दोस्तांनो, काळाचा पडदा पुनःश्च जरासा मागच्या व्यासपीठावर उठवूत. आणि हे काय चक्क दरदरीत घामाने अस्वस्थता वाढून अचानक मृत्यूच ! ‘स्विटींग सीकनेस‘ उर्फ ‘इंग्लीश स्विटींग सीकनेस’ ज्याला लॅटीन भाषेत ‘सुडोर अँग्लीकस‘ असे संबोधले जाते हा एक अनाकलनीय रोग इसवीसन १४८५ साली इंग्लंडमधे आणि त्यानंतर युरोपात पसरला होता.
या रोगाची लक्षणं दिसल्यानंतर अवघ्या काही तासातच बाधित व्यक्तीचा मृत्यू होत असे. इतर महामारी आणि संसर्गजन्य रोगांपेक्षा हा काहीसा वेगळा रोग होता ज्याचा प्रादूर्भाव शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात जास्त प्रभावी आणि घातक ठरलेला होता. यामागचे नेमके कारण उमगलेले नसले तरीही हंता व्हायरस मुळे हा जीवघेणा रोग पसरला असावा असे अभ्यासक सांगतात.
१५५१ साली श्रेव्सबरी येथे जेव्हा स्विटींग सिकनेसचा उद्रेक वाढला होता त्यावेळी डॉ. जॉन कैस यांनी लिहीलेले ‘अ बोक ऑर कौंसील अगेंस्ट दि डिसीज कॉमनली कॉल्ड दि स्विट ऑर स्विटींग सिकनेस’ हे या रोगाचे एक महत्वाचे लिखीत स्वरुपातील ऐतिहासिक स्त्रोत आहे. या रोगात सुरवातीस बेचैनी वाढायची. त्यानंतर थंडीने हुडहुडी भरणे, चक्कर येणे, डोक, गळा, खांदे, हातपाय तिव्र दुखू लागणे आणि जवळपास अर्धा तास ते तीन तास थंडीने पछाडल्यानंतर दरदरून घाम येणे अशी विचीत्र लक्षणे दिसून यायची. कोणत्याही कारणा शिवाय घाम फुटायचा आणि खूप तहान लागल्यागत व्हायचे. कैस यांच्या मते बाधित शेवटी एकतर पूर्णतः थकून गळून जायचा अथवा त्याला रोकता न येणारी झोप यायची.
१४८५ सालच्या पहिल्या उद्रेकाच्या वेळी डॉ थॉमस फॉरेस्टीअर यांनी देखील या रोगावर संशोधन केल्याचे काही लिखीत पुरावे आहेत. त्यानुसार हृदय आणि फुफ्फुसाभोवती एक बाष्प तयार व्हायचे ज्यामुळे पुढील लक्षणे दिसून यायची. मात्र या रोगामागचे नेमके कारण हे अद्याप देखील एक गुढच आहे.
तत्कालिन शेतकरी या रोगाला ‘स्टप गॅलंट‘ असेही संबोधतात कारण त्यांच्या मते ही श्रीमंतांना होणारी बाधा होती. बॉसवर्थ फिल्डच्या युध्दात या रोगाचा प्रादूर्भाव वाढल्याचे आढळते ज्यात बरेच सैन्य या रोगाचे बळी पडले असावे असा अंदाज आहे. ज्यात २ लॉर्ड मेअर्स, ६ लोकप्रतिनिधी आणि ३ शेरीफ्स यांचा समावेश आहे. तत्कालिन लंडनच्या नागरीकांनी अनुभवले की हेन्ऱी सातवा याच्या राज्याभिषेका दरम्यान या रोगाचा उद्रेक वाढलेला होता.
हेन्ऱी सातवा याचा मुलगा आर्थर, प्रिन्स ऑफ वेल्स, आर्थरची पत्नी कॉथेराईन या राजघराण्यातील व्यक्तींचा या रोगाने घात केला. प्रिन्स आर्थरचा या रोगात अंत झाला त्यावेळी त्याच्या विवाहाला अवघे ५ महिने झालेले होते. हेन्री ब्रँडन ही सफॉक ची दुसरी ड्युक हिचा मृत्यू देखील याच रोगाने झाला आणि मन हेलावणारी बाब म्हणजे हेन्रीचा भाऊ चार्ल्स जो सफॉकचा तिसरा ड्युक होता त्याचा मृत्यू बहिणीच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासातच झाला.
या रोगाची सन १५२०-३० दरम्यान आलेली चवथी लाट भयंकर ठरली ज्यात मृत्यू दर देखील वाढलेला होता. राजा हेन्री आठवा याने कोर्ट बंद करून लंडन शहर सोडून तो आपले निवासस्थान बदलत होता. त्याची मिसट्रेस अॅन बोनियन हिला लिहिलेल्या प्रेमपत्रांमधून अॅनला देखील या रोगाने ग्रासल्याचे समजते. मात्र राजाने विशेष वैद्य धाडून अॅनचा जीव वाचविला आणि आपले प्रेम सिध्द केल्याचे इतिहास सांगतो. या रोगाच्या अशा अनेक रोचक सत्य घटना आहेत ज्यावर कितीही लिहीले वाचले तरी कमीच.
असा हा अचानक जीव घेणारा रोग जेवढा रहस्यमय तेवढी त्याची कारण देखील गुढच. काही अभ्यासक याला घाणेरड्या सांडपाण्याचे कारण देतात तर काही अन्नातून होणाऱ्या विषबाधेचे. वॉर ऑफ रोजेस संपतांना हा रोग ऊवा-लिखांमुळे पसरला असावा असेही काहींचे मत आहे. हंता विषाणू आणि त्यांचा समूह हे देखील या रोगामागचे कारण असावे असा काहींचा तर्क आहे. या रोगाचा अंत देखील गुढच ठरला. इसवी सन १५५१ नंतर हा रोग कोणत्याही लसीकरण अथवा सर्वश्रुत उपचार पद्धतीशिवाय नाहीसा देखील झाला ! अशीच इडा पिडा आपसूक टळून जावी हिच प्रार्थना !

– लेखिका : तृप्ती काळे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800