चित्रपटातील बालगीतं
चित्रपटातील अंगाई व बालगीतं मनाला आनंद देणारी असतात.
मुलं म्हणजे फुलं असतात. विविध रंगी, नाजूक कोमल. ती उमलतांना, फुलतांना, हसतांना, खेळतांना, बागडतांना अपार आनंद देतात. आई वडील, भाऊ बहिण मामा मावशी, आजी आजोबा आणि कुटुंब सर्वच या आनंदात, कौतुकात सहभागी होत त्यात स्वत:ला शोधतात.
बालकांची लहानसहान कृती असो की बोल, त्याने टाकलेलं प्रत्येक पाउल किंवा त्याचे नटखटपण प्रेमात न्हाऊन निघते. त्याला शब्दांचे पंख लाभतात. ताल सुर लयीची साथ देत ते मनाच्या आभाळात गिरक्या घेतात, चंद्र सूर्य तारे मित्र होतात. चिमणी कावळा हत्ती घोडा त्यांच्या अंगणी खेळतात. हे सारं बालपण बालगीतातून, लोरी/अंगाई गीतातून टपकत राहते.
एखाद्या बालपणाला कधी दु:ख, गरिबी, अनाथपणाची किनार लाभते. हिंदी चित्रपटात या अर्थाची अनेक गीते उपलबद्ध आहेत. त्यातील अवीट गोडीची लोकप्रिय जुनी नवीन, काही काळानुसार विस्मरणात गेलेली निवडक गाणी या सदरातून आपल्या भेटीसाठी. ….
अंगाई गीत हा बालगीत प्रकार लोरी (हिंदी) जोला (तेलगु) थालाटटू (तमिळ) हालारडू (गुजराती), नानाबाया (ओरिया) या नावाने लोकप्रिय आहे. आई बाळाला खाऊ घालताना, खेळविताना आणि विशेष करून झोपविताना अंगाई गीत गाते. या गीतातूनच बाळाची शब्दावली, श्रवण कौशल्य, भावनिक विकास आणि दिनचर्याची निश्चितता होण्यास मदत होते. ‘लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई,’ ‘नीज माझ्या नंदलाला’, ’झो झो रे बाळा’ अशी अनेक सुरेख मधुर अंगाई गीते मराठीत प्रसिध्द आहेत.
हिंदी चित्रपटात तर अगणित गाणी आहेत. साधी सोपी, लक्षात राहणारी नाद मधुर. त्यातील प्रथम गीत आठवते ते ‘भोली सुरत दिल के खोटे नाम बडे और दर्शन खोटे’ फेम जेष्ठ अभिनेते भगवान अभिनित, अलबेला (१९५१) चित्रपटातील ‘धीरे से आजा रे अखियन में निंदिया आजा रे आजा’ ही लोरी. लताजी आणि चितळकर यांचे स्वर आणि सी रामचंद्र याचं संगीत आजही कानात गुंजन करते. ‘दो बिघा जमीन’ (१९५३) या चित्रपटातील.
’आजा रे तू आ निंदिया सपने सजा..’हे लताजीनी गायलेले मीना कुमारी आणि निरुपा राय या अभिनेत्रींवर चित्रीत गीत सलील चौधरी यांनी संगीतबध्द केले आहे. ‘चंदा रे चंदा रे छुप रहना, सोये मेरी मैना, लेके मेरी निंदिया रे’, लाजवंती (१९५८) सिनेमातील अभिनेत्री नर्गिस यांच्यावर चित्रित अप्रतिम लोरी गीत. स्वर आशा भोसले. ‘नन्नी कली सोने चली, हवा धीरे आना, निंद भरे पंख लिये, झुला झुला जाना’, हे ‘सुजाता’(१९५८) चे ‘सुलोचना’ यांच्यावर चित्रित असेच सुमधुर गीत. आवाज गीता दत्त. गीत जयदेव. संगीत सचिनदा बर्मन. ‘मै गाऊ तू चूप हो जा, मै जागू तू सो जा, धरती की काया सोई, अम्बर की माया सोई, झील मील तारों के नीचे सपनो की छाया सोई, मै धुंडू तू खो जा .. हे ‘दो आंखे बारह हाथ’ या सिनेमातील लोकप्रिय गीत. आवाज लताजी. गीत भारत व्यास. संगीत वसंत देसाई. कैद्द्यांच्या मुलांवर आधारित संध्या यांच्यावर चित्रित हे अंगाई गीत ऐकताना काळजात घर करते.
लताजींच्या आवाजात, ‘ओ नटखट, नन्नी लाडली, तुझे देखे मेरा मामा चंदा मामा, अब झटपट कहना माने, तुझे देखे चंदा मामा’. चित्रपट नन्हा फरीस्ता.(१९६९) तर दोस्ती (१९६४) चे लताजीने गायलेले, ‘गुडिया हमसे रुठी रहोंगी, कब तक न हसोंगी, देखोजी किरण की लहराई, आयी रे आयी रे हंसी आये” आजही कानांत गुणगुणते. गीत मजरूह सुलतानपुरी. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल. तर ‘सो जा रे सो जा’ हे लता यांच्या आवाजात शंकर जयकिशन यांचे संगीत असलेले कठपुतली (१९५७) सिनेमात वैजयंतीमालावर चित्रित गीत ही खूपच मोहक आहे.
‘मेरे घर आयी एक नन्ही परी, चांदनी मे हसीन रथ पर सवारी’. चित्रपट कभी कभी’ (१९७६) कलाकार वहिदा रहेमान. आवाज लता. गीत साहीर लुधयानवी. संगीत खय्याम.‘सो जा मेरी गुडिया, तू काये सोये ना, मिठी मिठी लोरी सुनायें तेरी मा’ हे मा बेटी” (१९८७) सिनेमातील गाणं जरुर ऐका. आवाज अलका याज्ञीक. गीत अंजान. संगीत आनद मिलिंद. कलाकार शर्मिला टागोर आणि शशी कपूर. तर ‘गुडिया रानी बिटीया रानी, परीयों की नगरी से एक दिन, राजकुमार जी आयेंगे, महलों में ले जायेंगे’ लताजीच्या आवाजातील’लम्हे’ (१९९१) सिनेमाचे एक मोहक गुडिया गीत. आनंद बक्षी आणि शिव हरी यांनी शब्द सुरांनी सजविलेलं.
अनिल कपूर श्रीदेवी अभिनित, तर परदेशी गेलेल्या वडिलांची वाट पाहणारे हूरहूर लावणारे, ’सात समुंदर पार से गुडियो के बाजार से, अछी अच्छी सी गुडिया लाना, पापा जल्दी आ जाना’ हे गीत आठवते का. ‘तकदीर (१९६७) आनंद बक्षी आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी सजविलेलं. लताजी, सुलक्षणा पंडित, उषा खन्ना यांनी गायलेलं अप्रतिम गीत. काहीसं विस्मरणात गेलेलं. गीता बाली यांच्यावर चित्रित ‘वचन’ फिल्मचे, ‘चंदा मामा दूरसे, पुए पकाए भूर के, आप खाये थाली मे, मुन्ना को दे प्याली मे’. आवाज आशा भोसले. कलाकार गीताबाली.
आता गुडिया गुड्डू थोडे मोठं झालेत. त्याचे वाढदिवस साजरे होतायत. खेळणी बदलली आहेत. आजोबाच घोडाघोडा झालेत. मित्र ही आहेत सोबतीला. बोबडे बोल गीतात बदलले. रुपडेही बदललेले. मग वाढदिवसाला हास्य कलाकार जॉनी वाँकर, ‘हम भी अगर बच्चे होते, नाम हमारा होता गबलू बबलू, खाने को मिळते लड्डू, हपी बर्थ डे टू यु’ म्हणत मुलांबरोबर धमाल करतो.
दूर की आवाज सिनेमात आशा, भोसले मन्नाडे यांच्या आवाजात सायराबानू, जॉय मुखर्जी आणि जॉनी वाँकर, यांनी लाजबाब अभिनय केला आहे. तर ‘तारे कितने नील गगन पे तारे, तेरी उम्र हो इतनी नील गगन मे तारे ‘आप आये बहार आये चे गीत मनात रुतून बसते. रफी लता यांनी गायलेले, आनंद बक्षी आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी सजविलेले साधना आणि राजेंद्र कुमार यांच्यावर चित्रित झालेलं आहे. ‘एक फुल दो माली’ सिनेमाचे ‘तुझे सुरज कहू या चंदा, तुझे दीप कहूं या तारा, मेरा नाम करेगा रोशन, मेरा राज दुलारा’ हे बलराज सहानी यांच्या तोंडी असलेले मन्नाडे यांनी गायलेले, संगीत रवी, गाणं आजही लोकप्रिय आहे.
याच धर्तीवर, ‘चंदा है तू, मेरा सूरुज है तू, ओ मेरे आंखो का तारा है तू’ या ‘आराधना’(१९६९)सिनेमातील गीताची आठवण येते. ‘चंदा हो चंदा, चंदा हो चंदा, किसीने चुराई तेरी मेरी निंदिया, जागे सारे रैना तेरे मेरे नैना’ हे ‘लाखो मे एक’ सिनेमाचे भावविभोर करणारे गीत. किशोर कुमार यांनी गायलेले आणि मेहमूद या कलाकारावर चित्रित. ‘जीने की राह’ चित्रपटाचे, ‘चंदा को धुंडने को सभी तारे निकाल पडे,’ हे गीत तर हृदयाला हात घालते.
मुलांच्या खेळण्यावर अशीच किती सुंदर सुंदर गाणी आहेत. त्यात आठवतात मीना कुमारीवर चित्रित ‘चल मेरे घोडे घोडे टीक टीक, चलना तेरा काम, रुकने का नाम नही लेना’. गायक लता मंगेशकर. संगीत रवी.चित्रपट ‘चिराग कहा रोशनी कहां’, तर ‘लकडी की काठी, काठी पे घोडा, घोडे की दूम पे जो मारा हाथोडा, दौडा दौडा दूम उठाके दौडा’ आजही लोकप्रिय आहे. मासूम (१९८३) चे गुलजार लिखित आर डी बर्मन यानीन संगीत दिलेले हे गीत गौरी बापट, गुरु प्रीत कौर आणि वनिता मिश्रा यांनी गायले आहे. तर बालकलाकार म्हणून रंगीला फेम उर्मिला मातोंडकर आणि जुगल हंसराज यांनी धमाल केली.
असेच एक लोकप्रिय गीत. ‘बच्चे मनके सच्चे, सभी जग के आंखो के तारे’.. चित्रपट ‘दो कालिया’. आवाज लताजी. संगीत रवी. ‘दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ’ हे आशा भोसले आणि कमाल बारोट यांच्या आवाजातील आणि रवी यांचे संगीत असलेले सदाबहार बालगीत ‘ललिता पवार’ यांनी केलेल्या अभिनयामुळे लक्षात राहते. चित्रपट घराना (१९६१). ‘चून चून करती आई चिडिया, दाल का दाना लाई चिडीया, मोर भी आया, कौआ भी आया, चुहा भी आया, बंदर भी आया’, हे ‘दिल्ली अब दूर नही’ (१९५७) या चित्रपटातील विस्मरणात गेलेले मजेशीर गीत. मो.रफी यांनी गायलेले, हसरत जयपुरी लिखित याकुब आणि रोमी या कलाकारावर चित्रित आहे. तर शम्मी कपूर यांच्यावर चित्रित ‘रे मामा रे मामा रे मामा रे मामा’ अंदाज (१९७१) सिनेमातील एक सुरेख विनोदी बालगीत. मो.रफी, हसरत जयपुरी, शंकर जयकिशन यांनी धमाल सजविलेले आजही खळखळून हसविणारे आहेत.
शम्मी कपूरवर चित्रित ‘ब्रम्हचारी’ या चित्रपटातील ‘मै गाऊ तूम सो जाओ, सुख सपनों मे खो जाऊ’..हे गीत असो की कुंवारा बाप सिनेमातील मेहमूदवर चित्रित, ‘आ री आजा निंदिया तू ले चल उडन खटोले में दूर कही दूर यहां से दूर..’ डोळ्याच्या कडा पालवितात. असेच एक गीत बेटा बेटी (१९६१)सिनेमातील. ‘आज कल मे ढल गया, दिन हुआ तमाम, तुही सो जा सो गई रंग भरी श्याम’ जरूर ऐकले पाहिजे. अनाथपणाचे दु:ख सांडणारे हे गीत शैलेन्द्र यांनी लिहिले आहे लताजीच्या आवाजाला शंकर जयकिशन यांनी साज दिला आहे.
तर सदमा (१९८३) चित्रपटातील श्रीदेवी आणि कमल हसन यांनी अभिनित केलेले, ‘सुरमयी आखींयो में नन्हा मुन्ना सपना दे जारे, निंदिया के उडते पाखी रे, आखींयो मे आजा रे’ एक वेगळ्या मानसिक समस्येवरील हे गाणं येशुदास यांनी गायले आहे.शब्द गुलजार आणि संगीत इलायराजा. दादा मुनी अशोक कुमार यांना विसरून कसे चालेल. आशीर्वाद (१९६८) सिनेमातील ‘रेल रेल गाडी झुक झुक झुक बिचवाले स्टेशन बोले रुक रुक..’ असो की साधू और सैतान (१९६८) या सिनेमातील मुलांबरोबर धमाल करणारे मेहमूद अभिनित ए फोर अँपल बी फोर बेबी, सी फोर कमल डी फोर दाढी, गीत जरूर ऐकले पाहिजे. मुलांनी सर्व भाषा शिकल्या पाहिजे यावर रचलेले फारच सुंदर प्रेरणा गीत आहे. मेहमूद आणि बालकलाकार सारिका अभिनित ‘मस्ताना’ आठवणीतून जात नाही. त्यातील ‘सो जा तारा ओ, लेके खिलोने सपने सलोने एक बंजारा’ बालविश्वातील एक अवीट गोडीचं गीत.
अशीच काही भावविभोर करणारी, पालकाचे दु:खच सांडणारी गीतं. अभिताभ बच्चन चित्रित ‘दो अनजाने’ (१९७६) चित्रपटातील,’ लुक छूप लुक छूप जाओना (किशोर कुमार ) असो की ‘तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूं’, मासूम (१९८३) चे गुलजार यांनी लिहिलेले अनुप घोशाल यांनी गायलेले गीत, पालकाचे संगीतमय मनोगतच आहे. जावेद अख्तर लिखित ‘तारा रम पम तारा रम पम’ हे राणी मुखर्जी आणि शैफ आली खान वर चित्रित शान, महालक्ष्मी यांनी गायलेले गीत असो की ‘सो जा मुन्ना’ हे हरयाणी (२०२१) चित्रपटातील सपना चौधरीवर चित्रित आणि सिमरान बुमरा यांनी गायलेले किंवा ‘आ लेके चलू तुझको एक ऐसे देश मे, मिलती है जहां खुशियां परीयों के भेष में..’ हे निधी सैनी यांच्या आवाजातील अंगाई गीत, खूपच मधुर व लोकप्रिय आहे.
‘पापा मेरे पापा’, ‘पापा कहते है बडा नाम करेगा, बेटा ऐसा नाम करेगा’ सारखी गाणी तर लहान थोरांच्या ओठी कायम आहेत. ‘आजा निंदिया राणी आजा तू दूर दूर सितारोंसे, नन्हे सपने लेके आजा’ ही मनिष त्रिपाठीच्या आवाजातील लोरी तर अलीकडे खूपच गाजत आहे. अशी शेकडो नवी जुनी अंगाई /लोरी आपल्याला लहान मुलांसमवेत नवा आनंद देतात. आपले बालपण, प्रेम जिव्हाळा, हास्य, नटखटपण पुन्हा बहाल करतात. मधुरता, कोमलता जपत हळवे होतात. यासाठी ही गाणी आठवली पाहिजे. गुणगुणली पाहिजे. तुमचा आमचा अनमोल ठेवा येणाऱ्या पिढीसाठी जपला पाहिजे. ‘काभूराज बोढारे’ या संगीत प्रेमी मित्राने आपल्या संदर्भ संवादातून हा गीत शब्द प्रपंच अधिकच खुलवला.
– लेखन : डॉ त्र्यंबक दुनबळे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.