Thursday, February 6, 2025
Homeलेखक्रांतिदिन : पडद्याआडचं नाट्य

क्रांतिदिन : पडद्याआडचं नाट्य

‘भारत छोडो’ अशी घोषणा महात्मा गांधीजीनी मुंबईच्या गवालिया टॅंक मैदानावरच्या सभेत ८ ऑगस्ट १९४२ रोजी दिली, तेव्हा ‘करेंगे या मरेंगे’ या निर्धाराने स्वातंत्र्याच्या लढ्याचे अंतिम पर्व सुरू झाले. त्या दिवशी पूर्ण दिवस महात्मा गांधींच्या बरोबर त्यांचे मसाजिस्ट जागतिक कीर्तीचे डॉ राम भोसले होते. घोषणांचा गदारोळ दिवसभर चालू होता. सभा संपल्यानंतर भावनांचा कल्लोळ गांधीजीना सहन होईनासा झाला.

डॉ भोसले यांनी सतत तीन तास मसाज करून गांधीजींच्या शरीरात भावनांच्या अतिरेकाने निर्माण झालेला दाह शांत केला. आपल्या शब्दाखातर लाखो लोक आयुष्याची होळी करून देण्यास तयार आहेत या  कल्पनेने गांधीजी अस्वस्थ झाले होते. या टप्प्यावर आपण एखादी चूक केल्यास त्याचे परिणाम किती विपरीत  होतील या विचाराने त्यांच्या मनात खळबळ माजली होती.  मनावर आलेला दबाव शरीरातून बाहेर पडू पाहत होता, हे जाणून त्यांच्यावर डॉ राम यांनी मसाज दिला.

डॉ राम भोसले यांची आजच्या पिढीला फारशी ओळख नसेल, पण स्वातंत्र्यपूर्व काळात ते महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल बॅरिस्टर आणि अन्य अशा त्यावेळच्या ज्येष्ठ नेत्यांचे, ब्रिटिश सरकारमधील अधिकाऱ्यांचे, संस्थानिक आणि देश-परदेशातील कितीतरी  व्यक्तींचे मसाज ख्यातकीर्त डॉक्टर म्हणून त्यांची प्रतिष्ठा फार मोठी होती.

डॉ राम भोसले

गवालिया टँक वर देशाला उद्देशून त्यांनी केलेल्या या प्रेरणादायी भाषणामुळे मुंबईत तेव्हा उपस्थित असलेले या लाखो लोकांना भारून टाकले होते.  एवढा मोठा समुदाय त्यांच्या प्रत्येक वाक्याला, प्रत्येक आवाहनाला, प्रत्येक शब्दालाच जणू  प्रतिसाद देत होता.  सतत घोषणा चालू होत्या.

अत्यंत कृश देह असलेले महात्माजी यांच्या मनात तेव्हा आणि नंतर देखील काय चालले असेल हे आत्ता कोणालाही सांगणे शक्य नाही.  पण डॉ राम यांना त्यांच्याशी खूप जवळीक होती. तीन तासाच्या सहवासात महात्माजींच्या मनात काय चालले असेल याचा फक्त त्यांनाच अंदाज होता

दुसऱ्या दिवशी महात्मा गांधी आणि हजारो काँग्रेस नेते, आणि  लाखो कार्यकर्ते यांची देशभर ठिकठिकाणी धरपकड झाली.  त्यांना तुरुंगात डांबले. देशात सर्वत्र ब्रिटिश विरोधी वातावरण होते.

या आधीपासूनच गांधीजींच्या बरोबर मुंबईत उपस्थित असणारे मोठमोठे नेते यांच्याशी डॉ भोसले यांचेही घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते.  गांधी बाबांच्या ब्रिटिश साम्राज्य विरोधी विचारांचा पगडा त्यांच्यावरदेखील पडला होता.  त्यामुळे त्यांनीही स्वातंत्र्य लढ्यात  उडी  घेतली.  पण त्यांनी वेगळा मार्ग पत्करला. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातारा सांगली परिसरामध्ये त्यांची क्रांतिकारकांची टोळी ब्रिटिश सरकार विरोधात कार्यरत होती.

डॉ भोसले यांचा जन्म सातारचा होता. बलदंड शरीर आणि प्रखर विचार यामुळे ब्रिटिशांच्या विरुद्ध गनिमी कावा आणि उघड दंड थोपटून उभे राहणे असे हे काहीसे संमिश्र प्रकरण होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मराठी स्त्री-पुरुषांना हाल हाल करून छळले होते त्यामुळे त्यांच्या मनात सूडाची आगही होती. एका पोलिस अधिकाऱ्याला बंदुकीच्या गोळीने त्यांनी ठार केले होते. त्यांच्या विरोधात अकरा वॉरंट होती. त्यांना पकडून देणाऱ्या साठी पन्नास हजार रुपयांचं बक्षीस पोलिसांनी जाहीर केले होते. डॉ भोसले त्यामुळे अज्ञातवासात फिरत राहिले.

मुंबईतील घरदार, कुटुंब, मित्रपरिवार, आणि  मोठी प्रॅक्टिस बाजूला ठेवून हिमालया मध्ये वास्तव्य करून ते राहिले.  देशभरातील पोलिसांनी जंग जंग पछाडले, पण ते सापडले नाहीत.

ते घरी परतले ते एकदम स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, देश स्वतंत्र झाल्यानंतर १९४७ मध्ये. त्यानंतर त्यांनी आपली प्रॅक्टिस परत सुरु केली.

ही सगळी माहिती आपल्याला मिळते ज्येष्ठ पत्रकार टाइम्स ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त स्पेशल करस्पाँडंट श्री दिलीप चावरे यांच्या ‘सिद्धहस्त’ या शीर्षकाच्या डॉ भोसले यांच्या चरित्राच्या चौथ्या आवृत्तीत.

पुस्तकाचे लेखक, दिलीप चावरे.

डॉ.भोसले अवलिया होते. अनेक क्षेत्रातले दिग्गज त्यांचे गुरु होते. वज्रेश्वरीचे नित्यानंद स्वामी यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली होती. परंतु इंग्लंड मधील विश्वविख्यात सर्जन सर हबर्ट बार्कर यांचे ते लाडके शिष्य होते. त्यांच्याकडे त्यांनी दोन वर्ष मसाज चे शिक्षण  घेतले. या खेरीज नृत्य, संगीत, गायन, अशा विविध क्षेत्रातील ज्येष्ठ  नामवंत त्यांचे गुरु होते.

भारता खेरीज तिबेट, चीन, आणि युरोप मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील  नामवंतांकडून त्यांनी उपचार पद्धती शिकून घेतल्या होत्या. आयुर्वेदातील चरकसंहिते  मधून त्यांनी ज्ञान आणि तंत्र प्राप्त केले होते.  त्यामुळे कोणतीही व्याधी असली तरी त्यांच्याकडे उपचार पद्धती तयार असायची.  त्यांच्याकडे अनुभवाचा, गप्पांचा, आणि अगदी विनोदाचा देखील मोठा खजिना असायचा. विविध क्षेत्रातील त्यांचे रुग्ण अनुभव सांगायचे ते अगदी थक्क करणारे आणि विश्वास बसणार नाहीत  असे असायचे. खूप आख्यायिका त्यांच्या भोवती तयार झाल्या होत्या. त्या हकीकतींची सत्यता पडताळण्यासाठी श्री  दिलीप चावरे डॉ राम यांच्या कडे  जाऊन बसायचे.  लिहिलेला मजकूर त्यांच्याकडून तपासून घ्यायचे अशा पद्धतीने चरित्रलेखन झाल्यामुळे त्यांच्या २२० पानी पुस्तकाला विश्वासार्हता प्राप्त झाली  आहे.

खरोखरच हे पुस्तक वाचून आपल्याला पडद्याआडची अनेक नाट्य पहायला मिळतात, हे निश्चित.

प्रा. डॉ. किरण ठाकुर

– लेखक : प्रा. डॉ. किरण ठाकूर, विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी