Saturday, January 3, 2026
Homeलेखसावित्रीबाई फुले : अलौकिक कार्य

सावित्रीबाई फुले : अलौकिक कार्य

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची तीन जानेवारी रोजी साजरी केली जाते. या दिवसाला बालिकादिन किंवा महिलामुक्तीदिन म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.

सावित्रीबाई फुले या नावातच एक चैतन्य आहे, एक ऊर्जा आहे. एकोणिवासाव्या शतकाच्या मध्यावर ज्यावेळी भारतासारख्या रुढीवादी आणि परंपरावादी देशात स्त्रीला स्वातंत्र्य तर सोडाच पण समाजात कुठलाही दर्जा नव्हता, “चूल आणि मूल” यातच जणू तिची इतिकर्तव्यता होती, मनुस्मृतीने स्त्रियांवर अनेक बंधने घातली होती आणि त्या काळातील समाजव्यवस्थेनेही ती बंधने अगदी सहज स्वीकारली होती, अशा काळात तिला शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा देण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. हे फार मोठे कार्य त्यांनी केले. याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही.

आज स्त्रिया शिक्षण घेऊन जे स्वातंत्र्य आणि सन्मानाचे जीवन जगत आहेत, त्याचे संपूर्ण श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते. त्या भारताच्या आद्य शिक्षिका आहेत. शिक्षणाची ही प्रेरणा सावित्रीबाईंना कुठून मिळाली हे पाहण्यासाठी आपणास थोडे मागे जावे लागेल.
इ.स. १८४० साली वयाच्या नवव्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह जोतीराव फुले यांच्याशी झाला. त्यावेळी जोतीराव अवघे तेरा वर्षांचे होते.जोतीरावांना लहानपणापासून मातेचे प्रेम मिळाले नाही. त्यांची मावस बहिण सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याकडे कामाला असल्यामुळे त्यांना इंग्रजी कळायचेही आणि बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग करून जोतीरावांना शिक्षणासाठी प्रेरित केले. जोतीरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना एका ख्रिश्चन मिशनऱ्याने लग्नापूर्वी दिलेले पुस्तक त्या लग्नानंतर सासरी घेऊन आल्या. त्यावरून जोतीरावांना एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वत: शिकून सावित्रीबाईंनाही शिकविले. सगुणाऊही सोबत होतीच.

एक मे १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. पुढे ही शाळा मध्येच बंद पडली. एक जानेवारी १८४८ रोजी भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाई यांनी मुलींची शाळा काढली. सगुणाऊंना त्या शाळेत बोलविण्यात आले. तत्कालीन ब्रिटीश भारतातील एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिली मुलींची शाळा ठरली. या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्याच्या इतर भागातही त्यांनी मुलींसाठी दोन तीन शाळा काढल्या.

सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला केवळ सहा मुली होत्या. १८४८ सालच्या अखेरपर्यंत ही संख्या ४०-४५ वर जाऊन पोचली. सावित्रीबाईंच्या या यशामुळे सनातनी उच्च वर्णीय चिडले.
“धर्म बुडाला, आता जग बुडणार” अशी हाकाटी त्यांनी सुरू केली. इतकेच नव्हे तर सावित्रीबाई शाळेकडे जात असतांना त्यांच्या अंगावर शेण फेकण्यास सुरुवात केली. काहींनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. त्यांना जोतीरावांची खंबीर साथ होती. अनेक संघर्ष करीत हा शिक्षण प्रसाराचा उपक्रम त्यांनी सुरूच ठेवला.

या दरम्यान एक गोष्ट सावित्रीबाईंच्या लक्षात आली. ती म्हणजे, ‘शिक्षणप्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रात काम करणे आणि स्त्रियांचा आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे’ हे त्यांनी ओळखले. बाला-जरठ विवाहामुळे अनेक मुली वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षीच विधवा होत. ब्राह्मण समाजात त्याकाळी विधवेला पुनर्विवाह करण्यास अनुमती नव्हती. पती निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा केशवपन करून त्यांना कुरूप बनविले जाई. कधी कधी अशा विधवा एखाद्या नराधमाच्या शिकार बनत आणि मग त्या आत्महत्या करीत किंवा भृणहत्या करीत.
या समस्येवरील उपाय म्हणून ज्योतीरावांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालविले.

या सर्व गोष्टींवरून आपल्याला सावित्रीबाई फुले यांच्या लौकिक कार्याची महती कळते. अशा या थोर विभूतीचे निधन 10 मार्च 1897 रोजी झाले. त्यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन.

उद्धव भयवाळ

— लेखन : उद्धव भयवाळ. छ. संभाजीनगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments