आषाढाच्या प्रथम दिवसे महाकवी कालिदास यांची जयंती साजरी केली जाते. या निमित्ताने महाकवी कालिदास प्रतिष्ठानच्या मुंबई, ठाणे जिल्ह्याचे उपप्रमुख योगेश जोशी यांनी एक काव्य मैफिल आयोजित करून साहित्य रसिकांना आनंद मिळवून दिला.
‘महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे ४१’ या मुख्य संस्थेने आपल्या ठाणे, पुणे, मुंबई ह्या शाखांच्या संयुक्त विद्यमाने महाकवी कालिदासदिन रविवार दिनांक ११ जुलैला, सायंकाळी ४ वाजता साजरा करण्याचे ठरविले होते. त्यानुसार हे काव्य संमेलन योगेश जोशी यांनी संपन्न केले.
दिव्यास वंदन करून या कालिदास संमेलनाला प्रारंभ झाला. त्यानंतर महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. विलास सातपुते यांनी संस्थेविषयी आपले बहुमूल्य विचार व्यक्त केले. या
प्रास्ताविकानंतर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष महेंद्र ठाकूरदास यांनी आपल्या मनोगतातून प्रतिष्ठानच्या उद्देशाची माहिती दिली. संस्थेचे कार्याध्यक्ष काकासाहेब चव्हाण यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
या ऑनलाइन काव्य संमेलनातील ४५ कवी कवयित्री दिलखुलासपणे निसर्गाच्या आणि प्रेम भावनांवर उत्कृष्ट कवितांचे सादरीकरण केले. देशातील विविध प्रांतातून हे कवी सहभागी झाले होते.
या मैफिलित “जन्म सखा” नावाची कविता पुण्यातील कवयित्री राधिका दाते यांनी सादर केली. त्यात पाऊस धारांच्या प्रेमात पडलेल्या धरतीचे वर्णन आले होते. अगदी सुंदररित्या त्यांनी हा प्रितबंध उलगडला.
कवी चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी, आपल्या कवितेतून प्रितीच्या गगनातुनी झरू दे रिमझिम रिमझिम श्रावणधारा असे बोल प्रकट करून “मनोभावंन श्रावण” अप्रतिम असा उभा केला.
हैदराबादच्या पुनम सुलाने, या कवयित्रींनी ‘असा पाऊस होउ दे’, असं या पावसाला मागणं मागितलं होतं. तनमन शुद्ध करणारा पाऊस आता होउ दे इतकी पवित्र पावसाची आळवणी ह्या कवयित्रीने केली होती.
भोपाळच्या विवेक सावरीकरांनी “खुशीने” ही सदाबहार गझल सादर करून सुरेश भटांची आठवण ताजी करून दिली. या गझलेत, प्रत्येक नात्यातून आपल्या समोर येणारी स्त्री, कशा प्रकारे आनंदाने, खुशीने कुटुंबातील सर्वांचा संभाळ करते या भावनांना सावरीकरांनी अलवारपणे आपल्या शब्दात आणले आहे. ते म्हणतात, तिला पांघरायला काही नसेल, तरी ती तिमिर पांघरून खुशीने झोपू शकते. या भावमधुर विचारातूनच गझलेची सखोलता साहित्य प्रेमींना समजून येते.
ठाण्यातील ज्येष्ठ कवी जयंत भावे यांनी वयस्कर सख्याचे प्रेम वेडे नैराश्य दाखवून दिले. “वय ना राहिले” या कवितेत, तरुणपणातलं ते प्रेम आता आपल्या सखीवर करता येत नाही. ही लाडिक कुरकुर कवीने व्यक्त केली आहे.
ठाण्यातील आणखी एक कवी रुपेश पवार यांनी पावसाला काय “सांगावे” असे म्हणत. प्रलयंकारी पावसाचे रूप स्वरूप आपल्या शब्दातून प्रस्तुत केले.
तर “जगणे नामंजूर” या कवितेत प्रज्ञा करंदीकर समरस झालेल्या दोन प्रेमींची भावनिकता दाखवण्याचा प्रयत्न केला. त्या आपल्या काव्यशब्दात म्हणतात, ध्यास सखीचा प्रियकराच्या मनाला छळतो आहे. अशावेळी त्या सखीने त्याला टाळले तर प्रियकरावर चंद्र हसतो. म्हणजे प्रियकराला सखी विना रावत नाही. म्हणून त्याला असे जगणे नामंजूर आहे. अशी भावना या काव्यातून रिमझिमली आहे
अशा प्रकारच्या विविध रंगछटातील कविता या काव्य संमेलनात पहायला मिळाल्या. या कवितांचा आनंद काव्य रसिकांच्या मनाला चिंब भिजवून गेला. या काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन खुमासदार शब्दात योगेश जोशी यांनी केले. श्री जोशी यांनी कवितेचा अर्थ, कवितेचा बोध चांगल्या रितीने काव्य प्रेमींसमोर सादर केला. अशाप्रकारे अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
हे काव्य संमेलन आपण “अक्षरमुद्रा” या यू ट्यूब चॅनेलवर पाहू शकता.
– लेखन : ऍड. रुपेश पवार
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.