“विकास खारगे”
महाराष्ट्राचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे यांचा, काल 17 मार्च रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे सरांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा करून दिलेला हा मनोद्य परिचय. खारगे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
विकास खारगे जेव्हा 1994 साली आयएएस झाले तेव्हा त्यांच्या निवडीबद्दलच्या बातम्या मी वर्तमानपत्रांमध्ये वाचल्या होत्या. सर्वसामान्य परिस्थितीतील या युवकाने आयएएस परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश संपादन केले. इतकेच नाही तर आतापर्यंत अतिशय लोकाभिमुख अशी वाटचाल करून प्रशासकीय सेवेत एक आदर्श निर्माण केला आहे
खारगे साहेबांचा आणि माझा परिचय होऊन पंचवीस सव्वीस वर्षे झाली. तेव्हा ते यवतमाळचे जिल्हाधिकारी होते. त्यांच्या एकंदरीत कारभारामुळे, नम्र आणि सर्वांशी आपुलकीने वागण्यामुळे त्यांच्याच हस्ते आमच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएस अकादमीच्या मिशन आयएएस या उपक्रमाचे उद्घाटन करणे संयुक्तिक ठरेल असे मला वाटत होते. त्यामुळे मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनीही सहज होकार दिला. त्यामुळे त्यांच्या हस्ते 12 मे 2000 रोजी अमरावती विद्यापीठाजवळ विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीच्या दंत महाविद्यालयात मिशन आयएएस या उपक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर ते जेव्हा माझ्या घरी आले, तेव्हा त्यांनी खाली जमिनीवर बसून जेवण केले. एक आय ए एस अधिकारी, त्यातही जिल्हाधिकारी जेव्हा एखाद्या अपरिचित घरी जमिनीवर बसून जेवण करतो तेव्हा तो अधिकारी सर्वसामान्य माणसाच्या मदतीला धावणारा असतो हे समीकरण ठरून गेले आहे आणि त्याला श्री विकास खारगे हे पात्र ठरले आहेत. तेव्हापासून आजतागायत आमचे ऋणानुबंध कायम राहिले आहेत. हा त्यांचा हातगुणच म्हटला पाहिजे की सुरुवातीपासूनच मिशन आयएएस सतत प्रगती पथावर राहिले आहे.
साहेबांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशासनामध्ये स्वतःची अमीट अशी छाप त्यांनी रुजविली आहे. सर्व सनदी अधिकाऱ्यांमध्ये व राजकीय नेत्यांमध्ये त्यांचे नाव आदराने, सन्मानाने घेतले जाते .”साधी राहणी आणि उच्च विचारसरणी” ही तत्व प्रणाली त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष उतरविली आहे .खरं म्हणजे हे कठीणच काम असते. पण ही तारेवरची कसरत ते यशस्वीरित्या करीत आहेत.
साहेबांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना केव्हाही एसएमएस करा, ते मला ताबडतोब उत्तर देतात. मग अगदी तो रात्री बारा वाजता अतिशय महत्त्वाच्या कामासाठी एसएमएस केलेला असला तरी. परवा साहेबांना मी एक छोटेसे काम सांगितले. काम खूपच लहान होते. पण ते साहेबच करू शकत होते. साहेबांनी ते काम केले आणि मला सांगितले माझ्या वडिलांचे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. त्याची पीडीएफ फाईल तुमच्याकडे पाठवीत आहे. त्यांच्या वडिलांचा 96 वा वाढदिवस नुकताच, त्यांच्या मूळ गावी म्हणजे; कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे साजरा झाला. साहेबांनी मला ते पुस्तक पाठवले. मी ते लगेच वाचून काढले. त्या पुस्तकाने प्रभावित होऊन मला त्यांच्या वडिलांना; श्री शंकरराव खारगे यांना भेटण्याची इच्छा निर्माण झाली. तसे यापूर्वी त्यांना मी भेटलो होतो. पण पुस्तक वाचून माझा आदर अजून वाढला म्हणुन मी त्यांना ताबडतोब भेटण्याचे ठरविले. त्याप्रमाणे परवा मी इचलकरंजीला साहेबांच्या घरी जाऊन आलो. साहेबांच्या वडिलांना भेटलो. 96 व्या वर्षी देखील ते बाहेर व्हरांड्यात पुस्तक वाचत बसले होते. मागे एकदा पासपोर्ट मॅन डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी माझा इचलकरंजी भागात कार्यक्रम ठेवला होता, त्यावेळी मी खारगे साहेबांकडे गेलो तर तेव्हा देखील त्यांचे वडील पुस्तकच वाचत होते.
एखाद्या अतिरिक्त मुख्य सचिवाचे घर किती साधे असू शकते याचे उदाहरण म्हणजे श्री विकास खारगे हे आहेत. मलाच नवल वाटले. साहेब इतके वरीष्ठ अधिकारी असूनही सर्वसामान्य माणसे जशी राहतात तसे त्यांच घर आहे. या घराला अजून तरी उच्च पदाचा अहंकारी स्पर्श झालेला नाही. हातमागासाठी लागणारे यंत्र तसेच त्यासाठी लागणारे रोल व इतर साहित्य घराच्या आजूबाजूला आहे. अगदी साधे शेतकऱ्याचे घर शोभावे असे त्यांचे घर मी टिपले. वडिलांचे 96 वय झाले तरी ते चालू, फिरू शकतात. ऐकू शकतात. फोन करू शकतात .स्वतःहून उठू शकतात. मोटरसायकल वर बसू शकतात. मला वाटते या कुटुंबाने आपल्या प्रारंभिक अवस्थेमध्ये जे संघर्षमय जीवन कंठले आहे, त्यामुळे त्यांच्या पाया मजबूत झाला आहे. तो आजही खंबीर आहे आणि राहणारही आहे.

मी इचलकरंजीला जाणार आहे हे साहेबांना कळविले होते. माझ्या स्वागतासाठी त्यांचे बंधू पनवेलवरून इचलकरंजीला आले आणि त्यांनी मला विनंती केली की सर अगोदर मला पोहचू द्या नंतर आपण या. मी सांगलीला आमचे सन्मित्र व सनदी अधिकारी श्री विशाल नरवाडे यांच्याकडे थांबलो होतो. त्यांनीच इचलकरंजीला माझी जाण्यायेण्याची व्यवस्था केली.
खारगेसाहेबांचे घर, वडील, भाऊ पाहून माझ्या मनात त्यांच्याविषयी असलेली आत्मीयता, जिव्हाळा, प्रेम गहिवरून आले. खरं आज अशी माणसं दुर्मिळ झालेली आहेत. पण ही माणसे मला इचलकरंजीला खारगे परिवाराच्या निमित्ताने प्राप्त झाली.
साहेब वेगवेगळ्या पदावर गेले. पण प्रत्येक वेळेस ते त्यांचे नंबर मला कळवीत गेले. अमरावतीला आले की ते आवर्जून मला फोन करीत असतात. आजच त्यांचा सकाळी फोन येऊन गेला. माझे जावई कर्नल सारंग व कन्या डॉ. प्राची ऑपरेशन सिंदूरनंतर राजस्थानवरून अमरावतीला माझ्याकडे आलेले. त्या गडबडीत मी तो फोन घ्यायला विसरलो. रात्री माझ्या लक्षात आले. मी लगेच साहेबांना फोन केला. अपर मुख्य सचिवांचा फोन बारा तास न उचलणे हेच मला बरेचसे टोचत होते. साहेबांशी बोलणे झाले. साहेबांनी कोणतीही तक्रार केली नाही. उलट माझ्या मुलीची व कर्नल जावयांची आस्थेने चौकशी केली. याला म्हणतात विनयशीलता.

खारगेसाहेबांचे एक अजून वैशिष्ट्य हे आहे की ते दरवर्षी गांधी जयंतीला आणि गांधी पुण्यतिथीला स्वतःसाठी खादीचे कपडे खरेदी करतात. आजकाल मोठमोठ्या ब्रँडेड कंपन्यांची वस्त्रे परिधान करण्याची फॅशन आली आहे. पण या फॅशनच्या शर्यतीत खारगेसाहेब कधीच नसतात. खादीच्या कपड्यामुळे त्यांना जे समाधान मिळते ते त्यांना ब्रँडेड कंपन्यांच्या वस्त्रांमध्ये नक्की मिळत नसणार !
साहेबांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते बासरी खूप छान वाजवितात. बासरीचे सुर हे नेहमी सौम्यच असतात. कधीही कर्कश होत नाहीत आणि त्यामुळेच की काय त्यांनी बासरी हे वाद्य निवडले असावे. त्यांना जेव्हा केव्हा सवड मिळते तेव्हा ते बासरी वाजवितात आणि सोशल मीडियावरही टाकतात.
मागे जेव्हा उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाली तेव्हा तिथल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने जर कोणाची निवड केली असेल तर ती विकास खारगे यांची. इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये ते उत्तराखंडला गेले. त्यांनी महाराष्ट्रीयन पर्यटकांची सुंदर व्यवस्था केली. त्या सर्वांना सुखरूप महाराष्ट्रात आणले त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांचा यथोचित गौरव केला.

साहेबांचा मुलगा मनीष आज सोशल मीडियावर खूप नावलौकिक मिळवित आहे. त्याचे व्हिडिओ जगभरात पोहोचले आहेत. सरांचे दोन्ही चिरंजीव मी सरांना जेव्हा त्यांच्या यवतमाळच्या बंगल्यात भेटलो तेव्हा खूपच लहान होते. आता तर 26 वर्षाचा कालखंड निघून गेला आहे. मी नियमितपणे सरांना, मुलांना वाढदिवसाचे पत्र पाठवितो.खारगेसाहेब म्हणतात; काठोळे तुम्ही एकमेव असे मित्र आहात की न चुकता मला शुभेच्छा देत असता
चांगल्या माणसांचे नेहमी गुणगान करायचे असते. त्यासाठी श्री विकास खारगे हे पात्र आहेत हे वेगळे सांगणे न लगे.सर्वसामान्य परिस्थितीतून आलेला हा माणूस आज महाराष्ट्राच्या अपर मुख्य सचिवपदापर्यंत पोहोचला आहे. त्यातच त्यांच्या यशाचे रहस्य दडलेले आहे. एवढ्या मोठ्या पदावर जाऊनही विनयशील बोलणे, वागणे, तत्परतेने काम करणे, रात्र असो वा दिवस, सर्वसामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणे हे ते अव्याहतपणे करीत असतात आणि करीत राहतील. अशा या विशाल हृदयाच्या माणसाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

— लेखन : प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे. अमरावती
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
