आज पंचाहत्तरीच्या घरात असलेले पण तरीही आता हयात नसलेल्या पत्नीच्या इच्छेमुळे तिच्या समवेत केलेल्या वारीमुळे भारावून गेलेले प्रकाश पळशीकर कथन करताहेत “आठवणीतील वारी….”
कथा आहे आम्हा उभयतां
कडून श्री पांडुरंगाने करवून
घेतलेल्या पंढरीच्या वारीची
साल होते १९९०. महिना नक्की आठवत नाही.
१९८७ साली मुलगा
Diploma In. industryal Electronics विषयाचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पार
करून लगेचच दरमहा फक्त
६०० रुपये अधिक ऑफिस ते
घर रेल्वेचा मासिक पास या
शर्तीवर कामासाठी रुजू
झाला. (नाहीतरी घरी बसून काय
करणार हा जरा बाहेरची
दुनिया बघू दे लोकल ट्रेनने
प्रवास कसा करायचा हे कळू
दे तरी )
साल १९९० पर्यंत दोन तीन
कम्पन्यात पायधूळ झाडून झाली
आणि मग एकाच वेळी साधारण
आठवड्याच्या फरकाने दोन
जाहिराती आल्या.
एक होती महाराष्ट्र राज्य
सुरक्षा दल विभाग ८ दौड
वायरलेस तंत्रज्ञ या पदासाठी
भरती राज्य सरकारी नोकरी.
दुसरी होती
दूरध्वनी तंत्रज्ञ ( कोकण विभाग महाराष्ट्र सर्कल ) केंद्र सरकारी नोकरी.
दोन्ही ठिकाणी अर्ज करण्याची
अंतिम तारीख एकच होती.
मनात म्हणले ठीक आहे आधी
अर्ज तर करू मग बघू कोण
बोलवतेय. तो पर्यंत दोन्हीं
ठिकाणची जास्तीत जास्त माहिती गोळा करून साधकबाधक चर्चा करून घेऊ निर्णय.
या कालावधीत आम्ही
डोंबिवली पूर्व येथील पूर्वा
सोसायटीत वास्तव्यास होतो.
चाळीस सदनिकांपैकी तीस
सभासद महानगर टेलिफोन
निगमचेच कर्मचारी होते.
चर्चेअंती पोलीस खात्याची
नोकरी स्वीकारावी असा निर्णय आम्ही घेतला.
कारण सम्प हा प्रकार
येथे नाही आणि त्याची मुंबई
विभागात नेमणूक होऊ शकते.
मुंबईतील राहत्या जागेच्या
अडचणी मुळे महाराष्ट्रतल्या
अनेक जिल्ह्यात राहणाऱ्या
मंडळींना मुंबई भागात नियुक्ती
नको असते.
मुलगा आपल्यापाशीच
राहील या स्वार्थाने ( माझ्यातील धृतराष्ट्र जागा झाला !)
अखेर पुण्याला
पाषाण येथील महाराष्ट्र पोलीस दल ट्रेनींग केंद्र येथे तो दाखल झाला.
पुण्याला तो त्याचा बाड बिस्तरा बांधून निघाला तेंव्हा आम्ही उभयतांनी सुध्धा त्याच्यासोबत जाण्याचे ठरवले आणि त्याला ट्रेनिंगला सोडून पुढे जेजुरीला
जाऊ आणि दुसऱ्या दिवशी
माघारी फिरू आणि खऱ्या
अर्थाने पंढरीच्या वारीची कल्पना
मनाला भिडली.
स्वारगेट बस स्टँड वरून
S T निघाली जेजुरीच्या
दिशेने. पुणे हद्द सोडून गाडी
दिवे घाट चढू लागली आणि
खिडकीतून बाहेर बघू लागलो
आणि डोळ्याचे पारणे फिटावे
असे दृश्य दिसले .
काय सांगू राव, माऊलीची
दिंडी घेऊन शेकडो नव्हे तर
हजारो वारकरी टाळ मृदुंगाच्या
मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजात
कमालीच्या शिस्तीने पंढरीकडे
निघाले होते. कोणतीही आरडाओरड नाही. धक्काबुक्की
नाही. माझी दिंडी पुढे जाणार
किंवा आमच्या दिंडीला वाट द्या
असे काहीही नाही. प्रत्येक दिंडीला
नंबर आणि विशिष्ट मुक्कामाचे
ठिकाण सर्व काही दिंडीला
सुरुवात होण्याआधी ठलेले
असते .
अर्थात हे सर्व नंतर कळले
दिवे घाट चढून आमची
S T पुढे मार्गस्थ झाली
खिडकीतून मागे वळून बघितले.
गळ्यात तुळशीची
माळ घातलेले पांढऱ्या स्वछ
कपड्यात पुरुष मंडळ आणि
डोक्यावर तुळशी वृंदावन
घेऊन महिला वारकरी.
रात्रभर मुक्कामी राहून
दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास
सुरु झाला सासवड सुटले अणि
S T ने दिवे घाट उतरायला
सुरवात केली खिडकीतून
बाहेर डोकावले तसेच दृश्य
फक्त फरक हा होता की
जेजुरीकडे येताना आम्ही S T मध्ये
बसून का होईना जणू काही
आम्हीही त्यांच्या सोबत वारीतच
होतो मात्र घाट उतरताना आम्ही
त्यानंच्या विरुद्ध दिशेने वारी
करत होतो.
डोंबिवलीला परत आलो.
दुसऱ्या दिवसा पडून पुन्हा तेच
रहाट गाडगे सुरू. मुलाचे वर्षा दीड वर्षाचे ट्रेनिंग पूर्ण झाले. अपेक्षेप्रमाणे
मुंबई मिळाली आणि जोगेश्वरी
येथे तो रुजू झाला.
थोडयाच दिवसात पुन्हा
त्याची बदली मुंबईतच पण
रिगल सिनेमा जवळ पोलीस
मुख्यालयात झाली. आणि मग
पोलीस खात्यात कामाचे तास
किती, कसे अवघड असतात याची
जाणीव त्याला तर झालीच तशीच
आम्हालाही झाली. रात्री अपरात्री
घरी परतायचा. कसे बसे चार घास
पोटात ढकलायचा. कित्येक वेळा
तर त्याच्यासाठी जागत बसलेली
माऊली चक्क त्याला भरवायची.
ही नोकरी सोडून दुसरी नोकरी करायची तर खासगी नोकरी बिन भरवशाची. सरकारी नोकरीत हळूहळू जागा कमी होत गेल्या आणि त्याना
पदवीधारक मिळू लागले. मग
डिप्लोमा वाल्याना कोण विचारतोय ?
आम्ही रहात असलेल्या पूर्वा
सोसायटीत चंद्रन नावाचे एक
इंजिनीयर MTNL सोडून एका
मोबाईल कम्पनीत (ORANJE )
काहीं दिवसांनी ती VODA फोन
म्हणून ओळखू लागले. त्याना माउलीने सर्व कथा सांगितली
आणि म्हणाली तुमच्या कम्पनीत
बघा असला एखादा जॉब.
मग कोण जाणो त्यांनी प्रयत्न
करून त्याला
थोडे दिवस अहमदाबादला
टाटा टेलिकॉम्स मध्ये नोकरी मिळवून दिली. मग आज एक कँपणी बदल.. थोडे दिवस जाऊ
द्यावे मग तिसरी कम्पनी असे
करत करत आज एक
तर थोड्या दिवसांनी दुसरी कम्पनी !
एक दिवस मला म्हणाला बाबा हे असेच असते.
दर तीन चार वर्षांची अंतराने
नोकरी बदलत राहायचे
अनुभव वाढत गेला कीं पॅकेज ही
वाढवून मिळते.
असे करता करता १९९६ साल उजाडले. फेब्रुवारी महिन्यात त्याचे
दोनाचे चार हात झाले आणि
आमचे कुटुंब झाले “चौकोनी” !
थोडयाच दिवसांनी एके दिवशी पत्नीने माझी लग्नाची धुंदी खाडकन उतरवली.
म्हणाली ,मूला प्रति असलेली सर्व कर्तव्य आपण जशी जमेल तशी पार पाडलीत. हळूहळू
त्यांच्यावर भार टाकून त्याना
हवा तसा हा गाडा पुढे नेऊ दे.
मी क्षणभर गप्प.
यावर्षी आपण पंढरीची वारी
करायची.
मी ताडकन म्हणालो, त्याचे
लग्न झाले याचा अर्थ असा नव्हे
की आपण इतके वयस्कर झालो
की आता वारकरी व्हायचे अग
अजून आपण बचपन पचपन
वालेच आहोत.
ती पुढे म्हणाली,
मी वारीची सर्व माहिती
काढली. श्री केळकर म्हणून
माझे परिचित आहेत. ते आपल्या
वारीची जबाबदारी घेणार आहेत.
नाव सुध्धा नोंदवली आहेत.
डोकं चक्रावून गेले
हे काय खूळ आलय हिच्या डोक्यात समजेना !
शांतता ओसरली.
मग म्हणाली की हे खूळ माझे
नाही तर तुमच्याच सुपिक
डोक्यातून पाझरले ..
आठवतंय का लेकाला
पोलीस ट्रेनिग साठी पुण्याला
सोडून घरी परत येताना बोलून
गेलात ना. काय तर म्हणे
आयुष्यात एकदा तरी वारी करावी.
मग उशीर कशाला ?
माऊली साद घालतेय !
काय तुमच्या रजेचे असेल ते बघा.
१६ जुलै ला निघायचे ठरलं.साल १९९६.
नेमकी वारीला निघायच्या
तीन दिवस आधी माझी
ठाणे चराई एक्सचेंज वरून
फोर्ट मधील सिटी किंवा वाडबी
टेलिफोन केंद्र येथे बदली केली गेली. रुजू होऊन रजा मंजुरीसाठी अर्ज दिला. दखल घेतली गेली नाही.
धीर करून वरिष्ठ अधिकारी यांना भेटलो.
सर्व रामायण सांगितले. शेवटी
“रजा मंजूर”असा शेरा अर्जावर
लिहिला. रबर स्टॅम्प
उठला आणि माझा जीव
भांड्यात पडला.
दुसरे दिवशी सकाळी
उठून डोंबिवली ते पुणे असा
रेल्वे प्रवास करून लगेच स्वारगेटला
पोचलो .पुणे ते म्हसवड या S T
बस मध्ये चढलो. अर्धे अधिक
प्रवासी पंढरीच्या वारीसाठी
निघालेले होते. आमच्या हातातील
सामानावरून त्याना अंदाज आला.
बॉब कट वाली बाई
आणि वारीला (१९९६ साल) !
औपचारिक चर्चा झाली आणि
त्यानी विचारले,
कोणयाचा दिंडी सोबत जाताय ?
उत्तर दिले,
सातारा येथून निघणाऱ्या
श्री दादा महाराज सातारकर यांच्या दिंडी सोबत.
अरे देवा, अहो ती तर उद्या सकाळी म्हसवड ला ११/१२
वाजता येईल. मग आज रात्री
मुक्काम कोठे करणार ?
त्यापेक्षा तुम्ही गोंदावल्या ला
उतरा. श्रीगोंदवलेकर महाराजांच्या मठातून उद्या दिंडी निघेल.
बघा प्रयत्न करून
कदाचित तुम्हाला सामावून
घेतील .
दुसरा वारकरी म्हणाला,
तुम्ही जर महाराजनचा अनुग्रह
घेतला असेल तरच तुमचे काम
होईल नाही. तर होणार नाही.
माझे डोके गरगरायला लागले
होते. “सौ” शांत. म्हणाली,
पुढे म्हसवडला जाऊ .
निघेल काही मार्ग.
प्रश्न एक रात्रीचा आहे काढू या कोठेही !
खरे तर श्री साईबाबावर नितांत
श्रद्धा .मग श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनी सुद्धा
मठात आरतीला हजेरी .नन्तर
प्रसाद घरी घेऊन येणार. असो.
म्हसवडला आलो .
स्टॅन्ड वर एका वारकऱ्याने
जुजबी चौकशी केली आणि
म्हणाला, चला माझ्या संग.
कदाचित आमचे महाराज घेतील
आमच्या दिंडीत. समोरच्या
शाळेत रात्री मुक्काम करून
आम्हीही पंढरीच्या वाटेने जाऊ.
पर्याय नव्हताच. शाळा मोठी
होती आणि वारकऱ्यांची संख्याही
मोठी होती. साधारण १०० एक तरी असतील.
शंकर महाज दिंडीचे प्रमुख
समोर उभे केले गेले.
त्याना आमची अडचण सांगितली.
त्यानी प्रश्न केला कोठे रहाता ?
सौ म्हणाली, आधी कल्याणला
आणि आता डोंबिवलीला.
महाराजांनी इतर वारकऱ्यांना
विचारले, तुमच्या पैकी
कल्याणहुन कोणी आहे का ? कल्याणची माहिती कोणाला आहे ? एक वारकरी उठला, म्हणाला मला आहे माहिती.
त्या वारकऱ्याने
हे ठिकाण कोठे, नगरपालिका
कोठे आहे, विठ्ठलाचे देऊळ
कोठे असे प्रश्न विचारून झाले.
शंकर महाराज म्हणाले,
प्रश्न विचारून खात्री करून
घेतल्या शिवाय आम्ही दिंडीत
कोणाला थारा देत नाही.
गैरसमज करून घेऊ नका. पण
आजची रात्र आमच्या दिंडीत
राहा. जेवण करा. झोपायची जागा
वारकरी दाखवेल. उद्या तुम्हाला दादा महाराज सातरकरांची दिंडी श्री पाठक
यांच्या घरी दुपारच्या मुक्कामाला
येते तेंव्हा तुमची अडचण दूर
होईल.
श्री शंकर महाराज सातारकर यांच्या दिंडी सोबत फक्त संध्याकाळ ते दुसऱ्या दिवसाची
सकाळ एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे दिंडीत
कोणताही भेदभाव नाही.
दिंडीतील प्रत्येक व्यक्ती लहान
असो वयस्कर, पुरुष व स्त्री
एकमेकांना अहो “माऊली ”
म्हणूनच साद घालायची आणि
माउलीने एकमेकानच्या चरणांवर
नतमस्तक व्हावयाचे.
वाकला न एका हाताने स्पर्श
केला असे होत नव्हते.
विचार करा वयाची सत्तरी किंवा नव्वद्दीला पोहोचलेले
हे वारकरी माऊली माऊली
बोलत जेंव्हा पन्नाशी पार केलेल्या
माझ्या सारख्याच्या पायावर
नतमस्तक होत
तेव्हा आम्हा उभयतांना खूप
लाज वाटायची. पूर्ण वारीत
आमचे डोळे दिवस भरत .
अनेकदा ओलेच राहायचे.
दुसरे दिवशी सकाळी
शंकर महाराजांच्या पायावर आम्ही उभयतांनी एकाचं वेळी
मस्तक ठेवले आणि महाराज वदले
“माऊली आता
खरे वारकरी झाला” असे म्हणत
मस्तकावर त्यांनी हात ठेवले.
उभयतांनी एकमेकांकडे
पाहिले. दोघांचेही नेत्र अश्रूंनी
डबडबले होते. महाराज एका
वारकऱ्याला सोबत देत म्हणाले,
ही माऊली तुम्हाला तुमच्या
दिंडीत सोडून येईल.
नाहीतर आम्ही आहोतच
वारकऱ्याने
श्री सुधीर पाठक यांच्या घरी आणलं.
पाठकानी जुजबी चौकशी केली.
जेंव्हा आम्ही पुण्याचे
श्री केळकर यांनी आमची सोय
केली. पण अशी सारी फसगत
झाली.
खळखळून हसत माऊली
म्हणाली, बसा चहा घेउ .स्नान वगैरे
झाले नसेल तर मागे परसात सोय
आहे. तासाभरात दिंडी पण येईल
आणि केळकर काका सुद्धा.
प्रातर्विधी स्नान आटोपले.
ओळख काढत स्वयंपाक घरात
कधी शिरकाव करून घेतला
कळलेच नाही.
अकरा सव्वा अकराला
“ज्ञानोबा माऊली तुकाराम”
सोबत टाळ मृदुन्ग यांचा आवाज
कानी पडताच मी आणि सौ
बाहेर मोठं अंगण होते तेथे आलो.
सुरवातीला वारकरीमध्ये बैलगाडीत नित्य पूजेच्या
मूर्ती आणि एक दोन बसलेले
वारकरी आणि गाडीच्या मागेही
वारकरी.
या दिंडीचे वैशिष्ट्यं
म्हणजे या दिंडीवर एक मोठा
डौलाणें फडकणार ध्वज होता. पंढरीला शेकडोंनी दिंड्या जातात. पण फक्त साताऱ्यातुन
निघणाऱ्या दादा महाराज सातारकर यांनाच ध्वज लावायला मुभा दिली गेलीय.एका वारकऱ्याने हे सांगितले
म्हणजे खरेच असले पाहिजे.
दिंडी थांबली आणि हळूहळू
चालत चालत येणारे केळकर
काका दिसले आणि सौ धावतच
सुटली. काकांच्या पायावर
कोसळून पडली. काकांनी
दोन्ही हाताला धरून उभी केली
आणि म्हणाले
आता मी आलोय ना
होणार तुझी वारी ..
समोरचे दृष्य नेत्रात
जितके मावेल तितके साठवत गेलो
यथाकाश गप्पा झाल्या.
थोड्याशा विश्रांतीनंतर दु ४ वाजता दिंडीने पंढरपूरच्या दिशेने
वाटचाल सुरू केली.
केळकर काका सोबत होते.
दर ४ साडेचार मैल
चाल झाली की अर्ध्या एक
तासाने पुन्हा वाटचाल सुरू.
“जय जय रामकृष्ण हरी”
असा नामघोष करत करत
टाळ मृदुंगाच्या तालावर किती
अंतर चालले हे कळतच नाही.
दिंडी रात्रीच्या मुक्कामाला
पोहोचली गावाचे नाव
“धूळदेव ”
हातपाय धुवून चहा झाला.
रात्रीच्या जेवणापर्यंत
भजन, कीर्तन, हरिपाठ चालूच.
जेवण झाली आपापल्या पथाऱ्या
पसरायच्या. झोपायचे.
पाठ टेकली अन पाय
बोलू लागले. सारखी वळवळ
करत होती .
थोड्या अंतरावर
जेथे महिला वर्ग झोपला होता
सौ उठून जवळ आली. विचरती
झाली पाय दुखतायात का रे ?
मी फटकन बोललो
झालं तेवढे बास झाले.
मला नाही चालवणार या पुढे.
उद्द्या आपण
परत जाऊ घरी.
शांत पणे म्हणाली उद्द्या ना?
अजून रात्र बाकी आहे.
सकाळी उठल्यावर बघू.
निघेल काहीतरी मार्ग.
जागे करीत बोलली
चला आवरा माऊली साद घालतेय. तिने पायावरून हलकासा हात फिरवला. मोरपीसाचा स्पर्श.
तो झटकून टाकला आळस आणि अर्ध्या तासात पुढच्या प्रवासाला तयार.
धूळदेव सकाळी साधारणपणे ९ च्या सुमारास सोडले .
रोज सकाळी आठ नऊ मैल
आणि संध्याकाळी सुध्धा
तेव्हढेच अंतर चालावे लागे.
मुखी सदैव जय जय राम
कृष्ण हरी। किंवा। ज्ञानोबा
माऊली तुकाराम सोबत
टाळ मृदुंगाची.
जेंव्हा वारकरी चालत
असत त्यावेळी रस्त्याच्या कडेला
जर वस्ती असली तर वस्तीतले
लोक वारकऱ्यांच्या पायावर डोके
ठेवीत. अनेक शेतकरी त्यांच्या
शेतात जे काही पिकवतात,
ते मग धान्य असो वा भाजीपाला
मुक्त हस्ताने वाटीत. घागरी घागरी
पाणी आणून वारकऱ्याची तहान
भागवत. ते दृष्य खूप मजेशीर
वाटायचे. एकाने घागर तिरकी
धरून पाण्याची धार धरायची.
पिणारीने वा पिणार्याने जमिनीवर
उकिडवे बसायचे .हात तोंडापाशी
धरुन कमीत कमी वाया जाईल
अशा रीतीने प्यायचे .
धमाल यायची.
एकमेकांना माऊली अशीच हाक मारली जायची. वय लिंग
असा कोणतही भेद जाणवला नाही. ८०/९० वर्षांची मंडळी
तुरुतुरु चालायची .
खूप भारी वाटायचे.
आणखी एक वैशिष्ट म्हणजे
पंढरीच्या दिशेने पण निरनिराळ्या
मार्गाने येत असताना प्रत्येक
दिंडीचा एक आखलेला रस्ता,
त्यावरची मुक्कामाची ठिकाणे
भक्तांच्या सोयीसाठी जेजे शक्य
असेल ते ते दिंडीचे संचालक
जातीने लक्ष घालून करीत असे.
जेथून दिंडी निघे तेथिल
कोणीतरी संचालक हि जबाबदारी
पार पाडी .थोडक्यात एक प्रकारे
हा एक व्यवसायच होता. पण
वाट्टेल तसा नफा मिळवणे हा
उद्देश कधीच जाणवला नाही .
दिंडीच्या अनेक दिवस आधी
ठराविक रक्कम दिंडी
संचालक यांच्याकडे भरून
आपली जागा बूक करावी लागे . दिंडीत किती वारकरी घ्यायचे
हे संचालक त्यांच्याकडे
असणाऱ्या साधनसामुग्री नुसार
ठरवत.
एक टेम्पो किंवा छोटी वा
मोठी लॉरी स्वयंपाकाचे सामानसुमान मावेल इतकी.
मग त्यात गॅस,शेगड्या,
सिलिंडर मोठ्या मोठया शेगड्या कोळसा लाकडे पत्रावळी द्रोण सारे. काही धान्य पीठ तेल
कधीही निघताना
एखादी वस्तू विसरली असे होत
नसे.
दुसरी लॉरी वारकऱ्यांचे
सामान सुमान ठेवण्यासाठी.
कोणाची पत्र्याची बॅग तर
कोणाचे गाठोडे .झोपण्यासाठी
वळकटी सतरंज्या इत्यादी वस्तू
दुसऱ्या लॉरी मध्ये .
हेतू हा असे की वारकरी
मोकळया हाताने वावरावा
गळ्यात माळ
हातात टाळ बस.
जेवण चहा यासाठी नेमलेल्या स्वयंपाकी मंडळींनी
सकाळचा चहा नास्ता झाला की
त्यांच्या सामानाची आवराआवर
करून साधारणपणे आठ नऊ
मैलावर जेवण विश्रांती साठी
जे ठिकाण ठरवलेले असते तेथे
जाऊन दुपारच्या जेवणाची
चोख तयारी करायची.
कारण सकाळी चालत निघालेली वारकरी मंडळी एक ते दीड
वाजेपर्यंत पोहोचायची.
दुपारची जेवणे, चारचा चहा झाला की हे स्वयंपाकी
रात्रीचा मुक्काम जेथे होणार
असतो त्या ठिकाणी जाऊन
रात्रीच्या भोजनाची सोय पूर्ण
करायचे.
आम्हाला पाचच दिवसाची वारी
करायची संधी मिळाली.
म्हणजे बघा रोज सकाळी नऊ मैल
आणि संध्याकाळी आठ नऊ मैल
एकूण अंदाजे ८०/९० मैल चाल
झाली. पण एकदाही कोणती
चूक स्वयंपाकी मंडळींच्या
हातून झाली नाही.
वारी एका मुक्कामावरून
पुढच्या मुक्कामी पोचे पर्यंत
चालताना फक्त जयघोष नामाचा
गजर एव्हढेच गप्पा टप्पा नाही
पण तंबाखू विडीकाडी एकदम
बंद.इतके पावित्र्य जपले जाते.
जेवणाला उशीर
कोणी कोठे झोपायचे या सारख्या
विषयावर भांडणे, वाद अजिबात
नाही
वारीत सर्वात मोठे
आकर्षण म्हणजे
उभे रिंगण आणि गोल रिंगण
लई भारी
असतो राव हा सोहोळा.
एक अबलख अश्व खास
रिंगणात धावण्यासाठी
तयार केलेला असतो .
कदाचित
रेसमध्ये धावणाऱ्या घोड्याच्या
पेक्षा अधिक काळजी घेतली
जाते.
उभ्याचे रिंगण होताना
वारकरी शिवाय फक्त हे रिंगण
सोहोळा बघण्यासाठी जमलेला
भाविक रस्त्याच्या दुतर्फा उभा
राहतो .त्यांच्या समोरून अचाट
वेगाने धावणारा घोडा पुढे
गेलारे गेला की जमिनीवर
त्याच्या टाचेखाली आलेली
माती पायधूळ म्हणून कपाळी
लावायची .तेंव्हा मात्र शिस्तीची
ऐसीची तैशी वाहायची .
पण काही मिनिटात पुन्हा सारे काही
शिस्तीत. असो.
उभे रिंगण ज्या ठिकाणी
व्हायचे त्याचे नाव
बाजीरावाची विहीर.
आणि गोल रिंगण जर्थे होते ते
नाव विसमरणात गेले आठवले
की सांगतो.
पंढरपूरलाच्या आधी
साधारण ८/९ मैलावर
वाखरी म्हणून एक ठिकाण आहे .
तिथे नवमीच्या रात्री आमची
दिंडी पोचली.
नजरेत मावत नव्हता
इतका प्रचंड परिसर राज्याच्या
निरनिराळया भागातून आलेल्या
दिंड्या एकत्रित होतात.
कोणाची दिंडी बैल गाडीवरून तर
कोणाची दिंडी खास बनवलेल्या
मोठं मोठया रथातून .
काहींच्या ट्रॅक्टर मधून.
लॉरी मधून येतात.
या ठिकाणी मात्र विस्कळीत
पणा जाणवायला लागतो.
विचार करा ५ लाखाहून
अधिक वारकरी त्यांची वाहने
सरकारने वारकरी मंडळींसाठी
पाण्याने भरलेले हजारोंच्या
संख्ये मध्ये मोजता येतील
इतके टँकर.
कोलाहल तर होणारच.
या संधीचा फायदा घेणाऱ्या भुरट्या लोकांनी केलेली गर्दी!
डोक्याचे पारणे फिटले.
वारी मध्ये जसा “रिंगण सोहोळा” हा आकर्षणाचा भाग असतो पण तो सबंध वारीत दोनदाच असतो.
हा खेळ नसून माउलीला वंदना असते.
“फुगडी” हा खेळ म्हणा
किंवा माउलीला वंदना. पण नेहमी जसा खेळला जातो तसाच
खेळायचा असतो आणि
तितकाच खूप धमाल
करणाराही असतो.
कोणीही दोघे मग दोन्ही
बाया वा बापडये
एक बाई एक पुरुष
एक तरुण
दुसरा म्हातारा /म्हातारी
अक्षरशः ना वयाचे ना लिंगभेद.
वाचकांना माझी खास विंनती
आहे मी लिहिलेले सर्व सोहोळे
U Tube वर उपलब्ध आहेत, ते अवश्य पहा.
चला आता पुन्हा एकदा
वारीचा शेवटचा टप्प्यावर जाऊ.
लाखोंनी जमलेल्या वारकऱ्यांच्या
कोलाहलात कोठे झोपायचे,
झोप तरी कशी लागणार आणि पुन्हा सकाळी उठून पंढरी गाठायची.
फक्त चार का पाचच मैल चालायचे होते.
इतक्यात आमचे सामान
ज्या लॉरीमध्ये होते त्याचा
चालक आम्हा उभयता समोर आला आणि म्हणाला
माऊली गेले चार पाच दिवस मी
तुम्हाला बघतोय ताई तू तर
बॉब कट वाली म्हणून बोलायला
जीभ धजावत नव्हती पण ठरवले
विचारायचे ( ३०/३५ ) वयाचा
काय विचारायचे ?
तुमची पहिलीच वारी ?
असं का वाटलं तुला ?
सांगू राग नाही येणार ना ?
माऊली तुमच्या दोघांच्या
पायातून थोडं थोडं रक्त व्हातेय.
वारीच्या दुसऱ्याच
दिवशी आम्हाला याची जाण
झाली होती पण प्रथमोपचार पेटी
बरोबर काही औषधें गोळ्या
बिस्किटे लिम्लेटच्या गोळ्यांचा
साठा ही होता. रात्री झोपायच्या
आधी सर्व जखमा पुसून मलम
वगैरे लावून गाडी ढकलत होतो.
वाचकहो
एक धडा त्या वाहन चालकाने आम्हाला शिकवला.
वारकरी वारीची तयारी
एप्रिल वा मे पासूनच करतो.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे
एक नवी कोरी चामड्याची
चप्पल खरेदी करायची.
चपलेचा तळवा सुध्धा जाडजूड
टाचा सुध्धा एकसंघ चामडे
वापरून बनवलेला असावा.
बनवून देणाऱ्यांना
सांगायचे मला वारी साठीचे
पायतान हवे.
रोज थोडे थोडे गोडेतेल
घालून चालायला मऊ मऊ
वाटली पाहिजे. काही दिवस
थोडे थोडे चालले की मग कायबी
वांदा नाय.
मग म्हणाला तुमचा माझ्यावर
विश्वास असला तर माझ्या बरोबर
माझ्या सासुरवाडीला रात्र काढू.
पहाटे लवकर अंघोळीपांघोळी
उरकू. नास्ताही होईल आणि
दिंडीला सुरुवात व्हायच्या आत
परत येऊ. हवेतर दिंडीच्या मालकाची परवानगी घेऊ.
तू थांब मी घेते परवानगी.
थांबला बिचारालस घेऊन दिंडी
चालकांसमोर उभी राहिली.
बघा काका, आम्ही परदेशी बरोबर
त्याच्या सासुरवाडीला जातोय
सकाळी दिंडी निघायच्या आत
हजर !
संचालक कावरा बावरा झाला.
केळकर काकांना बोलावले.
संचालकाने त्याना विचारले
काय करू ?
केळकर म्हणाले
तुम्ही नाही म्हणालात तरी
ती जाणारच.
मग जाऊ द्या माझी जबाबदारी.
गाडीचालकाचे नाव होते परदेशी. आधीही तो वारीला
यांची सोबत करत होता.
वाखरी पासून जवळच
कऱ्हाड नाका म्हणून एक
ठिकाण आहे. १५ मिनिटात
पोचलो. जावई येणार म्हणून
साग्रसंगीत तयारी होती.
आमची ओळख करून दिली .
थोडया गप्पा झाल्या आणि जेवण करून झोपले .
घर स्वताच्या मालकीचे होते. नीटनेटके.पडल्यापडल्या गाढ झोपली.
सकाळी स्नान नास्ता करून
वेळेच्या आत तयार.
संचालक वाटच उभे होते.
आम्हाला समोर उभे बघून
सौ ला दोन्हीहातानी अगदी
कोपरापासून नमस्कार केला.
पाठी केळकर उभे होते.
करनेका तो करनेका
डरनेका नाय !
नवमीच्या रात्री वाखरीला आलेली दिंडी दुसऱ्या दिवशी
सकाळी म्हणजे दशमीला दुपारी
बाराच्या सुमारास पंढरपूर
येथे दाखल झाली.
एका वाडयात
आमची सोय केली होती.
वाडा जुनाच होता.
पण फक्त दोन रात्रीचा
तर प्रश्न होता.
दुपारी जेवण झाल्यावर
ज्या कोणाला
काही खरेदी करण्यासाठी जायचे
असेल त्यानी खरेदी वगैरे करून
संध्याकाळी सातच्या आत परतावे .
कोणाला श्री विठ्ठलाच्या
मूर्ती तर कोणाला टाळ चिपळ्या,
तुळशीची माळ ,
सोलापुरी चादरी आणि
घोंगड्या स्वस्त पण मस्त होत्या.
सौ ने फक्त हळद आणि कुंकू घेतले. मंदिराच्या परिसरात
एक पेढ्याचे दुकान होते.
खूप प्रसिद्ध आहे म्हणून
केळकरकाकांनी सांगितले.
म्हणून एक किलो घेतले.
सातच्या आत परत.
जेवणे झाली आणि
दुसऱ्या दिवशीचा ( एकादशी )
कार्यक्रम नीट समजावून सांगितला.
वारकऱ्याने स्वतःच्या
जबाबदारीने चंद्रभागा नदीत
स्नान करून परत यावे.
कपडे धुण्याच्या भानगडीत पडू नका.
जे वारकरी जुने आहेत
त्यांनी जमेल तशी मदत
नव्याने जे वारकरी
आपल्या दिंडीत आले
त्यांना करा .आजच्या दिवशी
नदीपात्रात भरपूर पाणी सोडलेले
असते .धक्काबुक्की ही मोठ्या
प्रमाणात होत असते .
म्हणून शक्यतो
आठ आठ दहा दहा जणांनी
एकमेकांच्या कमरेला घट्ट धरून
राहत जा.
नव्याने आलेल्यानी
विशेष काळजी घ्यावी.
सांगणाऱ्या माऊलीचा
रोख बॉबकटवाली कडे होता.
सकाळी सांगितल्याप्रमाणे
एक एक गट नदीकडे
जाण्यासाठी वाड्याच्या बाहेर
आला अणि जे काही डोळ्यांनी
बघितले, अहो डोळे अक्षरशः
विस्फारले. आम्ही सात जणांचा
गट केला होता.
मध्यभागी बॉंबकटवाली.
तिच्या डाव्या उजव्या हाताला तीन.
एकच पर्याय .
एकतर सामील व्हा. नाहीतर माघारी.
बॉंबकटवाल्या सौ कडे
कटाक्ष टाकला आणि तिच्या
स्वभावानुसार
अभि नही तो कभी नही
माऊली आहे ना चला
तीस वर्षे लग्नाला झाली
होती एकमेकांना प्रत्येकाची
नस नस गवसली होती
वाचकहो आयुष्यात
आषाढी एकादशीला चंद्र भागेत
स्नान करायला काय काय सहन
करावे लागते, जाऊ द्या.
गेले पाच दिवस वारीत
शिस्त काय असते हे बघीतले होतं.
खूप कौतूक वाटायचे
साऱ्या वारकऱ्यांच्या गुणांचे .
एकमेकांना आदराने साद घालायची. भांडण नाही तंटे नाही.
पण स्नानाच्या दिवधी ही सारी
शिस्त कोलमडून पडते .
प्रचंड प्रमाणात धक्काबुक्की .
या गर्दीचा गैर फायदा घेणारे
यांचा सुळसुळाट
आम्हाला खूप असह्य होऊ लागला. मग ठरवले लवकर स्नान करून
माघारी फिरू.
पात्रात ही तीच धक्काबुक्की
कोणी कोणालाही स्नान घालतोय .
ही गोष्ट मला तरी खटकली.
इलाज नव्हता.
कसे बसे स्नान उरकले आणि
एकमेकांना घट्ट धरून परत आलो.
तसेच ओलेत्याने मुक्कामाच्या
ठिकाणी परत आलो.
कोरडे कपडे परिधान करून
केळकर काकांना घेऊन
नामदेवांच्या पायरीचे आणि
विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन
घेण्यासाठी बाहेर पडलो .
कळसाचे दर्शनासाठी सुध्धा खूप
कष्ट करावे लागले कारण
जितक्या जवळून दर्शन मिळेल
तितके पुण्य अधिक असे म्हणतात.
तीच कथा नामदेवांच्या पायरी बद्दल. काही सेकंद जरी
नतमस्तक होता आले तरी
वारी सफल झाली असे मानायचे.
हे सर्व करण्याला
जवळजवळ चार तास गेले .
खेटून खेटूनच रांग असते .
मग श्री ताकपिठ्या विठोबाचे दर्शन हे ही दुरूनच मिळाले. दिवसभरात दोन तीनवेळा चहा.
बस घरी आलो आणि
फराळ केला .मग मात्र मी आडवाच झालो. पत्नी पायावर हात फिरवीत बसली .
संध्याकाळी नेहमी प्रमाणे
भजन कीर्तन यांचा कार्यक्रम
झाला. आज वारीची सांगता
म्हणून जर कोणाला भक्ती संगीत
म्हणायचे असेल तर मुभा दिली.
पत्नीने माझ्याकडे बघत
नजरने विचारले, मी गाऊ का ?
माझ्या छातीत धडधड वाढली. कारण सिनेमातली गाणी
ती छान गायची.
मी पण खांदे उडवीत म्हणालो
तुझी इछा !
आणि अचानकपणे बोल
कानावर पडले
सावळ्या विठ्ठला
तुझ्या दारी आले
विसरोनी गेले देहभान
पूर्ण समाधि अवस्थेतील
तिचे हे गीत कधी सम्पले
हे कळलेच नाही.
भाविकांनी टाळ्या न वाजवता
टाळ वाजवून दाद दिली आणि माझा जीव भांड्यात पडला.
रात्रीचा मुक्काम करून
दुसरे दिवशी नास्ता चहा
आणि एकमेकांचा निरोप घेऊन
पुन्हा पंढरपूरहून म्हसवडला आलो.
श्री सुधीर पाठक यांच्याकडे रात्रीचे जेवण व मुक्काम केला.
दुसरे दिवशी सकाळी
म्हसवड ते ठाणे या एसटी बसने ठाणे. नन्तर ठाणे ते डोंबिवली रेल्वे
असा प्रवास करून
आमच्या पूर्वा सोसायटीच्या
आवारात शिरलो .
बाल्कनीकडे बघितले.
मुलगा आणि सून वाट
पहातच होते
अशी करवून घेतली वारी.
नेमकी विठ्ठलाने का,
माझ्या रुक्मिणीने ?
आज ती सोबत नाही.
जाताना म्हणाली,
मला काही नको .
बरोबर फक्त हे कुंकू घेऊन जातेय.
बोलता बोलता
पहिल्या आणि एकमेव वारीला बरोबर २५ वर्षे झाली.
रौप्य महोत्सवी वर्ष !
– लेखन : प्रकाश पळशीकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.
वाचनीय अनुभव…. प्रत्यक्ष वारीतच आम्ही तुमच्या बरोबर आहोत असं वाटलं