खरे सांगते मला आज तुमच्यासोबत बोलायचे आहे.
खरे सांगते, सावित्रीच्या लेकीनो, माझा तुम्ही आदर, मानसन्मान करता तर मन भरून येते. पण हे सर्व फक्त आज एक दिवसा पुरतेच तर नव्हे ना ?
स्वतः तुम्ही तुमची जपणूक, कर्तव्य, अस्तित्व, उचित प्रकारे जपत आहात ना ? स्त्रित्व याची जाणीवपूर्वक ओळख तुम्हांला पूर्णपणे आहे का ?
शिक्षणाने व्यक्ती सुशिक्षित होतात, पण सुसंस्कृत होत आहेत का ? घराघरातील स्त्री प्रथम शिकली तर तिचे कुटुंब शिकते, समाज सुधारतो, अन राष्ट्राचाही विकास होतो. तो त्यांच्या सर्वांच्या वागणुकीतून दिसतो. केवळ स्वातंत्र्य जपणे म्हणजे सुधारणा झाली का ? आपल्या जबाबदारी अन् कर्तव्य विसरून कसे चालेल ?
कित्येक कुटुंब अहंकाराच्या चढाओढ मध्ये कोलमडतात. घरातील वृद्ध मंडळीची काळजी, जोपासना हवी तशी केली जात नाही. म्हणून वृद्धाश्रम मधे त्यांना ठेवले जाते. पूर्वी होती का अशी वृद्धाश्रम ? अपत्याना योग्य संस्कार मिळत नाहीत. त्यांना ही तुमच्या कामाच्या वेळेत पाळणाघरात ठेवले जाते. तेथे त्यांचे योग्य पोषण जतन होते का ? कुठे तरी खंत मनाला लागून राहते.
आज शिक्षणाने सक्षम होऊन तुम्ही रोजगार मिळवत संसाराला हातभार लावत आहात. उच्चं पदासाठी शिक्षणाने, मोठं मोठीं पदे भूषवत आहात, याचा मला खरच अभिमान सार्थ वाटतो. माझा वसा तुम्ही पुढे चालवताना, नव्याने हाती घेऊन जीवन पद्धती बदलू या जबाबदारी सांभाळून, कर्तव्य पूर्ण करू या, माझे कुटुंब ही संकल्पना मोठीं करू या. सर्व नात्यांमध्ये आत्मीयतेने आपुलकी निर्माण करू या.
स्त्री ला कोणीही अबला म्हणू नये म्हणून तिला सबला करू या, 🤝
पुरुषप्रधान संस्कृती मधे, आपली ओळख ठळक पणे दाखवून देवू या. शिक्षणाचा खरा अर्थ जगास दाखवू या. सर्व द्वेष भावना सोडून, हेवेदावे दूर करून सुसंस्कारीत, सुशिक्षित होऊन, समंजसपणे एकमेकींना सन्मानाने वागवून समाजात सुधारणा झालेली दाखवू या. तेव्हा, मी घेतलेल्या त्या काळातील कष्टाचे अवहेलनेचे, सर्वांचे सार्थक झाल्यासारखे वाटेल.
माझ्या जयंती दिन निमित्त हा नवीन वसा घेऊन तुम्ही सर्वजणी, नवजीवनाची सुरुवात करू या. हिच ओळख नव्याने समाजात कायम ठेवू या. 👌
तुमचीच सावित्रीज्योती
अन् क्रांतीज्योती !!
धन्यवाद !!!

— लेखन : सौ मीना घोडविंदे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
