अन्वय प्रतिष्ठान आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृहात नुकतीच व्यसनमुक्ती पथनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धांचे हे दहावे वर्ष आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड परिसरातील एकूण १३ महाविद्यालयांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत विवेकानंद कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स चेंबूरने प्रथम पारितोषिक, एस आय ई एस कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स, कॉमर्स (सिनियर कॉलेज)ने द्वितीय पारितोषिक तर डी वाय पाटील स्कूल ऑफ फार्मसीने तृतीय पारितोषिक पटकावले. स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज चेंबूर तसेच एफ जी नाईक कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स, कोपरखैरणे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
विविध महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी आपल्या पथनाट्यातून व्यसनांची एक प्रयोग, मोठ्यांचे अनुकरण, करत अवलंबित्व आल्यानंतर भोगावे लागणारे दुष्परिणाम आणि त्यातून व्यक्तीची आणि कुटुंबाची होणारी वाताहात शेवटी त्यावर उपायही सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे ‘व्यसन सोडा जीवन जोडा’ हा विषय देण्यात आला होता. त्या अनुषंगाने जीवनावर प्रेम करा हाच संदेश या सर्व नाटिकांतून देण्यात आला.
अशा प्रकारच्या स्पर्धा या जेन झी ला विधायक मार्गाकडे नेण्यासाठी उपयुक्त ठरतील असे जेष्ठ पत्रकार श्री राजेंद्र घरत आपल्या मनोगतात म्हणाले.

नशा बंदी मंडळाचे चिटणीस अमोल मडामे म्हणाले की आपल्या समाजातील खरे नायक जे आहेत त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे.
या स्पर्धेचे परिक्षक म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी रवि वाडकर तसेच अभिनेत्री प्रितम सिंग यांनी काम पाहिले.
याप्रसंगी विचारमंचावर नवी मुंबई समन्वय संस्थेच्या सचिव अमरजा चव्हाण, स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त वृषाली मगदूम उपस्थित होत्या.
विजेत्या महाविद्यालयीन संघांनी जोशपूर्ण वातावरणात मंचावर येऊन आपापली पारितोषिके स्वीकारली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. अजित मगदूम यांनी या स्पर्धा घेण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. अनिल लाड यांनी विजेत्यांची नावे जाहीर केली तर सूत्रसंचालन ‘अन्वय’चे वरिष्ठ समुपदेशक उदय तिळवे यांनी केले.
या कार्यक्रमास विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर साईनाथ हायस्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
