Friday, January 9, 2026
Homeयशकथानवं उद्योजक अक्षय जाधव

नवं उद्योजक अक्षय जाधव

प्रत्येक मराठी तरुणाला नोकरीच हवी असते, त्याला उद्योग, व्यवसाय करता येत नाही, असे सर्वसाधारण बोलले जाते. पण या बोलण्याला एक अपवाद आहे, तो म्हणजे अक्षय जाधव या उमद्या तरुणाचा. हा अक्षय मला पाच वर्षांपूर्वी रशियात भेटला होता आणि इतक्या दूर देशात येऊन, उद्योग व्यवसाय करण्याची त्याची हिंमत बघून मला त्याच वेळी वाटले की, एक दिवस हा अक्षय नक्की नाव काढेल आणि आज त्याने ते सिद्ध करून दाखवले आहे, याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो.

खरे तर, अक्षयच्या घरी उद्योग, व्यवसायाची काही परंपरा नाही. त्याचे वडील अशोक हे खाजगी नोकरी करीत. तर आई सौ विजया ही माझ्या पत्नीसमवेत महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) मध्ये नोकरीस होती. त्यामुळेच माझा जाधव परिवाराशी परिचय झाला आणि पुढे गायक असलेल्या अक्षय च्या वडिलांशी; अशोक जाधव यांच्याशी छान मैत्री झाली.

प्रारंभीच अक्षयच्या आई वडिलांचे कौतुक केले पाहिजे, ते यासाठी की, त्यांनी आपल्या इच्छा, महत्त्वाकांक्षा ना अक्षय वर लादल्या, ना त्यांच्या मुलीवर कृतिका वर लादल्या. कृतिका ऑस्ट्रेलियात येथे असते.
त्यांना त्यांचे निर्णय घेऊ दिले आणि आई वडील म्हणुन जिथे जिथे, मुलांना जी मदत करायला हवी होती, ती सर्व प्राणपणाला लावून केली. त्यामुळेच अक्षय च्या आजच्या यशात त्यांचा फार मोठा वाटा आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.

अक्षय, आई अमित, वडील अशोक जाधव, बहिण कृतिका

आज अक्षय जाधव हा एक प्रतिष्ठित उद्योजक आणि क्रिप्टोकरन्सी व वेब3 इकोसिस्टममधील मान्यताप्राप्त तज्ञ म्हणून जगभर ओळखला जातो. ब्लॉकचेन इनोव्हेशन आणि विकेंद्रीकरण वित्तीय क्षेत्रातील त्याच्या भरीव योगदानांमुळे त्याने ही ओळख मिळवली आहे. अक्षयचा व्यावसायिक प्रवास हा तांत्रिक कौशल्य, शिस्त, कार्यक्षमता आणि उच्चप्रभावी नेटवर्किंगचे एक यशस्वी प्रतीक म्हणून पाहिल्या जाते. आजच्या डिजिटल जगात नेतृत्त्व सिद्ध करण्यासाठी हे गुण फार महत्वाच आहेत.

क्रिप्टोकरन्सी क्षेत्रात अक्षयचा प्रवेश २०११ मध्ये झाला. त्यावेळी त्याने कुतूहलापोटी त्याचा पहिला बिटकॉइन खरेदी केला. हा त्याचा पहिला वहिला अनुभव त्याच्या करिअरची पायाभरणी ठरला. नंतर त्याचा हा पाया विस्तारत गेला आणि त्याने जागतिक स्तरावर वेब 3 विकास घडवून आणला. अंडरग्रॅज्युएट अभ्यासानंतर, अक्षयने दोन मास्टर डिग्री मिळवल्या.
एक कॅनडा मध्ये आणि दुसरी रशियामध्ये, ज्यामुळे त्याला एक मजबूत आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्टीकोन मिळाला.

रशियामध्ये असताना, त्याने यांडेक्स या जगातील सर्वात मोठ्या इंटरनेट आणि तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एका प्रमुख भूमिकेत काम केले. तिथे त्याने जटिल तंत्रज्ञान पायाभूत संरचना आणि ब्लॉकचेन इंटिग्रेशनबद्दल अधिक समजून घेतले. यामुळे त्याच्या तंत्रज्ञान आणि वेब 3 क्षेत्रातील साखळीला अधिक बळ मिळाले.

अक्षयने सुरुवातीच्या काळात आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक जर्नल्समध्ये संशोधन पर लेख लिहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींकडून प्रशंसा मिळवली. यामुळे ब्लॉकचेन आणि विकेंद्रीकरण तंत्रज्ञानामधील एक विश्वासार्ह नाव म्हणून त्याच्याकडे पाहिल्या जाऊ लागले. या योगदानांमुळे, तसेच सास, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ब्लॉकचेन स्टार्टअप्समधील व्यावसायिक अनुभवामुळे, तो क्रिप्टो इंडस्ट्रीमध्ये झपाट्याने प्रगती करू शकला.

अक्षयने जागतिक एक्सचेंजमध्ये कार्यकारी नेतृत्त्वाच्या भूमिकांमध्ये काम केले आहे. विशेषत: त्याने मोठ्या क्रिप्टो एक्सचेंजसाठी CIS प्रदेश प्रमुख म्हणून काम केले. त्यानंतर एका प्रमुख केंद्रीकृत एक्सचेंज (CEX) मध्ये दक्षिण-पूर्व आशिया प्रमुख म्हणून काम केले. या दोन्ही भूमिकांमध्ये, अक्षयने ऑपरेशनल वाढ, ट्रेडिंग व्हॉल्यूम सुधारणा आणि डेटा-आधारित बाजार धोरणांची अंमलबजावणी करून एक्सचेंजची प्रदेशीय उपस्थिती आणि प्रभाव वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

अक्षयच्या यशाचे एक प्रमुख गमक म्हणजे त्याचे संस्थात्मक गुंतवणूकदार, की ऑपिनियन लीडर्स (KOLs), ट्रेडर्स, आणि वेब 3 संस्थापकांच्या विस्तृत नेटवर्कची निर्मिती आणि देखरेख. हे नेटवर्क ब्लॉकचेन इकोसिस्टममधील विविध स्टार्टअप्सना मार्गदर्शन आणि सल्ला देण्यात महत्त्वपूर्ण ठरले आहे. यामुळे यशस्वी टोकन लिस्टिंग, स्केलिंग धोरणे आणि नव्या बाजारांमध्ये विस्तार कार्य सुलभ झाले .

“धोरणात्मक व्यवसाय सल्लागार” या भूमिकेबरोबरच अक्षय क्रिप्टो शिक्षणासाठी महत्वाचे योगदान देत आहे. त्याच्या “अक्षय क्रिप्टोदादा (ACD)” या शैक्षणिक उपक्रमाद्वारे तो बाजाराची गती, तांत्रिक विश्लेषण आणि ब्लॉकचेन फंडामेंटल्सवर मार्गदर्शन करतो. त्याचे हे मार्गदर्शन यूट्यूब, इंस्टाग्राम आणि इतर प्लॅटफॉर्मवर प्रसारीत होत असते. याचा फायदा मुख्यत्वे करून नवे गुंतवणूकदार आणि त्यांच्या बरोबरच अनुभवी व्यावसायिकांना देखील होत असतो.

आपल्या अनुभवांच्या आणि जागतिक नेटवर्किंगच्या आधारावर अक्षय आगामी काळात क्रिप्टोकरन्सी आणि वेब 3 तंत्रज्ञान अधिक पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचा हा दृष्टिकोन डिजिटल अर्थव्यवस्थेत संशोधन वाढविण्यासाठी, आर्थिक सक्षमीकरण होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल, यात काही शंकाच नाही.

आज जगात अक्षय केवळ स्वतःचे, आई वडिलांचेच नाही, तर आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करीत आहे, ही आपणा सर्वांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे. अक्षय ला भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️+91 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अभिनंदन अक्षय ! अक्षय तुझ्या श्रमाचे चीज झाले.
    आदरणीय भुजबळ सर आपण भारतीय तरुणाची ओळख आणि कौतुक,तुमच्या पोर्टल वर दिलीत, त्यामुळे मराठी माणसाची प्रसिद्धी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचेल. या गोष्टीचा आम्हास आपलाही खूप अभिमान वाटतो. तुम्हा उभयतांच्या कार्यास खरंच मनापासून दंडवत ! धन्यवाद !🙏

    सौ. वर्षा महेंद्र भाबल.
    जुईनगर नवीमुंबई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments