बेळगाव येथे अध्यापिका आणि प्राचार्या म्हणून कार्यभाग सांभाळलेल्या, ४ जानेवारी १९१४ रोजी जन्मलेल्या, कवयित्री इंदिरा संत यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने त्यांना वाहिलेली ही आदरांजली..
कवयित्री इंदिरा संत यांना, त्यांच्या स्वतंत्र शैलीने मराठी साहित्य सृष्टीत मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. कन्या, पत्नी आणि एक स्त्री अश्या भूमिका आणि त्या दृष्टीकोनातून झालेली काव्य निर्मिती हे त्यांचे वैशिष्टय आहे. त्यांचे पती कवी नारायण संत आणि त्यांचा एकत्र कविता संग्रह ‘सहवास’ ह्या नावाने प्रथम प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘शेला’, ‘मेंदी’, ‘मृगजळ’, ‘ रंगबावरी’, ‘ बाहुल्या’, ‘ मृण्मयी’, ‘ चित्कळा’, ‘गर्भरेशीम’, ‘मरवा’, ‘वंशकुसुम’, ‘निराकार’, असे काव्यसंग्रह, ‘कदली’, ‘चैतु’, ‘श्यामली’ हे कथा संग्रह, ‘मालनगाथा’, ‘मृद्गंध’, ‘फुलवेल’ हे ललित लेख संग्रह, ‘घुंगुरवाळा’ ही कादंबरी, ‘गवतफुला’, ‘अंगतपंगत’, ‘मामाचा बंगला’ हे बालसाहित्य असे त्यांचे प्रकाशित साहित्य आहे.
याशिवाय साहित्य अकादमी, महाराष्ट्र शासन, जनस्थान अश्या अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत.
निसर्ग हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. निसर्गातील घटकांच्या प्रतिमांद्वारे त्यांनी प्रेम, विरह, अपेक्षा, अपेक्षा भंग अश्या मानवी भावनांना व्यक्त केले आहे. कवितेच्या जन्माचा एक प्रवास असतो ! जन्मापासून मरणापर्यंत जो एक प्रवास असतो त्याच प्रवासात आलेल्या अनुभवांतून त्या प्रसवतात.
आयुष्याच्या सारीपाटावर साऱ्यांचीच दाने पडलेली,
नियतीच्या खेळांची कथा प्रत्येकाच्या साक्षीने घडलेली.
अश्या आरस्पानी अनुभवांचा रंगत जातो डाव,
‘कसं कसं व्यक्त होवू ?’ दाटू लागतो भाव.
प्रतिभावान मनात मग एक होतो चमत्कार,
सुचत जातात शब्द तसा घडत जातो आविष्कार.
ओल्या चिंब भावनेची एक सजून येते सविता,
मृदुल हृदय मातीत एक रुजून येते कविता !
माझ्यातून जन्माला येणारी, माझेच रूप दाखवणारी, माझ्या आवेगांचा निचरा करणारी, माझे गूज असणारी, पुन्हा माझ्यातच झिरपणारी आणि तरीही ‘मी’ चा लवलेश नसणारी, ती खरी कविता आणि अशी कविता म्हणजे ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांची कविता !
सृष्टी कर्त्याने ‘स्त्री’ निर्मिली. प्रत्येकीचं भावविश्व निराळं. त्यांची सुखं-दुःखं निराळी, त्या सुखं-दुःखाचं व्यक्त-अव्यक्त असणं निराळं. ह्या अभिव्यक्तीस लौकिकार्थाने मिळणारे मान-अपमान निराळे. प्रत्येकीचे स्थान निराळे. मात्र प्रत्येक स्त्रीचं एक असं विश्व असतं जे तिच्या आत असतं. त्याची ओळख अनेकदा तिच्या अगदी जवळच्या म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तींना देखील नसते. ह्या अश्या विश्वाचं परमेश्वरी प्रतिभेने शब्दांत झालेलं गोड, गोजिरवाणं दर्शन म्हणजे ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांची कविता !
‘किती दिवस मी‘ नावाची त्यांची, माझी एक अतिशय लाडकी कविता आहे. कधी कधी संवेदनशीलता, जाणीवा बधिर झाल्या तर आयुष्य सुखी होईल असं वाटतं प्रत्येकालाच. निदान त्या निबरतेने तरी ही तडफड कमी होईल आणि ती निबरता जणू एखादं वरदान ठरेल असंही वाटणं प्रत्येकाचं. त्यावर इंदिरा संत लिहितात…
किती दिवस मी मानित होतें
या दगडापरी व्हावे जीवन;
पडो उन वा पाउस त्यावर
थिजलेले अवघे संवेदन…
खिळवून ज्याच्या वरती डोळे
मनात यावे असले काही
तोच एकदा हसुन म्हणाला-
दगडालाही चुकले नाही.
चुकले नाही… चढते त्यावर
शेवाळाचे जुलमी गोंदण;
चुकले नाही .. केविलवाणें
दगडफुलाचे त्यास प्रसाधन…
थिजलेल्याचे असले कांही
त्याहुन वाटे, हवे तुझे मन
सळसळणारे अन जळणारे
पशापशाने जाया भडकून
काहीवेळा सामाजिक, सांस्कृतिक जाणीवा, बंधनं किंवा कर्तव्यांतून काही कविता जन्म घेतात. त्या भानावर आणणाऱ्या कविता असतात. परंतु भान हरपून केवळ व्यक्त होण्यासाठी केलेली कविता म्हणजे इंदिरा संत यांची कविता !
‘पिंडी ते ब्रह्मांडी’ हा न्याय केवळ शास्त्रालाच लागू होतो असं नाही. भावावेगांचे प्रत्येक रूप निसर्गात दिसू शकते. निसर्गातील प्रत्येक घटक मनाच्याच निरनिराळ्या रूपांचं प्रतिबिंब आहे. निसर्ग हा केवळ मनीचे सगळे जाणणारा एक जवळचा मित्र नाही तर तो त्या मित्रात लपलेला एक चित्रकारही आहे. माझ्या मनाचे प्रत्येक रूप क्षणात ओळखणारा आणि ते स्वतःवर रेखाटून मलाच दाखवणारा. ह्या साऱ्याचा प्रत्यय म्हणजे कवयित्री इंदिरा संत यांची कविता !
स्त्री मन म्हणजे भावनांचा कल्लोळ. त्यात एकाकी स्त्री मन म्हणजे त्या कल्लोळाचं वादळात झालेलं रूपांतर. ह्या अश्या वादळाचे पडसाद त्यांच्या कवितांमध्ये दिसतात. मात्र हे त्यांच्या कवितांमध्ये उठणारे वादळ आपले मन उध्वस्त न करता आपल्या मनातील रूक्ष, जीर्ण पाला पाचोळा, धूळ घेवून उडतं आणि मग सुरू होतात पर्जन्य सरी. कधी दुःखाच्या, कधी सुखाच्या. कधी उदासी, कधी उमेद. कधी नैराश्याच्या, कधी नव निर्मितीच्या. अश्या सरींना इंदिरा संत सांगतात…
नको नको रे पावसा
असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली
त्या पुढे म्हणतात…
किती सोसले मी तुझे
माझे एवढे ऐक ना
वाटेवरी माझा सखा
त्याला माघारी आण ना
हे वाचून आपल्याही अश्रू सरी कोसळू लागतात. आयुष्याने दिलेले भयाण एकाकीपण असे कवितांमधून गुणगुणायचे आणि त्या एकाकीपणाच्या भेसूर चेहऱ्यावर असे गोड शब्दांचे साज सजवून त्यात आपलेच रूप पहायचे याला केवढे धैर्य लागत असेल. स्वतःची दुःखानुभूती अशी आत्ममग्न कवितेतून झिरपू द्यायची आणि त्याचा ओलावा प्रत्येकाच्या डोळ्यांस आणि मनास द्यायचा…कुठून लाभते ही अशी प्रतिभा ?
मी भरतमुनी कृत नाट्यशास्त्राचा थोडा फार अभ्यास केलेला आहे. त्यात अष्ट नायिका वर्णिलेल्या आहेत. ह्या नायिकांची त्यांच्या वयानुसार, परिस्थितीनुसार आणि जीवनानुभवानुसार मानसिक स्थिती असते. त्यासदृश नव्या प्रेमिकेची असणारी उत्कटता, असंयमीपणा, सर्वस्वार्पणभाव, प्रौढावस्थेतील प्रगल्भता, आणि कधी कधी प्रियकराच्या क्षणिक किंवा शाश्वत विरह वेदनेने आलेली व्याकुळता, तळमळ, तगमग ह्या साऱ्या अवस्था, स्त्री मनाची ही सारी रूपे अतिशय तरल शब्दांत इंदिरा संत यांच्या काव्यात व्यक्त होताना दिसतात.
ही कविता कोणतीही दाने देण्याचा प्रयत्न करत नाही. हिची भाषा फार अलंकृत नाही. ह्यात समाज प्रबोधन, जन जागृती, सौंदर्य निर्मिती असा कोणताही जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न नाही, उद्देश नाही. एका अतिशय संवेदनशील, भावविभोर स्त्री मनाने निसर्गाशी केलेले हे गूज आहे. मनाच्या कथा, मनाच्या व्यथा…केवळ मनाला सांगायच्या…त्या जनाला सांगण्याचा जराही प्रयत्न नाही. परंतु तरीही ते इतके सात्विक आहे की, वैयक्तिकतेच्या संकुचित मर्यादा ओलांडून कधी वैश्विक होवून जाते हे कळत देखील नाही. स्त्रीमनीचं बीज त्रिभुवनीचं तेज होतं आणि मग ही अशी कविता जन्मते…
पुस्तकातली खूण कराया
दिले एकदा पीस पांढरे
पिसाहुनी सुकुमार कांहीसे
देतां घेतां त्यांत थरारे
मेजावरचे वजन छानसें
म्हणून दिला नाजूक शिंपला
देतां घेतां उमटे कांही
मिना तयाचा त्यावर जडला
असेच काही द्यावे…घ्यावे…
दिला एकदा ताजा मरवा;
देतां घेतां त्यांत मिसळला
गंध मनांतिल त्याहुन हिरवा.
ह्या अश्या कवितेवर प्रतिक-प्रतिमांची फार जबाबदारी नाही, सालंकृत भाषेचे ओझे नाही. तिला काही सिद्ध करायचे नाही, काही साध्य करायचे नाही. म्हणूनच अशी कविता माझं आराध्य आहे. माझी असणारी, माझी रहाणारी. त्यातील व्यक्त होणे माझे. त्याचा गंध कुणाला आवडेल, कुणाला नाही, हरकत नाही परंतु त्याची जाणीव, त्याची जबाबदारी, त्याचे ओझे माझ्या कवितेवर नसावं.
‘अश्या भलत्या वेळी‘ नावाची त्यांची कविता, वाचताना अंगावर काटे आणणारी. त्यावेळची कवयित्रीच्या मनाची व्याकुळता, तळमळ, हातून काहीतरी निसटून चालल्याचं, काहीतरी हरवेल याचं भय… सगळ्याचा अनुभव करून देणारी
अशा भलत्या वेळीं
कोण कुठें निघाले आहे?
काळोखाच्या तुफान घोड्यावर
इतके चाबूक
कोण ओढतें आहे?
केव्हढया मोठ्यानें गाजत आहेत…
घड्याळाच्या डांबरी रस्त्यावरुन
एक टांगा
सारखा फिरतो आहे;
सारखा फिरतो आहे
कोण कूठें निघालें आहे ?
‘मती कुंठित होणे’ हा वाक्प्रचार म्हणून शिकणं आणि त्याची आपली अनुभूती अशी शब्दांत व्यक्त करून वाचकालाही त्या अवस्थेचा परिचय देणं ह्यात केवढा मोठा फरक आहे हे मला इंदिरा संतांच्या कविता वाचताना समजलं.
माझी त्यांची अजून एक खूप लाडकी कविता म्हणजे ‘चंद्रकळा‘
पुरवाया वेडी हौस
साडी घेतली विणून
उभें- आडवें जिच्यांत
काळया रात्रीचे रेशीम;
मधें नाजूक कशीदा
स्वप्नपांढऱ्या जुईचा,
किनारीचा नवा ढंग
चित्रामंगळस्वातीचा;
पुरवाया वेडी हौस
साडी घेतली विणून;
– तुला सामोरें येताना
घडी मोडावी म्हणून.
ही कविता एका प्रमिकेची म्हणून अतिशय तरल, उत्कट, स्वप्नाळू परंतु ह्याच कवितेस इंदिराजींच्या उत्तर काव्य प्रवासातील विरह वेदनेचा संदर्भाने वाचण्याचा प्रयत्न केला तर तर ती कविता हे विश्व सोडून एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेली असते. इंदिरा संत यांच्या कवितांचा अभ्यास करण्यापेक्षा त्यांना शरण जायचं आणि त्या केवळ अनुभवायच्या.
इंदिरा जी, आपण आमच्यातून देहरूपाने १३ जुलै २००० रोजी निघून गेलात पण आपण काव्यरुपाने अजरामर आहात.
आपल्या प्रतिभेस कोणत्याही शब्दांत परिपूर्णपणे व्यक्त करण्याची माझी ताकद नाही. आपल्याला माझा प्रणाम 🙏🏻
मी निसर्गाशी केलेले हे गूज, ‘सांगा मला ‘ म्हणून निसर्गास केलेली ही विनंती, आपले चरणी अर्पण.
सांगा मला
सांगा मला, हे कळ्या फुलांनो,
जरा तुम्हीही वण वाऱ्यांनो,
वर्ता खरे नदी, झऱ्यांनो,
सांगा बरे, डोंगर, खोऱ्यांनो,
चिवचिव करा, हे पाखरांनो.
कवितेस माझ्या मी ‘ माझी ‘ म्हणते
परि नाद त्यात तुमचे गुणगुणते
नवलाई, हिरवेपण तुमचे
करुणाई, बरवेपण तुमचे
अंकुरण ही पर्जन्याचे
स्फुरण ही चैतन्याचे
शब्द, स्पर्श मज तुम्ही शिकवले,
रूप, रंग मज तुम्ही दाखवले.
रूप माझे मी शब्दात पहाते
श्वास लिहिते; त्यात वहाते
एक एक श्वास मज सृष्टी देते
ते श्वास उमगण्या दृष्टीही देते.
सारे हे; जे तुमचे आहे,
धमन्यांत माझ्या अखंड वाहे.
जाणीव तुमची, नेणीव तुमची
संवेदन, कर्तेपण तुमचे
प्रेरण, उत्स्फूरण,’दिसणे’ पण तुमचे
अपुले माझे ‘असणे’ पण तुमचे
कवितेत ‘मी ‘ असते का?
तुम्हांस तरी मी दिसते का?
मग, म्हणू कशी मी कवितेस ‘माझी’?
कळवा मजला तुमची मर्जी.
– लेखन : डॉ. गौरी जोशी- कंसारा, न्यू जर्सी, अमेरिका.
– संपादन : देवेंद्र भुजबळ +91 9869484800.