महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी मुंबईत झाला. मराठी माणूस, शेतकरी, कष्टकरी जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या उध्दवजींना त्यांचे वडील शिवसेनेचे संस्थापक, शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे, आई स्व.मीनाताई आणि आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा समृद्ध वारसा लाभला आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पायाभरणी केलेल्या आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाची धुरा उध्दव यांनी मुख्य संपादक म्हणून सांभाळली आहे.
उद्धव ठाकरे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे स्नातक असून त्यांच्या छायाचित्रांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. व्यावसायिक छायाचित्रकार असलेल्या ठाकरे यांच्या कलाकृतींची दखल वेळोवेळी घेतल्या गेली आहे. त्यांच्यातील जागतिक दर्जाच्या छायाचित्रकाराचे दर्शन त्यांच्या विविध छायाचित्र प्रदर्शनांच्या माध्यमातून रसिकांना घडले आहे.
श्री उद्धव ठाकरे यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात विद्यार्थी दशेपासूनच झाली. शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रिय असलेल्या उध्वजींकडे २००२ च्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली. या महापालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन करीत त्यांनी ती यशस्वीरित्या पूर्ण केली. या निवडणुकीने त्यांच्यातील राजकीय नेतृत्व गुण संपूर्ण राज्याने अनुभवले. २००३ मध्ये पक्षाने त्यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना २००४ साली आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले.
उद्धव ठाकरे यांचा विवाह सौ. रश्मी यांच्याशी झाला असून त्यांना आदित्य आणि तेजस अशी दोन मुले आहेत. आदित्य ठाकरे आजोबा आणि वडिलांचा राजकारणाचा वसा पुढे चालवित आहेत. ते सध्या युवा सेनाप्रमुख असून २०१९ च्या निवडणुकीत ते वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले असून विद्यमान मंत्रिमंडळात ते पर्यावरण,पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री आहेत.
महाराष्ट्राच्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा अलौकिक सौंदर्याचे मूर्तीमंत आणि विहंगम छायाचित्रण उध्दवजींच्या ‘महाराष्ट्र देशा’ या २०१० ला प्रकाशित झालेल्या छायाचित्र पुस्तकातून दिसून येते. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिकतेचा मानबिंदू असलेल्या ‘पंढरपूर वारी’चे आणि ग्रामीण महाराष्ट्राचे यथार्थ छायाचित्रण असलेल्या त्यांच्या ‘पहावा विठ्ठल’ या २०११ मधील पुस्तकाने देशालाच नव्हे तर जगाला भूरळ घातली. आपल्या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी दुष्काळी भागातील शेतकरी आणि वन्यजीव संरक्षणासाठी निधी उभारून मदत केली आहे.
शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिवसेनेला अधिक सर्वसमावेशक करतानाच त्यांनी शिवसेनेला आधुनकतेशी जोडले. युवक, कामगार आणि शेतकरी यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी राज्यभर चालविलेल्या विविध आंदोलनांना यश आले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणाने कार्य करणाऱ्या शिवसेनेच्या समाजकारणाची दखल गिनीज बुकने घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमधील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने अनेक रूग्णालये निर्माण करण्यात आली आहेत. विविध रक्तदान महाशिबिरांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण समाजकार्याची त्यांनी पायाभरणी केली. महाराष्ट्रात पक्ष विस्तार केल्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश संपादन केले आहे. आता तर शिवसेनेचे सरकार स्थापन झाले आहे. शिवसेनेने राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भरघोस यश मिळविले आहे.
श्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कल्याणावर लक्ष केंद्रीत करीत आपल्या पक्षाचा विस्तार वाढविला आणि आता राज्यानेही त्यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. श्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणले आणि पक्षाला आजचे सुसंघटित रुप दिले. कोरोनामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत ही महाराष्ट्राला विविध आघाड्यांवर पुढे घेऊन जाणारे नेतृत्व त्यांच्या रूपाने लाभले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
-संजीव वेलणकर, पुणे.९४२२३०१७३३