Saturday, October 18, 2025
Homeकलाचित्रगीत

चित्रगीत

हिंदी, मराठी चित्रपटातील गीतं ही त्या त्या चित्रपटाची बलस्थानं असतात. नव्हे, ती चित्रपटाचा अविभाज्य
भागच आहेत. किती तरी चित्रपट केवळ गाण्यांमुळे गाजतात आणि आपल्या मनात कायमची घर करून बसतात. चित्रपटातील गाण्यांची महती आपल्याला दर शनिवारी सांगणार आहेत, डॉ त्र्यंबक दूनबळे.

डॉ त्र्यंबक दूनबळे हे भारत सरकारच्या अलियावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्थेतून जनमाध्यम अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांनी प्रसार माध्यमात पी एचडी केली असून विविध विषयांवर त्यांची पुस्तके, अनेक लेख प्रसिध्द झाले आहेत. त्यांची ही चित्रपटातील मुशाफिरी आपल्याला नक्कीच आवडेल, असा विश्वास आहे….

सदाबहार पाऊस गाणी
‘चिंब पावसानं रान झालं आबादानी’ चे दिवस सध्या आपण अनुभवतोय. मध्यंतरी पावसाने थोडी ओढ दिली. पण आता पुन्हा दमदार हजेरी लावलीय. कुठं रिमझिम कुठं मुसळधार बरसतोय. काही ठिकाणी धिंगाणा घातलाय म्हणतात. वीजेचा चाबूक कडाडत, सोसाट्याच्या वाऱ्यावर स्वार होत तुफान नाचलाय. त्याची ही नेहमीची लहरी सवय. धाकधूक वाढविणारी. ‘नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमोळी आणि दारात सावली’ या पुष्पा पागघरे यांनी गायलेल्या आणि यशवंत देव यांनी संगीत दिलेल्या गीताच्या ओळीतून त्याची विनवणी करावी लागते. असो.

पण पावसाच्या आगमनाने तसं सारेच सुखावले. पेरण्याची लगबग सुरु झाली. नदी नाले जलाशय वाहू लागले. डोंगर दऱ्या जलधारात न्हाऊ लागल्यात. सगळीकडे हिरवी चादर पसरली. प्राणी पक्षी आणि जीव सृष्टी नादवली. तशी गवताची पाती, पानं फुलं तरारली. आपण सर्वच आनंदलो. साहजिकच पावसाची जुनी नवी मराठी हिंदी गाणी ‘घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारां’च्या सुरांत ओठावर आली..

‘उमड घुमड कर आई रे घटा, कारे कारे बदरा की छाई छाई रे घटा’ हे ‘दो आंखे बारह हाथ’ (१९५७) गायक लता मंगेशकर, मन्नाडे. संगीत वसंत पवार. व्ही शांताराम आणि संध्या यांच्यावर चित्रित पावसाचे गीत, ढोल वाजवीत आणि नृत्य करीत वरूण राजाचे हे अप्रतिम स्वागत. आशा भोसले यांच्या आवाजातील ’येरे घना येरे घना, न्हाऊ घाल माझ्या मना, फुले माझी अळूमाळू, वारा बघे चुरुगळू, नको नको म्हणताना, गंध गेला रानावना… किती वर्षे मनाला सुखावतेय. चित्रपट अनवट (२०१७) गीत: आरती प्रभू, सं.हृदयनाथ मंगेशकर.

पावसांत न्हाऊ घालण्याची आळवणी हिंदी चित्रपटातील अनेक अप्रतिम गीते आठवतात. रसिकांना सूर तालात चिंब करीत, मनोरंजन करणारी. मनात जपलेली. त्यात ‘बरसात मे हमसे मिले तुम सजन, तुमसे मिले हम बरसात मे’ (लताजी) हे बरसात (१९४९) चे गाणं असो की राजकपूर आणि नर्गिस या कलाकारांवर चित्रित ‘श्री ४२०’ चे ’प्यार हुआ एकरार हुआ है, प्यार से फिर क्यो डरता है दिल, कहता है दिल रास्ता मुस्किल, मालूम नही है कहां है मंजिल’.. एका छत्रीत भिजत प्रेमी युगलांचे हे गीत, किती वर्षे रसिकांच्या ओठावर आणि कानात गुंजत आहे. आवाज – मन्नाडे आणि लताजी, संगीत शंकर जयकिशन.

असेच राजकपूर यांनी “डम डम डिगा, मौसम भिगा भिगा, बिन पिये मै तो गिरा, मै तो गिरा मै तो गिरा, हाय अल्ला, सूरत आपकी सुभान अल्ला,’ म्हणत पावसांत धुमाकूळ घालत नाचविले आहे. पावसाळी सहल असो की गाण्याच्या भेंड्या, हे गीत गायले नाही, असं क्वचित होतं. चित्रपट ‘छलिया’. आवाज मुकेश. संगीत कल्याणजी आनंदजी. ’एक लडकी भिगी भागी सी, सोंती रातों मे जागी थी, मिली एक अजनबी से, कोई आगे ना पिछे, तुम ही कहो ये कोई ये बात है’, भिजलेली नायिका मधुबाला आणि गाडी दुरुस्त करणारा अवखळ नायक किशोर कुमार वर चित्रित ‘चलती की नाम गाडी’ सिनेमातातील हे गाणं पोट धरून हसविते. मजरूह सुलतानपुरी यांचे शब्द आणि सचिनदा बर्मन यांचे संगीत. किती वेळा ऐकलं. मन नाही भरले.

‘कुछ कहता है ये सावन, क्या कहता है’ .. ‘मेरा गाव मेरा देश’ (१९७१) सिनेमातील धर्मेंद्र आणि आशा पारेख वर चित्रित लता आणि रफी यांच्या आवाजातील एक सदाबहार गीत. तर ‘रिम झिम के गीत सावन गाये. हाय भिगी भिगी रातो मे, (अंजना- लता आणि रफी) असो की ‘रिम झिम गिरे सावन, सुलग – सुलग जाये मन, भीगे आज इस मोसम मे लगी कैसी ये आगन’..(मंझिल) कलाकार अमिताभ बच्चन आणि मौसमी चटर्जी. किशोर कुमार/लता यांचा आवाज, रसिकाला ओलेचिंब करून जातो. शब्द योगेश. आर. डी. बर्मन यांचे संगीत. ‘घनन घनन घनन गिर रे बदरवा.. काले मेघा मेघा पाणी तो बरसाओ’ हे ‘लगान’ चित्रपटातील गाजलेले गीत. पाऊस आला तर जीवनात काय बदल होईल याचे सुंदर वर्णन करणारे गीत.

खरं आहे, पाऊस एक जीवन गाणं आहे. तो बरसला तरच जीवन, रोमान्स, नृत्य, गायन, वादन. तो नाही पडला तर ? जीवाला धडकी भरविणारे वास्तव या गीतात फार सुंदर मांडले आहे. साज ए.आर.रहेमान, सूर अलका याग्निक, उदित नारायण सुखविंदर. अमीर खान टीमचा लाजबाब अभिनय.जावेद अख्तर यांचे गीत लेखन या सर्वाला अर्थपूर्ण करणारे. अंबर आणि धरतीला साद घालणारं, पाऊस गाणं ऐकून मन तृप्त होते.

याच गीत स्मरण वाटेवर मग अभिताभ आणि स्मिता पाटील अभिनित (नमक हलाल, १९८२ ) ‘आज रपट जाये तो हमे ना उठायो.. हे किशोर/आशा यांच्या आवाजातील गीत. ‘अंजान’ चे शब्द आणि भप्पी लहरी यांचे संगीत. नुसता धमाका. ‘बुंदे नही सितारे टपके है’ रफीच्या आवाजातील पावसाचे वर्णन करणारे असेच एक अप्रतिम गीत. ‘साजन की सहेली’.कलाकार रेखा, विनोद मेहरा. तर ‘भिगी भिगी रातों मे’ हे राजेश खन्ना आणि जीनत अमान वर चित्रित, किशोर कुमार आणि लताजी यांनी गायलेले सुपरहिट रोमांटिक गीत.चित्रपट अजनबी(१९७४) गीत आनंद बक्षी. संगीत आर डी बर्मन. तर ‘उसने कहा था’ (१९६०) चित्रपटातील ‘आहा रिम झिम के ये प्यारे प्यारे गीत लिये… आयी रात सुहानी दिन के लिये’ हे तलत आणि लता यांच्या आवाजात गायलेले बहारदार अनोखे गीत.

सुनील दत्त आणि नंदा यांच्यावर चित्रित, शैलेन्द्र लिखित सलील चौधरी यांचे संगीत. ‘नैना बरसे (वो कौन थी) गायक लता, संगीत मदन मोहन हे गीत असो की लताजीनी गायलेले ‘नैनो मे बदरा छाये ..’ ही गाणी सर्वोत्तम गीतं आहेत. ‘ओ सजना बहार आयी,’ लताजी (परख), हाय रे हाय, निंद नही आय दिल मे तू समाय, आया प्यार का मौसम दिवाना’ (हमजोली),अब की सावन मे जी डरे, (जैसे को तैसा) किशोर लताजी, आठवा ‘मेघा रे मेघा,मेघा रे मेघा’.. सारखे गीत असो की लपक छपक तू आरे बदरवा (बूट पाँलिस) सारखे विस्मरणात गेलेलं गीत, ’भूले बिसरे गीत’, ‘तराने पुराने’ आणि टीव्ही चॅनेल्सवर सुरु असलेल्या गीत गायन कार्यक्रमातून कानावर पडते, तेव्हा एक काळ गाजविणारी ही गाणीं अनेक आठवणी जागवितात.

मराठी चित्रपटात तर अनेक अर्थपूर्ण आणि मोहक संगीताने सजलेली पाऊस गीतं म्हणजे सुखद गारवा. ‘जैत रे जैत’ सिनेमातील ’नभ उतरुनी आले’ (आशा भोसले, रवींद्र साठे आणि चंद्रकांत काळे), असो की लताजीच्या आवाजातील ‘घन ओथंबूनी येती, वनात राघू ओगरती, पंखावरती सर ओघळती चिंब झाली झाडाझाडावर धरती’ म्हणजे शब्दांची कोरीव लेणी. ना. धो. महानोर लिखित आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेली ही पाऊस गाणी म्हणजे अवीट गोडीची मन तृप्त करणारी पाऊसधाराच.

अप्रतिम शब्द सुरात आणि मधुर वाद्दमेळात सजलेली अशी अनेक पाऊस गाणी गीत,संगीत, नृत्य, आदी तून मनोरंजन करीत सदा मना मनात घर केलेली….

त्रंबक दूनबळे

– लेखन : डॉ त्र्यंबक दूनबळे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

ॲड.श्रध्दा बापूसाईनाथ राऊळ. आरवली.. on माणसांच्या गर्दीतूनी या…!!
संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप