नमस्कार 🙏
“ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिकांचं मन:पूर्वक स्वागत. 🙏
आजचं गाणं आहे माणिक वर्मा यांच्या गोड आवाजातलं.
गाण्याचे शब्द आहेत
“मुरलीधर चित्तचकोरा, जाशी कुठे नवनीत चोरा”
सर्व गोपिकांच्या खोड्या काढणारा, त्यांची वस्त्रं पळवणारा आणि त्यांच्या घटातलं दही, दूध, लोणी चोरणारा आणि या खट्याळपणा मुळेच गोपींचं ह्रदय चोरणारा लबाड श्रीकृष्ण आज कसा कोण जाणे गोपींच्या तावडीत सापडला. त्यामुळेच “जाशी कुठे नवनीत चोरा” असं त्या श्रीकृष्णाला विचारतायत.
आज तुझी ना होईल सुटका
फोडूनी बघ तू गोडच मटका
रोज रोज आमचं लोणी चोरून खायला तू आणि तुझा मित्र पेंद्या दोघेही चांगलेच चटावले आहात. आज मात्र तू आमच्या तावडीत सापडला आहेस. आता तुझी सहजासहजी सुटका होणार नाही. तेंव्हा लोणी पळवायचा किंवा आमचा मटका फोडायचा चूकून सुद्धा प्रयत्न करू नकोस. “किती करशील शिरजोरी असता तुझ्याभोवती घेरा” कारण आज तू चांगलाच गवळणींच्या तावडीत सापडला आहेस तेंव्हा उगीच चोरावर मोर बनण्याचा प्रयत्न करू नकोस.
असेल राधा गवळण भोळी
करू नको अमुच्याशी खोडी
तुझी राधा गवळण भोळी आहे कारण ती तुझ्या गोड गोड बोलण्यावर भाळते आणि तू मात्र साळसूदपणे चेहे-यावर भोळे भाव आणून तिच्या घटातलं लोणी पळवतोस. पण बच्चमजी आज गाठ आमच्याशी आहे. आमच्याकडे तुझी डाळ शिजणार नाही.
“सांगताच येईल यशोदा हाती घेऊनी झारा रे” आत्ता यशोदामातेकडे आम्ही सगळ्या गवळणी तुझी तक्रार घेऊन गेलो ना कि बघ तुझ्या हाताला तापलेल्या झा-याचा डाग देईल ती, म्हणजे पुन्हा तू कधी आमचं लोणी चोरून खाणार नाहीस.
ऐक सांगते अता शेवटी
मंजूळ पावा धरूनी ओठी
आम्ही जर यशोदामातेकडे तुझी तक्रार घेऊन जाऊ नये असं तुला वाटत असेल आणि आमच्या वेढ्यातून तुझी सहीसलामत सुटका करून घ्यायची असेल तर रोज न सांगता राधेसाठी वाजणारी तुझी मंजुळ बासरी आज आमच्यासाठी वाजव. “घुमवशील तेंव्हाच तुला रे सोडू नंदकुमारा” ही आमची अट मान्य करून जर बासरीवातनाचा टॅक्स भरला तर मात्र तुझी या गराड्यातून आम्ही नक्की म्हणजे अगदी नक्की सुटका करू हा आम्हा गवळणींचा शब्द आहे.
माणिक वर्मा यांच्या गोड आवाजातलं हे गाणं, आहे अण्णा जोशी यांचं
आणि संगीतबद्ध केलं आहे नीळकंठ अभ्यंकर यांनी. मला वाटतं माणिक वर्मा यांच्या आवाजातलं हे गोड गाणं ऐकायला खरोखरच तो मुरलीधर आला तर तो ही पावा वाजवायचं विसरून जाईल.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.

सुरेख परिक्षण…. अभिनंदन
गाणं तर गोड आहेच परंतू विकास भावे यांनी केलेले रसग्रहण मनाला भावते. खूपच छान.
विकास रसग्रहण फार छान केले आहेस ! अभिनंदन !
धन्यवाद 🙏
अप्रतिम
माणिक वर्मा यांच्या गोड आवाजातले गाणं मनाला भावून जाते. पण लेखकाचे रसग्रहण तर अति सुंदर.
अभिनंदन.
उत्तम रसग्रहण
माझं एक आवडतं गाणं. माणिक वर्मा यांच्या गोड गळ्यातून उतरलेले. कवी व संगीतकार यांची नावे आपल्या प्रशिक्षणामुळे कळली. सुरेख परिक्षण. अभिनंदन.
धन्यवाद 🙏