कधी कधी आपणच आपली साथ करावी. एक वेगळीच तरल, अनुभूती मिळते. ती शब्दातित असते. तरीही अशी आलेली अनुभुती व्यक्त करतायत मूळच्या ठाणेकर पण गेली १६ वर्षे अमेरिकेतील लुईव्हील, केंटकी इथे राहणाऱ्या, मराठी साहित्य आणि लेखनाची आवड असणाऱ्या शिल्पा कुलकर्णी. एनएसटी परिवारात त्यांचं मनःपूर्वक स्वागत करू या……..
धूसर संध्याकाळ, आज तापमानही चांगलं होतं. म्हणजे फार थंड नाही. फार उत्तमही नाही. पण तरीही बाहेर पडले. म्हटलं आज जरा फिरून येउ या. आजच रागांवर आधारीत सर्व जुन्या गाण्यांचा आकाशवाणी वरील एक कार्यक्रम कोणीतरी पाठवला होता. नशिबाने हेडफोन्सही सापडले.😀 पायात बूट, कानात हेडफोन्स घालून मस्त फिरायला बाहेर पडले.
आकाश ढगाळलेलं तरीही निळशार होतं. सूर्यकिरण नसले तरी भरपूर प्रकाश होता. सुखद गारवा अंगाशी लगट करत होता. गाण्याची एक एक सुरावट तरंगांसारखी हळूवारपणे कानात झिरपत होती. लताचा स्वर्गीय सूर कानात रूणझूणत होता. लता मग रफी मग किशोर … अहाहा !
अवीट माधूर्य याहून काय असावं !
स्वरलहरींच्या नादात मी आपल्याच तंद्रीत चालत होते. सुरावटींवर चक्क हातवारे करत समेवर जोरात ताल देत मस्त रमतगमत चालले होते. आज अगदी सारं लक्ष गाण्याकडे देउन ऐकत होते. तेरे सूर और मेरे गीत …. वाह ! .. मधूर आवाज, अर्थपूर्ण शब्द .. , साजेसं संगीत .. एक अनोखं विश्वच मन:पटलांसमोर साकारत होतं.
आज किती जागा नव्याने जाणवत होत्या. माधूर्याची साखर काकणभर जास्तच वाटत होती. निळभोर आकाश, सुखद गारवा, अवीट गोड गाणी सारा माहौल अगदी जमला होता. चालण्याने अंगात नवा उत्साह भरत होता. कित्येक दिवसांच्या कोंडलेपणानंतर आज मनाजोगता विहार करता येत होता.
गाण्यांच्या सुरावटीबरोबरच पक्षांचा मंजूळ किलबिलाटही कानी पडत होता. पाखरेही आज आनंदाने विहरत होती. कित्ती दिवस बिचारी तीही बर्फात गोठली होती. आज कुठे त्यांना मोकळीक मिळाली होती. समोर पहाते तो २/४ रॅाबिन पक्षी झर्रकन उडत गेले. एक गिरकी घेउन थोड्याशा हिरव्या गवतावर बसून आपल्या पिवळ्या चोचींनी किडे, दाणे शोधत होते. असं म्हणतात पाखरं गवतावर आली म्हणजे पाउस येणार. बघू उद्याची चिंता करून आजची सुवर्णसंधी वाया कशाला घालवायची ? माणसाचं असंच असतं सगळं छान असलं तरी ते अनुभवायचं सोडून नको त्या गोष्टींची चिंता विनाकारण करत बसायची लोचट सवय आपल्याला जडलेली असते. असो ..
आज किती गोष्टींकडे नव्याने लक्ष जात होतं. आमच्या घरापासून चार पाच घरं सोडून काही मुलं खेळत होती. तीही पाखरंच, क्षणात इथे, क्षणात तिथे मनमुराद विहरत होती. हास्यलकेरी झरत होत्या. त्यांना पाहूनही मनाचा सारा शीण निघून जात होता. पाखरांची हिच तर गंमत आहे.
नेहमीचीच घरं, तोचं रस्ता, तीच झाडं पण आज सारं स्वर्गीय भासत होतं. कदाचित पूर्ण लक्ष देउन ती शांतता मी अनुभवत होते. दहा कामं एकात एक करत गाणी ऐकत नव्हते. त्यामूळेच कदाचित प्रत्येक गोष्टीला योग्य न्याय मिळत होता. तसा बरेचदा आपणं सगळ्यावर आणि स्वत:वरही अन्यायच करत असतो. नाही का ? 🤔
आज प्रकर्षाने जाणवलं अगदी आरपार .. प्रत्येकाने स्वत:शी स्वत:चा वेळ द्यायला पाहिजे. जे आवडेल, भावेल ते करावं. मन आनंदानं भरून जात की नाही पहा. रोजच्या धबडग्यात आपण असा वेळ कधीच काढत नाही. पण असा वेळ किती गरजेचा आहे हे आज अगदी आतून जाणवलं.ही निसर्गाची कमाल होती, लताच्या गाण्याची कि मनात ओतप्रोत भरलेल्या शांततेची . सांगता येत नाही. पण आजच्या अनुभवावरून एक मात्र नक्की प्रत्येकानी स्वत:साठी असा वेळ काढणं गरजेच आहे.
माझी एक मैत्रीण मध्यंतरी एकटीच स्पेन ट्रीप ला जाउन आली. तेव्हा मला ती कल्पना विचित्र वाटली होती पण आज त्याचा अर्थ थोडसा जाणवला. अर्थात घरा जवळ फिरायला जाणं आणि पूर्ण एकट्यानं नवीन देशात जाणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. पण दोघांच्या मूळाशी गरज एकच आहे. आपलाच आपल्याशी शांत संवाद होतो. बरेचदा अनेक मनसूबे आपण अर्धवट रचत असतो. ते अशा शांतवेळी अलगद काठावर येतात. आणि मग मनाची नाव अनेक नवीन किनारे धुंडाळू लागते. काहीवेळा अशावेळी असं काही गवसतं की एरव्ही कधी दिसतही नाही.
रोजच्या व्यवहारात आपण इतके गुरफटतो की कसली शांतता आणि कसला विचार ? असंख्य गोष्टी एकापाठोपाठ चालू असतात. फूरसत कुठे असते ? रहाटहाडगं चालूच राहतं. पण खर सांगायच तर ’its just 5 sec formula‘ केव्हातरी थोडे व्याप बाजूला ठेवून असं करणं नक्कीच शक्य आहे. आपल्याच भावनांचा निचरा करण्यासाठी हे खूपचं गरजेच आहे. असं केल्यावर मनाची जळमटं, किल्मिषं विरून जाउन स्वच्छ प्रकाश नक्की फाकेल. याची साक्ष द्यायला
फिटे अंधाराचे जाळे
झाले मोकळे आकाश
या गाण्याची सुरावट असेल तर सोन्याहून पिवळं नाही का ?

– लेखन : शिल्पा कुलकर्णी, लुईव्हील, केंटकी, अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ +91 9869484800
माझा मीच असताना माझी मीच निवांतपणे वाचताना मन आनंदुन गेले. अनेक वर्ष अमेरीकेत राहूनही शिल्पा ताईंचे मराठी भाषेवर इतके असीम प्रेम आणि अगदी ठेवणीतल्या शब्दांचा प्रचंड साठा जतन केल्याचा अभिमान वाटला. शब्द सुरांची सुरवट, व्यस्त दैनंदिनीचे रहाटहाडगे (आमच्याकडे त्यास रहाटगाडगे म्हणतात) सोन्याहून पिवळं सगळं काही लोभसवानं वाटलं. स्पेन दौरा एकटीने करणं जीवनाला सार्थक करुन एक नवी दिशा देणारे आवाहन आहे. प्रत्येकाने कधितरी स्वत:मधे हरवून गेले पाहिजे हा अनमोल संदेश अगदी सहजपणे दिला. खरंच मनस्वी अभिनंदन 👍👏👏👏👏👏🌹🙏
डॉ. रमेश वाघमारे
माझी मीच आवडले.
धन्यवाद ! 🙏🏻