Wednesday, December 3, 2025
Homeसाहित्यरमाई आंबेडकर : समर्पणाची सुरेख कहाणी

रमाई आंबेडकर : समर्पणाची सुरेख कहाणी

रमाई’ म्हणजे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सावली. बाबासाहेबांच्या कार्य कर्तुत्वाचा जेथे कोठे संदर्भ येतो तेथे रमाईचे स्थान अढळ असते. अनेक विख्यात साहित्यीक, कवी, गीतकार, गायक यांच्या कलाकृतीतून आणि चित्रपट व दुरचित्रवाणी मालिकातून रमाईचे जीवन करोडो लोकांच्या मनात रुजलेले आहे. त्यात अनमोल सहभाग देत ‘अशोक केरू गोरे’ यांनी ‘रमाई आंबेडकर’ यांचा चरित्रपट पुन्हा एकदा वाचकांसमोर उलगडला आहे.

हे छोटेखानी चरित्र म्हणजे ‘युग पुरुषाला रमाईनी दिलेल्या साथ संगीताचा लेखाजोगाच’ या शब्दात लेखक, अनुवादक व समीक्षक अरविंद सुरवाडे यांनी नोंद केली आहे.

पुस्तकाचे लेखक श्री अशोक गोरे

सुशील, स्वाभिमानी, विनम्र, कर्तव्य दक्ष, धैर्यशील रमाईची जीवन कहाणी, गोष्ट सांगावी इतक्या सहज शैलीत लेखकाने मांडली आहे.

पुस्तकाचे अंतरंग समाज बदलून टाकणाऱ्या वादळाची संगत करणाऱ्या, बाबासाहेबांच्या शब्दात त्यांच्या प्रिय रामूचे हे चरित्र निसर्ग संपन्न कोकणातील दाभोळ बंदराजवळ असलेल्या वणंद गावापासून सुरु होते. रुख्मिणी व भिकू वणंदकर यांच्या घरी जन्मलेली रमाई सहा वर्षाची असतानांच पोरकी होते. मामा गोविंदपूरकर आणि चुलता धुत्रे वणंदकर रमाई सह तिच्या भावंडाना घेऊन मुंबईत येतात.

लेखकाने केवळ घटनांची जंत्री न देता खूप सुरेख व कथारूपाने हे सर्व मांडले आहे. त्याला एकोणीसाव्या शतकापासून झालेल्या विविध सामाजिक व वैचारिक स्थितंतराचा पूरक मागोवा घेतला आहे.

दरम्यान सुभेदार रामजी सकपाळ मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त होऊन भिवाला घेऊन सातारा येथे शिक्षणासाठी येतात. तेथेच वयाच्या सहाव्या वर्षीच भिमाईचे निधन झाल्याने भिवाच्या वाट्याला अकाली पोरकेपण येते. पुढे शिक्षणाबाबत दक्ष असलेले सुभेदार मुंबईत येतात.

त्या काळानुसार रमाई आणि बाबासाहेबांचे लग्न जुळते. वर्ष : १९०७. ठिकाण भायखळा भाजी मार्केट. लग्नाच्या वेळी रामीचे वय नऊ वर्ष तर भिवाचे वय सतरा वर्षे. हे सर्व वर्णन पुस्तकातून मुळातच वाचलं पाहिजे. सुभेदार यांचे देखील खूप छान चित्रण लेखकाने केले आहे. लष्करी शिस्त व शिक्षण याबाबत कडक व दक्ष. याबरोबरच प्रेमळ व गोड स्वभावाचे. भिमरावाचे ग्रंथ वाचन, मँट्रीक पास होणे, केळुस्कर गुरुजी आणि राव बहादूर सी.के.बोले यांनी केलेले अभिनंदन आणि त्या कौतुक सोहळ्यात मोहरलेली व बहरलेली रमा, लेखकाने खूप सुंदर शब्दात रंगविली आहे.

पुढे बाबासाहेबांचे उच्च शिक्षण, सयाजीराव गायकवाड यांची भेट व शिष्यवृत्ती, परदेशी शिक्षण तेथून त्यांनी आपल्या पत्नीला लिहिलेली पत्रे, या दरम्यान रमाबाईला सोसावे लागणारे आर्थिक चटके हा प्रवास म्हणजे त्याग, संयम, श्रम, एकाग्रता आणि समर्पणाचा प्रेरक इतिहास आहे.

हा जीवन प्रवास विविध घटना, प्रसंग आणि सुख दु:खासह शेवटी राजगृहात संपतो. २७ मे १९३५ या दिनी रमाईने शेवटचा श्वास घेतला. वय अवघे ३७ वर्षे. वादळाची साथ संगत सोबत करणारी रमाई बाबासाहेबाना सोडून जाते, बाबासाहेबांनी आपला ‘थाँटस ऑन पाकिस्तान’ हा ग्रंथ आपली प्रिय पत्नी रामूला अर्पण केला आहे.

शैलीदार व सुरेख साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत गेले पाहिजे. त्यासाठी त्या साहित्य कृतीची समीक्षा आवश्यक असते. मात्र पुस्तक परीचय आणि पुस्तक समीक्षा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. परिचयातून पुस्तकाची तोंड ओळख होते. तर समिक्षाणातून लेखनाचा उद्देश, प्रेरणा, विषय, आशय, शैली, भाषा आणि साहित्यिक अनुषंगाने मुल्यांकन अधोरेखित होते. नवीन माहिती समोर येते. लेखकाने त्यासाठी शोधलेले विविध संदर्भ, भेटी गाठी, चर्चा, पुस्तके, चित्रपट आदी ठळक होतात. समीक्षण केल्याने त्यांची उकल होऊन ते पुस्तक चर्चेला येऊन अधिकाधिक लोकांपर्यंत जाते.

रमाई पुस्तक हे जीवन चरित्र आहे. कोणत्याही लेखनाची तीन उद्दिष्टे असतात, माहिती देणे, शोध घेणे व मनोरंजन. लेखकाने हे पुस्तक लिहिण्यामागील प्रेरणा व उद्देश स्पष्ट केला आहे. लहानपणापासून लेखनाची आवड आणि रमाईच्या जीवन प्रवासावर एक कादंबरी लिहिण्याची योजना लेखकाने मनोगतात व्यक्त केली आहे.

लेखक रमाईचे जन्मगाव वणंद येथे मित्रांसमवेत भेट देतो. तेथे रमाईचे गुणगान करणाऱ्या काही महिला त्यांना भेटतात. त्यातून स्फूर्ती घेत लेखक आपला संकल्प पूर्ण करतो. लेखकाने अनेक संदर्भ दिले आहेत. वाचन, अभ्यास आणि हाडाचे शिक्षक असल्याने शिकविण्याची हातोटी आहे. त्यामुळे कथा शैलीत मुलांना गोष्ट सांगावी असे त्यांनी हे चरित्र सांगितले आहे. सामान्य वाचकाला समजेल व आवडेल असे हे लेखन आहे. छोट्या छोट्या प्रसंगातून त्यांनी ते फुलविले आहे. अनेक प्रसंग चित्रित केले आहेत. त्यामुळे हातात घेतलेले पुस्तक वाचूनच पूर्ण होते. कुठेही वाद्ग्रस्त, टिप्पणी किंवा आपली मते लादण्याचा प्रयत्न पुस्तकात नाही.

चरित्र लेखनात तटस्थता किंवा वस्तुस्थितीला महत्व असते. आदर, अस्मिता आणि भावनिकता मुद्द्यामुळे त्याबाबत काळजी घेतली जाते. या सर्व कसोटीवर उतरत लेखकाने वाचकांच्या अपेक्षा वाढविल्या आहेत.

रमाईचे आकर्षक रेखाचित्र असलेले मुखपृष्ठ, पुस्तकाची सुरेख मांडणी आणि छपाई, आशय गर्भ ब्लर्ब, ठसा प्रकाशनचे पाठबळ ही या पुस्तकाची वैशिष्ठे आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला एक संदेश आणि बाबासाहेबांनी रमाईला लिहिलेली पत्रे हे या पुस्तकाचे एक वैशिष्ट आहे. पुस्तकात एकूण वीस प्रकरणे आहेत. मात्र दोन भागात प्रकरणाची विभागणी अनाकलनीय आहे. शुध्दलेखनात काळजी घेण्याची गरज होती. या काही बाबी सोडल्या तर या पुस्तकाने लेखकाविषयी अपेक्षा वाढविल्या आहेत.

– लेखन : डॉ. त्र्यंबक दुनबळे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments