठी नव्हते. बरे, परीक्षा म्हणजे तरी काय.. तर ठरावीक प्रश्नाची ठराविक वेळात ठरावीक उत्तरे लिहिणे, अन् मोबदल्यात अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळवणे !
आधी अर्धसत्य कसे ते समजून घेऊ. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज १८० अंश असते हे प्रमेय आपण शिकतो.पण ते अर्धसत्य असते ! कारण हा त्रिकोण सम पातळी वर, एकच प्लेन वर असेल तरच हे शक्य, सत्य आहे. आपण स्पेरिकल असलेल्या पृथ्वीच्या पातळीवर त्रिकोण काढायचा प्रयत्न केला तर हीच बेरीज १८० पेक्षा जास्त असू शकते. हे पूर्ण सत्य शिकवले जात नाही. तसेच दोन बिंदुतले कमीत कमी अंतर म्हणजे त्या दोन बिंदूना जोडणारी सरळ रेषा.. पण हे तत्व जमिनीवर चालणाऱ्या वाहनासाठी दोन स्थानकातले नीट कमी अंतर काढण्यासाठी योग्य असले तरी तेच तत्व आकाशात उडणाऱ्या विमानासाठी वापरता येत नाही. विमाने इंधन वाचविण्यासाठी आकाशात सरळ रेषेत उडत नाहीत हे पूर्ण सत्य ! अशी अनेक उदाहरणे प्रत्येक विषयात देता येतील.
आजच्या पत्रकारिकेत तर सत्य कधी नीट सांगितलेच जात नाही. अर्ध सत्य सांगून गोंधळ उडवून द्यायचा हे पत्रकारितेचे, माध्यमांचे ब्रीद असते की काय कोण जाणे ?
तेच इतिहासाचे.. इतिहासात तर किती तोडमोड सोयीनुसार केली जाते याला सीमाच राहिली नाही. आपले पुराण ग्रंथ, धार्मिक ग्रंथ यातील पूर्ण मूळ सत्याची शहानिशा करणे, विश्लेषण करणे केवळ अशक्य होऊन बसते. अनेक सनावलीत गफलत असते. अनुवादात गफलत असते. विश्लेषण करताना मूळ घटना, मूळ वाक्ये,शब्द रचना यात सोयीनुसार फेरफार करून वेगवेगळे निष्कर्ष वेगवेगळ्या काळात काढले गेलेले आपण बघतो. यात कधी स्वतःचे शहाणपण दाखवण्याचा अट्टाहास असतो, कधी जाती, धर्माचा वर्गभेद ! अशा कृतीला प्रोत्साहन देत असतो. त्यामुळे मूळ सत्य बाजूलाच राहते. तोडमोड केलेले अर्धसत्य आपल्या समोर येते.
सायन्स चे सत्य देखील असेच ! त्या वेळचे त्या प्रमाणावर आधारित, त्या विद्वानाला जाणवलेले सत्य असते.काही वर्षांनी दुसरा कुणी वैज्ञानिक येतो अन् आधीचे सत्य खोदून काढतो. नवे सत्य, नव्या आविष्कारासह, प्रमाणासह नव्याने समोर येते. मॅटर संबंधी पार्टीकल थिअरी, वेव्ह थिअरी, अनसरटनटी प्रिन्सिपल, क्वांटम थिअरी ही त्याचीच उदाहरणे. त्या त्या काळात तेच सत्य गृहीत धरले गेले. मान्य झाले. यातील काही संशोधकांना त्या त्या वेळी नोबेल पुरस्कार देखील मिळाले!. आधीचे अर्धसत्य खोडून काढण्यासाठी पुरस्कृत केले गेले !
समाजात अनेक दुर्घटना घडतात. हत्या, आत्महत्या, भ्रष्टाचार, बलात्कार.. अशा अनेक घटनांत सत्य क्वचितच बाहेर येते. आरुषी केस, सुशांतसिंग, दिशा सालियन आत्महत्या….
एका न्यायाधीशाच्या घरात सापडलेली जाळलेली प्रचंड कॅश, अनेक राजकीय खून.. अशा अगणित घटनातले सत्य बाहेर येणार नाही. आपल्याला अर्धसत्यावर, अफवांवर विसंबून रहावे लागेल.
आपल्याला नीती नियम कायदे शिकवले जातात.पण वेगवेगळ्या वर्गासाठी वेगळे कायदे, वेगळे नियम असतात. सामान्य माणसाने जमीन घोटाळा केला तर ताबडतोब आय टी, ई डी, सी आय डी, एफ आय आर..सगळे तातडीने मागे लागतात.
हेच काम एखाद्या राजकीय पुढाऱ्याने, मंत्र्याच्या नातेवाईकाने केले तर हीच यंत्रणा चिडीचूप.. तिथे वेगळे नियम, वेगळी भूमिका, वेगळे कायदे, वेगळ्या पळवाटा.. एकाच सत्याचे दोन चेहरे.. काही अर्धवट झाकलेले.. मुद्दाम लपवलेले.
नात्याच्या, कौटुंबिक व्यवहारात ही हेच घडते.लग्न ठरवताना अर्धी (खोटी) माहिती द्यायची. अडचणीचे लपवून ठेवायचे. नंतर फसवणूक झाली की बोंबलायचे ! नोकरीसाठी मुलाखतीत खोटे सांगायचे. खोटे सर्टिफिकेट लावायचे. अर्धसत्य सांगून पळवाटा शोधून नोकरी, प्रमोशन पदरात पाडून घ्यायचे. हे सगळे समाजात सर्रास चालते. चोरी पकडली गेली तर तो चोर ठरणार. एरवी शिरजोर म्हणून समाजात वावरणार..
आता तर भ्रष्टाचार करताना रंगे हाथ पकडले गेलेले उच्च पदस्थ अधिकारी, कुलगुरू, प्राध्यापक, डॉक्टर देखील प्रकरण थंडावले की समाजात उजळ माथ्याने फिरताना दिसतात. शिक्षा राहिली दूर, पेन्शन वगैरे लाभ घेताना दिसतात. सरकार, न्याय व्यवस्था, समाज सगळेच कसे काय याकडे डोळेझाक करतात ? आपली स्मृती इतकी कमजोर कशी ? आपण अर्धसत्य का पचवतो ? पूर्ण सत्याचा पाठपुरावा कुणीच का करीत नाही? कारण शाळेपासूनच आपल्याला तसे शिकवले गेले. शिक्षकांना, मोठ्यांना प्रश्न विचारायचे नाहीत. शंका विचारायचे नाही. ते जे सांगतात, ते अर्धसत्य असले, वाटले तरी पूर्ण (अंतिम) सत्य मानून चूप बसायचे. आवाज उठवणे हा गुन्हा. क्रॉस क्वेश्चन करणे महापाप, मोठ्यांचा अपमान ! हेच शिकवले गेले ना आपल्याला ? या प्रश्न, शंका न विचारण्याच्या प्रवृत्तीमुळेच आपली प्रगती खुंटली. आपली जिज्ञासा खुंटली. विचारशक्ती पंगू झाली.
आजकाल नव्हे पूर्वीपासूनच वर्गात प्रश्न,शंका विचारण्याचे प्रमाण नगण्य होते, आहे. शिकण्याचा वर्ग म्हणजे वन वे ट्रॅफिक. एक तास फक्त प्राध्यापक/शिक्षक बडबड करणार. समोरचे ते ऐकून घेणार. प्रश्न, शंका न विचारता ते अंतिम पूर्ण सत्य मानून, गृहीत धरून पुढची वाटचाल करणार. या मार्गाने फक्त पदवीचा कागद मिळतो. शहाणपण येत नाही. पूर्णसत्य कळत नाही. ज्ञान प्राप्त होत नाही. याचे कारण तार्किक, बौद्धिक विचारशक्ती, म्हणजे विवेक आपण गमावला असतो. एकाच प्रश्नाची अनेक उत्तरे असू शकतात. योग्य वाटलेले उत्तरही उपयोगाचे असेलच असे नाही.काही प्रश्न तर असेही असतात ज्यांना उत्तरे च नसतात. करोना ने हे सिद्ध केलेच. त्यावेळी तर अर्धसत्य सांगण्याची जगभर स्पर्धाच चालू होती ! मृत्यूचे खोटे आकडे पसरवले जात होते.सत्य लपवले जात होते. अर्ध सत्याच्या पांगुळ गाड्यावर जग वाटचाल करीत होते कशी बशी !
आपली संस्कृती, आपले वेद पुराण, आपले तात्विक, धार्मिक ग्रंथ अंतिम सत्याचा दावा करतात.पण तिथपर्यंत पोहोचायचे कसे हे कुठल्याच शाळा कॉलेजात, विद्यापीठात शिकवले जात नाही. शिकवतात ते अर्धसत्य !

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
