हिरवा हिरवा ऊन-पावसाचा खेळ
आता सुरू झाला
नाचत हासत गाजत
हिरवाकंच श्रावण आला
मनात फुलला सोन पावसाचा
जसा मखमली स्पर्श
आला जीवनी मधुगंध घेऊन
फुलला, रोमांचित झाला
आला श्रावण आला
आला हिरवा श्रावण आला..
सरीवर सरी अन् दरीवरही सरी
अन् अंगणात नाचली जशी सुंदर परी
आली सणांची मैफिलही, घाईगर्दी त्याची
येई सुख-समृद्धी घरोघरी
हुलकावण्या घाली, मनबावळी खरी
आली हिरवीगार श्रावणसरी …
हिरवाईच्या दूर-दूर वाटा
जशा सावलीच्या पाऊलवाटा
ऊन-पावसाचा लुपाछुपीचा
खेळ मला भासे, माझ्या सुख दुःखांचा
तरीही आनंदात स्वागत करू
जरी करकटी रुतला काटा
आला श्रावण आला, भिजूया श्रावण आला…
आसुसलेले डोळे
श्रावणाचा रंग टिपायला
अन् गात्रही शहारले
तो रोमांच स्पर्श हळुवार झेलायला
हातही सोडले मी हवेत, सज्ज झाले
मुक्तीचे सर्व पाश तोडायला
आला श्रावण आला, आला श्रावण आला…
माझ्या मनात लपलेला पाऊस
आकाशातून धबधब कोसळला
इंद्रधनुचे ते रंग आकाशी
उडले जसे उधाण माजायला
क्षितीजाची ती गवसणी
छेदूनी गेली नभाला
बघा कसा श्रावण आला
मिठीत घेतले धरतीला…
उन्हासवे ते हिरवे गाणे
पुन्हा पुन्हा मैफिलीत गुणगुणावे
पावसाचे रिमझिमणे
मदहोश मनाने टिपटिपावे
हर्ष मानसी श्रावण सरी
रंग रंगात मधुबन फुल फुलावे
झरझरणाऱ्या श्रावणाने त्याच्या
मिठीत मला सामावून घ्यावे
आला श्रावण आला
आला श्रावण आला…
श्रावणातल्या ऊन-पावसाचा खेळी
धुंद कराव्या तुझ्या माझ्या भेटी
हळूच तुझ्या स्पर्शाने
घट्ट होतील अमुच्या रेशीमगाठी
श्रावणाने तुझे माझे स्वप्न
हृदयातून फुलवावे, जसे एकरुप व्हावे
नवा इतिहास, नवी परिभाषा, नवी कल्पना
प्रेमाची समाजाला दाखवावे
आला श्रावण आला
स्वप्न घेवुनी नवे…
पिवळे पिवळे ऊन
अन् हिरवे हिरवे रान
पावसाला जरी रंग नसे
पण इंद्रधनू देई, सप्तरंगाचे दान
कानी गरजे सुश्राव्य गाणी
सृजन श्रावणाची ती, सुमधुर धुन
आला श्रावण आला
रंग घेवूनी हिरवे
माझ्या तुझ्या प्रेमाचे
कसे गडद गुलाबी रंग नवे
आला श्रावण आला
रंग घेऊनी नवे
माझे प्रेमाचे रंग हिरवे
– रचना : शिल्पा तगलपल्लेवार गंपावार, केमॅन आयलँड्स
खूप सुंदर मनभावन कविता