आपल्या बहारदार आणि नेत्रदीपक सादरीकरणाने रिदमिक जिम्नॅस्टिक्सच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी नवी मुंबईकरांची मने नुकतीच जिंकून घेतली. फिनिक्स जिम्नॅस्टिक्स अकॅडमीच्या स्कूल ऑफ बॅलेट, नवी मुंबईच्या शुभारंभाप्रसंगी नवी मुंबईत प्रथमच आलेल्या रिदमिक जिम्नॅस्टिक्सच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू संयुक्ता काळे, अस्मी बडदे, किमया कार्ले, रिया खिल्लारे, स्पृहा साहू आणि अन्वी नार्वेकर यांना गौरविण्यात आले. यावेळी एकूण १५ खेळाडूंनी आपले क्रीडा कौशल्य सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले.
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून भारत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या मुली, आपल्यातील अंगीभूत क्रिडा कौशल्याने अतिशय कमी वयात आणि वेळात देशाचे नाव उज्ज्वल करीत आहेत. श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या पूजा श्रीनिवास सुर्वे, तसेच कनिष्ठ आशिया चँपियनशिप टीम इंडियाच्या प्रशिक्षक मानसी सुर्वे-गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी लहानपणापासून प्रशिक्षण घेऊन त्यांनी आपली क्रीडा कौशल्याची छाप आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटवलेली आहे.
आतापर्यंत संयुक्ता काळे यांनी ९१ सुवर्ण पदकांसह एकूण १०५ पदकांची कमाई केली आहे, तर अस्मी बडदे यांनी ५० सुवर्ण पदकांसह एकूण ९१ पदके, किमया कार्ले यांनी ५० सुवर्ण पदकांसह एकूण ७५ पदके, रिया खिल्लारे यांनी १९ सुवर्ण पदकांसह एकूण ४६ पदके, स्पृहा साहू यांनी १५ सुवर्ण पदकांसह एकूण ३७ पदके, अन्वी नार्वेकर यांनी १५ सुवर्ण पदकांसह एकूण ३८ पदके प्राप्त केलेली आहेत. तर नावव्या नायर, साईज्ञा शिंदे, आर्या कदम, स्वरांगी नार्वेकर, अनन्या कोठारे-कलमकारा, अवनी कदम, देवश्री केंगार आणि ओवी सर्मोकदम या रिदमिक जिम्नॅस्टिक्सच्या नवोदित खेळाडूंनी अतिशय लयबद्ध व शिस्तबद्ध सांगीतिक सादरीकरण करून रसिकांची वाहवा मिळविली.
भारताच्या माजी आंतरराष्ट्रीय रिदमिक जिम्नॅस्टिक्स खेळाडू राहिलेल्या पूजा यांनी कॉमन वेल्थ गेम्स वर्ल्ड चॅम्पियनशिप इंटरनॅशनल स्पर्धांसह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच विविध राष्ट्रीय स्पर्धाही गाजविलेल्या आहेत. आज त्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये रिदमिक जिम्नॅस्टिक्स जज म्हणून कार्यरत आहेत. तसेच फिनिक्स जिम्नॅस्टिक्स अकॅडमीच्या त्या संस्थापक तथा संचालकही आहेत.
तसेच एक गुणवान आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या मानसी यांनी देखील ज्येष्ठ व कनिष्ठ आशियाई चँपियनशिपमध्ये थायलँड, मलेशिया येथे रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. खेलो इंडिया अंतर्गत स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या पटकावणाऱ्या मानसी यांनी विविध राष्ट्रीय व इस्टोनिया, फिलिपाईन्ससह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली किमया दाखविलेली आहे. मानसी आज आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व रिदमिक जिम्नॅस्टिक्स जज आणि जागतिक दर्जाच्या बॅलेट प्रशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
भविष्यात नवी मुंबईतूनही असे आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणाच्या उद्देशाने पूजा आणि मानसी यांनी नवी मुंबईत रिदमिक जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षण देण्याचे निश्चित केले आहे. याचमाध्यमातून फिनिक्स जिम्नॅस्टिक्स अकॅडमीच्या स्कूल ऑफ बॅलेट, नवी मुंबईचा शुभारंभ आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सुप्रसिद्ध नृत्यांगणा कथक विशारद राधिका फणसे यांच्या हस्ते सानपाडा सेक्टर १८ येथील भूमीराज कोस्टारिका येथे झाला. यावेळी नवी मुंबईतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील असे सुतोवाच फणसे यांनी केले.
कोविड-१९ नियमांन्वये आयोजित या कार्यक्रमास विविध प्रमुख पाहुण्यांसह नवी मुंबईकर क्रिडा रसिक उपस्थित होते. सूत्रसंचालन सलीमा कोठारे यांनी केले, तर पूजा सुर्वे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
अभिप्राय :
नवी मुंबईकरांनी केलेल्या गौरवाबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत, आमच्या क्रीडा कौशल्याला त्यांनी भरभरून प्रोत्साहन आणि शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद !
– रिया खिल्लारे, आंतरराष्ट्रीय रिदमिक जिम्नॅस्टिक्स खेळाडू
नवी मुंबईतील क्रिडा रसिकांनी आमचा गौरव करून आमच्यासारख्या अनेक खेळाडूंना शाबासकी दिली आहे. येत्या काळात नवी मुंबईतुन खेळाडू तयार व्हायला हवेत, आम्ही त्यासाठी प्रयत्न करू.
– अस्मी बडदे, आंतरराष्ट्रीय रिदमिक जिम्नॅस्टिक्स खेळाडू
या मुलींनी एका नव्या क्रीडा प्रकारचे दर्शन आम्हा नवी मुंबईकरांना घडविले, भविष्यात नवी मुंबईतून असे आंतरराष्ट्रीय खेळाडू घडल्यास आम्हाला त्याचा अभिमान वाटेल.
– साक्षी गावंडे, नवी मुंबईकर
केवळ टीव्हीवर स्पर्धेच्या माध्यमातून पाहता येणारा हा सोहळा आम्ही याची देही याची डोळा अनुभवता आला. मुलींच्या या मनमोहक सांगितिक सादरीकरणाने त्यांच्यातील कल्पकता, लवचिकता, चपळता, लयबद्धता अशा विविध कौशल्याचे दर्शन नवी मुंबईकरांना घडविल्याबद्दल त्यांचे आभार आणि शुभेच्छा !
– कृष्णदर्शन जाधव, नवी मुंबईकर.
आता ऑनलाईन स्कुलचा कंटाळा आला, स्कुल सुरू झाल्यास असे रिदमीक जिम्नॅस्ट, बॅलेटसारखे खेळ शिकायला आवडतील. या मुलींचे सादरीकरण मला खूप आवडले.
– स्पृहा आपटे, नवी मुंबईकर
– लेखन : टीम एनएसटी 9869484800.
अप्रतिम